आयपीएल आणि प्रेक्षकांचं नातं सुरु झालं ते २००८ ला. पण, या नात्याची सुरुवात फार रंजक आहे. क्रिकेटच्या टी - ट्वेण्टी स्वरुपालाच आयपीएलचा बाप बीसीसीआयनं नाकं मुरडली होती. महेंद्रसिंह धोनीच्या ज्युनियर आणि गंमत म्हणून पाठवलेल्या टीमने बीसीसीआयला टी ट्वेण्टी प्रकार गांभिर्याने घ्यायला लावला. त्यातूनच बीसीसीआयनं आयपीएलला जन्माला घातलं आणि या आयपीएलने भारतीय जनमानसावरच नाही तर इंटरनॅशनल क्रिकेटलाही भुरळ घातली.
कोरोनाच्या जागतिक साथीच्या काळात अनेक शक्यतांना मागे टाकत येत्या १९ सप्टेंबरपासून आयपीएलचा १३ वा हंगाम सुरु होतोय. आयपीएलचा इतिहास पाहिला तर आयपीएलने या आपल्या एका तपाच्या इतिहासात अनेक चढ, उतार, वाद पाहिले आहेत पण, आजपर्यंतच्या इतिहासात आयपीएल रद्द करावी लागलीय असं कधीही घडलं नाही. कोरोनाने सर्व जगाला शांत केलं पण, आयपीएलने या संकटातूनही मार्ग काढत आपला डंका वाजवला. आयपीएलने आपल्या लाडक्या प्रेक्षकांशी कधीही फारकत घेतली नाही.
आयपीएलच्या दुसऱ्याच हंगामात म्हणजे २००९ ला आपला देश सोडावा लागला. त्यावेळी आयपीएल आणि प्रेक्षकांमधे दुरावा निर्माण झाला होता. पण, थेट टेलिकास्टच्या माध्यमातून आयपीएलने आपलं प्रेक्षकांबरोबरचं लाँग डिस्टन्स रिलेशन मेंटेन केलं. यंदाच्या हंगामातही आयपीएलला आपल्या प्रेक्षकांची ताटातूट सहन करावी लागणार आहे पण, थेट टेलिकास्टच्या माध्यमातून प्रेक्षकांबरोबर लाँग डिस्टन्स रिलेशन मेंटेन केलं जाईलच. या लाँग डिस्टन्स रिलेशनची एक व्यावसायिक गंमत आहे. हे लाँग डिस्टन्स रिलेशन मेंटेन करण्यासाठी आयपीएललला एक दमडीही मोजावी लागत नाही. उलट याचे बक्कळ पैसे आयपीएलला मिळतात.
आयपीएल आणि प्रेक्षकांचं नातं सुरु झालं ते २००८ ला. पण, या नात्याची सुरुवात फार रंजक आहे. क्रिकेटच्या टी - ट्वेण्टी स्वरुपालाच आयपीएलचा बाप बीसीसीआयनं नाकं मुरडली होती. पण, महेंद्रसिंह धोनीच्या ज्युनियर आणि गंमत म्हणून पाठवलेल्या टीमने बीसीसीआयला टी ट्वेण्टी प्रकार गांभिर्याने घ्यायला लावला. त्यातूनच बीसीसीआयनं आयपीएलला जन्माला घातलं आणि या आयपीएलने भारतीय जनमानसावरच नाही तर इंटरनॅशनल क्रिकेटलाही भुरळ घातली.
आयपीएलचे आणि त्याच्या चाहत्यांच्या नात्याला एक तप पूर्ण झालं. यंदाच्या वर्षी त्याचा १३ वा हंगाम होणार आहे. पण, आयपीएल आणि त्यासोबत त्याच्या हक्काच्या प्रेक्षकांचा, चाहत्यांचा हा प्रवास फार रंजक आहे. यात वाद, ताटातूट, पुन्हा जुळून येणाऱ्या रेशीम गाठी असा सगळा मसाला आहे. अनेक खेळाडूंचं आयुष्य घडलं तर अनेक जण देशोधडीला लागले. असं हे आयपीएल रसायन आता भारतीय जीवनाचा एक अविभाज्य भाग झालंय.
