महर्षी शिंदेंच्या डायऱ्या सांगतात, ११० वर्षांपूर्वीच्या प्लेगचा कहर

२० मे २०२०

वाचन वेळ : १८ मिनिटं


महर्षी विठ्ठल रामजी शिंदेंच्या उल्लेखाशिवाय देशातल्या प्रबोधनाचा इतिहास पूर्ण होऊ शकणार नाही. त्यांनी लिहिलेल्या आठवणींमधून त्यांचा काळही आजच्या पिढ्यांसाठी जिवंत ठेवलाय. आज कोरोनाने देश हादरलाय. तशीच परिस्थिती १८८९चा प्लेग आणि १९१८मधला इन्फ्लुएंझा यांच्या साथीने केली होती. मुंबई-पुणे हवालदिल होतं. ते शंभर वर्षांपूर्वीचे अनुभव आजही प्रत्ययकारी ठरतात.

महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांची समाजसुधारक विचारवंत म्हणून महाराष्ट्राला ओळख आहे. महर्षी शिंदे यांनी अस्पृश्यता निवारणाच्या कार्यापासून अनेक सामाजिक चळवळींमधे कृतिशील सहभाग घेतला. ब्राम्हसमाजाचे प्रसारक आणि प्रचारक म्हणून त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावलीय. समाजशास्त्रज्ञ, तौलनिक भाषाशास्त्राचे अभ्यासक, इतिहासकार, श्रेष्ठ दर्जाचे ललित लेखक अशा विविध भूमिका त्यांच्या आयुष्यात पाहायला मिळतात.  

महर्षी शिंदे यांनी त्यांच्या विद्यार्थीदशेत तसंच पुढच्या आयुष्यात आलेले प्लेग आणि इन्फ्लुएंझा साथीचं अनुभवकथन त्यांच्या ललित स्वरुपाच्या वाङमयात नोंदवून ठेवलेलं आहे. आज कोरोनामुळे देशभर झालेल्या परिस्थितीत हे वर्णन अधिक प्रत्ययकारी ठरतं. एकतर महर्षी शिंदे यांचं ललित वाङमय हे सामाजिक आणि ऐतिहासिकदृष्ट्या फार मोलाचं आहे. महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या अस्पृश्यतेच्या इतिहासाबरोबरच त्यांच्या परिणत आणि प्रगल्भ अशा जाणिवांचा आविष्कार महर्षींच्या आत्मपर लेखनातून झालेला आहे. यामधे त्यांचं रोजनिशी लेखन फार महत्त्वाचं आहे.

हेही वाचा : वि. रा. शिंदेः ते रोज एकदा अस्पृश्यांबरोबर जेवत

११० वर्षांपूर्वीच्या डायऱ्यांतल्या साथरोगांची हकीगत

आपल्या आयुष्याच्या विविध टप्प्यांवर महर्षी शिंदे यांनी या डायऱ्या लिहिल्यात. तरुण विद्यार्थीदशेतल्या पुणे येथील १८९८-९९ या काळातल्या रोजनिशी तसंच मॅंचेस्टर कॉलेज, ऑक्सफर्ड येथील १९०१-०३ या काळातल्या रोजनिशी, १९२८ सालातली बंगालमधील ब्राम्हसमाज शतसांवत्सरिक सफर आणि चौथी १९३०ची शहरातील येरवड्याच्या तुरुंगातली रोजनिशी असं रोजनिशी लेखन महर्षी शिंदे यांनी केलेलं आहे. याशिवाय त्यांच्या काही अप्रकाशित रोजनिशी अद्याप प्रकाशित व्हायच्या आहेत. 

याबरोबरच आत्मपर लेखनाचा आविष्कार म्हणून त्यांचं 'माझ्या आठवणी व अनुभव' हे आत्मचरित्र आणि सुबोध पत्रिकेमधे लिहिलेली प्रवासवर्णनंदेखील फार महत्त्वाची ठरतात. महर्षी शिंदे यांच्या अंतरंगाचा विलोभनीय आविष्कार या आत्मपर लेखनातून  झालेला आहे. त्यांच्या एकंदर आयुष्यातील जीवन प्रवासाबद्दलचं वैशिष्ट्यपूर्ण निवेदन त्यांच्या या लेखनात आहे. स्वाभाविकपणेच शिंदे यांच्या आयुष्यातील सभोवतालच्या जीवनाची समाजचित्रं आणि अनुभवकथनांनी त्याला वेगळं परिमाण लाभलंय. 

त्यामुळे १८९८ आणि ९९ मधल्या पुण्यातल्या प्लेगच्या साथीचे अनुभव या लेखनात आहेत. तसंच १९१८मधल्या महाराष्ट्रातल्या इन्फ्लुएंझा या साथीच्या आजाराचं निवेदनदेखील या लेखनात आहे. पुणे, मुंबई, कोल्हापूर या गावातले तसंच परदेशी प्रवासातल्या आगबोटीवरचे अनुभव यामधे आहेत. या आत्मपर नोंदी केवळ कोरड्या माहितीपर स्वरुपाच्या नाहीत तर त्याला शिंदे यांच्या संपन्न व्यक्तिमत्वाचा खोलवरचा स्पर्श झालेला आहे.

