भूपिंदर सिंह: जगण्याचं भाग्य लाभलेला कलावंत

२६ जुलै २०२२

वाचन वेळ : ६ मिनिटं


प्रसिद्ध गायक भूपिंदर सिंह यांचं नुकतंच निधन झालं. ते स्वतः एक सुंदर, साधं, आनंदी, समाधानी आयुष्य जगले आणि रसिकांनाही आपल्या गायकी आणि संगीतामधून तेवढंच सुंदर असं काहीतरी देऊन गेले. त्यांनी गायलेली बहुतेक सर्व गाणी रसिकांना एका वेगळ्याच विश्‍वात घेऊन जातात. भूपेंद्र हे काळाबरोबर राहणारे कलाकार होते. आपण पाहिलेल्या सुवर्णकाळावर त्यांचं प्रचंड प्रेम होतं.

‘तुम्हारे आवाज का अगर तावीज बन सकता तो मैं जरूर बनाके पहन लेता।‘ हे उद‍्गार आहेत विख्यात कवी-दिग्दर्शक गुलजार यांचे आणि ज्यांच्याबद्दल हा भाव व्यक्‍त केला आहे, ते म्हणजे विख्यात गायक भूपिंदर सिंह. सर्वसामान्यांच्या मनातले भाव ओळखण्याचं सामर्थ्य गुलजारांकडे आहे. म्हणूनच तुमच्या आमच्या मनात बसलेल्या भूपेंद्र यांच्या आवाजाला गुलजारांनी थेट तावीजमधे नेऊन ठेवलं होतं.

भूपेंद्र स्वतः एक सुंदर, साधं, आनंदी, समाधानी आयुष्य जगले आणि रसिकांनाही आपल्या गायकी आणि संगीतामधून तेवढंच सुंदर असं काहीतरी देऊन गेले. गीतकारानं लिहिलेले शब्द स्वतः जगण्याचं भाग्य लाभलेल्या काही मोजक्या कलावंतांपैकी ते एक होते.

‘नाम गुम जायेगा
चेहरा ये बदल जायेगा
मेरी आवाजही पहचान है
गर याद रहे’

सूरसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा दैवी स्वर सोबत असूनही भूपेंद्र संगीत रसिकांच्या लक्षात राहिले आणि हे गाणं कानी पडलं की, या आवाजाची ओळख आपोआपच पटायची.

बालपणातच वाद्य शिकले

अमृतसर-नवी दिल्ली-मुंबई असा त्रिवेणी प्रवास करत भूपेंद्रजींची कारकीर्द घडली. त्या काळात जे सर्वसामान्य घरांमधे घडायचं, तेच भूपेंद्र यांच्या घरातही घडलं. भूपेंद्र यांचे वडील नाथा सिंग हे अमृतसरमधल्या एका कॉलेजमधे संगीताचे प्राध्यापक होते. त्यामुळे भूपेंद्र यांना खेळण्या-बागडण्याच्या वयातही संगीताची आराधना करावी लागली. अर्थातच भविष्याच्या द‍ृष्टीनं ती त्यांना फलदायी ठरली.

नाथा सिंह हे स्वतः चांगले सूफी गायक. शास्त्रीय संगीताची त्यांना जाण होती. मेंडोलिन, सारंगी, सतार, दिलरूबा, तबला, हार्मोनियम एवढी सगळी वाद्यं त्यांनी आपल्या घरी जमवली होती की, एखादी लायब्ररीच तिथं सुरू करता आली असती. छोट्या भूपेंद्रला या लायब्ररीचा लाभ झाला.

नाथा सिंग हे कडक शिस्तीचे असले तरी भूपेंद्रला त्यांनी या वाद्यांसाठी कसलंही बंधन घातलेलं नव्हतं. कोणतंही वाद्य तो कधीही वाजवू शकत होता. म्हणूनच अवघ्या सहाव्या-सातव्या वर्षी भूपेंद्र ही सर्व वाद्यं केवळ शिकले नाहीत, तर ती सर्व त्यांना वश झाली.

हेही वाचा: प्रभाकर कारेकरांच्या गायकीवर खुद्द दिलीपकुमारही फिदा असायचे

नायक बनायची सुरवात

यथावकाश नवी दिल्लीला ‘ऑल इंडिया रेडिओ’मधे त्यांनी काम सुरू केलं. इथंही जेवणाच्या १ ते २ या वेळेत इतर लोक जेवत असताना भूपेंद्रजी विविध वाद्यांबरोबर सराव करत असत. ते पाहून रेडिओ केंद्रामधल्या इंजिनिअर मंडळींची तिथं गर्दी व्हायची. प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक मदन मोहन यांचं या केंद्रात एकदा येणं झालं आणि भूपेंद्रजींचं संगीताचं ज्ञान आणि त्यांच्या आवाजातली एक गझल ऐकून ते चाट पडले. तिथून निघताना मदन मोहननी भूपेंद्रना थेट चेतन आनंद यांच्या ‘हकिकत’ सिनेमात पार्श्‍वगायनाची ऑफर देऊन मुंबईत निमंत्रित केलं.