हेही वाचा : मेजर ध्यानचंद यांनी हिटलरचा प्रस्तावही नाकारला
आयपीएलची सुरवात भारताच्या दुय्यम समजल्या जाणाऱ्या धोनीच्या युवा टीमने टी - ट्वेण्टी वर्ल्डकप जिंकल्यानंतर झाली. नाहीतर बीसीसीआय पहिल्यापासूनच टी - ट्वेण्टी फॉरमॅटला नाकं मुरडायची. त्यामुळेच त्यांनी टी - ट्वेण्टी वर्ल्डकपसाठी आपला दुय्यम टीम पाठवली. पण, या टीमने शेवटच्या सामन्यात सख्खा शेजारी पक्का वैरी असलेल्या पाकिस्तानला पराभूत करुन पहिला टी - ट्वेण्टी वर्ल्डकप भारतात आणला आणि बीसीसीआयलाच धक्का दिला. जसा हा वर्ल्डकप भारतात आला बीसीसीआयलाही टी - ट्वेण्टी फॉरमॅटवर प्रेम जडलं. त्यांनी भारतात या टी - ट्वेण्टीच्या लोकप्रियतेचं बाळसं धरलेल्या प्रेक्षक वर्गाला एनकॅश करण्याचा चंग बांधला.
त्यानंतर फुटबॉल लीगच्या धरतीवर बीसीसीआयने आयपीएलची घोषणा केली. तसं पाहिलं तर भारतात अशी लीग घेण्याचा हा पहिला प्रयत्न होता असं नाही. यापूर्वी आयसीएल अर्थात इंडियन क्रिकेट लीग वर्षापूर्वीच म्हणजे २००७ ला सुरु झाली होती. ही लीग झी ने बीसीसीआयबरोबर टेलिकास्टच्या वादातून जन्माला घातली होती. त्यामुळे बीसीसीआयने या लीगला आपला पाठिंबा दिला नाही आणि याच्याशी जे लोक, खेळाडू जोडले जातील त्यांना बंडखोर ठरवून त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला होता. यातून खुद्द कपिल देव यांचीही सुटका झाली नाही. मग इतर ज्युनिअर प्लेयरची काय गत होणार?
या लीगमधे भारतीय टीममधले दिग्गज प्लेयर नसल्याने लोकांचाही त्याला पाठिंबा मिळाला नाही. त्यातच वर्षभरातच बीसीसीआयनेही आपली अधिकृत आयपीएल लीग जाहीर करुन आयसीएलची उरली सुरली हवा काढून घेतली.
आयपीएलची घोषणा झाली त्यावेळी जगभरातले प्लेयर या लीगमधे खेळणार याची उस्तुकता सर्व क्रिकेट प्रेमींना होतीच. बीसीसीआयने आयपीएलचं प्रमोशन करतानाच 'मनोरंजन का बाप' असं केलं. त्यामुळे आयपीएल ही फक्त टी ट्वेण्टी स्पर्धा नाही तर ही एक मनोरंजनाची सिरीज आहे. गेली कित्येक दशकं सास बहू मेलोड्रामा जीवनशैलीचा एक भाग बनलेल्या भारतीय जनमानसात आयपीएलने ग्रँड एंट्री केली. आयपीएलने या सास बहूवाल्यांचा हक्काचा प्राईम टाईम खाऊन टाकला पण, त्यांच्या हक्काच्या प्रेक्षकवर्गालाही खीळ बसली. त्यामुळे भारतीय मनोरंजन बाजारच बदलून गेला.