१८९७ ते १९०० या काळातल्या प्लेगच्या थैमानाचं कथन मराठीतल्या इतरही काही साहित्यकृतीत पाहायला मिळतं. अहिताग्नी शंकर रामचंद्र राजवाडे यांच्या 'आत्मवृत्त' या आत्मचरित्रात पुण्यातल्या प्लेगच्या साथीचं अतिशय प्रभावी असं चित्रण आहे. तसंच पांडुरंग चिमणाजी पाटील यांच्या 'माझ्या आठवणी' या आत्मचरित्रातही १९०० सालातल्या काही आठवणी आहेत.

कॉलेजकाळातले प्लेग साथीचे अनुभव

महर्षी विठ्ठल रामजी शिंदे हे आजच्या कर्नाटकातल्या जमखंडीचे. त्यांचं बालपण आणि शालेय जीवन जमखंडीला गेलं. पुढे कॉलेजसाठी ते १९९५च्या सुमारास पुण्यामधे आले. त्यांनी फर्ग्युसन कॉलेजमधे प्रवेश घेतला. या काळात ते विविध ठिकाणी खोली भाड्याने करून राहत असत. दोन-तीन वर्षानी त्यांच्या विधवा बहीण जनाक्का यांनाही ते शालेय शिक्षणासाठी म्हणून आपल्या सोबत पुण्यात घेऊन आले. ही भावंडं काही वर्षं एकत्र राहिली, तर काही वर्षं जनाक्का बोर्डिंगमधे राहिल्या.

महर्षी आणि जनाक्का या भावंडात अतिशय प्रेमाचं आणि जिव्हाळ्याचं हृद्य नातं होतं. जनाक्का महर्षींच्या समाजकार्यात आयुष्याच्या अखेरपर्यंत सहभागी झाल्या. महर्षीं शिंदेंनी जानक्कांना पंडिता रमाबाईंच्या शाळेत तसंच महर्षी कर्वे यांच्या शाळेत प्रवेश मिळवून देण्याचा प्रयत्न केला, परंतु तो त्यांना मिळाला नाही. अखेरीस हुजूरपागा शाळेत जानाक्कांचं शिक्षण झालं.

विठ्ठल रामजी यांच्या या विद्यार्थी काळातल्या प्लेगच्या आठवणी त्यांच्या रोजनिशीत आहेत. त्यांच्या कॉलेज काळातील या समाजवृत्तांत स्वरुपाच्या नोंदी महत्त्वपूर्ण ठरतात. तसंच त्यांच्या या काळातल्या मनोवस्थेचं आणि विचारदृष्टीचं दर्शनदेखील या लेखनात आहे. तसंच तरुण विद्यार्थीदशेतल्या या साथीच्या आजाराचं वातावरण, मित्रमेळा, अनुभव यामधे आहेत. 

पुण्याच्या महाविद्यालयीन काळात महर्षी शिंदे यांना खूप जिवाभावाचे मित्र लाभले. या साथीसंबंधीची पहिली नोंद ७ एप्रिल १८९८ची आहे. महर्षींचे अतिशय जिवाभावाचे मित्र कोल्हापूरचे गोविंदराव सासणे आणि इतर मित्रांना कॉलेजच्या सेल्बी साहेबांनी `क्वारंटायीनस्तव` दहा दिवसांसाठी कोल्हापूरला जाण्याची मुभा दिल्याची नोंद आहे. हे सर्व विद्यार्थी दुसऱ्या दिवशी कोल्हापूरला जाणार होते. म्हणून ते पुण्यात दिवसभर काही सामान खरेदी करण्यासाठी फिरले. त्यांच्या सोबत महर्षीही होते. दुसऱ्या दिवशी ही मंडळी स्टेशनवरून कोल्हापूरला निघाली.

त्यानंतर महर्षींचे सहाध्यायी मित्र कानिटकर आणि हुल्याळ हे दोघे आजारी पडल्याचाआणि त्यांच्या शुश्रुषेचा वृत्तांत आहे. पुढे केशव शंकर कानिटकर(१८७६-१९५४) हे फर्ग्युसन कॉलेजमधून शास्त्र विषयाचे प्राध्यापक म्हणून निवृत्त झाले. तर माधव नारायण हुल्याळ (१८७३-१९५८) हे डिस्ट्रीक्ट डेप्युटी कलेक्टर तसंच भोर आणि जमखंडीया संस्थानांचे दिवाण होते.

नातलग अंत्ययात्रेला आलेच नाहीत

त्या काळातल्या प्लेगच्या साथीची धास्ती कॉलेजमधल्या सर्व तरुणांच्या मनावर होती. हे मित्र एकमेकांची काळजी घ्यायचे. महर्षी रात्री दोन तीनदा उठून हुल्याळचा घाम पुसत डोक्यावर गार पाण्याची पट्टी ठेवत. पांघरूण घालून त्यांना निजवत. स्वतःखोलीतून बाहेर येऊन पडवीत झोपत. त्यावेळी महर्षींनी स्वतःच्या काळजीचा उल्लेख केला आहे की, 'खोलीत मित्राबरोबर झोपणं म्हणजे फाजील माया आणि वेडेपणा ठरेल'.  

तसंच या काळातील प्लेगच्या साथीविषयी ही मित्रमंडळी एकमेकांमधे थट्टा मस्करी करत. विठ्ठल रामजींना या काळात राहण्याच्या अनेक अडचणी आल्या. जनाक्कांना घर मालकिणीचा जाच सहन करवा लागला. त्याची महर्षींना नेहमी चिंता असे. त्यामुळे त्यांना वारंवार बिऱ्हाड बदलावं लागलं. दोघं मिळून स्वयंपाक करून जेवत असत. प्लेगमुळे २६ एप्रिलचा शिवजयंती उत्सव पुण्यात नीट साजरा न झाल्याची नोंद आहे. यावेळी त्यांनी सरकारला उद्देशून टीकादेखील केली आहे. दुष्काळ, प्लेग आणि सरकारच्या मूर्खपणाचे प्रताप यामुळे हे घडल्याचं महर्षींना वाटत होतं. 