‘होके मजबूर उसने बुलाया होगा’ हे ते अजरामर गीत! विशेष म्हणजे महम्मद रफी, तलत मेहमूद आणि मन्‍ना डे यासारख्या दिग्गज गायकांबरोबर भूपेंद्रना हे गाणं गाण्याची संधी मिळाली. हे गाणं खूपच गाजलं. त्या काळात हिंदी सिनेमात पार्श्‍वगायन क्षेत्रावर रफी, मन्‍ना डे, तलत मेहमूद यांच्यासारख्या दिग्गज गायकांचा प्रभाव होता. आपल्याला त्यांच्याप्रमाणे गाता येईल की नाही, याची भूपेंद्रना भीती होती. त्यामुळेच आपली डाळ इथं शिजणं कठीण आहे, अशी भीती वाटून भूपेंद्र पुन्हा दिल्लीला निघून गेले.

पुढे ‘हकिकत’चेच दिग्दर्शक चेतन आनंद यांनी त्यांना पुन्हा मुंबईत बोलावून घेतलं. त्यावेळी ते ‘आखरी खत’ सिनेमाची निर्मिती करत होते. खरं तर भूपेंद्र यांना नायक म्हणून या सिनेमात घेण्याची त्यांची इच्छा होती. भूपेंद्र यांचं व्यक्‍तिमत्त्व आणि त्यांच्या मखमली आवाजाची चेतन यांना इतकी भुरळ पडली होती. भूपेंद्र यांची ‘सिंगिंग हिरो’ अशी प्रतिमा बनू शकते, असं चेतनजींना वाटत होतं. पण, भूपेंद्र नायक बनायला काही तयार नव्हते. अखेर आनंद यांच्या आग्रहाखातर त्यांनी या सिनेमासाठी ‘रूत जवां जवां, रात मेहरबान’ हे आपलं पहिलं ‘सोलो’ गीत गायलं.

कैफी आझमी यांनी लिहिलेलं, खय्याम यांनी संगीतबद्ध केलेलं हे गाणं भूपेंद्र यांच्यावरच चित्रित झालं होतं. अशा प्रकारे भूपेंद्र हे नायक बनायला तयार झाले नसले तरी चेतन आनंदनी त्यांना गाण्याच्या रूपानं रुपेरी पडद्यावर आणलंच. मात्र कॅमेर्‍याला सामोरं जाण्याची कृती भूपेंद्रना फारशी भावली नाही. त्यांनी पुन्हा एकदा दिल्लीचा रस्ता धरला. या क्षेत्रात त्यांना त्यावेळी कोणी चांगलं मार्गदर्शन करणारेही भेटले नाहीत. हिंदी सिनेसृष्टीला गायक आणि अभिनय या दोन्ही गोष्टी करणारा एक चांगला अभिनेता मिळाला असता.

आरडींसोबत गट्टी जमली

भूपेंद्र यांच्या आयुष्याला आणखी एक निर्णायक वळण मिळालं, ते संगीतकार आर. डी. बर्मन यांच्या भेटीमुळे. १९६९ला आरडींच्या खार इथल्या घरी हे दोघे पहिल्यांदा भेटले. पहिलीच भेट अशी झाली की, या दोघांचं जन्मजन्मांतराचं नातं असावं. अगदी ‘लव ऍट फस्ट साइट!’ त्यापूर्वी आरडींचा ‘छोटे नवाब’ हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. त्यामुळे या माणसामधली गुणवत्ता भूपेंद्रना कळली होती. तसंच आरडींनाही भूपेंद्रमधला गायक-वादक चांगलाच उमगला होता. इथून सुरू झालं ते या दोघांच्या मैत्रीचं आणि अप्रतिम सुरावटींचं एक वेगळंच पर्व.

भूपेंद्रना गिटार तर येतच होती. मुंबईत आल्यावर ते स्पॅनिश गिटार शिकले आणि आरडींच्या संगीत दिग्दर्शनाखाली त्यांनी अनेक सुपरहिट आणि सदाबहार गाणी दिली. अमर प्रेम सिनेमातलं ‘चिंगारी कोई भडके’, सत्ते पे सत्तातलं ‘प्यार हमें किस मोड पे ले आया’, यादों की बारातमधलं ‘चुरा लिया है’, हंसते जख्म सिनेमातलं ‘तुम जो मिल गये हो’ ही ती गाणी.