जसं आयपीएलने आपल्या सुरवातीच्या हंगामाचं ‘मनोरंजन का बाप’ कॅम्पेन केलं तसं जवळपास दोन महिने आयपीएलने सगळ्या कौटुंबिक मालिकांना आपला प्राईम टाईम बदलायला लावला. कारण आता प्राईम टाईम आयपीएल टाईम झाला होता. मनोरंजनाच्या क्षेत्रात पहिल्या हंगामाद्वारे दमदार एन्ट्री घेतल्यानंतर आयपीएलने आपला कॅम्पेनचा नूर बदलत इंटरनॅशनल क्रिकेटमधले स्टार भारतीय कल्चरमधे रुजवण्यास सुरवात केली. या कॅम्पेनमुळे भारतीय क्रिकेटवेडे आता भारताचे प्रतिस्पर्धी असलेल्या संघातल्या प्लेयर्सचेही चाहते बनू लागले.
कॅरेबियन बेटावरच्या, कांगारुंच्या देशातले तगडे क्रिकेटर भारतीयच वाटू लागले. याचं उत्तम उदाहरण म्हणजे हळूहळू पोलार्ड मुंबईकर, ब्राव्हो चेन्नईतला साऊथ इंडियन, डेव्हिड वॉर्नर पक्का हैदराबादी बनला. मुंबई इंडियन्सचा फिल्डिंग कोच जॉण्टीने तर त्याच्या मुलीचे नाव इंडियाच ठेवले. हा एक क्रिकेटमधला सकारात्मक बदल होता. कारण आता भारतीय क्रिकेटवेडा चाहता चांगल्या क्रिकेटपटूच्या पर्यायाने चांगल्या क्रिकेटच्या प्रेमात पडू लागला होता. देशा देशातल्या सीमा अदृश्य झाल्या होत्या.
बीसीसीआयने आयपीएलची रचना भारतीय प्रांतवार रचनेसारखी केली. त्यामुळे संपूर्ण भारत आयपीएलच्या कवेत आला. प्रत्येक प्रांताचे प्रतिनिधित्व करणारा एक संघ आयपीएलमध्ये असल्याने प्रांतिक अस्मितेलाही हात घातला गेला. त्यामुळे आयपीएलचे भारतात यशाचे इक्वेशन चपखल बसले.
हेही वाचा : लेजंड धोनीचा अखेरचा 'षटकार'
आयपीएलचा आणि भारतीय प्रेक्षकांचा सुरवातीचा हा काळ हनिमून पीरियडचा होता. आयपीएलचे दोन महिने क्रिकेट वेड्या भारताचं चांगलंच मनोरंजन होत होतं. पण, आयपीएलने फक्त मनोरंजन केलं नाही तर देशांतर्गत खेळणाऱ्या अनेक गुणी खेळाडूंना आपली ओळख निर्माण करण्यासाठी हक्काचं व्यासपीठ तयार करुन दिलं.
रणजी ट्रॉफीत चमकणारा एखादा ज्युनियर खेळाडू हा फक्त त्याच्या क्रिकेटिंग सर्कल, क्रिकेट जाणकारांच्याच नजरेत भरायचा. पण, आता आयपीएलमुळे तो सर्वसामान्य भारतीय प्रेक्षकांच्या नजरेत भरायला लागला. त्यामुळे त्याला भारतीय टीममधे न खेळताही स्टारडमचा अनुभवायला मिळायला लागले.
आयपीएलने या ज्युनियर प्लेयरना फक्त स्टारडम, पैसा चेहरा दिला नाही तर आयपीएलने त्यांच्यासाठी टीम इंडियाची दारं उघडून दिली. आता या प्लेयरच्या निवडीची चर्चा फक्त निवड समितीच्या बंद दाराआड सीमित राहिली नाही. ती आता न्यूज रुम, भारतातल्या गल्लीतल्या कट्ट्यांवर, कॉर्पोरेट ऑफिसमधे पोचली. याचा एक दबावगट तयार झाला. या सर्वांचाच परिपाक म्हणजे भारतीय टीमला नव्या दमाची आणि बदलत्या क्रिकेटमधे आपलं नाणं खणखणीत वाजवून दाखवणारी पिढी मिळाली.
