तेरवं : शेतकरी विधवांच्या जगण्याच्या मर्दानी कहाण्या

१५ जानेवारी २०१९

वाचन वेळ : ८ मिनिटं


यवतमाळ इथल्या साहित्य संमेलनाच्या नियोजित उद्घाटक नयनतारा सहगल यांचं निमंत्रण रद्द करून आयोजकच अडचणीत सापडले. उद्घाटनासाठी ऐनवेळी कुणीच सापडेना. कुणाला बोलवावं हेही कळेना. अशावेळी धावून आल्या वैशालीताई येडे. शेतकरी नवऱ्याने आत्महत्या केल्यानंतर खंबीरपणे परिस्थिती सांभाळणाऱ्या वैशालीताईंचं भाषण मराठी माणसाला खूप भावलं. वैशालीताईंना घडवणाऱ्या तेरवं या नाटकाची ही कहाणी.

आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या विधवांच्या प्रत्यक्ष सहभागातून तयार झालेल्या ‘तेरवं’ या दीर्घांकाचे सध्या विदर्भात प्रयोग सुरू आहेत. यात काम करणार्‍या त्या तरुण विधवांना भेटायला वर्ध्याला गेले होते. त्यांना भेटले तेव्हा त्या प्रत्येकीच्या चेहर्‍यात मला माझ्या गावातल्या लक्ष्मीचा चेहरा दिसत होता. शिवा गेला तेव्हा तिला तीन अपत्यं होती आणि घरात आंधळी आई. नैराश्याच्या भरात शिवाने क्षणभरात आत्महत्या केली. पण सार्‍या जबाबदार्‍या लक्ष्मीच्या गळ्यात टाकून तो मोकळा झाला. तेरवंमधे काम करणार्‍या प्रत्येकीची हीच भावना दिसली.

‘तेरवं’ हे दीर्घांकाच्या रूपबंधात आहे. तो रंगमंचीय आविष्कारच आहे. त्या अर्थानं त्याला नाटक म्हणता येईल. पण ती रंगमंचावर सुरू झालेली कृषी चळवळ आहे. नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी शेतकर्‍यांच्या मदतीसाठी स्थापन केलेल्या नाम फाऊंडेशनचं विदर्भातलं काम श्याम पेठकर आणि हरीश इथापे बघतात. ‘नाम’चे ते संस्थापक सदस्य आहेत. ‘नाम’च्या स्थापनेच्या आधीपासून ही मंडळी शेतकर्‍यांसाठी काम करतात.

तू खुद की खोज में निकल
तू किस लिए हताश है...
तू चल तेरे वजूद कि
समय को भी तलाश है...

तन्वीर काझींच्या या ओळींमधलं आत्मभान त्यांच्यात पेरणं ही आजची खरी गरज आहे. ते काम विदर्भात काही समाजसेवी संस्था करतात. किसान मित्र नेटवर्क ही आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबासाठी काम करणाऱ्यांची मुख्य संस्था आहे. शेतकरी आणि शेतमजुरांसाठी काम करते. डॉ. मधुकर गुमळे यांची ‘अपेक्षा सोसायटी’ शेतकर्‍यांच्या या विधवा महिलांसाठी काम करते. ग्रामीण भागातल्या विधवा, परित्यक्ता, अविवाहित अशा एकट्या महिलांसाठी काम करणारी एकल संघटना आहे. या संस्थाशीही हे दोघं सक्रियपणे जुळलेले आहेत. या संस्थांना त्यांनी ‘नाम फाऊंडेशन’च्या कामाशी जोडून घेतलंय.

