सध्या पंडित नेहरू आणि सरदार पटेल यांना आमनेसामने उभं करून वाद घातला जातोय. स्टॅच्यू ऑफ युनिटीने तर या वादात तेलच ओतलंय. खरंच त्यांच्यात वाद होते का? गांधीजींनीही त्यांच्यावर अन्याय केला का? या सगळ्याविषयी गांधी विचारांचे अभ्यासक तुषार गांधी यांनी पुण्यातल्या एका कार्यक्रमात विचार मांडलेत. त्यांच्या भाषणातले हे महत्त्वाचे मुद्दे.
कार्यक्रमः जन सहयोग ट्रस्ट आयोजित व्याख्यान
ठिकाणः एस एम जोशी सोशलिस्ट फाउंडेशन, नवी पेठ, पुणे
वेळः १५ डिसेंबर, संध्याकाळी ६ वाजता
वक्तेः गांधी विचारांचे अभ्यासक आणि गांधीजींचे पणतू तुषार गांधी
विषयः सरदार वल्लभभाई पटेल : कर्तृत्व आणि नेतृत्व
काय सांगितलंः महान नेत्यांच्या जडणघडणीची प्रक्रिया सांगितली.
आपण अनेकदा अनोळखी माणसाला पहिल्यांदा भेटतो. मग ते प्रसिद्ध असतील पण आपला त्यांच्याशी तसा परिचय नसतो. अशा व्यक्तीच्या पहिल्या भेटीतून आपण मनातल्या मनात त्याचं मूल्यमापन करतो. त्या माणसाची हीच इमेज बराच काळ आपल्या मनात राहते.
एखादा चांगल्या स्वभावाचा, नम्र माणूस काही कारणांमुळे आपल्याशी नीट वागला नाही. आजुबाजूचे सगळेजण भले त्याला चांगलं म्हणत असोत, आपल्यासाठी मात्र, तो तसा असत नाही. एखाद्या व्यक्तीच्या वेळोवेळी संपर्कात आल्यावर आपल्याला त्याचे इतर पैलू कळायला लागतात. पण तरीही इंग्रजीतल्या म्हणीप्रमाणे फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. त्या व्यक्तीची पहिली प्रतिमा पुसली जाणं कठीण असतं. तसंच काहीसं गांधी आणि पटेल यांच्यातल्या पहिल्या भेटीचं झालं होतं.
'सत्याचे प्रयोग' या पुस्तकात एक प्रसंग आहे. महात्मा गांधी पहिल्यांदा मुंबईच्या कोर्टात खटल्यासाठी उभे राहतात, तेव्हाचं वर्णन त्यात आहे. एका मुस्लिम विधवेच्या संपत्तीच्या संदर्भातला तो खटला होता. गांधीजी भरपूर तयारी करून कोर्टात गेले. पण खटल्यासाठी उभं राहिल्यावर त्यांच्या तोंडून शब्दच फुटेना. ते पुरते घाबरले आणि शेवटी कोर्ट रूममधून पळून गेले.
इंग्लंडमधून शिकून आलेला हा वकील नेमका कशा प्रकारे खटला लढतो, याचं तिथल्या अनेक वकीलांना कुतूहल होतं. त्यामुळे या खटल्याचं कामकाज बघायला अनेक वकील जमले. त्यापैकी एक भारतातच वकिलीचे शिक्षण पूर्ण केलेले होते. ते म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल! सरदारांची बापूंशी ही पहिली भेट.
देशविदेशात नाव झालेले गांधीजी खूप वर्षांनी आफ्रिकेहून मायदेशी परतले. अहमदाबादेत त्यांचं जंगी स्वागत झालं. सरदार वल्लभभाई पटेल यांच्याकडे त्यांचे अहमदाबाद स्पोर्ट्स क्लबमधील मित्र गांधींच्या स्वागत समारंभाला जाण्याचा आग्रह करू लागले. ‘कशाला आपला वेळ वाया घालवताय. त्या माणसाच्या तोंडून तर शब्दही फुटत नाहीत’, असं म्हणून पटेलांनी त्या कार्यक्रमात जायचं टाळलं होतं.
हेच वल्लभभाई पुढे त्याच महात्मा गांधींचे अत्यंत जवळचे सहकारी झाले. दीडच वर्षांनी वल्लभभाईंनी गांधींना स्वतःचा नेता मानलं. एवढंच काय, त्यांच्या सांगण्यावर आपली उत्तम चाललेली वकिलीही सोडून दिली.
सरदार पटेल म्हणायचे,
I claim to be nothing more than an obedient soldier of him. There was a time when everyone calls me his blind follower. But, both he &I knew that I followed him because of our convictions tallied. मी गांधींचा प्रामाणिक शिपाई आहे. लोक मला त्यांचा आंधळा चेला म्हणायचे. पण गांधींना आणि मला दोघांनाही माहीत होतं, की मी गांधींजींशी बांधिलकी जुळल्यामुळे आम्ही सोबत आहोत.
सरदार पटेलांनी चौरीचौरातील हिंसेनंतर असहकार चळवळ बंद करु नये, असं पटेलांचं मत होतं. या विषयावरून त्यांचा गांधीजींशी वादही झाला. अनेक लोक गांधींना सोडून जाऊ लागले. पण पटेल मात्र गांधींना सोडून गेले नाहीत. 'दांडी यात्रे'ला फार यश मिळणार नाही, असं पटेलांना वाटायचं. तसं त्यांनी बोलूनही दाखवलं. मात्र, दांडी यात्रेचा निर्णय झाल्यावर पटेलांनी जीव ओतून या यात्रेचा प्रचार केला. ब्रिटीश सरकारने पटेलांनाच सगळ्यात आधी अटक केलं. अनपेक्षितपणे ते आंदोलन प्रचंड यशस्वी झालं.
