शाश्वत ऊर्जेचा माणूस :  वि. रा. जोगळेकर

११ सप्टेंबर २०२०

वाचन वेळ : ५ मिनिटं


गांधीजींचा ग्रामीण भारत आणि नेहरूंचा उदयोन्मुख उद्योगी भारत या दोन्ही विचारांचं द्वंद जोगळेकर यांच्या मनात फिरत होतं. त्यांनी कोयनेला १९६७ च्या शेवटाला झालेला भूकंप आणि तिथलं उद्‌ध्वस्त जीवन डोळ्यादेखत पाहिलेलं होतं. शेवटी गवर्नमेंटची गाडी, बंगल्याची, मोठ्या पदावरची नोकरी त्यांनी सोडली. गोबरगॅस आणि बायोगॅस यंत्र उभारणीचं काम सुरू केलं. त्यातून ऊर्जा क्षेत्रातली नवी दिशा जोगळेकरांच्या संशोधक दृष्टीला मिळाली.

आज सारं जग ऊर्जा आणि प्रदूषण यांच्याविषयी प्रश्न घेऊन उभं आहे. त्या दोन्ही विषयांवर चर्चा खूप होते, वाद विवादही झडतात; पण प्रत्यक्ष जमिनीवर पाय रोवून जमेल तितकं काम आपल्या आदर्शातून उभं करणारा एक भगीरथ म्हणून विठ्ठलराव जोगळेकर यांच्याकडे आम्ही सगळे पाहत होतो. ‘थिंक ग्लोबली, ॲक्ट लोकली’ अशा विचाराने भारलेले विठ्ठलराव आयुष्यभर एका निरलस तत्त्वाने जगले. आजच्या व्यवहारी आणि तडजोडीच्या जगात पुष्कळदा त्यांचे विचार आणि वागणं काहींना एकांगी वाटलं असेल, पण गांधीविचारांचा हा भक्त त्यांच्याच वागण्यावर श्रद्धा ठेवून असल्यामुळे त्यांच्या मार्गापासून तसूभरही ढळले नाहीत.

निसर्गाच्या अनुभवातलं तारुण्य

तासगावच्या एका शेतकरी ब्राह्मण कुटुंबात १९३४ मधे त्यांचा जन्म झाला. त्यांच्या घरात आधुनिक विचार आणि परंपरागत आचार यांचं मनोहारी मिश्रण होतं. वडील समर्थभक्त, व्यायाम प्रसारक असल्यामुळे त्यांच्या घरावर आणि सभोवतीच्या सगळ्या गोतावळ्यावर शालीनतेचं आणि संस्कारांचं वातावरण पसरलेलं होतं. त्यातच मिश्किली आणि खेळकरपणालाही महत्त्वाचं स्थान होतं. त्यामुळे त्या सगळ्याच कुटुंबाला स्वच्छ, शुद्ध व्यवहाराची देणगी पिढीजातच मिळाली असावी. विठ्ठलदादांची कारकीर्द याही संस्कारांनी प्रभावित झालेली होती आणि तो प्रभाव काल, परवापर्यंत त्यांनी सगळ्या घरावर पांघरलेला होता. 

तासगाव, सांगलीच्या पंचक्रोशीत या जोगळेकर कुटुंबाला लोकांनी श्रद्धास्थान मानलं. त्या जनश्रद्धेचे सगुण रूप म्हणून विठ्ठलदादा काल, परवापर्यंत घाबरत होते. इतक्या बाळबोध घरातला उमलता तरुण सांगलीच्या इंजिनिअरिंग कॉलेजमधून पदवीधर झाला. याच वयात त्यांच्यावर त्यांचे मामा कै.दत्त आपटे यांच्या देशप्रेमाचा, अफाट वाचनाचा आणि जनसंपर्काचा प्रभाव पडला. इंजिनिअर झाल्यावर ते स्वतंत्र भारताच्या उभारणीतील आपला सहभाग देण्याच्या ईर्ष्येने कोयना प्रकल्पावर रुजू झाले. धरणाच्या बांधकामापासून तिथल्या दऱ्या, खोऱ्यांतून आणि जंगलांमधे त्यांचा वावर होता.

निसर्गाच्या या आगळ्या अनुभवातून त्यांच्या सुसंस्कृत तारुण्याला नवी उंची मिळाली. त्याचबरोबर धरणाचा जगङ्‌व्याळ प्रकल्प पूर्ण होईपर्यंत या साऱ्या खटाटोपाचा हेतू कोणता, असा एक संभ्रम त्यांच्या मनात होता. 

