ग्रँड स्लॅम स्पर्धांमधे युवा शक्तीचा डंका

१८ सप्टेंबर २०२२

वाचन वेळ : ५ मिनिटं


कार्लोस अल्कारेझ आणि इगा स्विआतेक यांनी नुकत्याच झालेल्या अमेरिकन टेनिस स्पर्धेत पुरुष आणि महिला गटात एकेरीचं विजेतेपद मिळवत ‘ग्रँड स्लॅम स्पर्धां’मधे युवा क्रांती घडतेय हे सिद्ध केलं. कार्लोस हा या स्पर्धेत विजेतेपद मिळवणारा आणि जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान घेणारा सर्वात युवा खेळाडू आहे. तर स्विआतेक ही सेरेना विल्यम्स, स्टेफी ग्राफ यांच्यासारख्या श्रेष्ठ खेळाडूंची वारसदार मानली जाते.

ग्रँड स्लॅम स्पर्धांमधे गेली अनेक वर्षे नोवाक जोकोविच, रॅफेल नदाल आणि रॉजर फेडरर यांचंच निर्विवाद साम्राज्य होतं. या स्पर्धांमधे अव्वल दर्जाचं यश मिळवण्यासाठी वयाचा अडथळा येत नाही हे जोकोविच, राफेल नदाल यांच्या कामगिरीवरून नेहमीच दिसलंय.

टेनिसच्या दृष्टीने प्रौढ असलेल्या या खेळाडूंकडे कदाचित युवा खेळाडूंइतकं चापल्य नसेल. पण पराभवाच्या छायेतून सामन्याला कलाटणी कशी द्यायची, आपल्याला अपेक्षित असलेलं यश कसं खेचून आणायचं, याचा प्रत्यय या खेळाडूंनी नेहमीच दिला आहे.

फोरहँड आणि बॅक हँडचे परतीचे फटके, क्रॉसकोर्ट आणि जमिनीलगत फटके, अचूक आणि बिनतोड सर्विस, नेटजवळून प्लेसिंग असा कौशल्यपूर्ण खेळ कसा करायचा याचे दाखले खेळाडू देत असतात. त्यांचं कौशल्य बहारदार आणि चाहत्यांना मंत्रमुग्ध करणारं असलं तरीही टेनिस चाहत्यांना युवा खेळाडूंकडूनही सर्वोच्च कामगिरीची अपेक्षा असते.

हेही वाचा: फूटबॉलपटूच्या किकने बदलला मुस्लिमांकडे बघण्याचा दृष्टिकोन

मातब्बर खेळाडूंची किमया

अल्कारेझ आणि स्विआतेक यांच्यासह काही युवा खेळाडूंनी गेल्या दीड-दोन वर्षांत ग्रँड स्लॅम स्पर्धांमधे अनेक चमकदार यश मिळवलंय. किंबहुना बुजुर्ग खेळाडूंप्रमाणे जागतिक टेनिस क्षेत्रात वर्चस्व गाजवण्याची क्षमता आपल्याकडे आहे, याचा परिपाठ त्यांनी दिला आहे.

स्पॅनिश खेळाडू अल्कारेझ याने गेल्या दोन वर्षांत एटीपी टूर मालिकेतल्या अनेक स्पर्धांमधे धक्कादायक निकाल नोंदवले होते. मात्र ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या विजेतेपदाने त्याला हुलकावणी दिली होती. यंदाच्या अमेरिकन स्पर्धेत मात्र त्याने हे अपयश धुऊन काढताना अनेक मातब्बर खेळाडूंवर सनसनाटी मात केली आहे.

सगळ्यात युवा खेळाडू अल्कारेझ

अल्कारेझ हा सहा फूट उंचीचा खेळाडू आहे. त्याचा फायदा त्याने घेतला नाही, तर नवलच. वॉलीज, परतीचे फोरहँड आणि क्रॉस कोर्ट तसंच जमिनीलगत फटके, नेटजवळून प्लेसिंग अशी विविधता त्याच्या खेळात आहे. सर्व प्रकारच्या मैदानांवर परतीचे खणखणीत फटके तसंच वेगवान आणि अचूक सर्विस करण्याबाबत त्याच्या खेळात लक्षणीय सुधारणा झाली आहे.

अल्कारेझ याला टेनिसचं बाळकडू त्याचे वडील आणि ज्येष्ठ खेळाडू कार्लोस यांच्याकडून मिळालं. त्यानंतर त्याने वडलांच्या सल्ल्यानुसार जुआन कार्लोस फेरेरो यांच्या अकादमीत प्रवेश केला आणि तिथं त्याच्या भक्कम टेनिस करिअरची पायाभरणी झाली आहे. रॉजर फेडरर याला आदर्श मानणार्‍या अल्कारेझ याने अमेरिकन स्पर्धेतल्या सर्वच सामन्यांमधे परतीचे फटके मारताना फेडरर याच्या शैलीची आठवण लोकांना करून दिली.