पटेलांचे बापूंशी वैयक्तिक संबंध फार जिव्हाळ्याचे होते. पटेलांना स्वातंत्र्य चळवळीच्या काळात देशाच्या विविध भागांमध्ये सारखं फिरावं लागायचे. त्याचवेळी पटेलांच्या बायकोचा अकाली मृत्यू झाला. त्यामुळे आपण दौऱ्यावर गेल्यावर आपली मुलं विशेषतः मुलगी मणीबेन म्हणजेच मणीबा यांची काळजी पटेलांना वाटायची. तेव्हा पटेलांनी मणीबांना कस्तुरबांकडे ठेवलं. मणीबांसाठी वल्लभभाई हे 'विजिटिंग फादर' होते, जे अधूनमधून त्यांना भेटायला यायचे आणि निघून जायचे. सरदार पटेल कस्तुरबांच्या फार जवळ होते. ते दोघं एकाच भाषेत बोलायचे. बऱ्याचदा गांधी आणि पटेल यांच्यातले मतभेद कमी करण्यात बा प्रयत्न करायच्या.
येरवडा जेलमधे गांधी आणि पटेल वर्षभराहून अधिक काळ सोबत होते. तेव्हा गांधीजी लिंबाच्या काडीने दात घासायचे. ही काडी त्यांना सरदार पटेल बनवून देत. रोज हे काम करताना पटेल गांधींना विनोदाने म्हणायचे 'तोंडात चार दात उरले नाहीत. तरीही कसले दात घासतात काय माहीत!'
सरदार पटेलांना प्रश्नांची उत्तरं झटपट हवी असायची. ते 'क्विक रिझल्ट्स'वर विश्वास ठेवायचे. खूप काळ वाट बघत बसायचा त्यांचा स्वभाव नव्हता. भारताच्या फाळणीला सर्वात आधी मान्यता देणारे पटेलच होते, यावरूनही हे स्पष्ट दिसतं. ते आक्रमक स्वभावाचे होते. त्यामुळे ते उजव्या विचारांच्या लोकांसाठी आकर्षक व्यक्तिमत्त्व असतील, पण पटेल अहिंसक होते.
गांधीजींच्या मृत्यूनंतर नेहरू आणि पटेल लगेच बिर्ला हाऊसमध्ये पोचले. गांधीजींच्या मृतदेहाकडे बघून नेहरू रडायला लागले. त्यावेळी गांधीजींचे पीए प्यारेलाल यांच्याशी बोलताना सरदार पटेल म्हणाले, जवाहर रडू तरी शकतो, मी तर रडूही शकत नाही.
सरदारांचा पुतळा वास्तवतः कश्मीरमध्ये बनायला हवा होता. कारण तिथूनच त्यांची कन्याकुमारीपर्यंत सावली पडली असती. साबरमती नदीवरच्या पुतळ्याचं फार महत्त्व नाही. यामुळे महत्त्व मिळतं ते पुतळ्याचं उद्घाटन करणाऱ्यांना. पुतळ्याआडून सरदारांची उंची मोजणं कुणालाही शक्य नाही. कारण त्यांची उंची फार मोठी होती.
सरदारांनी सोमनाथ मंदिर बनवलं. पण त्यासाठी मुस्लिमांना विश्वासात घेतलं. त्यांनी शरणार्थींसाठी त्रास सहन केला, त्याला तोड नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील भरकटलेल्या तरुणांना पटेल काँग्रेसच्या छत्राखाली आणू इच्छित होते. याचा अर्थ असा नाही की पटेल काँग्रेसची हिंदूमहासभा बनवू इच्छित होते. गांधीहत्येबद्दल पटेलांची सर्वाधिक निंदा ही समाजवादी मंडळींनी केलीय. हाही एक इतिहास आहे. पण या निंदेमध्ये सत्याचा तीळमात्र अंश नाही.
सुभाषचंद्र बोसांच्या बाबतीत असं बोललं जातं की त्यांना महात्मा गांधींनी काँग्रेसचा राजीनामा द्यायला लावला. पण सुभाषबाबूंना विरोध करण्यांमधे खुद्द पटेलच आघाडीवर होते. त्यांनीच महात्मा गांधींना बजावलं की अशा पद्धतीने पक्ष चालल्यास आपण त्यापासून वेगळं होऊ. तेव्हा पटेलांच्या सांगण्यावरून महात्मा गांधींनी हस्तक्षेप केला आणि पुढील इतिहास घडला. पण तरीही गांधी, नेहरू, पटेल आणि बोस हे एकमेकांचे निकटचे सहकारी आणि मित्र होते. या सगळ्या मतभेदांमुळे त्यांचं आपापसातलं काही प्रेम कमी झालं नाही.
भारताच्या स्वातंत्र्यानंतर पहिल्या पंतप्रधानपदाचा निर्णय घेताना वय, आरोग्य या गोष्टींचाही विचार केला गेला. एखाद्या देशाच्या जन्म झाल्यानंतर काही वर्ष त्या देशाचं नेतृत्व अशा व्यक्तीच्या हाती द्यायला हवं, जो पुढील निदान ५ ते १० वर्ष देशाचं नेतृत्व करेल. नेहरूंची निवड त्या अर्थाने योग्यच होती. कारण पटेल यांचा लवकरच मृत्यू झाला. याउलट पाकिस्तान स्वतंत्र झाल्यावर त्यांचे पहिले पंतप्रधान महंमद अली जीना वर्षभरातच मृत्युमुखी पडले. तेव्हापासून पाकिस्तानची गाडी रुळावरून घसरली, ती कायमचीच.