हे प्लेयर टीममधे निवडले जाण्यात त्यांच्या आयपीएलमधल्या कामगिरीचा मोलाचा वाटा आहे. याचं साधं उदाहरण म्हणजे जसप्रीत बुमराह. बुमराहने रणजी ट्रॉफीत किती विकेट घेतल्या किंवा तो रणजी ट्रॉफी कोणत्या टीमकडून खेळतो हे बऱ्याच लोकांना माहीत नसेल. पण, त्याचा आयपीएलचा प्रवास आणि तिथून भारताच्या टीममधे घेतलेली उडी ही कथा सामान्य प्रेक्षकालाही तोंडपाठ आहे. जसप्रीत बुमराह सारखे अनेक खेळाडू आहेत. बुमराह हा त्याचे एक प्रातिनिधिक उदाहरण आहे.
ज्याप्रमाणे भारतीय प्लेयरना आयपीएलचा फायदा झाला त्याचप्रमाणे काही इंटरनॅशनल प्लेयरनाही आयपीएलचा फायदा झाला. याचं सर्वात चांगलं उदाहरण म्हणजे अफगाणिस्तानची सध्याची लोकप्रियता. सध्याची अफगाणिस्तानची टीम त्यांच्या खेळामुळे आणि झुंजार वृत्तीमुळेच इंटरनॅशनल क्रिकेटमधे उगवत्या ताऱ्याच्या रुपात दिसतेय. पण, त्यांच्या लोकप्रियतेच्या वाट्यात आयपीएलचाही एक महत्वाचा वाटा आहे. कारण, अफगाणिस्तानची टीम ज्या राशिद खान, मुजीब - उर - रहीम या दोन स्टार बॉलरभोवती फिरतो त्या स्टार बॉलरनी त्यांचं स्टारडम आयपीएलमधूनच कमावलं आहे.
या दोघांनाही कमी वयात आयपीएल खेळण्याची संधी मिळाली आणि त्यांना जग ओळखू लागलं. पर्यायाने अफगाणिस्तान क्रिकेटला जग ओळखू लागलं. संदीप लामिछाने या नेपाळच्या युवा बॉलरला आयपीएलमधून ओळख मिळाली. याचबरोबर संदीपमुळे सामान्य क्रिकेट चाहत्यांना नेपाळचीही क्रिकेट टीम आहे याची कल्पना आली. त्यामुळे हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच देश क्रिकेट खेळतात असे म्हणणाऱ्यांच्या बौद्धिक मर्यादा विस्तारल्या. याला अप्रत्यक्षरित्या आयपीएलही कारणीभूत ठरली.
हे कोरोना स्पेशलही वाचा :
साथीच्या आजारात सारं जग समाजवादी वळण घेतं
डॉक्टरांनी घातलेला सूट म्हणजे कोरोनाविरूद्धचं चिलखतच!
कोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशन्ट बरं कसं होतात?
कोरोनाला रोखण्यासाठी तैवानकडून आपण काय शिकलं पाहिजे?
एकदा बरं झाल्यावरही पेशंटला का होतेय पुन्हा कोरोनाची लागण?
किराणा दुकानातून आपण कोरोनाला घरी नेण्यापासून कसं वाचू शकतो?
आयपीएलच्या सुरवातीच्या काळातल्या लिलावात जगभरातल्या स्टार प्लेयरना बक्कळ पैसा कमवून दिला. टी ट्वेण्टी फॉरमॅटचा ढंगच बॅटिंग धार्जिणा असल्याने सुरवातीला याचा फायदाही फक्त बॅट्समनना झाला. पण, जसजसे आयपीएलचे एका पाठोपाठ एक हंगाम येत गेले तस तसे बॉलरचंही महत्त्व टीमच्या मालकांना पटू लागलं. त्यामुळे टीम बांधणीसीठी रिसर्च होऊ लागला आणि आपल्या टीमसाठी कोण योग्य कोणाला जास्त पैसे मोजून घेणं गरजेचं आहे याचा आराखडा तयार होत गेला. यामुळे बॉलर तसंच रिसर्च केल्यामुळे ज्युनियर खेळाडूंनाही जास्त पैसा मिळू लागला. याचं प्रतिबिंब आयपीएलच्या अनेक हंगामात दिसू लागेल.