अंतिम फेरीत स्थान मिळवण्यापूर्वी त्याला लागोपाठ तीन सामन्यांमधे पाच सेट्सपर्यंत झुंजावं लागलं होतं. दोन फेर्‍यांमध्ये जरी एक दिवस विश्रांतीचा असला तरीही अशा प्रदीर्घ लढतीनंतर मानसिक दमछाक होतच असते. त्यावर मात करत तो जिद्दीने अंतिम सामन्यात लढला आणि स्वप्नवत विजेतेपद खेचून आणलं. या स्पर्धेत विजेतेपद मिळवणारा आणि जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान घेणारा तो सर्वात युवा खेळाडू आहे.

हेही वाचा: स्पर्श न करता खेळता येतं, म्हणून आपल्याकडे क्रिकेट वाढलं

स्विआतेकची कौशल्यपूर्ण खेळी

महिला गटामधे विजेतेपद मिळवणारी स्विआतेक ही सेरेना विल्यम्स, स्टेफी ग्राफ यांच्यासारख्या श्रेष्ठ खेळाडूंची वारसदार मानली जाते. पोलंडच्या या २१ वर्षीय खेळाडूने अमेरिकन स्पर्धेसह आतापर्यंत तीन ग्रँड स्लॅम विजेतेपद मिळवली आहेत.

यंदा तिने अमेरिकन स्पर्धेपूर्वी फ्रेंच स्पर्धेत दुसर्‍यांदा विजेतेपदावर नाव कोरलं होतं. यंदाच्या मोसमात तिने आतापर्यंत सात स्पर्धांमधे अजिंक्यपदाची कमाई केली आहे. एकाच मोसमात ग्रँड स्लॅमच्या दोन स्पर्धा जिंकण्याचा अनोखा पराक्रमही तिने केला.

ही कामगिरी करताना सर्व प्रकारच्या मैदानांवर सर्वोत्तम खेळ करण्याची किमया आपल्याकडे आहे, हे तिने दाखवून दिलंय. तिचे वडील तोमाझ हे ऑलिम्पिक रोईंगपटू असल्यामुळे तिला खेळासाठी सर्वतोपरी सहकार्य मिळालं आहे. खोलवर आणि बिनतोड सर्विस, परतीचे टॉपस्पीन आणि खणखणीत बॅकहँड फटके असं कौशल्य तिच्या खेळात पाहायला मिळतं.

टेनिसमधल्या कौतुकास्पद यशामुळे तिला अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या जाहिराती मिळत असतात. आपल्याला जो नावलौकिक मिळाला आहे, त्यामधे समाजाचाही मोठा वाटा आहे, याची जाणीव ठेवत आपल्याला मिळणार्‍या उत्पन्नाचा काही वाटा ती अनेक सामाजिक कामासाठी खर्च करत असते. विशेषतः बहुविकलांग, दिव्यांग मुलांसाठी काम करणार्‍या संस्थांना ती सढळ हाताने मदत करत असते. तिचा आदर्श इतर खेळाडूंनी घेतला पाहिजे.

आश्चर्याची गोष्ट अशीही

ग्रँड स्लॅम स्पर्धांमधे सनसनाटी निकाल नोंदवले गेले नाही, तर नवलच. कारकिर्दीत २२ ग्रँड स्लॅम विजेतेपद मिळवणारा नदाल याला चौथ्या फेरीत अमेरिकन खेळाडू फ्रान्सिस तियाफोई याच्याकडून धक्कादायक पराभव स्वीकारावा लागला. प्रौढत्वाकडे झुकलेल्या नदाल याच्या शारीरिक तंदुरुस्तीच्या मर्यादा स्पष्ट होऊ लागल्या आहेत.

तियाफोई याने उपांत्य फेरीपर्यंत मजल गाठली. या स्पर्धेतल्या पुरुष गटात सोळा वर्षांनी अमेरिकन खेळाडूला उपांत्य फेरीत स्थान मिळालंय. एकेकाळी पीट सॅम्प्रास, आंद्रे आगासी, जिम कुरियर या अमेरिकन खेळाडूंनी टेनिसमधे साम्राज्य निर्माण केलं होतं. खरं तर अमेरिकेमधे टेनिस खेळासाठी भरपूर प्रशिक्षण केंद्र आणि सवलती, सुविधा उपलब्ध असताना त्यांच्याकडे पुरुष गटात अव्वल यश मिळविणारं नैपुण्य सध्यातरी नाही, हीच आश्चर्याची गोष्ट आहे.

