आपल्या हिंदी, मराठी गाण्यांमधे कितीतरीवेळा चंद्राचा उल्लेख आलाय. माणूस चंद्रावर जाऊनही ५० वर्षं झाली. तरी आपलं चंद्राशी एक वेगळंच नात आहे. याच चंद्रावर भारताचे अंतराळवीर जाणार आहेत. याचा आपल्याला खूप अभिमान आहे. पण या संपूर्ण मोहिमेत आपल्या महाराष्ट्रातल्या मराठी तरुणाचं योगदान आहे.
सोमवारी २२ जुलैला आपण सगळ्यांनीच एक ऐतिहासिक क्षण अनुभवला. तो क्षण म्हणजे चांद्रयान २ चं उड्डाण. इस्त्रोने यशस्वी उड्डाण केल्यानंतर देशात उत्साह, आनंदाचं वातावरण पसरलं. स्पेस सेंटरमधे बसलेल्या शास्त्रज्ञांनीही मोहिमेचा पहिला टप्पा यशस्वी पूर्ण झाल्याचा जल्लोष केला. जगभरातून भारत आणि इस्त्रोचं कौतुक होत होतं. आजही कित्येकजण वारंवार युट्यूबवर जाऊन पुन्हा पुन्हा उड्डाणाचा वीडियो बघतायत.
आतापर्यंत ज्या ज्या देशांनी चंद्राची स्वारी केलीय ते चंद्राच्या विषुववृत्तीय भागावर जाऊन आलेत. पण आजवर कोणाची हिम्मत झाली नाही. त्याच दक्षिण ध्रुवावर भारताचं स्वदेशी यान जातंय. देशाच्या याच महत्त्वाकांक्षी मोहिमेत काम करण्याची संधी महाराष्ट्रातल्या कोल्हापूरमधल्या एका तरुणाला मिळाली. त्यांनी आपलं काम उत्तमरीत्या करत या उड्डाणात महत्त्वाची भूमिका बजावलीय.
चांद्रयानाच्या लॉंचिंगमधे महत्त्वाचं काम करणारा एक तरुण कोल्हापुरातल्या चिकोत्रा खोर्यातलं जैन्याळ या छोट्याशा गावातला आहे. या तरुणाचं नाव यशवंत बांबरे. यशवंत गेल्या तीन वर्षांपासून इस्रोमधे रॉकेट व्हेईकल लाँच विभागात काम करतोय. त्याच्या या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रकल्पातल्या सहभागाने ग्रामीण भागातलं गुणवत्तेचं नाणं पुन्हा एकदा खणखणलंय. आणि त्याच्यामुळे आज गावातल्या तरुणांना काही करून दाखवण्याचा आत्मविश्वास मिळालाय. तो आज गावातल्या मुलांचा आयडॉल झालाय.
आज आयडॉल असला तरी यशवंतचं आयुष्य काही साधंसरळ नाही. वयाच्या पाचव्या वर्षीच त्याच्या आईचा मृत्यू झाला. घरी अत्यंत प्रतिकूल परिस्थिती होती. लहानग्या यशवंतमधली ज्ञानाची भूक आणि जिज्ञासूवृत्ती मामाने ओळखली. हमीदवाडा इथले त्याचे मामा नामदेव बोगार्डे यांनी त्याचं पालनपोषण केलं. त्यांचं शिक्षण पूर्ण केलं. इस्रोपर्यंतच्या सार्या शैक्षणिक प्रवासाचा लाखो रुपयांच्या खर्चाचा भार त्यांनी उचलला. दहावी, बारावी गावाकडे झालेल्या यशवंतने पुण्याच्या सावित्रीबाई फुले पुणे युनिवर्सिटीतून मेकॅनिकल इंजिनीअरिंगची पदवी घेतली.
हेही वाचा: ती १५ मिनिटं ठरवणार आपल्या चांद्रयानाचं भवितव्य
यशवंतने इस्त्रोत काम करण्याचं स्वप्न बघितलं होतं. त्यादृष्टीने त्याने प्रवेश प्रक्रियेची तयारी सुरु केली. आणि २०१६ मधे वयाच्या २४ व्या वर्षी त्याचे प्रवेश परीक्षेमार्फत इस्रोमधे निवड झाली. त्यावेळी देशातून २२ हजार उमेदवारांनी ही परीक्षा दिली होती. पण निवड प्रक्रियेतल्या विविध कसोट्यांमधून पार होऊन फक्त ३४ जणांची अंतिम निवड झाली. त्यात यशवंतचा नंबर लागला.
पुढे इस्रोची परीक्षा पास केली. आणि ज्युनिअर सायंटिस्ट म्हणून तिरुअनंतपूरम इथल्या विक्रम साराभाई स्पेस सेंटरमधे काम सुरु केलं. व्हेईकल लाँच विभागात काम करणारा यशवंत हा कोल्हापूर जिल्ह्यातला एकमेव रहिवाशी आहे. जीएसएलवी एमके ३ या रॉकेटमधे तो गेली ३ वर्ष काम करतोय. या रॉकेटच्या डेवल्पमेंट फ्लाईट्स मशिन २०१७ आणि २०१८ मधे त्याचा सहभाग होता.
हेही वाचा: स्टीफन हॉकिंगः आयुष्यभर खुर्चीत बसून उलगडलं अवकाशातलं गूढ
आपल्याला आठवत असेल या यानाचं उड्डाण १५ जुलैला होणार होतं. पण लॉंचिंगच्या ५६ मिनिटं आधी उड्डाण रद्द केलं. आणि लॉंचिंग विभागातल्या सर्व शास्त्रज्ञांनी २४ तास सतत निरीक्षण करून बिघाड शोधून काढला. आणि दुरुस्ती करून हे यान उड्डाणासाठी सज्ज केलं. यात यशवंतचंही मोठं योगदान होतं.
फक्त भारताचं नाही, तर संपूर्ण जगाचं लक्ष ज्या महत्त्वपूर्ण मोहिमेकडे आहे, त्या मोहिमेत काम करण्याची संधी मिळणं ही माझ्यासारख्या तरुणासाठी भाग्याची गोष्ट आहे. ज्यावेळी चांद्रयान २ ने उड्डाण घेतलं, तो क्षण तर खूपच आनंदाचा होता. यावेळी आम्ही सर्वच जण भारावून गेलो, असं यशवंतने दैनिक पुढारीशी बोलताना सांगितलं.
हेही वाचा:
पहिल्या अग्निबाणाच्या यशस्वी उड्डाणाची आज पन्नाशी
प्रिय मोदीजी, आम्ही देशाच्या भविष्याबद्दल चिंतेत आहोत
काट्याच्या शर्यतीत भारताचा जावई झाला इंग्लंडचा पंतप्रधान
चंद्रावर पहिलं पाऊल कोण ठेवणार यावरुन वाद झाला होता
जेंडर इक्वॅलिटीमधे भारताला १०८ वा नंबर देणारी संस्था कोणती?