हेही वाचा : जॉर्ज ऑरवेल : सत्तेच्या खेळाचा चिरंतन भाष्यकार

संशोधनासाठी प्रयोगशाळा 

गांधीजींचा ग्रामीण भारत आणि नेहरूंचा उदयोन्मुख उद्योगी भारत या दोन्ही विचारांचं द्वंद त्यांच्या मनात फिरू लागलं. त्याचा निर्णय म्हणून, कोयनेतून निर्माण होणारी विद्युत ऊर्जा उद्याच्या जगापुढे प्रचंड भस्मासुर उभा करणार याचा त्यांना साक्षत्कार झाला. त्यातच कोयनेला १९६७ च्या अखेरीस झालेला भूकंप आणि तेथील उद्‌ध्वस्त जीवन त्यांनी डोळ्यादेखत पाहिले. मग गाडी, बंगल्याची सरकारी उच्चपदाची नोकरी सोडून देण्याचा त्यांनी निर्णय घेतला.

सांगलीत येऊन सहकारी उद्योग सुरू करण्यासाठी त्यांना त्यांचे मामा दत्त आपटे आणि त्यांचे प्रेरणास्थान वसंतदादा पाटील यांनी प्रोत्साहन दिलं. जुन्या सांगलीतल्या कारखानदार रघुनाथराव भिडे यांनी शिवसदन सहकारी संस्थेचं अध्यक्षपद घेतलं. या साऱ्या टीममधे थोर इंजिनियर वि.ह.केळकर, आवटी, गणपतराव आरवाडे अशी दिग्गज मंडळी काम करत होती. त्यांचे कोयनेपासूनचे कनिष्ठ सहकारी सुरेश आपटे हे जोगळेकरांच्या जोडीला आल्यानंतर या संस्थेने ग्रामीण भागातल्या गरजा आणि विकास डोळ्यांसमोर ठेवून प्रचंड उत्पादन सुरू केलं. 

शेतकरी आणि शेतमजुरांसाठी छोटी घरकुलं, तयार गोठे, पाण्याच्या टाक्या अशी उत्पादने सुरू झाली. त्या काळात पश्चिम महाराष्ट्रातला सहकारी उद्योग भरात आलेला होता. त्या माध्यमातून ग्रामीण भागात पोचणं आणि शेतकऱ्यांच्या गरजा भागवणं शक्य झालं. त्यातूनच गोबरगॅस आणि बायोगॅस यंत्र उभारणीचं काम सुरू झालं. त्यातून ऊर्जा क्षेत्रातली नवी दिशा जोगळेकरांच्या संशोधक दृष्टीला मिळाली. यासाठी लागणारा कच्चा माल प्रचंड प्रमाणात उपलब्ध असतो आणि त्यापासून निर्माण होणारी ऊर्जा देशाला स्वयंपूर्ण बनवू शकते, हे त्या, त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञ लोकांना जाणवू लागलं. 

केंद्र सरकारचे अपारंपरिक ऊर्जा खात्याचे सचिव आणि शास्त्रज्ञ महेश्वर दयाळ यांनी जोगळेकरांना भरपूर वाव दिला आणि सांगलीसारख्या आडवळणी गावात याविषयाच्या संशोधनासाठी प्रचंड प्रयोगशाळा उभी राहिली.

इंग्रजीतलं रामायण मराठीत आणलं

विद्यार्थिदशेपासून कष्ट आणि अभ्यास यांच्या संयोगाने समृद्ध झालेलं जोगळेकरांचं जीवन त्यांच्या पंचाहत्तराव्या वर्षी दैनंदिन उद्योगातून निवृत्त झालं. तासगावच्या वडिलार्जित मळ्यात त्यांनी वानप्रस्थ स्वीकारला, पण त्यांच्यातली नैसर्गिक आणि पारंपरिक ऊर्जा अधिकच काम करू लागली. आजवरच्या अनुभवांचा आणि व्यासंगाचा उपयोग करण्यासाठी त्यांनी लेखनाचा छंद विकसित केला. राजगोपालाचारींनी इंग्रजीत रूपांतरित केलेलं रामायण त्यांनी मराठीत आणलं. त्या पुस्तकाला लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला. त्यामुळेच पाठोपाठ महाभारताचीही मराठी आवृत्ती त्यांनी प्रकाशित केली. 

