वॅलेंटाईन स्पेशल: गोष्ट ४० वर्षापूर्वीच्या अनोख्या 'लव जिहाद'ची

१४ फेब्रुवारी २०२३

वाचन वेळ : ७ मिनिटं


तो समाजवादी घरातला मराठमोळा ब्राम्हण मुलगा. ती मोडकंतोडकं इंग्रजी बोलणारी तमिळ ख्रिश्चन मुलगी. पण प्रेमासाठी दोघांनी धर्म, भाषा आणि प्रांताच्या मर्यादा ओलांडल्या. लाख अडचणींवर मात करून मुंबईतल्या समाजवादी चळवळीच्या कार्यकर्त्यांनी या दोघांचं लग्न लावलं. ४० वर्षांपूर्वीच्या या अनोख्या ‘लव जिहाद’ची गोष्ट प्रत्येक प्रेमी युगुलाने वाचायलाच हवी.

४० वर्षांपूर्वीची घटना. १९८३ सालच्या जानेवारीचा दुसरा आठवडा संपत आला होता. मी घरात झोपलो होतो. मध्यरात्रीच्या सुमारास फोन घणघणला. इतक्या रात्री फोन म्हटलं की छातीत धडधडतं. फोन घेतला. त्या बाजूला मेरी होती. बंगलोरच्या सेंट फिलोमीना हॉस्पिटलमधे ती नोकरी करायची. घाबरत मोडक्या तोडक्या इंग्रजीत ती म्हणाली,

‘तीन चार दिवसांत नातेवाईक येणार आहेत. घरी घेऊन जायला. तमिळनाडूला. त्यांना आपल्या अफेअरविषयी कळलंय. त्यांचा विरोध आहे. तू निघून ये लगेच.’

फोन ठेवला, पण काही सुचेना. तेव्हा बंगलोरसाठी थेट ट्रेन नव्हती. बसनेच जायचं. पण त्यासाठी सकाळ उजाडायला हवी. आईकडे घरात तीनेकशे रुपये होते. युक्रांदचे राम आणि शैला सातपुते गोरेगावातच राहायचे. रामचा भाऊ सतीशही तिथं राहायचा. त्याला बंगलोरला चल अशी विनंती केली. तो तयार झाला. पण त्याच्याकडे दोनेकशे रुपये होते बहुधा. राम आणि शैला यांना अफेअरची कल्पना होती.

बंगलोरमधली धावपळ

सकाळी आठ वाजता दोघांनी नॅशनल ट्रॅव्हल्सची बस पकडली. दोघांच्या तिकिटाचे झाले २४० रुपये. दुपार आणि रात्रीचं जेवण, दोनदा नाश्ता, बंगलोरमधे अपेक्षित खर्च यासाठी कसेबसे दोनशे शिल्लक राहिले. तेव्हा भाऊ सुहास बंगलोरला राहायचा. त्याच्याकडून पैसे घेऊ, असं ठरवलं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी बंगलोरला सुहासच्या घरी पोहोचलो. तो कामासाठी दिल्लीला गेला होता.

त्याचा पार्टनर गणपती शेणोय मात्र घरी होता. त्याला परिस्थिती सांगितली. मग मी आणि सतीश थेट गेलो मेरीच्या हॉस्पिटलमधे. ती ड्युटीवर होती, पण भेटली. म्हटलं, चल माझ्याबरोबर. पण तिला लगेच शक्य नव्हतं. संध्याकाळी पुन्हा या, तोपर्यंत मेट्रनना काही तरी कारण सांगून निघते. मग चार पाच तास आसपास वेळ काढला. संध्याकाळी ती बॅगेसह आमच्यासोबत निघाली.

घरी आजी आजारी आहे, असं सांगितलं होतं तिनं. तिघे पुन्हा घरी आलो. शेणोयशी तिची ओळख करून दिली. सर्व प्रकार कानावर घातला. मुंबईत परतण्यासाठी पैसे नव्हते. ती अडचण त्याला सांगितली. लगेच त्यानं तब्बल दोन हजार रुपये दिले. आता आर्थिक विवंचना संपली. दुसऱ्या दिवशी सकाळी मुंबईसाठी बस पकडली. मुंबईत लग्न करायचं हे दोघांनी ठरवलंच होतं. 

हेही वाचा: ‘वाकड्या तिकड्या’ लोकांचं प्रेम

धर्माने उभा केला यक्षप्रश्न

माझ्या आईचा पाठिंबा होता, पण लग्न होईस्तोवर तिनं कुठे राहायचं, हा प्रश्न होता. अखेर राम आणि शैला यांच्या घरीच राहायला गेलो. आईही तिथं आली मेरीला भेटायला. लग्न हा यक्षप्रश्न आहे, हे तेव्हा कळलं. सिविल मॅरेज कायद्याप्रमाणे विवाह करण्यासाठी एक महिन्याची नोटीस देणं या परिस्थितीत शक्य नव्हतं. दोघांचा धर्म वेगळा.

