कोलाजः फिचरोत्सवात आपलं स्वागत आहे

१९ ऑक्टोबर २०१८

वाचन वेळ : ३ मिनिटं


आज दसरा. सीमोल्लंघनाचा दिवस. आम्ही आमच्या सीमा ओलांडून `कोलाज डॉट इन` या नव्या प्रदेशात शिरत आहोत. आम्ही आमची शब्दांची शस्त्रं धार लावून तयार ठेवलीत. आम्ही आमच्या अक्षरांचं सोनं वाटण्यासाठी उत्सुक आहोत. `कोलाज डॉट इन` हा आमच्यासाठी जगण्याचा उत्सव आहे.

ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटच्या जाहिराती पेपर, टीवीत वाजू लागल्या की कळतं सणासुदीचे दिवस आलेत. गणपती गेले. नवरात्री गेल्या. आज दसरा आहे. दिवाळी येईल. नाताळ येईल. न्यू ईयरही. सण येतात आणि जातात. पण सेलिब्रेशन थांबायला नको. प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण आपल्याला साजरा करता यायला हवा.

कोलाज डॉट इन त्याच्यासाठीच आहे.

आम्ही पत्रकार आहोत. आम्ही म्हणजे मी याचा संपादक सचिन परब, माझे सहकारी, आणि मित्र. आमचा आनंदही बातम्यांत आणि दुःखही. आम्ही बातम्यांच्या पुढे, मागे, आत खोल शिरतो, तेव्हा त्याचा आनंद वाढत जातो. पत्रकार आपापल्या काळाचं सेलिब्रेशन करत असतो. त्यातून फिचर घडतात. वेगवेगळ्या प्रकारचे लेख बनतात. बातम्यांशी थेट संबंध असणारे आणि नसणारेही लेख. अशा लेखांची ही वेबसाईट आहे. फिचरमधून साजरा करायचा हा आमचा उत्सव आहे. शब्दांचा खेळ करायचा, तर हा आमचा फिचरोत्सव आहे.

या फिचरोत्सवात आपलं स्वागत आहे. मायबाप वाचकहो, तुम्ही आहात, म्हणून आम्ही आहोत. लिहिण्याची खाज आमची. तरीही आम्ही लिहितो तुमच्यासाठी. हा विरोधाभास असला तरी आमचा आनंद तुमच्याशी वाटल्याशिवाय साजराच होऊ शकत नाही. त्यामुळे हा फिचरोत्सव जितका लिहिणाऱ्याचा, तितकाच वाचणाऱ्याचाही आहे. `कोलाज डॉट इन` ही वेबसाईट आमच्याइतकीच तुमचीही आहे. आपण एकमेकांना समृद्ध करत हा उत्सव साजरा करायचाय. यातून इंटरनेटच्या जगात मायमराठीसाठी काही भरीव करू शकलो. पुढची काही वर्षं लक्षात राहील, असं काही घडवू शकलो. तर आम्ही भरून पावलेलो असू. बस्स इतनासा ख्वाब हैं.

यात फक्त राजकारणाचे किंवा सिनेमाचेच लेख असतील असं नाही. आम्हाला कोणत्याच विषयाचा विटाळ नाही. जगण्याशी संबंधित कोणताही विषय आम्हाला वर्ज्य नाही. आम्ही कोणत्याही एका सामाजिक विचारधारेशी, राजकीय पक्षाशी, चळवळीशी बांधील नाही. प्रत्येक साध्या माणसाचं असतं तसं आमचं आमच्यापुरतं एक जगण्याचं तत्त्वज्ञान मात्र आहे. त्यामुळे उजव्यांना ही साईट डावी वाटली आणि डाव्यांना उजवी वाटली, तर आम्ही योग्य ट्रॅकवर आहोत असं मानू. आम्ही भूमिका मात्र घेणारच. तीही थेट. शेवटचा माणूस हाच आमच्या भूमिकेच्या केंद्रस्थानी असेल.

माणुसकीच्या भोवती फेर धरायचा म्हणजे प्रेमाशिवाय पर्याय नाही. माणसावरचं, माणसाच्या जगण्याविषयी, माणसाच्या परिसराविषयी प्रेम यातून व्यक्त होईल, याची आम्ही काळजी बाळगू. म्हणजेच सगळ्या प्रकारचे भेदाभेद, द्वेष, कट्टरता, स्वार्थ याच्या विरोधात आम्ही माणसाच्या बाजूने उभे राहू. यातून आम्हाला क्रांती घडवायची नाही. यातून आम्हाला सरकारं उलथवायची नाहीत. यातून आम्हाला जगदेखील बदलवायचं नाही. आम्हाला वाटतं, ते तुमच्याशी शेअर करायचंय एवढंच. हाच आमचा पोटापाण्याचाही उद्योग असणार आहे. त्यामुळे आम्ही सर्वार्थाने या प्रोजेक्टविषयी प्रामाणिकच राहावं लागेल.

आपल्याला तुकड्या तुकड्या जगण्याची सवय लागलीय. आपल्याला समग्रपणे समरसून आयुष्य जगताच येत नाही. आपल्या काळाचा हा आपल्याला शाप आहे. ते स्वीकारून आयुष्याचा कोलाज करता यावा लागणार आहे. तुकडे तुकडे जोडून जगण्याला नवा आकार द्यावा लागणार आहे. त्यामुळे कोलाज हे म्हणाल तर आमचं जगणं आहे, म्हणाल तर एक वेबसाईट आहे. छान जगायचं तर आयुष्य उमगायला हवं. कुठे पापपुण्याचे हिशेब मांडून, जाडे ग्रंथ वाचून, बाबाबुवाच्या नादी लागून आयुष्य उमगेल, असं आम्हाला वाटत नाही. ते आमच्या कामातून सापडणार आहे. आमच्या बातम्यांचा, लेखांचा कोलाजच आमचं जगणं समृद्ध करणार आहे. 

आज दसऱ्याच्या दिवशी आम्ही आमच्या सीमा ओलांडून या नव्या प्रयोगाच्या प्रदेशात शिरतो आहोत. सोबत तुम्ही आहात ही खात्री आहेच. आमचं हे स्वप्नं साकार करण्यासाठी मदत करणाऱ्या मित्रांचे आभार मानून मी सचिन परब `कोलाज डॉट इन` ही साईट आपल्यासमोर सादर करतोय.

त्यामुळे आता थिंक आणि सेलिब्रेट.