एप्रिलच्या सुरवातीपासूनच सर्वत्र बातम्या येत होत्या की अॅवेंजर एंडगेम बाहुबलीचा रेकॉर्ड तोडणार. त्यातच अॅवेंजर सिनेमालिकेचा हा सिनेमा म्हणजे शेवटचा भाग असल्याची घोषणा झाली. त्यामुळे रिलीज व्हायच्या आधीच तरुणाईने सिनेमाला डोक्यावर उचललं. पण ही सिरिज माहिती नसलेल्या अनेकांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होतं. सिनेमा बघितल्यावरही तो अनेकांना समजला नाही. त्यांच्यासाठी हा क्रॅश कोर्स.
अॅवेंजर या सायंस फिक्शन सिनेमालिकेला भारतीय प्रेक्षकांनी नेहमीच डोक्यावर घेतलंय. यातल्या काही सिनेमांमुळे तर किंग खानचेही सिनेमे आपटलेत. पण अमिताभ बच्चन यांनी अॅवेंजर : इन्फिनिटी वॉर पाहिला आणि ट्विट केलं की सिनेमात काय चाललंय काहीच समजलं नाही. तेव्हा सर्वसामान्यांवर तर तोंडात बोटच घालायची वेळ आली. बिग बींच्या ट्विटला अनेकांनी रिट्विट करत म्हटलं, 'हो आम्हालाही हा सिनेमा समजला नाही.' त्यामुळे काही जणांना आपण या ट्रेंडमधे नाही असं वाटलं. पण आता अॅवेंजर न कळालेल्यांनी चिंता करायची, घाबरून जायची गरज नाही. त्यांच्यासाठी आपण क्रॅश कोर्स आणलाय.
सिनेमाच्या गोष्टीतली गोष्ट आणि व्यक्तिरेखा यांचा सहजासहजी संबंध लागत नाहीत. त्यामुळे नेमकं काय चाललंय हे हा सिनेमा न समजण्याचं मुख्य कारण आहे. आपल्याकडे जे सिक्वेल सिनेमे बनतात त्यात कधी कधी पहिला भाग बघितला नाही तरी चालतो. आपण आधीच्या भागात काय होतं, हे समजून घेऊ शकतो, अंदाज बांधू शकतो. मग त्यात मुंबई-पुणे-मुंबई असो किंवा आपला जुडवा. पण या अॅवेंजरची गोष्ट वेगळीय. ती एकमेकांत गुंतलेलीय. पण म्हणून हा सिनेमा समजून घेणं अवघड आहे, असं काही नाही.
अॅवेंजर म्हणजे सेनापतींची फौज. प्रत्येक सेनेला एक सेनापती असतो. तसं अनेक सेनापती एकत्र आले तर काय होईल तर ते अॅवेंजर. या सिनेमांची सुरवात २००८ मधे आलेल्या आयर्न मॅनपासून झाली.
पण सुपर हिरोची टीम बनवण्याची मूळ संकल्पना १९६१ मधली. ती तेव्हा आलेल्या फॅनटॅस्टीक फोर या मार्वेल कंपनीच्या कॉमिकमधली आहे. त्याआधी कधीच सुपर हिरोची टीम बनवण्यात आली नव्हती. मात्र अॅवेंजरची सुरवात १९६२ मधे आलेल्या आयर्न मॅनपासून झाली. ही सर्व पात्रं आणि कथानकं कॉमिकचे संपादक स्टॅन ली यांनी डिझाइन केलीत.
साठच्या दशकात अमेरिका आणि युरोपतल्या घराघरात ही पात्रं चर्चेचा विषय बनली. लहान मुलांच्या मनात जागा पटकावली. ही कॉमिक्स एवढी प्रसिद्ध झाली की पुढे वीडियो गेम, टीवी सिरियल आणि सिनेमाच्या रुपात ती आपल्यापुढे आली. आजही अमेरिका आणि युरोपमधे ऐतिहासिक, जुन्या वस्तू विक्रीला असलेल्या पॉन दुकानांमधे या कॉमिक्सला खूप डिमांड असते. तिथे लोक बड्या किंमतीला ही कॉमिक्स विकत घेतात. जुन्या मार्वल कॉमिक्सना नेहमी मागणी असल्याचं अमेरिकेच्या लास वेगास इथले डीलर डेविड पाम यांनी 'कोलाज'शी बोलताना सांगितलं.