‘दम मारो दम’साठी खुद्द देव आनंदच्या तोंडून या गाण्याची सिच्युएशन ऐकल्यानंतर भूपेंद्र भारावून गेले आणि त्यानंतर या गाण्यात त्यांनी आपल्या गिटारवादनाची जी कमाल केली, ती अजरामर ठरली. आर. डी. बर्मन यांच्याबरोबर भूपेंद्र या काळात एवढं काम करायचे की, त्यांना इतर संगीतकारांबरोबर काम करायला वेळच मिळायचा नाही. मदनमोहन, नौशाद, जयदेव, खय्याम यासारख्या दिग्गजांबरोबर त्यांना मोजकीच गाणी करता आली. अगदी बप्पी लाहिरीसारख्या उडत्या चालींसाठी प्रसिद्ध असणार्‍या संगीतकाराबरोबरदेखील त्यांनी ‘किसी नजर को तेरा’ यासारखं वेगळं गाणं दिलं.

हेही वाचा: आशाताई जेव्हा रहमानसाठी गातात

मोजकीच गाणी वाट्याला आली

भूपेंद्र यांच्या आवाजाचा पोत वेगळा होता. तसंच त्या काळातले नायक पाहता, भूपेंद्र यांचा आवाज त्यांना रुळायला वेळ लागला. म्हणूनच भूपेंद्र हे पार्श्‍वगायनामधे फार काळ रमले नाहीत. तसंच कोणाकडे काम मागायला जाणं, हा त्यांचा स्वभाव नव्हता.

पार्श्‍वगायनासाठी जी काही ‘फिल्डिंग’ लावावी लागते, ती लावण्याची त्यांची मानसिकता नव्हती. आपण काय वाट्टेल ते करून खूप मोठा गायक बनावं, अशीही त्यांची महत्त्वाकांक्षा नव्हती. जे मिळेल, त्यात ते आनंदी आणि समाधानी होते. त्यामुळेच या काळात जी मोजकीच गाणी त्यांच्या वाट्याला आली, त्याचं त्यांनी सोनं केलं.

भूपेंद्र यांच्या गायकीच्या काळात संगीत क्षेत्रावर लक्ष्मीकांत-प्यारेलाल आणि कल्याणजी-आनंदजी यांचं मोठं वर्चस्व होतं. या दोघांकडे भूपेंद्र खूप कमी गायले आहेत. ती संख्या थोडी अधिक असती तर रसिकांना एक वेगळेच भूपेंद्र अनुभवायला मिळाले असते.

‘मंजिले और भी है’ या सिनेमाला संगीतही त्यांनी या काळात दिलं. पण, सेन्सॉरच्या कात्रीमुळे या सिनेमाची अशी काही वाताहात झाली की, भूपेंद्र यांना सिनेमाला संगीत देण्यातही रस उरला नाही. पण भूपेंद्र हे एवढे प्रतिभावान कलावंत होते की, एक दरवाजा बंद झाला की आपोआप दुसरा त्यांच्यासाठी उघडायचा.

काळाबरोबर राहणारा कलाकार

१९८०च्या दशकात ते गझलगायकीकडे वळले आणि तिथंही त्यांनी आपला ठसा उमटवला. आपल्यात दडलेल्या संगीतकाराला त्यांनी गझलमधून व्यक्‍त केलं. अनेक दिग्गज शायरच्या गझल भूपेंद्र यांनी लोकप्रिय केल्या. ‘एक अकेला इस शहरमें’ हे भूपेंद्र यांचं गाणं कालांतरानं लोकगीत झालं. खेडेगावातून शहरांमधे संघर्ष करायला येणार्‍या प्रत्येकाचं ते जीवनगाणं झालं. तीच गोष्ट ‘किसी नजर को तेरा’ या गाण्याची.

भूपेंद्र हे काळाबरोबर राहणारे कलाकार होते. आपण पाहिलेल्या सुवर्णकाळावर त्यांचं प्रचंड प्रेम होतं. अभिमानही होता. नवीन पिढीबरोबरही त्यांनी जुळवून घेतलं. त्याचाच पुरावा म्हणजे शमीर टंडनच्या संगीत दिग्दर्शनाखाली त्यांनी गायलेलं ‘न जिस दिन तेरी मेरी बात होती है’ हे ‘ट्रॅफिक सिग्‍नल’ सिनेमातलं गाणं. कोणत्याही वेळी, काळी हे गाणं ऐकलं तरी भूपेंद्र यांचा आवाज आपल्याला झपाटून टाकतो. केवळ हे एकच गाणं नाही, तर त्यांची गाजलेली बहुतेक सर्व गाणी रसिकांना एका वेगळ्याच विश्‍वात घेऊन जातात.

हेही वाचा: 

प्रति परमेश्वर सुपरस्टारला कोणी विचारत नाही तेव्हा

गिरीश कर्नाड: भारतीय कलासंस्कृतीचा अस्सल प्रतिनिधी

लतादीदींनी मुजरा गाण्यासाठी होकार दिला, कारण खय्याम

शाहिरांनी महाराष्ट्राचा इतिहास फक्त गायला नाही तर घडवलायही

आवाजाइतकीच रसरशीत आशा भोसलेंची जग गाजवणारी रेस्टॉरंट

(दैनिक पुढारीच्या बहार पुरवणीतून साभार)