लिंगभेदाला छेद देत घरातल्या चुलीपासून गाडीच्या स्टेअरींगपर्यंत

०४ एप्रिल २०१९

वाचन वेळ : ५ मिनिटं


दिल्लीच्या आझाद फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेनं महिलांसाठीचे अपारंपरिक रोजगार या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषद घेतली. या विषयातले जगभरातले अभ्यासक, कार्यकर्ते, धोरणकर्ते यांनी परिषदेत सहभाग घेतला. महिलांच्या चौकटीबाहेरच्या रोजगारासाठी काय काय करता येईल, यावर चर्चा झाली. या चर्चेचा हा रिपोर्ट.

विशिष्ट उद्दिष्टाने ज्यात श्रम गुंतलंय अशी कृती करणं म्हणजे काम. मग हे काम महिलांनी करू देत अथवा पुरुषांनी. त्यातला श्रम हा मुलभूत घटक फारसा बदलत नाही. मात्र सामाजिक दृष्ट्या श्रम ही संकल्पना वस्तुनिष्ठ न राहता त्याला सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक, लैंगिक, पारंपरिक, ऐतिहासिक आणि मानसिकतेची पुटं लगडली गेलीत.

समाजात माणसं नाही तर महिला आणि पुरुष काम करतात. कामातले लिंगाधारित भेद मोडून सगळ्यात पहिल्यांदा १९३९ ते १९४५ म्हणजेच दुसऱ्या महायुद्धादरम्यान काम करण्यासाठी महिला घराबाहेर पडल्या. १९६० नंतर जगभरातल्या महिला सरकारी नोकऱ्यांमधे काम करण्यास सुरवात केली होती. मात्र आजही अशी अनेक क्षेत्र आहेत जिथे महिलांचं अस्तित्व दिसत नाही. महिलांचं श्रम हे लिंगभेदाच्या विळख्यात अडकलंय.

पारंपरिक कामांचं लेबल

समाज बांधणीच्या काळात समाजात स्थैर्य येण्यासाठी आणि दैनंदिन व्यवहारात समतोल राखण्यासाठी शारीरिक क्षमता आणि साधनांची उपलब्धता ओळखून महिला आणि पुरुषांच्या जबाबदाऱ्या ठरवल्या गेल्या. पुरुषाने बाहेर शिकारीसाठी जायचं आणि बाईने घरी थांबून शेतीची, मुलांची, घराची काळजी घ्यायची इतकं ते साधं होतं. यामुळे या विभाजनाला पुढे स्त्री पुरुषांच्या पारंपरिक कामांचं लेबल कायमचंच चिकटलं.

हेही वाचाः लोक आपापल्या सोयीपुरता स्त्रीवाद का मांडतात?

आज एवढ्या वर्षांनंतर तंत्रज्ञानाचं बोट धरून क्षितिजाला गवसणी घालत असतानासुद्धा बाईने रांधायचं, वाढायचं, उष्टी काढायची. आणि फारफारतर कुटुंबाची आर्थिक गरज भागवण्यासाठी एखादी सुरक्षित, बाईच्या जातीला शोभेल अशी दहा ते पाचची नोकरी करायची. हे स्ट्रक्चर समाजाला पितृसत्तेच्या मार्गाने एका मोठ्या नकारात्मक विध्वंसक गर्तेत घेऊन जातंय.

चूलमूल काही सुटत नाही

मागं युनायटेड नेशन्सने एक अभ्यास पाहणी केली होती. त्यातनोकरी करणाऱ्या महिला आणि पुरुष यांच्या श्रमाची तुलनाकरण्यात आली. घरातल्या व्यक्तींची काळजी घेण्याच्या भावनिक आणि मानसिक श्रमांमधे बायका पुरुषांपेक्षा २.६ पटीने जास्त गुंतलेल्या असतात. 

महिला आज विविध क्षेत्रांत, विविध पदांवर काम करताहेत. तरीही घरातल्या सर्वांगीण जबाबदारीच्या या कामात त्या आपली कितीतरी ऊर्जा आणि वेळ गुंतवतात. त्या भुमिकेचा पैशाच्या नाही तर कौतुकाच्या स्वरुपात सन्मान होतो. त्यामुळे वर्षानुवर्षे महिलांच्या व्यक्तिमत्त्वाला कारुण्याची झालर लावून हे काम आर्थिक गणितांपासून दूरच ठेवलं गेलं.

सामाजिक गैरसमजुती

भारतीय अर्थव्यवस्थेने महिलांचं श्रम संस्काराच्या नावाखाली नेहमीच दुर्लक्षित ठेवलं. रोजचं घरगुती काम हे प्रचंड थकवणारं, निकृष्ठ दर्जाचं, सृजनाला संधी नसणारं आणि अनुत्पादक असल्याने त्याला नव उदारमतवादी अर्थव्यवस्थेने काहीच महत्व दिलं नाही.

हेही वाचाः आपण खरंच सावित्रीच्या लेकी आहोत का?

प्रशिक्षित असूनही बायकांकडे जुनाट सामाजिक गैरसमजांमुळे कौशल्यपूर्ण कामगार म्हणून बघितलं जात नाही. याचं प्रमाण जगभरात २५% आहे. भारतातल्या फक्त २४% महिला दर्जा असलेलं काम करतात. ८६% महिला फक्त घरगुती कामांमधे आणि अनौपचारिक क्षेत्रात जिथे श्रमाला काम म्हणून मान्यताच नाही अशा क्षेत्रात आपलं श्रम गुंतवतात. 

