भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या मॅचला एखाद्या युद्धासारखं स्वरूप येतं. काहीजण या मॅचला दोन धर्मातल्या युद्धासारखंही स्वरूप देण्याचा प्रयत्न करतात. पण हे क्रिकेटसाठी धोक्याचं आहे. या सगळ्यात एक खेळ म्हणून क्रिकेट कसं एन्जॉय केलं पाहिजे, हे सांगणारी धर्मगुरुंची एक टीमच आकाराला आलीय. या टीमच्या कामगिरीवर प्रकाश टाकणारा हा लेख.
माहोल क्रिकेटचा आहे. सध्या वर्ल्डकप स्पर्धा जोरात आहे. क्रिकेट सभ्य गृहस्थांचा खेळ मानला जातो. क्रिकेटमुळे दोस्ती आणि स्नेहाचे बंध जुळतात. क्रिकेट खिळाडुवृत्ती शिकवतो. सांघिकपणे खेळायचा खेळ असल्यानं संघवृत्ती वाढते. सारे खेळाडू एकाच परिवाराचे सदस्य असल्यासारखे एकमेकांशी वागतात. क्रिकेटची ही अशी ओळख आहे. तरीही आज हार जीतला नको तितकं महत्त्व आलंय.
क्रिकेटचे सामने धर्मयुद्धासारखे झालेत. हेच ओळखुन चक्क वॅटिकन सिटीमधे वॅटिकन क्रिकेट टीमही गेली पाच वर्ष खेळात भाग घेतोय. वॅटिकन सिटी म्हणजे तमाम ख्रिश्चनांची पंढरी. त्यांचं प्रमुख चर्च इथं आहे. स्वत: फ्रान्सिस पोप यांनाही या संघाचं कौतुक आहे. हा संघ नेमका आहे कुणाचा असा प्रश्न पडला असेल ना? हा संघ आहे पाद्रींचा अर्थात ख्रिस्ती धर्मोपदेशकांचा.
त्याचं नेतृत्व करणारा धर्मोपदेशक हा मुळचा भारतीय आहे. डिकॉन मॅथ्युज. तो मुळचा केरळचा. वॅटिकन सिटी आणि धर्माचा अभ्यास करण्यासाठी म्हणुन तो तिथे गेलाय. इंग्लंडमधे तो चारेक वर्ष क्रिकेटही खेळत होता. इंग्लंडमधल्या नामांकित मैदानांवर तो खेळलाय.
वॅटिकन क्रिकेट संघाची स्थापना झाली ती २०१३ मधे. त्याच श्रेय जात ते जॉन मॅकार्थी यांना. ते तेव्हा ऑस्ट्रेलियाचे रोममधे राजदूत होते. धर्माची शिकवण घ्यायला येणाऱ्यांमधे त्यांनी क्रिकेट खेळणारी मुलंही पाहिली. ही सारी मुलं चांगलं खेळायची. त्यांच्यात एक संघ तयार करायला काय हरकत आहे या विचाराने त्यांनी मेहनत घेतली आणि खरोखर एक संघ घडवला. आजवर ह्या संघाने पन्नासहून अधिक सामने खेळले असतील.
हेही वाचा: वर्ल्डकप सेमीफायनलमधे 'या' चार टीमला एंट्री मिळणार
इथे येणाऱ्यांमधे आशियाई तरुणांचा भरणा अधिक असल्यानं क्रिकेट खेळणाऱ्यांची संख्या मोठी असते. कुठलाही भेद न मानता क्रिकेटमुळे हे सारे एकत्र येतील आणि त्यामुळे एक चांगला संदेश जाईल या हेतूने हा संघ स्थापन करण्यात आलाय. गंमत म्हणजे ह्या संघातले सात खेळाडू भारतीय आहेत. त्यातले तिघे केरळचे तर दोघे गोव्याचे आहेत. एक बंगळुरूचा आणि एक पंजाबचा आहे. बाकीचे पाकिस्तान, बांगलादेश, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका आणि कॅनडाचे आहेत.
या संघाची निवड कडक निकष लावून होते. जे नवीन विद्यार्थी आहेत, ज्यांना क्रिकेटची आवड आहे त्यांना सरावाच्या ठिकाणी बोलावलं जातं. ज्यांच्याकडे गुणवत्ता आहे त्यांना प्रोत्साहन दिलं जातं. ऑस्ट्रेलियाचे डेन, किर्वी हे सध्याचे या संघाचे प्रशिक्षक आहेत. ते संघाचा सराव करुन घेतात. दर शुक्रवार हा बहुधा सरावासाठी असतो.
हेही वाचा: पाकसोबत मॅच नको म्हणणारा गौतम गंभीर आता काय म्हणतोय?
एप्रिल, जून, सप्टेंबर, ऑक्टोबर या महिन्यात क्रिकेट प्रशिक्षण चालतं. इतर महिन्यात अभ्यास, परीक्षा, समारंभ यामुळे कुणाला वेळ मिळत नाही. सर्वांवर ठसवलं जात की तुम्ही धर्मोपदेशक आहात क्रिकेटपटू नाही. त्यामुळे खेळाकडे खेळ म्हणून पहा. प्रतिस्पर्ध्यांमधे खेळीमेळीचं वातावरण असतं. सामना सुरु होण्याआधी सर्वांसाठी प्रार्थना म्हटली जाते. त्यामुळे वातवरण प्रसन्न असतं.
धर्मगुरू आणि क्रिकेट खेळतात ही कल्पना कदाचित इतर धर्मियांना विचित्र वाटेल. पण ही माणसंच आहेत. त्यांनी त्यांचे छंद जोपासण्यात गैर काही नाही. खेळातून बघणाऱ्यांना आनंद वाटतात. धर्मगुरू सगळ्या गोष्टींचा त्याग करणारा असायला हवा असं काही नाही.
हेही वाचा: बेल पडत नाहीत, बॅट्समन आऊट होत नाही आणि आयसीसी नियम बदलत नाही
मुंबईतल्या गोरेगावात पूर्वेला सेंट पायस कॉलेज आहे. ते धर्मगुरू तयार करायचंच ठिकाण आहे. इथं छान अशी दोन मैदानं आहेत. तीही इथल्या मुलांना खेळायला. बाहेरच्यांनासुद्धा इथं सामने खेळायची परवानगी दिली जाते. क्रिकेट हा आनंद देणारा खेळ आहे. माणसामाणसांमधला तेढ वाढवणारा नक्कीच नाही. त्याला धर्माचं स्वरुप देऊ नका असा विचार वॅटिकन सिटीने दिलाय.
भारतरत्न सचिन तेंडुलकरचे प्रशिक्षक रमाकांत आचरेकर. कुठल्याही मैदानावर पाऊल ठेवताना वाकुन नमस्कार करायचे. त्यांच्या मते मैदान हे एक मंदीर आहे. पवित्र स्थान आहे. आपला विद्यार्थी चांगला क्रिकेटपटू होण्याबरोबर चांगला माणूस होणं गरजेचं आहे याचं ते भान ठेवून होते. म्हणुनच एक भारतरत्न घडू शकला.
हेही वाचा:
सचिन बाद झाल्यानंतर, युवराजने टीवी सुरु ठेवला
(लेखक हे ज्येष्ठ पत्रकार आहेत.)