हेही वाचाः सुपरहिरो मरत नाहीत आणि त्यांचा बापही!
मार्वल कंपनीचा सिनेक्षेत्रातला प्रवास हा सर्वांच्या लाडक्या सुपरहिरो स्पायडर मॅनपासून झाला. ही सिरीज २००२ ते २००७ दरम्यान आली. त्यानंतर एक्स मॅन हा सिनेमा आला. मात्र तो सपशेल आपटला. त्यामुळे मार्वल कंपनी कर्जबाजारी झाली. मग सोनी आणि डिस्ने कंपन्यांकडे त्यांच्या स्पायडर मॅन, हल्क आणि वुल्वरीन यासारख्या व्यक्तिरेखा गहाण टाकाव्या लागल्या. यामुळे मार्वल कंपनी कशीबशी कर्जबाजारीपणातून बाहेर पडली.
शेवटी त्यांच्याकडे ५५ कोटी उरले. कोणी शहाणा असता तर गुपचुप घरी बसला असता. पण मार्वल कॉमिकचे ८५ वर्षांचे संपादक स्टॅन ली यांनी नवं काही तरी करण्याचा निश्चय केला. यातून त्यांनी टोनी स्टार्क म्हणजेच आपल्या लाडक्या आयर्न मॅनला जन्म दिला. असं म्हणतात हे चित्र त्यांनी तब्बल ४६ वर्षांनी काढलं होतं.
हा सिनेमा अपेक्षेपक्षा जास्त हिट झाला. त्यामुळे कॉमिकमधल्या इतर सुपरहिरोंवर सिनेमे बनवण्यास सुरवात झाली. सुपरहिरो सिरीजमुळे मार्वल पुन्हा एकदा प्रकाशझोतात आलं. त्यांनी सायन्स फिक्शन सिनेमांना एका वेगळ्या उंचीवर नेलं. आपल्याकडे भारतातही अशाप्रकारचे काही प्रयोग करण्यात आले. मात्र या सायन्स फिक्शन सिनेमांना फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यातल्या त्यात किंग खानच्या रा.वन सिनेमाने केलेला प्रयोग काहीअंशी यशस्वी झाला. रा.वनला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. दुसरीकडे साऊथमधे मात्र सायन्स फिक्शन सिनेमाला दांडगा प्रतिसाद मिळतो. तिकडे असे सिनेमेही बनतात.
हेही वाचाः अंधाधूनसारखा सिनेमा चीनमधे अंधाधुंद कमाई का करतो?
पहिल्या सिनेमात, शिल्ड नावाची संस्था असते. जगभरातल्या सुपर नॅशनल पावर्सवर नियंत्रण, निरीक्षण करणं हे त्यांचं काम असतं. टोनी स्टार्कचे वडील हावर्ड स्टार्क यांनी ही संस्था उभारली. जगावर कोणतंही संकट आलं की ज्याचा सामना सामान्य सैन्यदलं करू शकणार नाहीत, त्यासाठी सुपर पॉवर असणाऱ्या लोकांची एक टीम बनवली.
यातला पहिला सुपरहिरो म्हणजे आपला लाडका आयर्न मॅनची पहिल्या सिनेमात ओळख करून देण्यात आलीय. त्यानंतर आयर्न मॅनच्या दुसऱ्या भागात शिल्ड आणि त्याच्या आर्मर्सची माहिती अधिक विस्ताराने आलीय. त्यानंतरचा महत्त्वाचा सिनेमा म्हणजे कॅप्टन अमेरिका: द फर्स्ट अॅवेंजर. यात पाच सुपरहिरोंना एकत्र दाखवलंय. त्यांनी जगावर आलेल्या संकटांवर कशी मात केली याची गोष्ट सांगितलीय.