खेळातल्या पैशाचं रुपांतर पैशाच्या खेळात कधी झालं याचा पत्ताच लागला नाही. या आयपीएलमधल्या पैशाच्या खेळाचं पहिलं बिंग फुटलं ते २०१० ला. आयपीएल ही फक्त 'मनोरंजनाचा बाप' नसून सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे याची जाणीव आयपीएलचे फाऊंडर मेंबर आणि चेअरमन असलेल्या व्यापारी ललित मोदींना कळून चुकलं होतं. त्यामुळे त्यांनी अधिक नफा आणि अधिक पैसा मिळवण्याच्या हव्यासापोटी या कोंबडीवर एकाचवेळी जास्त अंडी घालण्यासाठी दबाव टाकला. त्यांनी आयपीएलमधे नव्या दोन टीमचा समावेश करत त्याची व्याप्ती वाढवण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांनी या प्रयत्नात आपलंही उखळ पांढरं करुन घेतल्याचा आरोप त्यांच्यावर झाला.
त्यांनी केरळ कोची टस्कर टीमची मालकी देण्याबाबत आपल्या अधिकारांचा गैरवापर केला आणि आयपीएलमधे आर्थिक गडबडी केल्याचा आरोप त्यांच्यावर झाला. त्यामुळे २०१० ला त्यांना सस्पेंड केलं. पण, यामुळे आयपीएल मोठ्या वादात अडकली. कारण, आयपीएल संघात काळा पैसा मुरवला जातो, हवालाच्या पैशाचा वापर होतो असा आरोप होऊ लागला.
२०१० ला हा मोठा आयपीएलचा वाद समोर आल्यानंतर आयपीएलचा गुडी गुडी असा वाटणारा हनिमून पिरियड संपला. या वादानंतर आयपीएलकडे त्याच्या आर्थिक गणितांकडे संशयाने पाहिलं जाऊ लागलं. आयपीएलचा मास्टर माईंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ललित मोदींना या प्रकरणामुळे लंडनला पळ काढावा लागला. आता आयपीएल भारतातल्या मोठ्या तपास यंत्रणांच्या रडारवर आली होती. आता जनसामानसातच आयपीएल हा तर बीसीसीआयचा पैशाचा खेळ आहे असा समज होऊ लागला. त्यामुळे त्यांना खेळाच्या नावाखाली आर्थिक सवलती द्यायला विरोध होऊ लागला.
यातच २०१२ ला स्पॉट फिक्सिंग एक प्रकरण घडलं. पण, या प्रकरणाने आयपीएलकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत गेला. कारण भारतीय क्रिकेटला २००० च्या दरम्यान मोठा दणका दिला होता. त्याच्या आठवणी ताज्या झाल्या. यात गुंतलेले प्लेयर हे मोठे नसल्याने या प्रकरणाला जास्त हवा मिळाली नसली तरी चाहत्यांच्या मनात फिक्सिंगची पाल चुकचुकली होतीच. त्यातच खेळाडूंच्या नाईट पार्ट्या, चिअर लिडर्स, अभिनेत्र्यांचा ग्लॅमरस सहवास याच्या सुरस कथा बाहेर येत होत्या.
शेवटी २०१३ ला आयपीएलमधला स्पॉट फिक्सिंगचा बॉम्ब फुटलाच. यामधे ज्या तीन खेळाडूंची नावं आली त्यात भारतीय टीममधल्या एक प्रमुख प्लेयर एस. श्रीसंतचं नाव आल्यानं याप्रकरणाला मोठी हवा मिळाली. दिल्ली पोलिसांनी केलेल्या या कारावाईने पुढे आयपीएलमधल्या सट्टाबाजाराचं पितळ उघडं पाडलं. या सट्टेबाजी प्रकरणी चेन्नई सुपर किंग्ज टीममधे मोठ्या पदावर असलेल्या आणि तत्कालीन बीसीसीआय अध्यक्ष एन. श्रीनिवास यांचा जावई गुरुनाख मयप्पन याला अटक झाली. त्या पाठोपाठ राजस्थान रॉयल्स संघाचे मालक राज कुंद्रा यांचंही नाव या प्रकरणात झळकलं.