त्यांच्या अनुभवांचं शब्दांकन म्हणून त्यांची ‘शाश्वत ऊर्जेची शोधयात्रा’ ग्रंथबद्ध झाली. या सर्वच पुस्तकांना बाहेरचा कोणी मोठा प्रकाशक शोधावा लागलाच नाही, पण सुजाण वाचकांनी त्या पुस्तकांचं भरभरून स्वागत केलं. लुई फिशर या अमेरिकन पत्रकाराचा ‘महात्मा गांधी : हिज लाईफ ॲण्ड टाइम्स’ हा ग्रंथ त्यांनी अनेकदा वाचला होता. जगभरच्या व्यासंगी वाचकांमधे हे इंग्रजी पुस्तक विलक्षण लोकप्रिय झालेलं होतं; पण गेल्या सत्तर वर्षांत ते पुस्तक मराठीत आलेले नव्हतं, ते विठ्ठलदादांनी भाषांतरित केलं.

पुण्याच्या साधना प्रकाशनाने गेल्या १ सप्टेंबर २०१९ रोजी ते ७०० पानांचे पुस्तक प्रकाशित केलं. आश्चर्य म्हणजे, एकाच महिन्याने २ ऑक्टोबर २०१९ ला त्याची दुसरी आवृत्ती प्रकाशित झाली. गांधींजींवर श्रद्धा असलेला विठ्ठलदादांसारखा हळव्या मनाचा अनुयायी पुण्याच्या प्रकाशन समारंभात त्यांचे मनोगत व्यक्त करताना ओक्साबोक्शी रडला, हे भरगच्च भरलेल्या सभागृहाला नि:शब्द आणि स्तब्ध करून गेलं.

हे कोरोना स्पेशलही वाचा : 

लस सापडल्यावर तरी कोरोना संपेल का?

डॉक्टरांनी घातलेला सूट म्हणजे कोरोनाविरूद्धचं चिलखतच!

कोरोनाचे पेशंट या देशांत सापडले नाहीत की काही झोल आहे?

कोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशन्ट बरं कसं होतात?

एकदा बरं झाल्यावरही पेशंटला का होतेय पुन्हा कोरोनाची लागण?

किराणा दुकानातून आपण कोरोनाला घरी नेण्यापासून कसं वाचू शकतो?

आयुष्य खेळत जगण्याचा मंत्र दिला

गेल्या सुमारे वर्षभरात त्यांनी लेखनाचा तो व्यासंग चालू ठेवला होता, परंतु वयामुळे त्यांची लेखणी मनासारखी न धावता ती कुरकुरत होती, असं आमच्या सारख्या निकटवर्तीयांना जाणवू लागलं होतं. तरीही त्यांनी आपल्या आयुष्याची काही स्मरणचित्रं नुकतीच लिहिलीत. अगदी आदल्या दिवशीपर्यंत त्यांचा फोनवरून आमच्यासारख्या अनेकांशी संवाद चालू राहिला होता आणि तितक्याच नव्या उमेदीने नवे संकल्प चालू राहिले होते. १५ ऑगस्टच्या दुपारी त्यांची भेट घेण्यासाठी आम्ही काही जण तासगावला जाण्याचं ठरलंही होतं. 

त्या वेळी सहकार, ऊर्जा, लेखन, प्रकाशन अशा अनेक घरगुती विषयांवर काही विचारमंथन अपेक्षित होतं. पण ते सारंच आता जिथल्या तिथं थांबलं! आम्हा साऱ्या जवळच्यांमधे ते वयाने, बुद्धीने, मनाने, व्यासंगाने ज्येष्ठ होते. हीच त्यांची भूमिका तासगाव परिसरात होती. त्यामुळे त्या सर्व विश्वाला वडिलधारं माणूस गेल्याचं दुःख आहे; त्याचबरोबर त्यांनी दिलेल्या संस्कारांमुळे ते दुःख पाठीवर टाकून समृद्ध आयुष्याची वाटचाल हसत, खेळत जगण्याचा मंत्रही अनुसरला पाहिजे, ही जाणीव आहे.

हेही वाचा : 

'ती'ला हवंय तिरंग्याचं पोषण

हिंदू राष्ट्राचं स्वप्न साकार होईल का?

संत ज्ञानेश्वरांची ‘कोपर्निकसन’ क्रांती

जगातले १६ देश, जिथे रिटायरमेंटचं वय सगळ्यात जास्त आहे

आवाजाइतकीच रसरशीत आशा भोसलेंची जग गाजवणारी रेस्टॉरंट

(साभार : साप्ताहिक साधना)