पारंपरिक चौकट मोडण्याचं आव्हान

नव्वदीच्या दशकात सगळीकडेच जागतिकीकरणामुळे अनेक क्षेत्रांच्या कक्षा रुंदावल्या. टेक्नॉलॉजीमुळे शारीरिक मेहनतीची जागा आता बौद्धिक मेहनतीने घेतली. यावेळी श्रमांच्या संकल्पनेत झालेल्या बदलामुळे बायोलॉजिकल डिटर्मिनेशनचा प्रतिवाद पोकळ ठरेल. मात्र बायका बौद्धिक काम करू शकत नाहीत हा एक नवा पोकळ दावा वापरून त्यांना या क्रांतीपासूनसुद्धा दूरच ठेवलं गेलं. खरंतर हे मोठ्या सत्तासंघर्षाचं प्रतिक आहे.

महिलांची बेरोजगारी किंवा त्यांच्या श्रमाला मोबदला न मिळणं हा फक्त आर्थिक मुद्दा नाही. हा जाणीवपूर्वक निवडलेला एक राजकीय पर्याय आहे. सत्तेच्या शर्यतीपासून नेहमीच महिलांना दूर ठेवलं जातं. अशा प्रतिकूल वातावरणात महिलांसाठी अपारंपरिक रोजगाराच्या संधी निर्माण करणं, सक्षमपणे टिकून राहण्यासाठी बळ देणं आपल्यापुढचं मोठं आव्हान आहे.

समानतेचा मार्ग

आता महिला घराबाहेर जाऊन काम करू लागल्यात. तरी त्यांची पुरुषांसारखी स्कीलफुल पर्सन म्हणून ओळख तयार होत नाही. उलट कामाच्या जागा बाईपण आणखी अधोरेखित करणाऱ्या असतात. अशावेळी महिलांना अपारंपरिक रोजगाराचा मार्ग जात, वर्ग, धर्म, लिंग, क्षमता आणि इतर दमनात्मक व्यवस्थांमधून तयार झालेले स्टिरीओटाइप्स भेदायला मदत करू शकेल.

यामुळे महिलांवरच्या हिंसेला उत्तर देण्याचं बळ मिळेल. तसंच सार्वजनिक जागांवर जाण्याचा आणि समान उपभोग घेण्याचा अधिकार, प्रशिक्षण मिळवण्याचा, पैसे कमावण्याचा, कमावलेले पैसे खर्च करण्याचा, स्वतःच्या आयुष्याचे निर्णय स्वतः घेण्याचा, सामूहिक जीवन स्वातंत्रपणे जगण्याच्या अधिकारामुळे महिलांचं व्यक्तिमत्व अधिक स्वतंत्र होत जाईल.

हेही वाचाः जेसिंडा अर्डेन, यू आर माय लीडर

महिलांनी अपारंपरिक क्षेत्रात येण्यासाठी फक्त तशा संधी निर्माण करणंच महत्वाचं नाही. पूर्वापार चालत आलेल्या आणि पुरुषांच्या मानल्या गेलेल्या कामांवर पुरुषप्रधान संस्कृतीचे दृश्य ठसे पुसून ती कामाची जागा महिलांसाठी सुरक्षित आणि सन्मानाची करणंसुद्धा तितकंच महत्वाचं आहे.

महिला टॅक्सी चालकांचा अनुभव

महिला टॅक्सी चालक अनेक ठिकाणी काम करत असल्या तरी त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतय. दिल्लीतली टॅक्सी चालक झीनत सांगते, ‘पॅसेंजर वही टॅक्सी में बैठते हैं जिसमे आदमी ड्रायव्हर हो.हम लडकियाँ भी उन्हें अच्छे से पहुंचा सकते हैं.’आपल्याकडचे रस्ते प्रचंड पुरुषी आहेत. त्यांनी महिला ड्रायव्हर्स या प्रतिमेचा विचारच केलेला नाही. सगळीकडे पुरुषांसाठीच स्वच्छतागृहे असतात.पुरुषच सिक्युरिटी गार्ड असतात असंही झीनत सांगते.

कोलकात्याची टॅक्सी चालक पल्लवी तिच्या आफ्रिकेतल्या मैत्रिणीचा अनुभव सांगते.‘परीक्षा घेणारा पुरुष हा पितृसत्तात्मक व्यवस्थेतूनच आलाय. त्यामुळे अशिक्षित किंवा कमी शिकलेल्या, खालच्या जातीतल्या किंवा गरीब बाईची प्रतिमा किचनमधली असते,  गाडीच्या स्टीअरींगवरची नाही.’

घरातली जबाबदारी पुरुषांनीही घेतली पाहिजे. या कामांमुळे एक प्रकारे घराची किंवा कुटुंबाची सत्ता महिलांकडे आलेली असते. मिळालेली सत्ता सोडणें किंवा कुणाच्या हवाली करणं सोपं नसतं. या दोन्ही बाजूंचा विचार करून समान विभागणी करणं आणि पुरुषांनी अपारंपरिक क्षेत्रात उतरणं हे बायकांच्या वेगळ्या प्रवासाला ताकद देणारं ठरू शकेल.

हेही वाचाः 

मुलीच्या मासिक पाळीने देवाचं ब्रम्हचर्य भ्रष्ट होईल?

या बायांमुळे मला रंडुलेपणाची लाज वाटत नाही

(लेखिका नाशिकच्या अभिव्यक्ति मीडिया फॉर डेवलपमेंट या संस्थेत कामाला आहेत.)