तिला धर्म बदलावा लागू नये, यावर मी ठाम होतो. त्यासाठी तिचा धर्म स्वीकारायची माझी तयारी होती. ख्रिश्चन विवाह कायद्यात एक व्यक्ती त्या धर्माची असली तरी चालते, असं कळल्यानं प्रश्न मिटला असं वाटलं. पण तिथंही नोटीस द्यावी लागते. संबंधित व्यक्तीचा आधी विवाह झालेला नाही, असं ती व्यक्ती ज्या चर्चची सदस्य आहे, तिथून मिळवावं लागतं.

मेरीला तिच्या गावच्या चर्चकडून ते मिळणं अशक्य होतं. तितका वेळ नव्हता आणि शंभरेक घरांच्या गावात बोंबाबोंब होण्याची शक्यता होती. इस्लाममधे दोघे मुस्लिम लागतात. बौद्ध धर्मातही अशी अट असल्याचं ऍड काकासाहेब आळेकर म्हणाले. हिंदू विवाह कायद्यात दोघे हिंदू असणं बंधनकारक. काय करावं कळेना.

सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्या. हेमंत गोखले यांना फोन केला. तेव्हा ते मुंबईत वकिली करत. मेरी हिंदू झाल्याशिवाय विवाह शक्य नाही, असं ते म्हणाले. मसुराश्रमात जा, ते तिची ‘शुद्धी’ करतील, फुकट विवाह लावतील आणि त्यांच्या पत्रिकेत फोटोही छापतील, असंही ते गमतीने म्हणाले. मला लग्न करायचं होतं, पण तिला धर्मांतर करायला लावणं मान्य नव्हतं.

गिरगावच्या फादरचा नामी तोडगा

एकाने सांगितलं की सांताक्रूझला आर्य समाजात जा, ते लग्न लावून देतील. मी आणि सतीश तिथं गेलो. तिथल्या व्यक्तीने सांगितलं, ‘शुद्धी’ तो करवानीही पडेगी. म्हणजे पुन्हा तेच. म्युन्सिपल मजदूर युनियनचं काम करताना रोज गिरगांव नाक्यावरच्या चर्चवरून जायचो. म्हटलं, तिथं जाऊन पाहू. सतीश आणि मी गेलो. तिथल्या फादरला परिस्थिती सांगितली. त्यावर त्यानं कुठे राहता, आता मुलगी कुठेय, असे प्रश्न विचारले.

गोरेगाव हे उत्तर दिल्यावर तो म्हणाला की गोरेगावच्या चर्चमधे जाण्याचा सल्ला घ्या. मग गोरेगावला चर्चमधे एका फादरला भेटलो. त्याला सारी कथा सांगितली. त्यावर मुलीला घेऊन या, मी तिच्याशी बोलेन आणि मग काय शक्य होईल, ते पाहू, असं तो म्हणाला. मग मेरीला घेऊन मी आणि शैला चर्चमधे गेलो. तिथं त्यानं मेरीला आत बोलावलं आणि आम्हाला बाहेर थांबायला सांगितलं.

पाऊण तासाने त्यानं आम्हाला बोलावलं. तो म्हणाला, या मुलीला तुमच्याशी विवाह करण्याची खरोखर इच्छा आहे. तुम्हाला धर्मांतर करण्यात रस नसला तरी विवाहासाठी तिला हिंदू करून घ्या. काही काळानं तिनं चर्चमधे येऊन कन्फेशन म्हणजेच धर्म बदलल्याची चूक केल्याचा माफीनामा द्यावा.मग तिला बॅप्टिस्मा देऊन पुन्हा ख्रिश्चन होता येईल.

हे मी तिला समजावलंय. तिची त्यास तयारी आहे. त्यामुळे आता वेळ न घालवता लवकर विवाह करा. तिचे नातेवाईक तुमच्या घराशेजारी राहतात, असं तिनं मला सांगितलंय. आणि हो, हा सल्ला मी दिला, हे कोणाला सांगू नका. अन्यथा माझ्यावर कारवाई होईल.

