तेजवीराची सावली होता आलं याची कृतार्थता मोठी

१८ जानेवारी २०२२

वाचन वेळ : १८ मिनिटं


महाराष्ट्रातल्या पुरोगामी विचार आणि जनचळवळींचा आवाज बनलेल्या एनडी पाटील यांचं निधन झालं. तत्वनिष्ठ राजकारण करत त्यांनी चळवळींना दिशा दिली. त्यांच्या पत्नी सरोज पाटील यांचा 'चळवळीचा महामेरू: एनडी पाटील ' या पुस्तकात त्यांचं सहजीवन आणि एनडींच्या कृतार्थ करकीर्दीविषयी लेख आहे. २०१८च्या अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्रात आलेला हा संपादित लेख इथं देत आहोत.

अतिशय चारित्र्यसंपन्न, गुणवान, सुसंस्कृत अशा आई-वडलांच्या पोटी माझा जन्म झाला. हिमालयापेक्षा उंचीचे आणि सागरापेक्षा विशाल मनाचे भाऊ मला लाभले. तसंच पैशापेक्षाही मौल्यवान असे जिव्हाळ्याचे मित्र आम्हाला लाभले आणि सर्वांत शेवटी, ज्यांच्याबरोबर मी हा धकाधकीचा संसार केला ती व्यक्ती असामान्य होती.

त्यांच्या मानाने मी अतिसामान्य, रुपानेही सुमारच. पण आपल्या मूल्यांशी, तत्त्वांशी प्रतारणा न करता त्यांनी माझं मन जपलं. माझ्या स्वातंत्र्याला कधीही मर्यादा घातली नाही. मला जे आवडतं ते काम मला करू दिलं. दोघांनीही एकमेकांना समजून घेतल्यानं जीवन संघर्षमय असूनही त्याची इजा एकमेकांना झाली नाही. 

असं गेलं बालपण

माझे आई-वडील निर्व्यसनी होते. त्या दोघांना एकच व्यसन होतं आणि ते म्हणजे ‘जनसंपर्क’. माझ्या लहानपणी आमच्या घरासमोर रस्ता सगळा मोकळा होता. आमच्या घराकडे येणारा माणूस दुरून दिसला रे दिसला की, वडील स्वयंपाकघरात चहा-नाष्ट्याची ऑर्डर द्यायचे. घरात माणसांचा सतत राबता असायचा.

त्या काळात आमच्या आई नगरपालिकेवर निवडून आल्या होत्या. आमच्या घरात वेगवेगळ्या थरांतले लोक यायचे. स्वातंत्र्यपूर्व काळात अनेक क्रांतिवीरांचं वास्तव्य आमच्या घरात असायचं. गांधीहत्येच्या वेळी अनेक ब्राह्मण कुटुंबांना आमच्या आई-वडलांनी आधार दिला होता.

आमच्या आबांचं कौतुक करायला हवं. कारण बहुतेक सगळे पुरुष बाहेर एक बोलतात आणि आत एक वागतात. बाहेर समाजाला ज्ञान शिकवतात. पण आमच्या आबांचं असं अजिबात नव्हतं. त्या काळात आपल्या बायकोला अशा पद्धतीनं स्वातंत्र्य देणं, ही सोपी गोष्ट नव्हती. मुलींच्या बाबतीतही त्यांनी तेच केलं. बाईबरोबरच त्यांनीही मुलींना शिक्षण देण्याचा आग्रह धरला होता.

हेही वाचा: अ. भि. गोरेगावकर स्कूल : खूप सारं शिकवणारी ‘शिकणारी शाळा’

खेळाच्या मैदानावर हुशारी

आम्ही त्या काळात कबड्डी खेळायचो. मुलांबरोबर वावरायचो. कधीही आम्हाला आमच्या आई-वडलांनी अडवलं नाही. माझी मोठी बहीण सरला जगताप. तिला आम्ही ताई म्हणतो. ताई आणि मी अशा आम्ही पवार बहिणी खेळाच्या मैदानावर अतिशय प्रसिद्ध होतो. पण आश्चर्य म्हणजे एवढ्या पुरोगामी विचारांच्या बाई. पण त्यांनी आम्हाला कबड्डी खेळायला बाहेरगावी जाऊ दिलं नाही.