हरीष इथापेंनी ‘अ‍ॅग्रो थिएटर’ ही संकल्पना राबविलीय. त्या माध्यमातून ही मंडळी दिवाळीला शेतकरी विधवा भगिनींसह पाडवा, भाऊबीज इथापेंच्या शेतावर साजरी करतात. वर्ध्याजवळ रोठा नावाचे गाव आहे. तिथे इथापेंची शेती आहे. तिथे हे ‘अ‍ॅग्रो थिएटर’ सुरू आहे. तिथे या महिलांशी एका दिवाळीला गप्पा मारल्या. तेव्हा एका दिवाळीला या दोघांनी प्रश्न केला, ‘तुमचा नवरा आत्महत्या करण्याच्या आधी तुम्हाला भेटला असता तर तुम्ही काय बोलल्या असत्या. किंवा आता तो दोन मिनिटंच भेटला तर काय बोलाल.’  त्यानंतर या बायका वेदनेचा धबधबाच वाहू लागावा इतक्या आवेगात बोलत राहिल्या. ते ‘तेरवं’ या नाटकाचं बीजारोपण होतं.

या विधवा महिलांच्या एकूण जगण्यावर बेतलेल्या नाटकात त्यांनीच काम का करू नये, असं इथापे आणि पेठकर यांना वाटलं. म्हणून मग ज्यांना शक्य आहे, घरून परवानगी मिळते अशा महिलांचं नाट्य प्रशिक्षण शिबीर घेतलं. महिनाभर ते चाललं. थिएटर नेहमीच आत्मविश्वास देत असतं. या महिलांनाही तो मिळाला. मग त्या महिलांनीच पेठकरांच्या मागे लकडा लावला, ‘भाऊ नाटक कधी लिहिता?’ त्यातून हे नाटक लिहिलं गेलं. अ‍ॅग्रो थिएटरच्या माध्यमातून ते रंगमंचावर आलंय.

चंद्रपूरला राज्य नाट्य स्पर्धेत हा प्रयोग सादर झाला. नाटकानंतर या महिलांना भेटायला गर्दी झाली होती. सतत उपेक्षा, शोषण, अवहेलना, आत्मवंचनाच वाट्याला आलेल्या त्या महिलांच्या चेहर्‍यावर आत्मप्रतिष्ठेची भावना पहिल्यांदा दिसली. हौशी असूनही अत्यंत व्यावसायिक सफाईने या महिलांनी या समूहनाट्यात कामं केली. अशा प्रकारचा हा बहुधा पहिलाच प्रयोग असावा.

तसंही लोककला, लोकनाट्य ही कला प्राचीनतम काळापासून ग्रामीण संस्कृतीचं एक अविभाज्य अंग राहिलीय. मग खेड्यांमधलं डंडार असो की झाडीपट्टीतली नाटकं हे त्यातलेच प्रकार. हे नाट्याविष्काराचे प्रकार ग्रामीण जनतेचं, शेतकरी, शेतमजुरांच्या प्रकटीकरणाचं एक सशक्त माध्यम होतं. त्यांच्या रोजमर्रा जगण्यातला तो एक विश्रांतीसाठीचा थांबा होता.

पण आता मुळात ग्रामव्यवस्थाच उसवत आणि उद्ध्वस्त होत चाललीय. त्यातून हे प्रकारही दुर्दैवाने लोप पावत चाललेत. त्यामुळे ग्रामीण जनतेने व्यक्त होण्याची साधनंच संपुष्टात आलीत. शेतकऱ्यांना निराशेनं ग्रासल्याचं कारण यातही दडलेलंय.

शेतकर्‍यांच्या नैराश्याचा प्रश्न हा आर्थिक आहेच. सोबतच तो सांस्कृतिक पर्यावरणाचाही आहे. गाव, ग्रामसंस्कृती आणि शेतीमातीचं सांस्कृतिक पर्यावरण बदललंय. गावं राजकारणाचा अड्डा होतायंत. गावपण उजागर करण्याची गरज आहे. या विचारातून मग अ‍ॅग्रो थिएटरची संकल्पना आली. शेतीमाती, गावगाडा यातूनच कथानक, कलावंत, साधनं, रंगमंच हे सारे घेऊन छोटीमोठी नाटकं उभी करायची आणि सादर करायची, अशी ती संकल्पना.