हेही वाचा : कॉमेंट्रीटर असे अतिशहाण्यांसारखे का वागतात?
सट्टेबाजी प्रकरणात मोठी मोठी नावं आल्यानं आणि बीसीसीआयच्या सर्वोच्च पदावरच्या व्यक्तीच्या नातेवाईकालाच अटक झाल्याने हे प्रकरण चांगलंच गाजलं. त्याचा परिपाक म्हणून २०१४ ला बीसीसीआयचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांचा सर्वोच्च न्यायालयाने राजीनामा घेतला. सर्वोच्च न्यायालयाने एवढ्यावरच न थांबता बीसीसीआयच्या शुद्धीकरणाची मोहीमच हातात घेतली. त्यांनी पहिल्यांदा सट्टेबाजीत सामिल असणाऱ्या दोन टीम मालकांच्या टीमवरच बंदी घातली. विनर चेन्नई सुपर किंग्ज आणि पहिला हंगाम गाजवणारा राजस्थान रॉयल्स दोन्ही टीमवर दोन वर्षाची बंदी आली.
यानंतर बीसीसीआयचं शुद्धीकरण करण्यासाठी लोढा समिती नियुक्त करण्यात आली. या समितीने बीसीसीआयचा चांगलचा कीस काढला. याचा फटका बऱ्याच मोठ्या मोठ्या खेळाडूंना बसला. लाभाच्या पदाचा मुद्दा घेऊन त्यांचे आर्थिक हितसंबध तपासण्यास सुरवात केली. यातून ना तेंडुलकर, द्रविड सुटला ना धोनी सुटला. हा बीसीसीआयचा आणि पर्यायाने आयपीएलचा रफ पॅच दोन वर्ष चालला.
दोन वर्षात बीसीसीआय आणि आयपीएलमध्ये आमुलाग्र बदल झाले, अनेक बंधनं आली. दोन टीम बंदीमुळे बाहेर फेकल्या गेल्यामुळे त्यांची जागा घेण्यासाठी दोन टीमची नव्याने निर्मिती करण्यात आली. गुजरात लायन्स आणि रायजिंग पुणे जायंट या दोन टीम राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्जच्या खेळाडूंना सामावून घेण्यात आलं. पण, प्रेक्षकांना धोनीला पिवळ्या जर्सीत आणि स्मिथ, रहाणेला निळ्या जर्सीत बघण्याची सवय झाली होती. त्यामुळे हा बदल फारसा रुचला नाही.
अखेर दोन वर्षे संपली. चाहत्यांच्या आयपीएल सट्टेबाजीच्या, फिक्सिंगच्या आठवणीही अंधुक झाल्या. चाहत्यांनी या दोन्ही टीमचं विशेषतः धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जचं खुल्या मनाने आणि जल्लोषात स्वागत केलं. धोनीच्या सीएसकेनेही तो हंगाम जिंकून देत पुन्हा चाहत्यांची मनं जिंकली. इतकं सगळं टक्के टोणपे खालल्यानंतर आता आयपीएल आणि प्रेक्षकांचा संसार एका तपानंतर थोडा स्थिरावत होता. त्यात आता या एका तपाच्या काळात आयपीएलच्या या प्रादेशिक संस्थानांनी आपापला असा एक चाहता वर्ग निर्माण केला आहे. तो चाहता वर्ग त्यांचा हक्काचा आहे.