खरं तर आम्ही ‘ट्रिपल क्राऊन’ मिळवला होता. धुळे-जळगावला राहायची सोय नसल्यामुळं बाईंनी आम्हाला तिकडे पाठवलं नाही. त्या काळात आमच्या शिक्षिका वाटवे बाई आम्हाला खूप प्रोत्साहन द्यायच्या. थ्रो बॉलची मी कॅप्टन होते. उंच उडी, लांब उडी या सगळ्या खेळांमधे आम्ही कायम पुढे असायचो. स्मरणशक्तीसारख्या खेळात पहिला आणि दुसरा क्रमांक नेहमी असायचा.

खरं म्हणजे त्या काळात आमच्या दोघींमुळे शाळेत एक नियम काढला - ‘एन थ्री’ म्हणजे विद्यार्थ्यांनी कुठल्याही ‘तीनच स्पर्धां’मधे भाग घ्यायचा. कारण मी थ्रो बॉलची कॅप्टन होतेच. पण त्याचबरोबर सगळ्यामधे भाग घेऊन पहिला-दुसरा नंबर मिळवल्यामुळे तो नियम केला होता की, प्रत्येक विद्यार्थ्याने कुठल्या तरी तीनच खेळांमधे भाग घ्यायचा.

माहेरात मिळाला वैचारिक वारसा

जातिभेद, धर्मभेद यांचं वारंही आमच्या घरात शिरलं नव्हतं. माझे वडील बंधू वसंतराव पवार हे शेतकरी कामगार पक्षातले एक लोकप्रिय आणि धडाडीचे नेते होते. त्यामुळे डाव्या चळवळीतल्या अनेक नेत्यांची आमच्या घरी ये-जा होती. क्रांतिसिंह नाना पाटील, भाई उद्धवराव पाटील, दाजीबा देसाई, जी. डी. लाड यांच्या सहवासानं आमचं घर पुनित झालं होतं.

कर्मवीर भाऊराव पाटलांच्या अनवाणी पावलांनीही आमची भूमी मंगलमय झाली होती. कर्मवीरांच्या वतीनं मोहिते नावाचे एक लठ्ठ गृहस्थ कायम आमच्या घरी उतरायचे आणि ते खेडोपाडी जाऊन देणग्या आणि धान्य गोळा करायचे. हे सगळं सांगायचा उद्देश हा की, आई-वडलांच्या लोकसंग्रह वृत्तीतून माझं लग्न एन. डी. पाटील यांच्याबरोबर झालं आणि माझ्यात थोडीफार सामाजिक दृष्टीही येऊ शकली.

आईने ठरवलं लग्न

वडील म्हणायचे, ‘आपल्या मुलीने इथं जिथं फुलं वेचली, तिथं तिला काटे का वेचायला लावायचे?’ यावर आई म्हणायच्या, ‘चिमण्या-कावळ्याप्रमाणे अनेकजण संसार करतात. पण हा मुलगा असामान्य आहे. त्याच्या डोळ्यांत बुद्धीची चमक आहे. वागण्यात प्रामाणिकपणा आहे. यालाच मुलगी द्यायची.’

एन. डी. पाटील यांना ओळखणारे अनेक लोक आई-वडलांना म्हणायचे, ‘अहो! याच्या पायाला भोवरा आहे, एखाद्या दरवेशाप्रमाणे हा भटकत असतो. कशाला मुलगी देता? तुम्हाला ती जड झालीय का?’ असे वादविवाद चालू होते. यात माझ्या पसंती-नापसंतीचा विचार कुणाच्याच डोक्यात नव्हता. आमच्या आईचं व्यक्तिमत्त्व प्रभावी असल्याने अशा वादाच्या वेळी आईचा नेहमीच विजय व्हायचा. अशा रीतीने माझं लग्न एकदाचं ठरलं.

हेही वाचा: मांग महारांच्या दुःखाविषयी, सांगतेय मुक्ता साळवे

लग्नापूर्वीच झाली वास्तवाची जाणीव

लग्नापूर्वीच एन. डी. पाटलांनी सांगितलं, ‘माझ्याकडे शेती नाही. असली तरी आम्हाला मिळणार नाही. मी घरात वेळ आणि पैसा दोन्ही देऊ शकणार नाही. कारण मी पूर्णवेळ पक्षाचं काम करायचा निर्णय घेतलाय. अर्थात, माझी तुमच्याकडूनही कुठलीच अपेक्षा नाही. मला मुलगी आणि नारळ चालेल. तुम्ही करून द्याल, तसं लग्न मला मान्य आहे. हे सगळं जर मुलीला चालत असेल, तर माझी काही हरकत नाही.’