महर्षींनी २ मेच्या नोंदीत एक दुःखदायक आठवण सांगितली आहे. त्यांच्या कॉलेजमधला टिकेकर नावाचा विद्यार्थी आदल्या रात्री पहाटे ३ वाजता मरण पावला. क्वार्टर्समधे त्याचं प्रेत पाहून महर्षींना फार वाईट वाटलं. त्याचे आई बाप म्हातारे असून त्यांचा हा एकुलता एक मुलगा होता. सकाळी ओंकारेश्वराला अंत्यविधीसाठी नेण्यात आलं. कॉलेजची मुलं त्या वेळेस त्यांच्या समवेत होती. अगदी मोती बुलासादेखील त्यांच्याबरोबर होते. मात्र त्याचे नातलग कोणीच नव्हते, त्यामुळे अंत्यविधी झाला नाही, अशी नोंद शिंदे यांनी केली आहे.

हेही वाचा : शाहू महाराजांच्या एन्फ्ल्युएन्झा मंडळानं स्पॅनिश फ्लूला रोखून दाखवलं!

फर्ग्युसन कॉलेजमधले ६ विद्यार्थी बळी

३०मेच्या नोंदीमधे पुण्यातील वसंत व्याख्यान मालेवर प्लेगच्या साथीचा परिणाम झाल्यामुळे 'मालेची फार दैना दिसत आहे' अशी नोंद आहे. या व्याख्यानाला नामवंत मंडळी मिळाली नसल्यामुळे झालेल्या परिस्थितीविषयी मिश्किल नोंद त्यांनी केलीय. ती अशी, 'दुष्काळ व प्लेग यामुळे फुले का महाग व्हावीत हे कळत नाही. पण 'वरजाती' पुष्पे मिळाली नाहीत. म्हणून कण्हेरीची व बाभळीचीही फुले मालाकरांनी ओवण्याचा सपाटा चालविला आहे. यावरून एक नुसती लांबलचक माळ तयार झाली की काम आटपले असे यांना वाटत असे दिसते.' 

प्लेगच्या साथीमुळे बहीण जनाक्काला काही दिवस पुणे सोडून जमखंडीला जावं लागलं. त्यामुळे शाळा बुडाल्यामुळे जनाक्काची आठ महिन्यांची स्कॉलरशिप बुडाली, याची खंतही शिंदे व्यक्त करतात. त्यानंतर पुण्याला परतल्यानंतर जनाक्काला बोर्डिंगमधे घेतलं नाही. महर्षींना स्वतःच्या परीक्षेचीही चिंता होती. खोल्या बदलाव्या लागत होत्या आणि आजूबाजूला प्लेगच्या अनेक केस त्यांना पाहायला मिळत होत्या.

९ जूनच्या  नोंदीत अशीच दीर्घ  नोंद आहे. त्यांच्या कॉलेजमधे धारवाडचा कुकनूर आणि जमखंडीचा पोटे अशा आडनावांचे दोन विद्यार्थी आजारी पडले. त्यांना नायडू दवाखान्यात दाखल करण्यात आलं. त्यात कुकनूर मरण पावला. ही बातमी ऐकून शिंदे यांच्या मनाला फार वाईट वाटलं. एका वर्षात कॉलेजच्या रेसिडेंट विद्यार्थ्यांमधला हा सहावा मृत्यू असून हे कॉलेजचं दुर्दैव आहे, असं त्यांना वाटलं. त्याबद्दलची हळहळ ते व्यक्त करतात. 

फर्ग्युसनवाल्यांस सहाध्यायांच्या अंत्ययात्रांची चटक

विद्यार्थ्यांच्या मरणाची विविध कारणं लोक देत राहतात. मात्र त्यांच्या मरणाकडे कुणाचं लक्ष नसल्याचं शिंदे नोंदवतात. यात प्राध्यापकांचा निष्काळजीपणा देखील त्यांना कारणीभूत वाटतो. `रेसिडेंटमधील ही मुलं एकत्र खेळत,जेवल्याबरोबर पुलावर गप्पा मारीत बसत. व्हराड्यांत निजणे,सापडली वेळ की अनवाणी शेंडी उडवीत टेनिस ग्राउंडवर हुंदडणे अगर क्रिकेटचे सामान सापडले की खराब करणे इ. गोष्टींकडे नजर पुरविण्यास प्रोफेसरांस वेळ होत नसेल काय', असा प्रश्न शिंदे उपस्थित करतात. तुलनेने गावातला एकही निवासी विद्यार्थी मरण न पावल्याकडे शिंदे लक्ष वेधतात.

त्यानंतर त्यांनी एक वैशिष्ट्यपूर्ण असं उपरोधिक निरीक्षण नोंदवलं आहे. ते असं, 'काही असो, फर्ग्युसनवाल्यास आपल्या सहाध्यायांचा अंत्यविधी पाहण्याची जणू चटक लागली आहे'. कुकनूरचं प्रेत दवाखान्यात दुसर्यािच एका खोलीत ठेवण्यात आलं होतं. जवळ कोणीच नव्हतं. महर्षी शिंदे सुमारे तासभर एकटेच प्रेताशेजारी बसले होते. तासाभराने क्वार्टर्समधली मंडळी आली. दहन होऊन घरी यायला रात्रीचे साडेबारा वाजले.

