एचआयवीची चाळीशी: प्रत्येक पाचव्या मिनिटाला एका मूलाचा मृत्यू

०१ डिसेंबर २०२१

वाचन वेळ : ३ मिनिटं


युनिसेफनं 'वर्ल्ड एचआयवी डे रिपोर्ट' प्रकाशित केलाय. युनिसेफच्या आकडेवारीनुसार, २०२०ला जगभरात एचआयवीच्या १५ लाख केसेस समोर आल्या आहेत. ३ लाख मुलांना एचआयवीचा संसर्ग झाला. तर १.२ लाख मुलांचा या संसर्गामुळे मृत्यू झाला. धक्कादायक म्हणजे जगातल्या ५ पैकी २ मुलांना एचआयवीचा संसर्ग झालाय हे त्यांच्या आईवडलांना माहीत नसतं.

४० वर्षांपूर्वी १९८१मधे अमेरिकेतल्या समलैंगिक पुरुषांमधे पहिल्यांदा एचआयवीची लागण झाल्याचं समोर आलं. जगातली ही एचआयवी एड्सची पहिली केस होती. सुरवातीला याची लक्षणं ही ताप, गळ्यावर गाठ येणं, लाल चट्टे अशी दिसून आली. वर्षभरानं १९८२ला या आजाराला 'एक्वायर्ड इम्युन डेफिशियंसी सिंड्रोम' असं अधिकृत नावही मिळालं.

फ्रान्सचे साथरोगतज्ञ ल्युक मॉँटनी आणि फ्रांसुवा बेगे सिनोसी यांनी यावर प्रदीर्घ असं संशोधन केलं. त्यांना त्यासाठी नोबेलही मिळालं. १९८४ला या वायरसचा लोकांमधे कशाप्रकारे संसर्ग होतो त्याची माहिती एचआयवीवरच्या चाचणीने जगासमोर आली. हळूहळू एड्सनं साथीच्या आजाराचं रूप घेतलं.

१९८८मधे ही साथ जगातल्या १०० पेक्षा अधिक देशांमधे पोचली. त्यामुळे संयुक्त राष्ट्राने १ डिसेंबर हा 'जागतिक एड्स दिवस' म्हणून घोषित केला. 'यूएनएड्स' ही एचआयवीवर काम करणारी संयुक्त राष्ट्राची महत्वाची संस्था आहे. युनिसेफ या संस्थेचा 'वर्ल्ड एचआयवी डे रिपोर्टही' महत्वाचा मानला जातो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रकाशित झालेला युनिसेफचा यावेळचा रिपोर्ट चिंतेत टाकणारा आहे.

५ पैकी २ मुलांना एचआयवी

युनिसेफच्या 'वर्ल्ड एचआयवी डे रिपोर्ट'ची आकडेवारी फारच धक्कादायक आहे. २०२०ला ३ लाख मुलांना एचआयवीचा संसर्ग झाला होता. त्यातल्या १.२लाख मुलांचा या संसर्गामुळे मृत्यू झाला. म्हणजेच प्रत्येक दोन मिनिटाला एक मूल एचआयवीच्या विळख्यात सापडतंय.

जगातल्या ५ पैकी २ मुलांना एचआयवीचा संसर्ग झालाय हेच त्यांच्या आईवडलांना माहीत नसतं. यातल्या अर्ध्या अधिक मुलांना तर नीट उपचारही मिळत नाहीत. पुरेशा आरोग्य सुविधांपासून ही मुलं वंचित राहतात. त्यांना स्त्री-पुरुष भेदभावालाही सामोरं जावं लागत असल्याचं युनिसेफनं म्हटलंय.

आफ्रिफेला एचआयवीनं मोठ्या प्रमाणात ग्रासल्याचं चित्र आहे. जगातल्या एचआयवीच्या एकूण संसर्गापैकी ८९ टक्के केसेस या २०२०मधे एकट्या आफ्रिकेत सापडल्या आहेत. तर यातल्या ८८ टक्के केसेस या लहान मुलं आणि तरुणांमधे आढळून आल्यात. मुलांच्या तुलनेत मुलींमधे एचआयवीचं प्रमाण ६ पटीने अधिक आहे.

हेही वाचा: कोरोना वायरसबद्दल मुलांशी आपण कसं बोलायचं?

गेल्यावर्षी १५ लाख केसेस

४ दशकांपूर्वी एचआयवीचा पहिला पेशंट आढळून आला होता. तेव्हापासून आजपर्यंत यात अनेक चढउतार आले. मागच्या काही वर्षांमधे एचआयवीच्या आकड्यांमधे आधीच्या तुलनेत घट झाल्याचं दिसून आलंय. पण हे आकडे पुरेसे समाधानकारक नाहीत हेही तितकंच खरं आहे.

युनिसेफच्या एड्ससंदर्भातल्या २०२०च्या आकडेवारीनुसार या वर्षभरात जगात १५ लाख इतक्या केसेस समोर आल्या आहेत. काही देशांनी चांगली कामगिरीही केली. पण काही देशांमधे मोठ्या प्रमाणात आकडे वाढताना दिसले. पण ज्या पद्धतीने एचआयवीच्या संसर्गात घट व्हायला हवी होती ती मात्र झाली नाही.

कोरोना वायरसमुळे आरोग्य सुविधांवर जो ताण आला त्या सगळ्याचा परिणाम या केसेस वाढण्यावर झाल्याचं दिसून येतंय. या कोरोना साथीमुळे मोठ्या प्रमाणावर विषमता वाढली. त्याचा परिणामही एचआयवीतून दिले जाणारे उपचार आणि सेवांवर झाल्याचं युनिसेफनं म्हटलंय.

कोरोनाचा ताण एचआयवी सुविधांवर

कोरोनाचा परिणाम एचआयवीच्या सेवांवर झाला. त्यामुळे लहान मुलांच्या चाचण्यांमधे ५० ते ७० टक्के इतकी घट पहायला मिळाली. गरोदर महिलांची एचआयवी चाचणी, त्यांना मिळणाऱ्या आरोग्यसुविधा, उपचार यावरही त्याचा परिणाम झाला. दक्षिण आशियातल्या महिलांचं गरोदर काळात करावं लागणारं एआरटी कवरेज हे ७१ टक्क्यांवरून ५६ टक्क्यांवर आलं.

एआरटीचं जागतिक स्तरावरचं प्रमाण दक्षिण आशिया ९५ टक्के, मध्यपूर्व आणि उत्तर आफ्रिका ७७ टक्के , पूर्व आशिया ५९ टक्के, पूर्व आणि दक्षिण आफ्रिका ७७ टक्के, दक्षिण अमेरिका ५१ टक्के, पश्चिम आणि मध्य आफ्रिका ३६ टक्के इतकं प्रमाण पाहायला मिळतं. जे काळजी करायला लावणारं आहे.

हेही वाचा: 

टू डेज वन नाईट: बेरोजगार कुटुंबाची जागतिक गोष्ट

हात धुण्यासाठी साबण वापरायचा की सॅनिटायझर?

क्वारंटाईनमधेही लोकांना जातीची माती का खावी वाटते?

लस असतानाही आपल्याला वायरसवरच्या औषधांची गरज पडेल?

आपण सारखं चेहऱ्याला हात का लावतो? ही सवय कशी मोडायची?