हेही वाचा : इंग्लंड जगजेत्ता आणि न्यूझीलंडला चौक्यांचा चकवा
प्रत्येक संस्थानाचे असे एक राजे आहेत. मुंबई इंडियन्सचा राजा रोहित शर्मा, चेन्नई सुपर किंग्जचा राजा महेंद्रसिंह धोनी, रॉयल चॅलेंजर बेंगलोरचा राजा विराट कोहली, सनराईजर्सचा हैदराबादचा राजा डेव्हिड वॉर्नर असे हे राजे आपली सेना घेऊन आयपीएलच्या ट्रॉफीसाठी लढतात. त्यांचे पाठीराखे या लढाईत आपल्या राजाचे जीव तोडून समर्थन करतात. यातले बरेचसे खेळाडू भारतीय टीमकडून एकत्रच खेळत असतात पण, आयपीएलमधे ही मंडळी एकमेकांच्या समोर त्वेषाने उभी राहतात.
सुरवातीला बाहेरच्या खेळाडूंना देशी ढंगात बांधून त्यांच्या प्रेमात पाडायला लावणाऱ्या आणि क्रिकेटला खऱ्या अर्थाने वैश्विक करणारी आयपीएल आता देशातल्या खेळाडूंना त्यांच्या समोर उभं करतेय. आता आयपीएल संस्थानांचे पर्यायाने या त्यांच्या राजाचे असे कट्टर चाहते गट निर्माण झाले आहे.
मध्यंतरीच्या काळात आयपीएलच्या एका चाहत्याने संपूर्ण मॅचमधे मुंबई इंडियन्सला चिअर केले आणि सामन्याचं चित्र पालटायला लागल्यानंतर धोनीची पिवळी जर्सी घालून दंगा करायला सुरवात केली होती. हे एक फ्लोटिंग चाहत्याचं लक्षण होतं. पण, यंदा २०२० चा आयपीएल हंगाम सुरु होण्यापूर्वीच मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन टीमच्या चाहत्यांमधे हाणामारी झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. याची दखल घेत खुद्द वीरेंद्र सेहवागनं ‘हे वागणं बरं नव्हं' अशा कानपिचक्या दिल्या. हे बदलतं आयपीएल आणि त्याचे बदलते चाहते आहेत.
अशा या आयपीएलवर चांगल्या, वाईट दोन्ही काळात प्रेम करणाऱ्या, साथ न सोडणाऱ्या चाहत्यांसाठी आयपीएलनेही कधीही आपल्या मनोरंजनाच्या व्यवसायात खंड पडू दिला नाही. भारतात निवडणुका आल्या तर दक्षिण आफ्रिकेतून भारतीय प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. कोरोना काळात आता ही आयपीएल दुबई, शारजा, अबुधाबीतून मनोरंजनासाठी सज्ज झालीय. कोरोना, लॉकडाऊन, नोकरीवरच्या टांगत्या तलवारी, धंदा बुडणं, डोक्यावरच्या कर्जाच्या हप्त्यांचा वाढता डोंगर, नवतरुणांच्या डिग्रीची अनिश्चितता या सर्वाला आता 'चल हवा आने दे' म्हणायचं. आता दोन महिने फक्त धोनी, रोहित आणि विराटचा जप करायचा.
हेही वाचा :
टीम इंडियाच्या पराभवाला भारतीय चाहतेही जबाबदार
सिंगल-डबलची स्ट्रॅटेजी फेल आणि भारत वर्ल्डकप बाहेर
अपघाताने जन्माला आलेल्या वनडे क्रिकेटची आज पन्नाशी
स्पर्श न करता खेळता येतं, म्हणून आपल्याकडे क्रिकेट वाढलं
लेडी सेहवाग शफालीचा सिक्सर पुरुषांनाही तोंडात बोट घालायला लावतो!
जगातल्या सगळ्यात मोठ्या दुर्गुणाविरुद्ध क्रिकेटनं एका हत्यारासारखं काम केलं
महात्मा गांधींचं क्रिकेटशी नातं सांगणारे हे किस्से आपल्याला माहीत आहेत का?