महर्षींनी लिहिलंय,  'त्या निर्जीव सोबत्याशी माझा एकांतवास फारच उदासवाणा झाला. तो मरून चार तास झाले होते तरी त्याचे आंग किंचित गरम लागत होते. मी त्याला दोनदा शिवलो व प्लेग डाक्टरने त्याची तपासणी केल्यावर जेव्हा आपले हात स्वच्छ प्रकारच्या साबणाने धुतलेले मी पाहिले, तेव्हा मात्र माझ्या कृतीचा पश्चाताप झाला.' 

कोल्हापूरमधे शिरण्याआधी शिरोळला क्वारंटाइन

यानंतर पुढच्या नोंदी जवळपास नऊ महिन्यांनंतरच्या नोंदी आहेत. महर्षी शिंदे साथीमुळे या काळात आपल्या गावाकडे परतलेले दिसतात. या सुट्टीच्या काळामधे महर्षी, गोविंदराव सासणे आणि जनाक्का यांनी एकत्रित पन्हाळा दर्शन करण्याचं ठरवलं होतं. त्याप्रमाणे ३१ मार्च १८९९ला महर्षी जमखंडीहून कुडचीला आले. त्यावेळी त्यांना कळलं की गोविंदराव हे शिरोळ इथे क्वारंटाइनमधे आहेत. 

पन्हाळा, विशाळगड, जोतिबा आणि पावनगड अशी सफर करावी, असं या वर्ग मित्रांनी ठरवलं होतं. शिरोळचं रेल्वे तिकीट न मिळल्यामुळे महर्षींनी मिरजेत क्वारंटाइनमधे मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी दुपारी तीन वाजता गोविंदराव यांचा निरोप आल्यानंतर महर्षी मिरजवरून अंकलीमार्गे पायवाटेने शिरोळ क्वारंटाइनमधे पोहोचले. एका मोठ्या बंगल्यात क्वारंटाइनची सोय केलेली होती.

त्याकाळातही कोल्हापूर परिसरात प्लेगची साथ होती. जवळपास १८ खेड्यांत ही साथ पसरली होती. संस्थानामार्फत २ जानेवारी १९००ला प्लेग जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला होता. कोल्हापुरातले नागरिक गावाबाहेरच्या रानात,झोपड्यात राहत होते.बाहेरून येणाऱ्यांसाठी क्वारंटाइनची सोय करण्यात आली होती, अशी माहिती राजर्षी शाहूगौरव ग्रंथात आहे.

हे कोरोना स्पेशलही वाचा : 

लस सापडल्यावर तरी कोरोना संपेल का?

कोरोनाग्रस्त मृतदेह जाळायचा की पुरायचा?

हात धुण्यासाठी साबण वापरायचा की सॅनिटायझर?

साथीच्या आजारात सारं जग समाजवादी वळण घेतं

आपल्याला घरात थांबायचं इतकं टेन्शन का आलंय?

कोरोनाचा पेशंट वेंटिलेटरवर किती काळ जिवंत राहतो?

कोरोना कुटुंबातलं सातवं पोरच इतकं वात्रट कसं निघालं?

डॉक्टरांनी घातलेला सूट म्हणजे कोरोनाविरूद्धचं चिलखतच!

एकदा बरं झाल्यावरही पेशंटला का होतेय पुन्हा कोरोनाची लागण?

कर्तृत्ववान केळवकर बहि‍णींचा सहवास

शिरोळ क्वारंटाइनमधे ही सर्व मंडळी जनाक्काची वाट पाहत होती. यावेळी कोल्हापूरच्या केळवकर कुटुंबातल्या कृष्णाबाई, यमुनाबाई आणि अहल्या या तिन्ही मुली तिथे होत्या. केळवकर कुटुंबाशी महर्षींचा जवळचा स्नेह होता. यातील कृष्णाबाई या फर्ग्युसन कॉलेजच्या पहिल्या विद्यार्थिनी. शिंदेही त्याच काळात फर्ग्युसनला होते. पुढे त्या वैद्यकीय शिक्षण घेऊन संस्थानातल्या पहिल्या महिला डॉक्टर बनल्या. 

राजर्षी शाहू स्मारक ग्रंथात अरुणा ढेरे इतर दोन बहि‍णींविषयी सांगतात, 'यमुनाबाई या पुढे शिक्षिका झाल्या. त्यांचा नंतर पंजाबातील एक नेते लाला हरकिशनलाल यांच्याशी विवाह झाला. तर अहल्या यांचेही शिक्षण झालेले होते. त्यांचा विवाह हैद्राबाद येथील प्रसिद्ध डॉक्टर मलाप्पाजीनागेश यांच्याशी झाला'. केळवकर कुटुंब हे ब्राम्ह समाजी  होतं. हे मूळचे वसईचे. छत्रपती शाहू महाराजांनी त्यांना आपल्या संस्थानात आणलं होतं. या कुटुंबाविषयी शिंदे यांच्या मनात आदर होता. त्यांच्या घरी शिंदे यांनी अनेकदा ब्राम्ह समाजाच्या कौटुंबिक उपासना केल्या होत्या.           