हेही वाचा: तुमचं आमचं सेमच असतं

मृणाल गोरेंचा सल्ला

आता विवाह कुठे करायचा हा प्रश्न. दादरच्या एका विवाह संस्थेत गेलो. तिथं बसलेल्या तरुण भटजीच्या तोंडाला सकाळीच दारूचा वास येत होता. तो पैसेही खूप मागत होता. त्यामुळे चर्नी रोड स्टेशनसमोर आशाताई कुलकर्णी यांच्या संस्थेत गेलो. त्यांनी भटजी, फोटोग्राफर, करावी लागणारी चार प्रतिज्ञापत्रे, त्यावर नोटरीच्या सह्या आणि शिक्के आणि त्यांची फी असे सुमारे १४०० रुपये सांगितले.

दुसऱ्या दिवशी मेरीला जन्माचा दाखला घेऊन तिथं गेलो. मी सज्ञान आहे, मी स्वतःहून हिंदू होतेय, मी घरून निघताना कोणतीही वस्तू चोरलेली नाही आणि मी स्वखुशीने संजीव श्रीरंग साबडेशी विवाह करतेय, अशी प्रतिज्ञापत्रे केली. त्या काळात आजच्या इतके नोटरी नव्हते. त्यामुळे फोर्टमधे नोटरीसमोर उभं राहिलो, त्यानं आधी चार पाच प्रश्न विचारले.

उत्तरानं समाधान झाल्यानंतरच सह्या केल्या. एक औपचारिकता पूर्ण केली. लग्नं करतोयस, हे मृणाल गोरे यांना सांग, असं आई म्हणाली होती. त्याप्रमाणे मृणालताईंकडे गेलो. त्या म्हणाल्या, मेरीकडचं जसं कोणी लग्नाला नसेल, तसं तुझ्याकडचंही कोणी असता नये. तुम्ही दोघांनी परस्पर विवाह केला, असं वाटलं पाहिजे.

पोलीस स्टेशनमधे वरात!

माझा विवाह असल्याचं कळताच चळवळीतील ७५ ते १०० जण विवाहस्थळी आले. शैला सातपुतेनं स्वतःची चांगली साडी मेरीला नेसायला दिली होती. लग्नाच्या वेळी भटजीनं मंगळसूत्र विचारताच शैलानं स्वतःच्या गळ्यातलं मंगळसूत्र काढून दिलं. या गडबडीत हार आणायचे राहिले होते. पैसेही नव्हते. बहुदा सुबोध जठार दोन हार घेऊन आला.

आणखी एक मित्र पेढे घेऊन आला. मुलीचा मामा म्हणून सतीश तांबेनं माझा कान पिळला. त्याला अर्थातच काही दिलं नाही. प्रत्येक विधीचे फोटो काढले जात होते. पुढे पुरावा म्हणून उपयोगी पडतील, असं आशाताई कुलकर्णी म्हणाल्या होत्या. विवाह झाला, तेव्हा खिशात जेमतेम पाच रुपये शिल्लक राहिले होते. त्यातून गोरेगावचं रेल्वे तिकीट काढलं.

सोबतीला काही मित्र होते. शेजारी राहणाऱ्या मेरीच्या नातेवाईकांनी काही गडबड केली, तर तयारीत असावं, यासाठी काही आधीच घरी पोहोचले होते. आईनं गोड आणि परवडेल अशी जिलबी आणून ठेवली होती. घरी जाण्याआधी गोरेगाव पोलीस स्टेशनला गेलो. एनसी म्हणजे अदखलपात्र गुन्ह्यांची तक्रार नोंदवून ठेवली.

हेही वाचा: कुणाला फासावर न चढवताही प्रेमाशी संबंधित गुन्हे रोखता येतात!

शेवट गोड झाला

घरी गेलो, तेव्हा चाळीच्या बाहेर अंगणात बाहेर बरेच जण स्वागताला उभे होते. शेजाऱ्यांना ते का आलेत, हे कळेना. त्यामुळे तेही बाहेर आले होते. आईनं दोघांच्या तोंडात जिलबी भरवली. तिथं शेजारी राहणारा शरद बिडये कॅमेरा घेऊन उभाच होता. शेजारच्या बोस नावाच्या एका वरिष्ठ गृहस्थाना बोलावलं. त्यांच्या पाया पडलो. ते खूश झाले.

मेरीच्या नातेवाईकांना आमच्या घरी आणण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. त्यांना ही मानाची गोष्ट वाटली. ते मेरीची बहीण, तिची सासू यांना घेऊन आले. त्या दोघी घरात शिरताच आम्ही पाया पडलो. शरदने लगेच फोटो काढला. थोडी रडारड झाली.

पण राडा सोडाच, वादवादीही झाली नाही. पाया पडल्यावर आशीर्वाद देणं त्यांना भागच होतं. नंतर पोस्टात जाऊन सर्वांना पटापट तारा केल्या. सुहासच्या मित्रानं कळवलं की ती रक्कम माझ्यातर्फे अहेर आहे. ती परत करू नये.