क्रीडा क्षेत्रातली सुपर मॉम म्हणून ख्याती मिळवलेल्या सेरेना विल्यम्स हिने स्पर्धात्मक टेनिस मधून निवृत्त होण्याचा निर्णय स्वतःच्या घरच्या मैदानावर घेतला. या स्पर्धेतल्या तिसर्‍या फेरीत पराभूत झाल्यानंतर तिने लगेचच हा निर्णय जाहीर केला. अमेरिकेच्या या खेळाडूने कारकिर्दीत ग्रँडस्लॅमची २३ विजेतेपदं मिळवली आहेत. सेरेना आणि तिची मोठी बहीण विल्यम्स यांनी घरची गरिबी दूर करण्यासाठी टेनिसचा जो मार्ग निवडला, तो खरोखरीच इतर युवा खेळाडूंसाठी आदर्श आहे.

हेही वाचा: दंगल आणि लीगपेक्षा तर राणादादाने कुस्तीला ग्लॅमर दिलं

जागतिक टेनिस क्षेत्रात भारत

ग्रँड स्लॅम स्पर्धांच्या एकेरीत सर्वोच्च यश मिळवता आलं नसलं तरीही भारताच्या लियांडर पेस आणि महेश भूपती या जोडीने अनेक विजेतेपदं मिळवली, तसंच इतरांच्या मदतीनेही अजिंक्यपदावर आपली नावं कोरली. रोहन बोपण्णा आणि सानिया मिर्झा यांनीही या जोडीचा वारसा पुढे चालवला.

पेस याने १९९६ला अटलांटा इथं झालेल्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत ब्राँझ पदकावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर एकाही भारतीय खेळाडूला ऑलिम्पिकमधे फारसं यश मिळवता आलेलं नाही. चाळिशी उलटल्यानंतरही पेस आणि बोपण्णा हे खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर टेनिस खेळत असतात. या सर्वच खेळाडूंना फारशा सुविधा आणि सवलती उपलब्ध नसतानाही त्यांनी जागतिक टेनिस क्षेत्रात भारताचा ठसा उमटवला आहे.

भारतीय खेळाडूंनी काय शिकावं?

हल्लीच्या खेळाडूंना परदेशातल्या स्पर्धांमधे सहभाग याच्यासोबत सर्व सुविधा आणि सवलती उपलब्ध असतानाही जागतिक स्तरावर विशेषतः ग्रँड स्लॅम स्पर्धांमधे भारतीय खेळाडूंची कामगिरी फारशी चमकदार होत नाही, ही वस्तुस्थिती आहे.

ग्रँड स्लॅम आणि जागतिक मालिकेतल्या विविध स्पर्धांमधे चमकदार कामगिरी करणार्‍या परदेशी युवा खेळाडूंकडून प्रेरणा घेत, भारतीय खेळाडूंनी देशाचा नावलौकिक उंचावण्याची गरज आहे. सर्वोत्तम शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्ती, जिंकण्यासाठी आवश्यक असणारी विजिगिषावृत्ती, कठोर मेहनत यांच्या जोरावर खेळाडूंनी वैयक्तिक महत्त्वाकांक्षेबरोबरच सांघिक लढतींमधेही सर्वोच्च यश संपादन करण्याची गरज आहे.

परदेशी लोकांचं अनुकरण करताना त्यांच्यात असलेले विजेतेपदाचे गुण आणि कौशल्य आत्मसात केलं पाहिजे. तरच खर्‍या अर्थाने खेळाडू म्हणून त्याचं कौतुक केलं जाईल. ग्रँड स्लॅम स्पर्धांच्या मालिकेतली अखेरची स्पर्धा म्हणून अमेरिकन स्पर्धेकडे पाहिलं जातं. ग्रँड स्लॅम स्पर्धांच्या पुढच्या मोसमासाठी अजून भरपूर वेळ आहे, हे लक्षात घेऊन भारतीय खेळाडूंनी  त्या दृष्टीने आताापासूनच तयारी करण्याची गरज आहे.

हेही वाचा: 

टू डेज वन नाईट: बेरोजगार कुटुंबाची जागतिक गोष्ट

पुरुषांनी रडायला हवं असं सचिन तेंडूलकर का म्हणाला?

शिवाजी पार्कचा श्रेयस अय्यर तर विराटच्या ‘नक्शे कदम पर’ चाललाय!

लेडी सेहवाग शफालीचा सिक्सर पुरुषांनाही तोंडात बोट घालायला लावतो!

मॅकडोनल्ड खाऊच्या ठेल्यापासून फास्टफूड इंडस्ट्रीचा बादशाह कसा बनला?

(दैनिक पुढारीतून साभार)