कृष्णाबाई यांनी पुण्याला जनाक्कांच्या बोर्डिंगमधल्या मदरला शिरोळहून पत्र पाठवलं. त्यामुळे जनाक्कांना ८ एप्रिलला शिरोळला पोहोचता आलं. शिरोळच्या क्वारंटाइनमधे संस्थानातले धनवडे नावाचे परोपकारी सेवाभावी वृत्तीचे डॉक्टर भेटल्याचा उल्लेख शिंदे यांनी केला आहे. या मंडळींनी शिरोळला एकूण पंधरा दिवस क्वारंटाइन म्हणून घालवले.

शिकलेले असून भजनं कसं गातात?

शिरोळहून ही सर्व मंडळी ११एप्रिलला कोल्हापूर जवळच्या उदगावला आली. गावाजवळच्या पुलाजवळ पोलीस नाईक मल्हारी साळुंखे राहत. ते सासणे यांचे नातेवाईक होते. ही मंडळी त्यांच्या झोपडीत क्वारंटाइन म्हणून राहायला आली. त्यांची  झोपडी मोठी आणि तीन खोल्यांची होती. नदीकाठावरच्या दोन्ही बाजूंना दोन जंगी पूल, एकांतवास, रम्य देखावा, स्वच्छ हवा आणि पाणी यामुळे सर्वांना आनंद वाटला. हे सगळे या झोपडीत क्वारंटाइन म्हणून मुक्कामास राहिले.

विठ्ठल रामजी आणि गोविंदराव रोज संध्याकाळी नदीकाठाजवळच्या पुलाजवळ गप्पा मारत बसत. नदीकाठच्या निसर्गरम्य परिसरात फिरायला जात. या फिरण्यात त्यांना आनंद वाटे. या काळातील त्यांच्या मनातील सूक्ष्म भावतरंगांचं निवेदन या नोंदींमधे  आहे. तिथे रोज रात्री निजण्यापूर्वी नाईक आणि महर्षी वारकरी भजन करत. साळुंके यांच्या झोपडीत टाळ आणि चिपळ्या होत्या. महर्षी शिकलेले असूनही ते भजन करतात याचं लोकांना कौतुक वाटत असे. क्वारंटाइननिमित्त पुलावर अनेक वारकऱ्यांच्या गाठीभेटी घडत.  

उदगावच्या बाळोबा नावाच्या एका वृद्ध वारकऱ्यांची कथादेखील त्यांनी सांगितली आहे. हा भोळाभाबडा वारकरी पंढरपूरची पंधरवडा वारी चुकवत नसे. एकदा त्यांच्या पायाला नारू झाला होता आणि नदीला पूर होता. तरीही ते 'विठ्ठल विठ्ठल` असं ओरडत पंढरपूरला गेल्याची आठवण शिंदे सांगतात. यावेळी शिंदे यांनी एक स्वरचित भजन म्हटलं. ही भजनं मनाला गोड लागतात आणि वृत्ती सात्विक होऊन लय होतो. ऐहिक ताप निवतात, असं शिंदे यांना वाटत असे.

कोल्हापुरात राजपुत्रांच्या जन्माचा उत्सव

जनाक्कांचे क्वारंटाइनचे दहा दिवस भरल्यानंतर ही सगळी मंडळी १८ एप्रिलला कोल्हापुरात पोहोचली. यावेळी त्यांना कोल्हापुरात अतिशय आनंद उत्सवाचे असं वातावरण दिसलं. छत्रपती शाहू महाराजांच्या दुसऱ्या पुत्र जन्मोत्सवानिमित्त घरोघर गुढ्या उभा होत्या. पेठेतून निशाणं, तोरणं फडकत होती. हत्ती, घोडे, उंटस्वार, पायदळ इतक्या सरंजमांनी भर रस्त्यातून प्रत्येक घरी हत्तीवरून साखर वाटली जात होती.

महर्षी कोल्हापुरात केळवकर कुटुंबात मुक्कामी असावेत. या कुटुंबात एक प्रकारची आकर्षक अशी शक्ती आहे, असं त्यांना वाटे. बुद्धी, सौंदर्य, विनय, विनोद, आदर अशा मोहक गुणांचे विलास या घरी सहज नजरेला पडल्यामुळे त्या कुटुंबात त्यांना जादू वाटे. या काळात महर्षींच्या मनात एक अंतःस्थ खळबळ चालू होती. मनातल्या या भावसंवेदनांच्या त्यांनी फार सूचक नोंदी केल्या आहेत.

२३ एप्रिलला ही सर्व मंडळी बैलगाडीतून पन्हाळ्याला निघाली. २३ ते २९ एप्रिल या काळात त्यांनी हा सर्व परिसर पहिला. या प्रवासाचं महर्षींनी केलेलं वर्णन हा प्रवासवर्णनाचा उत्तम नमुना आहे. पन्हाळा, विशालगड, मसाई पठार, पांडवदरी, पावनगड आणि वाडी रत्नागिरी म्हणजे जोतिबा अशीही त्यांची स्थळयात्रा दर्शनाची विहंगम सफर त्यांनी अतिशय ललित भाषेत कथन केली आहे.

हेही वाचा : प्लेगची साथ रोखण्यासाठी गांधीजींनी झोपडपट्टीत उभारलेल्या जुगाड हॉस्पिटलची गोष्ट

मन सुखावणारी पन्हाळ्याची भेट 

पन्हाळ्यावरील पेठा म्हणजे वाड्या, साधुबोवांचा दर्गा, लहानसं तळं, हॉस्पितळ, पोस्ट ऑफिस, संभाजी महाराज देऊळ, लायब्ररी, सरकारी कचेरी ही ठिकाणं बघितल्याचं ते सांगतात. 'पन्नगालय' या शब्दाचा अपभ्रंश होऊन पन्हाळा हे नाव पडल्याचे ते आवर्जून नोंदवतात. तटावरच्या ऐतिहासिक खुणा, तोफा, शिलालेख, तीन दरवाजे,चार दरवाजे, पन्हाळा किल्ल्याचा इतिहास,  दंतकथा, निसर्गस्थळे, आजूबाजूचा परिसर,वनश्रीयांची खूप चांगली निरीक्षणं या लेखनात आहेत. 