श्याम पेठकर लिखित ‘दाभोळकरचं भूत’, पारोमिता गोस्वामीच्या दारूबंदी आंदोलनावरील ‘आडवी बाटली’ ही नाटकं अ‍ॅग्रो थिएटरने बसवली. इतकंच नाही तर जे शेतकरी निराशेने ग्रासलेत, त्यांनाही इथे आणून प्रशिक्षण दिलं जातं. तेरवंसाठीसुद्धा आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या २० विधवांना नाट्यप्रशिक्षणासाठी बोलावलं. त्यातल्या काही महिलांना घेऊन मग तेरवंचा सराव सुरू झाला.

नाटकाच्या तालमी शिबीर पद्धतीने घेतल्या जातात. कलावंत निवासी असतात. १२ एकर पसरलेल्या शेतात लेवल्स टाकून, जमिनीवर स्टेज आखून तालीम सुरू होते. मग या तालमींचं शेड्युल लागलं तेव्हा त्या आल्या. घरच्यांचा विरोध झाला. ‘नाटकंबी करा लागली का आता?’, असा बोचरा सवाल करण्यात आला. पण या तालमीत त्या रमल्या. 

अ‍ॅग्रो थिएटरच्या सदस्यांसोबतच त्यांनी तिथेच दिवाळी मनवली. अशी दिवाळी त्यांच्यासाठी अतिशय अभिनव होती. अन्नपाण्यापेक्षाही इतके दिवस दबलेला मोकळा श्वास त्यांना इथे घेता येत होता. अशा रितीने तेरवं या नाटकाचा सराव सुरू झाला. तेरवं हे समूहनाट्य आहे. त्यात पुरुष पात्रही महिलांनीच केली आहेत.

कारण, पतीच्या आत्महत्येनंतर या महिलांनी त्यांच्या आयुष्यातही पुरुषांच्या भूमिका निभावल्यात. निभवत आहेत. पुढेही निभवतच राहणार आहेत. जात्यात भरडले जाणार्‍या दाण्यांसारखी या महिलांची अवस्था आहे. म्हणून जात्यावरच्या ओव्यांच्या माध्यमातून त्यांच्या व्यथा उजागर करण्यात आल्या. त्या ओव्या श्याम पेठकर आणि मुकुंद पेठकरांनीही लिहिल्या आहेत. संगीतबद्ध ओव्यांनी या लयबद्ध नाट्याची परिणामकारकता आणखीन वाढलीय. नागपूरचे प्रसिद्ध संगीतकार वीरेंद्र लाटणकर यांनी या ओव्यांना अतिशय सुरेल चाली दिलेल्या.

आम्ही तेरवं मांडलं
बाई आम्ही तेरवं मांडलं
आसवायचं दानं आम्ही
खलबत्त्यात कांडलंऽऽ

महादेवानं केली शेती
पार्वतीच त्याची सोबती
जमिनीच्या वाह्यतीत बाई
हलाहलच सांडलंऽऽऽ

गडी आमचा महादेव
झाला रंक बाई रावाचा
मामला घामाच्या भावाचा
शिवार पायानं लवंडलंऽऽ

या ओवीनी नाटकाची सुरवात होते.

‘तेरवं’चं वैशिष्ट्य हेच की यात केवळ आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या विधवांच्या व्यथांचं, दुःखाचं प्रदर्शन नाही. तर त्यातून बाहेर पडण्याची, आपल्या बलबुत्यावर उभं राहण्याची, आपल्यातली अंगभूत शक्ती समाजाला दाखवून देण्याची एक ठिणगी आहे. म्हणूनच या नाटकाच्या कथानकात तेराव्याचं एक मंडळ स्थापन करण्यात आलंय.

जसं मंगळागौरीला, काजळतीजेला बाया एकमेकींकडे जाऊन गाणी म्हणतात. तसंच हे विधवांचं तेराव्याचं मंडळ एखाद्या शेतकर्‍याने आत्महत्या केल्यानंतर त्याच्या तेरवीला जाऊन त्याच्या बायकोमधे आत्मभान फुंकतात. त्या नवविधवेला एकटीनं आयुष्याचा झगडा देण्यासाठी बळ यावं म्हणून मग बाकी बायका त्यांच्या वाट्याला आलेल्या आलेल्या शोषणाच्या कथा सांगतात. भाषा अर्थातच स्थानिक बोलभाषा वर्‍हाडी आहे.