या २२ सिनेमांमधून त्यांनी एकएका सुपरहिरोची गोष्ट सांगितलीय. त्यांनी कॅरेक्टर डेवलपमेंटला अक्षरश: एक अख्खा सिनेमा वाहिलाय असं म्हणता येईल. यातून त्या सुपरहिरोचे फिचर, त्यांची क्षमता समजते. यात त्यांच्याही मालिका आहेत. जसं की आयर्न मॅन, हल्क वगैरे. हे सगळे सुपरहिरो एकत्र येऊन वाईट शक्तींविरुद्ध लढतात तेव्हा काय होतं, ते म्हणजे अॅवेंजर. हा सिनेमा म्हणजे एक कादंबरी आहे. यातले हे २२ सिनेमे म्हणजे त्या कादंबरीतले छोटे छोटे चॅप्टर आहेत.
हेही वाचाः कोल्हापूर ते ऑस्करः भानू अथैय्या यांचा ९० वा वाढदिवस
या मालिकेची सुरवात आयर्न मॅनपासून झाली. पुढे यात द इनक्रेडिबल हल्क, आयर्न मॅन-२, थॉर, कॅप्टन अमेरिका: द फर्स्ट अॅवेंजर, द अॅवेंजर्स, आयर्न मॅन-३, थॉर: द डार्क वर्ल्ड, कॅप्टन अमेरिका: द विंटर सोलजर, गार्डीयन्स ऑफ द गॅलेक्सी, अॅवेंजर्स: एज ऑफ अल्ट्रॉन, अॅन्ट मॅन, कॅप्टन अमेरिका: सिविल वॉर, डॉक्टर स्ट्रेन्ज, गार्डीयन्स ऑफ द गॅलेक्सी-२, स्पायडर मॅन: होमकमिंग, थॉर: रॅग्नॅरोक, ब्लॅक पॅंथर, अॅन्ट मॅन अँड द वॉस्प, अॅवेंजर : इन्फिनिटी वॉर आणि कॅप्टन मार्वल अशा २० सिनेमांची भर पडली.
यानंतरचा या मालिकेतला शेवटचा सिनेमा म्हणजे अॅवेंजर्स : एंडगेम. हा सिनेमा रिलीज व्हायच्या आधीच मार्वल कंपनीने एंडगेम हा या सिरिजमधला शेवटचा सिनेमा असल्याचं जाहीर केलं.
पण अॅवेंजर समजून घेण्यासाठी काही सगळे बावीसच्या बावीस सिनेमे बघण्याची गरज नाही. त्याची मूळ गोष्ट आणि मालिकेतले काही महत्त्वाचे टप्पे म्हणजेच सिनेमे बघितल्यावरही अॅवेंजर समजून घेता येतो. यात आयर्न मॅनचे पहिले दोन भाग, कॅप्टन अमेरिका द फर्स्ट अॅवेंजर, द अॅवेंजर्स, अॅवेंजर्स: एज ऑफ अल्ट्रॉन आणि अॅवेंजर: इन्फिनिटी वॉर हे सिनेमे बघितल्यावर आताचा एंडगेम समजून घेता येऊ शकतो.
एंडगेममधे एक युग संपतं. आघाडीचे अॅवेंजर्स निवृत्त झालेत. मग पुढे काय, जीवनचक्र कधी संपत नाही. तसंच वाईट प्रवृत्ती जन्म घेणार, त्या नष्ट करण्यासाठी चांगल्या प्रवृत्ती सरसावणारच ना. तसंच. नवे नायक, नवे खलनायक, नव्या समस्या येणार. नव्या पिढीसाठी नवे अॅवेंजर्स येणार.
अॅवेंजर्स एंडगेम हा सिनेमा अॅवेंजर: इन्फिनिटी वॉर या सिनेमाचा दुसरा भाग आहे. यात आधीच्या २१ सिनेमाची पार्श्वभूमी दिलीय. याचं कथानक द इन्फिनीटी गॉन्लेट आणि अॅवेंजर्स: इन्फिनिटी वॉर या कॉमिक्स आणि कार्टून मालिकेवरून तयार करण्यात आलंय. याचं दिग्दर्शन अँथोनी रुसो आणि जो रूसो या भावांनी केलंय.