तीन दरवाजवळच्या बागेत त्यांना वेलदोडे, मिरी,  महाळुंगाची लागवड केलेली दिसली. तबक उद्यानात झुपकेदार तांबड्या पिवळ्या फुलांचं रोजबेरचं झाड दिसलं. 'त्या पानाचा रंग हिरवा अस्मानी असून पाने फार मऊ व कोमल असतात. त्याची फळे अद्याप पिकली नव्हती. रंग पिवळसर तांबूस होता. ती आंबट मधुर असतात. करवंदाएवढि होती. खुरबुड होती,' असं या झाडफुलाचं वर्णन केलं आहे. 

अवतीभवती त्यांना अतिशय स्वच्छ गोड पाणी आढळलं. नाना प्रकारच्या वेलींनी तटाला चोहीकडून कवटाळलं आहे, असं नोंदवून तिथून सभोवार दिसणाऱ्या रम्य मनोहारी देखाव्याचं वर्णन महर्षींनी केलंय. त्यांना तटावरून खाली त्यांना दहा पंधरा लांडग्यांचा कळपही दिसला.

त्याच बरोबर त्यांनी पावनगड पाहिल्याचं निवेदनही आहे. पावनगड शब्दाची उत्पत्ती, परिसर, कबरी, पीर देऊळ, उंचावरून दिसणारा जोतिबा आणि कोल्हापूरचा राजवाडा यांच्या नोंदी त्यांच्या रोजनिशीत आहेत. तिथल्या एका प्रसंगाचे वर्णन शिंदे यांनी काव्यात्म भाषेत केलं आहे. ते असं,

'पूर्वेकडच्या कोपऱ्यावर बुरुजाच्या अगदी टोकातून एक पिंपळाचे झाड हवेत वाढले होते. त्या झाडाच्या एका फांदीवर मी खाली पाय सोडून देखावा पाहत बसलो. गोविंदरावांनी बरोबर काही कापशीची बोण्डे घेतली होती. हारडीकरांनी त्याचे पतंग करून वाऱ्यावर सोडले, ते वाऱ्याच्या झुळकीसरशी उंच वर जात आणखी खाली येत. असे उंच झोके खात ते जोतिबाच्या डोंगरावर पडले असावेत. सडकांवरून खडी पसरवली होती. त्यामुळे मला अति प्रियकर उषःकालच्या फिकट आबाशायी रंगाची काळ्या फत्तरातून व हिरव्या झाडीतून सडकांची हृद्ययंगम वळणे पाहून वारंवार माझे हृदय द्रवत असे व अंतरंगातील अतिगूढ विषयाकडे हट्टाने ओढ घेत असे. माझ्या हातातील गाठीच्या काठीची गावंडायची झाडे मी येथे पहिली. रात्री चांदण्यातून घरी आलो.' 

निराशेच्या वातावरणात मनात मात्र ऊर्जा

त्यानंतर  मसाई पठार, तिथल्या गुहा, झाडी डोंगर यांची वर्णनं आहेत. विशाळ गडावरचा सोनचाफा, सुवर्णपुष्प, नेवाळी, फुलझाडं करवंदं, बोरं, आंबे, जांभळं अशा विपुल निसर्ग संपत्तीची वर्णनं या नोंदीत आहेत. वाडी रत्नागिरीचा परिसर, जोतिबाच्या दंतकथा, मंदिराची ठेवण, जोतिबा आणि यमाईच्या विवाहाची मिथककथा याचं कथन या नोंदीत आहे. 

त्यादिवशी चैत्री पौर्णिमेची जोतिबाची यात्रा होती. सकाळी आठ वाजता दशम्या घेऊन ही मंडळी बाहेर पडली. अलीकडे क्वारंटाइनमुळे यात्रा भरत नसल्याचा उल्लेख आहे. मात्र या यात्रेचं वर्णन त्यांनी केलंय. उमेदीचे लोक वीस सासणकाठ्या नाचवत होते. पुढे कुणब्याचं वाद्य, लहान कर्कश वाजंत्री आणि डफडं वाजत होतं. डफडेवाला आणि काठीवाला हे समोरासमोर आपल्या ओबडधोबड तालावर बेहोष नाचत होते. देवाला गुलाल, खोबरं, खारका यांची मोठी आवड असल्याचं दिसतं. मुख्य देव जोतिबाचं तोंड दक्षिणेकडे म्हणजे कोल्हापूरकडे आहे.

बाहेर रोगांच्या साथीची एक निराशा आणि उदासीनता असतानाही एका सकारात्मक ऊर्जादायी मनाचा प्रवास महर्षींच्या या नोंदीमधे आहे. सभोवतालच्या बहरलेल्या निसर्गातून त्यांना जगण्याचा अतीव आनंद मिळत असल्याचा प्रत्यय आहे. या निसर्गदर्शनाने त्यांच्या दुःखाचा लय होत असे. या साऱ्या उत्फुल्ल निसर्ग देखाव्याचा महर्षींच्या मनावर खोलवरचा परिणाम झाला. त्यांच्या या अंतरंगाचा आणि जीवनदृष्टीचा प्रेरक कंद एका नोंदीत त्यांनी असा नोंदवला आहे. 