‘तेरवं’मधे काम करणार्‍या सगळ्याच महिलांची भेट घेतली. त्यांच्याबद्दल जाणून घेतलं. यवतमाळ जिल्ह्यातली कळंब तालुक्यातली वैशाली येडे नामक तरुणी आताशी कुठं २८ वर्षांची आहे. तिचं लग्न झालं तेव्हा तिला जेमतेम एकोणीसावं लागलं होतं. सासरी खूप मोठा खटला. सख्खे चुलत मिळून १४ दीर, भासरे, जावा, सासवा वेगळ्या.

सार्‍या खटल्यात तसाही तिला सासुरवास होताच. वैशालीच्या नवर्‍याच्या नावाने तीन-चार एकर शेती होती. दोघं शेती करायची आणि आपली गुजराण करायचे. पण २०११ मधे वैशालीच्या नवर्‍याने कर्जाला कंटाळून आत्महत्या केली. तेव्हा तिला पाच वर्षांचा मुलगा होता आणि मुलीचा गर्भ पोटात होता. नवर्‍याच्या आत्महत्येनंतर तिच्या हालअपेष्टांमधे आणखीन भर पडली. 

सासरच्यांचा आणखीन छळ सुरू झाला. तिचा कोणी वालीच नसल्याने घरात तिला मोलकरणीसारखं वागवलं जाऊ लागलं. तिचं बाहेर जाणं बंद करून टाकलं. तिने साधं तयार झालेलं, नीट राहिलेलं सासरच्यांना सहन होत नव्हतं. चेहर्‍याला साधी फेस पावडर लावली तरी सासू दुषणं द्यायची.

‘आता कोनाले आपलं थोबाड दाखवायचं आहे तुले?’ अशा अनर्गल भाषेत तिची संभावना केली जायची. बाहेरच्यांच्याच कशाला, घरातल्यांच्याही वाईट नजरांचा सामना तिला करावा लागला. वैशाली हे सारं निमूटपणे सहन करीत होती तोपर्यंत सारं ठीक होतं. पण तिने प्रतिकार करायला सुरवात केली तेव्हा ती घरातून निघून जावं अशी वातावरणनिर्मिती केली गेली. तिला घरातून निघून जायला भाग पाडलं गेलं.

अखेर एक दिवस तिने आपल्या मुलाला घेऊन सासरचा उंबरठा ओलांडला तो कायमचाच. त्यानंतर ती वर्ध्याच्या एकल महिला संघटनेत सामील झाली. शिलाई मशिन आणि मजुरी करून ती आपल्या मुलांना घेऊन राहते.

मंदा अलोणेचीही व्यथा यापेक्षा निराळी नाही. ती आर्वी तालुक्यातल्या सोरहाता गावात राहते. तिच्याही नवर्‍याजवळ ३ एकर शेती होती. सततच्या नापिकीने, बिनभरवशाच्या पावसाने नवरा कर्जबाजारी झाला. कंटाळून अखेर त्याने २०१३ मधे आत्महत्या केली.  मंदाच्याही पोटी दोन मुलं. तीदेखील अशीच सासरहून हाकलल्या गेली. ती घराबाहेर पडली. नाम फाऊंडेशनद्वारे तिला शिलाई मशिन दिली गेली. आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी ती देखील संघर्ष करत आहे.

तळेगाव ठाकूरच्या माधुरी चिटुलेचीही हीच कहाणी. नवर्‍याने नापिकीला कंटाळून आत्महत्या केली, सासरची मंडळी शेतीवरचा अधिकार देत नाही. तीदेखील सासरहून बाहेर घालवली गेली. कविता ढोबळे वर्धाच्या एकल महिला संघटनेचं काम बघते. वर्धा जिल्ह्यातल्या विरुळच्या कविताची स्थितीदेखील याहून निराळी नाही. तिनेही एक दिवस सासर सोडून मुलांना घेऊन माहेर गाठलं. एकल संघटनेचं काम बघता बघता तीच आता इतर महिलांचं समुपदेशन करू लागली आहे.