यामधे आकाशगंगेतली नाहीशी झालेली अर्धी जीवसृष्टी कशी पुनरुज्जीवीत करण्यात आलंय हे दाखवलंय. तसंच आधीच्या सिनेमांमधल्या एकूण ३२ लोकप्रिय व्यक्तिरेखांचा समावेश आहे. मॉडेल्स, थ्रीडी अॅनिमेशन, लायटिंग, मोशन ग्राफिक्स, विज्युअल इफेक्ट्स, स्टायलायझेशन आणि सिनेमेटोग्राफी यासारख्या टेक्निकल गोष्टी ही या सिनेमाची वैशिष्ट्य आहेत.
या सिनेमाने सुरवातीच्या १० दिवसांतच लोकांची बोलती बंद होईल एवढा गल्ला भरलाय.दोन आठवड्यात भारतात ५० कोटींची कमाई केली.त्यामुळे या सिनेमाला कमाई करून देणारा भारत हा जगातील दुसरा देश ठरलाय. एंडगेमने जगभरात ३१२.९५ कोटींचा गल्ला जमवलाय. ही आकडेवारी सिने व्यवसायाचे विश्लेषक तरण आदर्श यांनी आपल्या ट्विटमधे दिलीय.
हेही वाचाः एका नाटकाचा प्रवासः सिंधुदुर्गातलं सरमळे ते न्यूयॉर्कचं ब्रॉडवे
या संपूर्ण सिरीजमधले सर्वच सिनेमे काही हिट झाले नाहीत. तरीही अनेक सिनेमांना प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. २२ सिनेमांमधून त्यांनी प्रेक्षकांना टिकवून ठेवलं. लोकांच्या मनात त्या हिरोंची जागा बनवली. सतत वर्षातून दोनदा सिनेमे काढून प्रेक्षकांना आपल्या गोष्टीत गुंतवलं. यासगळ्यांमधे नाव झालं ते सुपरहिरो म्हणजे टोनी स्टार्कच.
मात्र अॅवेंजर सिरीजचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात वाढण्याचं कारण आयर्न मॅन आहे. २०१२ पासून सर्वाधिक लोक या सिरिजशी जोडले गेल्याचं वेगवेगळ्या सिनेसमीक्षकांनी नोंदवलंय. टोनी स्टार्क हा माणसाळलेलाय. त्याच्यातलं माणूसपण लोकांना भावतं. तसंच त्याच्यातला अॅरोगन्स, बिंधास्तपणा तरुणाईला आकर्षित करतो. याउलटस्पायडर मॅन, बॅटमॅन हे आधी आलेले सुपरहिरो आपली ओळख लपवत होते. टोनी स्टार्क मात्र उघडपणे आपली ओळख सांगत होता.
एखादा सिनेमा बघताना तो आपण वेळी आपल्या जगण्याशी रिलेट करतो. सिनेमा रिलेट होत असेल तर चालतोही तुफान. आणि या सिनेमांतली गोष्ट म्हणजे या सिरीजमधली चेरी ऑन द केक आहे. प्रेक्षकांना त्यांच्या आयुष्याशी सिनेमाची गोष्ट रिलेट करता येते. अशाप्रकारच्या कथानकांमुळे सुपरपावर्स असूनही ते हिरो आपल्यातले वाटतात.
त्यानंतर सर्वात महत्त्वाचं मार्केटींग आहे. सिनेमाचं मार्केटींग जवळपास वर्षभरापासून सुरु होतं. वर्षातून दोनदा सिनेमे, विडियो गेम, खेळणी, युट्युबवर विडियो या सगळ्यांमुळे हे हिरो सतत लोकांच्या लक्षात राहिले. ज्यांनी सिनेमा बघितला नाही त्यांनासुद्धा हे हिरो किमान बघून माहीत आहेत.
हेही वाचाः
चला आता आपण राज ठाकरेंना प्रश्न विचारुया