तो असा,' गर्द कोवळ्या पालवीची झाडी सोनचाफा, सुवर्णपुष्प, नेवाळी ही फुलझाडी घमघमीत फुलल्यामुळे सर्व वातावरण सूक्ष्मपणे परिमळले होते. अनेक लहानमोठ्या पाखरास स्वतः निसर्गाने गायनकलेत निष्णात करून सोडले आहे.` या पार्श्वभूमीवर शिंदे यांनी फार चांगले निवेदन केले आहे. ज्यातून त्यांच्या मनाची अध्यात्मिक ठेवण आणि तत्त्वदर्शनाचा ओढा व्यक्त झाला आहे. 

ते लिहितात, ' इतक्या सुंदर गोष्टीनी बाह्य जग खुलले असता अंतर्जगात आमच्या पूर्वजांनी येथे गाजवलेल्या पराक्रमाची आठवण होऊ लागली की पहाणारा सबाह्य आंतर आनंदमय होऊन आपल्या स्वतःला विसरून जातो. रसिक असून तो नास्तिक असेल तर त्याच्या मनाची मजल इतकीच होते. पण आस्तिक असेल तर ह्या सुंदर अंतर्बाह्य विश्वाच्या सच्चिदानंद परमात्म्याच्या ठायी लीन होतो.’ कॉलेजमधे शिकणाऱ्या महर्षी शिंदे यांची जाणीव किती प्रगल्भ आणि परिणत अवस्थेची होती याचा प्रत्यय या लेखनशैलीत आहे.

सगळी आगबोटच क्वारंटाइन होती

महर्षी शिंदे हे १९०१ ते ३ या काळामधे मॅंचेस्टर कॉलेज ऑक्सफर्ड इथे तौलनिक धर्मशास्त्राचं शिक्षण घेत होते. त्यावेळी त्यांनी मुंबईहून लंडनला आगबोटीतून प्रवास करतानाचे अनुभव सांगितले आहेत. १९०१च्या सप्टेंबर महिन्यामधे पर्शिया नावाच्या बोटीने महर्षी इंग्लडकडे निघाले. मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर कुटुंबातल्या आप्तांकडे  पाहत वियोग भावनेने त्यांनी निरोप घेतला. त्यांच्या बोटीने मुंबईचा समुद्रकिनारा सोडला. त्यावेळी त्यांच्या मनात भावनांची कालवाकालव झाली, त्या व्याकुळ क्षणांचं प्रभावी निवेदन त्यात आहे. 

पुढे बोटीवरचे सहकारी, तिथलं वातावरण,  समुद्रावरचं हवामान आणि तिथल्या जीवन व्यवहाराविषयीच्या नोंदी त्यांनी लिहिल्या आहेत. २२ सप्टेंबरला चारेक दिवसांनी महर्षींना भल्या पहाटे एडनजवळची टेकडी नजरेला पडली. आगबोट बंदराजवळ आली. परंतु शिंदे सांगतात की ती किनाऱ्यावरच्या जमिनीला नेऊन भिडली नाही. प्लेग आणि क्वारंटाइनमुळे ती बंदरापासून थोड्या अंतरावर उभी केली. 

बोटीवर क्वारंटाइनचा निदर्शक काळा झेंडा आणि मेलचा तांबडा झेंडा हे दोन्ही फडकवण्यात आले. त्याकाळी या बोटी बंदरात थांबल्यावर त्या परिसरातल्या व्यापाऱ्यांची वस्तू विक्रीसाठी लगबग उडायची. मात्र ही बोट किनाऱ्यापासून थोडी अंतरावर असल्यामुळे व्यापाऱ्यांना येता येत नव्हतं. हे विक्रेते अरब होते.

क्वारंटाइनमुळे विक्रेत्यांना बोटीवर येण्यास बंदी होती. तसंच बोटीतल्या प्रवाशांना खाली उतरण्यासही परवानगी नव्हती. त्यामुळे हे विक्रेते खालूनच जिन्नस दाखवून ओरडून किंमत सांगत. 'टू शिलिंग फोर', ' व्हेरीफाईन', 'लेडी' अशा तुटक इंग्रजी भाषेत ते साहेब लोकांशी व्यवहार करत. आपल्या जवळच्या जिनसांनी, भाषेने आणि अंगविक्षेपाने ते ग्राहकांचं चित्त वेधून घेत, असं त्यांनी लिहून ठेवलंय.

हेही वाचा : पाचवीला पुजलेल्या प्लेग लॉकडाऊनमुळेच जगाला शेक्सपिअर मिळाला!

इन्फ्लुएंझाच्या साथीत माणसं जळत होती

महर्षी शिंदे यांच्या रोजनिशीतील प्लेगच्या साथीच्या अनुभव कथनबरोबरच त्यांच्या आत्मचरित्रात १९१८च्या महाराष्ट्रातल्या इन्फ्लुएंझा या साथीच्या आजाराचं वर्णन आहे. मुंबई आणि पुणे या शहरात या साथीने हाहाकार माजविला होता. महर्षी तेव्हा पुण्यामधे होते. या साथीच्या अस्वस्थ भीतीदायक काळाचं वर्णन महर्षींनी असं केलंय,   'साथ कसली दावाग्नीच तो. वणव्यात गवत जळावे त्याप्रमाणे माणसे जळू लागली.'