तेरवंमधे काम करणारी एक मुलगी शिवानीची चित्तरकथा तर अतिशय हृदयद्रावक आहे. ती नववीत असताना तिच्या वडिलांनी तिचं लग्न लावून द्यायचं ठरवलं. तिने विरोध केला. पुढे शिकायचं आहे म्हणाली. वडील ऐकेनात. तरीही ती बधली नाही. पुढे शिकण्याच्या आपल्या निर्णयावर ठाम राहिली. तेव्हा संतापाच्या भरात अश्विनीच्या वडिलांनी तिच्या पोटात लाथ घातली.

तिच्या किडणीला मार लागला. ज्याच्या वेदना तिला आजही भोगाव्या लागत आहेत. पण त्याच दिवशी तिने शिक्षणासाठी घर सोडलं ते कायमचं. पुढे शिक्षण घ्यायचंच या तीव्र इच्छेपोटी ती घरातून निघून गेली, ती आजतागायत घरी परतलेली नाही. अश्विनीने बराच संघर्ष केला. एकटी राहिली. आज ती वर्ध्याच्या हिंदी विद्यापीठात फिल्म डायरेक्शनचा कोर्स करते. 

एका तरुण विधवेचं मनोगत ऐकून तर मन सुन्न झालं. ‘आम्ही विधवा ना. नाहीतरी आमच्यावर समाज आक्षेपच घेतो. सख्ख्या भावासोबत दिसलो तरी संशयाने पाहतात. प्रत्येक पुरुषाला आम्ही संधी वाटतो. सरळसोट वागलं तरीही आमच्या चारित्र्यावर संशय घेतात. माझ्या मुलाच्या शिक्षणासाठी मग मी वेश्याव्यवसायही करायला तयार होईन पण मुलाला शिकवीन.’

समुपदेशन करताना कविताने सांगितलेल्या या प्रसंगांनी अंगावर काटे उभे राहिले. या मुलींची वयं अगदी पंचविशी-तिशीच्या आसपास आहेत. अशा कोवळ्या वयांत त्यांच्या वाट्याला वैधव्य आलं अन् शोषण, छळ आला. तो साराच अंगावर काटा आणणारा आहे.   

आधीच म्हटल्याप्रमाणे तेरवं हा या महिलांच्या हक्कासाठीचा रंगमंचीय लढा आहे. त्यांच्या काही मागण्या आहेत. एकल महिला संघटनेच्या माध्यमातून त्या समोर केल्या जातात. हे नाटक बघून त्या मागण्या किती साध्या आहेत, योग्य आहेत, याची जाणिव होते.

- वैधव्य वाट्याला आलेल्या या कोवळ्या तरुण मुली आहेत. त्यांच्यावर या वयांत एकदोन मुलांची जबाबदारी आहे. मुलांच्या संगोपनासाठी सरकारने त्यांना महिना तीन हजार रुपये द्यावेत.
- पतीच्या आत्महत्येनंतर त्यांना सासरचे हाकलून लावतात अन् माहेरचेही पाठ फिरवतात. उघड्यावर पडलेल्या या महिलांना घर बांधायला सरकारने जमीन द्यावी.
- स्वतंत्र राशन कार्ड या महिलांना मिळावं. अंत्योदय योजनेत तिला स्थान असावं.

या महिलांच्या चळवळीचं हे नाट्यविधान आहे. नाटकाच्या भाषेत या महिलाच सशक्तपणे बोलल्या आहेत. त्यामुळे या नाटकाचे प्रयोग राज्यभर अन् राज्याच्या बाहेर दिल्लीपर्यंत करण्याचा हरीष इथापे, श्याम पेठकर यांचा मानस आहे. तो पूर्ण व्हावा, कारण या महिलांच्या जगण्याचा संघर्ष त्यांच्या आयुष्याचे निर्णय करणार्‍या सुरक्षित, शहरी समाजापर्यंत पोचलाच पाहिजे!