समविचारी मित्रांचे टोमणे

या विवाहाला आज २२ जानेवारी रोजी ४० वर्षं पूर्ण होतायत. पण महत्वाचा मुद्दा राहिला. संजीव साबडेने बायकोला धर्मांतर करायला लावलं, तिला हिंदू करून मगच लग्न केलं, अशी ओरड तेव्हा काही अगदी जवळच्या आणि समविचारी मित्रांनी केली. शेवटी साबडेचं खरं स्वरूप बाहेर आलं, असंही ही मंडळी म्हणाली होती.

आताच्या भाषेत मी ‘लव जिहाद’च केला होता. चर्चच्या फादरला मात्र माझ्याविषयी शंका आली नाही. या साऱ्याविषयी मी कधीच काही बोललो नाही, लिहिलं नाही. आज मोकळेपणाने सारं मांडलं. लग्नाला आलेल्या, त्या अडचणीच्या काळात मदत केलेल्या सर्वांचे मी कधी आभारही मानले नाहीत.

शैला, राम, सतीश सातपुते, सतीश उर्फ बाबा तांबे, अरुण केळकर, नंदू धनेश्वर, जयंत धर्माधिकारी, जगदीश आणि अरुणा देशपांडे, माधुरी समेळ, निर्मला स्वामी, शेणोय, भास्कर तांबे, आनंद असे असंख्य मित्र आणि माझी आई ठामपणे आम्हा दोघांच्या मागे उभे होते. मोठा भाऊ सुहास आणि मोठी बहीण सुलभा खंदारे हे दोघं माझे समर्थकच.

हेही वाचा: लिंगभेदापलीकडची प्रेमाची वर्च्युअल पायवाट

मेरीने साथ दिली

पुढे मेरीच्या कुटुंबीयांशीही उत्तम संबंध निर्माण झाले. त्यांनी मला स्वीकारलं. मुख्य म्हणजे मेरीने तेव्हा माझ्यावर विश्वास ठेवला आणि लगेच बंगलोरहून माझ्यासोबत आली, हे मला खूप महत्त्वाचं वाटतं. अगदी आजही! ती तमिळनाडूच्या एका छोट्या खेड्यातली. ती गोरेगावला बहिणीकडे आली, तेव्हा ओळख झाली होती.

तिला तमिळ आणि कन्नडशिवाय अन्य भाषा येत नव्हत्या. इंग्रजी तर अगदी तोडकंमोडकं. ती तमिळमधून पत्रं लिहायची आणि माझे तमिळ मित्र ती वाचून दाखवायचे. त्या बॉम्बे लेबर युनियनच्या त्या मित्रांशिवाय सर्व अवघडच होतं. मेरी आता मराठीसह सात भाषा बोलते.

मोलाचा सल्ला देणारी चोरवाट

या निमित्ताने एका गोष्टीचा मुद्दाम उल्लेख करतो. दोन वेगळ्या धर्माच्या व्यक्तींना आपला धर्म न बदलता कोणत्याही कारणास्तव घाईघाईनं विवाह करता येणं अशक्य आहे. त्यासाठी एक तर धर्म बदलावा लागतो किंवा एका महिन्याची नोटीस देऊन थांबावं लागतं. ही अडचण दूर व्हायला हवी.

माझ्या लग्नामुळे मला चोरवाट लक्षात आली. ती म्हणजे प्रतिज्ञापत्राद्वारे सज्ञान असल्याचं आणि विवाह केल्याचं जाहीर करा. त्यावर नोटरीचा सही आणि शिक्का घ्या. शिवाय चारचौघाच्या साक्षीने एकमेकांच्या गळ्यात हार घाला.

जमल्यास मंगळसूत्र घाला. त्याचे फोटो काढायलाच हवेत. पुरावा म्हणून. शिवाय पैसे दिले की काही भटजी प्रमाणपत्र देतात म्हणे. त्याआधारे विवाह नोंदणी करायची. आणि हो, पुरावा म्हणून काही लग्नपत्रिका छापून घ्यायच्या!

हेही वाचा: 

आशिक लाथ कधी मारेल, सांगता येत नाही

छोट्याशा गावातल्या दिशाचा सतरंगी संघर्ष

क्रिकेटच्या पिचवर रंगतोय सतरंगी प्रेमाचा किस्सा

खलील जिब्रान : प्रेमाची देववाणी सांगणारा प्रॉफेट!

एखाद्या प्रेमाच्या नात्यात काय काय हवं बरं, सांगता येईल तुम्हाला?