या काळात महर्षी पुणे महानगरपालिकेकडून इन्फ्लुएंझाच्या मिक्शर औषधाच्या बाटल्या भरून आणून पुण्यातल्या लष्कर भागातल्या गरीबांच्या घरोघरी पोहोचवत. महर्षींच्या घरची सर्व मंडळीही या काळात आजारी होती. तरीही ही मंडळीही वेगवेगळ्या ठिकाणी औषधं वाटण्याचं काम करत होती. या दरम्यान महर्षींचे धाकटे बंधू एकनाथराव मुंबईला होते. एकनाथरावांच्या पत्नी मथुराबाई गरोदर होत्या आणि आजारीही होत्या. महर्षींना एक पेच पडला की आपण मुंबईला जावं की पुण्यातच रहावं. 

लहान भावाच्या काळजीपोटी महर्षी मुंबईला गेले. गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी मथुराबाई बाळंत झाल्या. पण त्यांचं मूल मरण पावलं. रात्री बारा वाजता महर्षी आणि बंधू एकनाथरावांनी हॉस्पिटलमधून लहान बाळाचं प्रेत आणलं. तेव्हा तिथे हॉस्पिटलजवळ प्रेतवाहकांची गर्दी उसळलेली त्यांना दिसली. तिथे त्यांना शिरकावही करता येईना. त्यांनी कसेबसे ते मृत मूल मिळवलं.

अंत्यविधीसाठी खड्डा मिळेना आणि सरपणही 

स्मशानभूमीत त्यावेळी एक पेच निर्माण झाला. ट्रस्टींमधे वाद निर्माण झाल्यामुळे मृत बाळाला पुरण्यासाठी त्यांना खड्डा मिळेना. तक्रारीनंतर त्यांना खड्डा मिळाला. त्या लहान मुलाचा अंत्यविधी करून महर्षी रात्री उशिरा घरी आले. तर रुक्मिणी हॉस्पिटलमधून त्यांना निरोप आला की मथुराबाईंचं निधन झालंय. दुसऱ्या दिवशी त्यांचं प्रेत आणून सोनापुरात त्यांचा अंत्यविधी केला. तिथेही अंत्यविधीसाठी त्यांना सरपण  मिळेना. त्यावेळी त्यांचे एक मित्र लक्ष्मीदासतेरसी यांनी लाकडाचे ओंडके आणि सरपण पुरवलं.

महर्षी शिंदे यांच्या भारतीय निराश्रित सहाय्यकारी मंडळीच्या वतीने या काळात मदतीचं कार्य सुरू होतं. संस्थेच्या वतीने `रोग निवारक प्रयत्न एक निकडीची विनंती' या नावाने एक निवेदन प्रसिद्ध करण्यात आलंहोतं. सरकारी मदतीबरोबर काही खासगी प्रयत्नांचीही महर्षींना गरज वाटत होती. 

पुणे लष्करात बकाल वस्त्या असल्यामुळे शिस्त नसल्याचं ते नोंदवतात. तिथे निराश्रित मंडळींच्या विविध शाळांमधे औषधे व दूध देण्याची व्यवस्था करण्यात आली होती. संस्थेचे जनरल सेक्रेटरी म्हणून मोठ्या तळमळीने त्यांनी हे निवेदन काढलेलं होतं. महर्षी शिंदेंनी १९१८च्या साथीमधल्या दुःखद आठवणी लिहिल्या आहेत. या काळात त्यांचं मन आणि शरीर थकलं होतं. पुण्यात त्यांनी स्थापन केलेल्या अहल्याश्रमाचा वादही निर्माण झालेला होता.

त्यामुळे महर्षी शिंदे यांच्या आत्मपर लेखनातील या साथीच्या आजारांबद्दलच्या या नोंदी वैशिष्ट्यपूर्ण ठराव्यात अशाच आहेत. महर्षींना प्लेग आणि इन्फ्लुएन्झा काळातल्या साथीचे अनुभव आले, तसेच्या तसे त्यांनी कथन केले आहेत. साथीच्या काळातली समाज स्थिती, वातावरण तसंच स्वतःच्या मानसिकतेचं वर्णन केलंय. शिवाय या काळात त्यांनी केलेल्या प्रवासाची विलोभनीय काव्यात्म आणि चिंतनशील शैलीतली वर्णनंही आहेत. त्यातून त्यांच्या अंतरंगाचा आणि मनोविश्वाचा आविष्कारदेखील झालाय. आज कोरोनाच्या काळात या सगळ्या लेखनाचं दस्तऐवज म्हणूनही मोल वाढलंय. 

हेही वाचा : 

कामगारांसाठी बनवलेली जीन्स, स्टाईल स्टेटमेंट झाली

चक्रीवादळाचं नाव कसं ठरवतात? बंगाल, ओडिशाला अम्फानचा धोका

मध्यम वर्गाला आर्थिक पॅकेज नाही, तर थाळी वाजवण्याचा टास्क पाहिजे

कर्ज खिरापतीनं २००८ मधे जगाला आर्थिक संकटात ढकललं, त्याची गोष्ट

इतिहास सांगतो, निसर्गातलं वैविध्य संपत असल्यानं जगावर वायरस संकट

दीपिका सांगतेय, लॉकडाऊनमधे मानसिक आरोग्य सांभाळण्याच्या १५ टिप्स

५६ वर्षांपूर्वी कोरोना कुटुंबाचा मूळ वायरसपुरुष शोधणाऱ्या जून अल्मेडाची गोष्ट