या त्यांच्या अटींबद्दल विचार करण्याचं माझं वय नव्हतं आणि मला कुणी मार्गदर्शनही केलं नाही. माझ्या आई-आबांनी त्यांच्या सर्व अटी मान्य केल्या आणि आमचं लग्न ठरलं. माझे दुसरे भाऊ अनंतराव त्यानंतर एकदा त्यांना फिरायला घेऊन गेले. ‘आता लग्न होणार. मग तुम्ही पुढचा विचार काय केलाय?’ असा प्रश्न त्यांनी विचारला.

त्यावर ‘कोणतीही वेळ आली तरी तुमच्या दारात येणार नाही,’ असं त्यांनी सांगितलं. बस्स! लग्नापूर्वी झाली ती एवढीच चर्चा. त्यात मी कुठेच नव्हते. आजच्या मुली स्वतंत्रपणे स्वत:च्या आयुष्याचा विचार करतात, तसं करायचे ते दिवसच नव्हते. आपले आई-आबा आपलं चांगलंच करणार, असा विश्वास असायचा. मी तर लग्न, त्यानंतरचं आयुष्य याचा विचारच केला नव्हता. तेवढी परिपक्वता माझ्यात नव्हती.

त्या वेळी मी पुण्यातल्या आबासाहेब गरवारे कॉलेजात बी.ए.च्या दुसऱ्या वर्षात शिकत होते आणि होस्टेलला राहत होते. माझ्याबरोबर इतरही अनेक मैत्रिणींचं लग्न ठरलं होतं. शनिवारी सगळ्या मैत्रिणींचे भावी यजमान होस्टेलवर यायचे. आपल्या भावी पत्नींना घेऊन सिनेमाला किंवा फिरायला जायचे. याला अपवाद फक्त एन. डी. पाटील होते. ते शेवटपर्यंत या होस्टेलची पायरी चढले नाहीत. मी मनात म्हणायची, ‘हे कधीच कसे येत नाहीत? फोनही करत नाहीत, कसला नवरा?’ अशा रीतीने मनाला हळूहळू चटके बसू लागले होते.

धावपळीतला लग्नसमारंभ

शेवटी १७ मे १९६०चा दिवस उजाडला. लग्नाची वेळ सकाळी दहाची होती. मांडवात लोक जमू लागले. अक्षता द्यायची वेळ येऊन ठेपली. पण नवरदेवाचा पत्ता कुठाय? माझ्या मनात पाल चुकचुकली, ‘या गृहस्थाने रामदासासारखं पलायन तर केलं नाही ना?’ चार दिशेला चार भाऊ नवरदेवांना शोधायला गेले. त्या काळी बिचाऱ्यांकडे गाड्याही नव्हत्या. शरद एक डबडी मोटारसायकल घेऊन पळाला. उन्हात वणवण फिरून अगदी दमलेल्या अवस्थेत मांडवात परतला. अक्षरश: तोंडाला फेस आला होता. ते १८ वर्षांचं पोर थकून गेलं होतं.

विरोधी पक्षाची चपराक कशी असते, त्याचा अनुभव लहान वयातच आला. त्यामुळेच की काय, पुढच्या आयुष्यात विरोधी पक्षाशी त्याला चांगलंच जमवून घेता येऊ लागलं. शेवटी नवरदेवाचा शोध लागला. नवरदेव आणि वरात एका ओढ्यातल्या चिखलात अडकून पडलं होतं. शेवटी घाईघाईने नवरदेवाची गाडी ओढून काढली. त्यांना मांडवात बिनआंघोळीचंच उभं केलं आणि एकदाचं अक्षता टाकून त्यांना चतुर्भुज केलं.

सासरच्या घरची दुरावस्था

लग्नानंतर एक डबड्या फियाटमधून आमची वरात माझ्या सासरी, ढवळी गावाला निघाली. फियाटमधे पाठीमागे आमच्या दोघांप्रमाणे आणखी दोघे घुसले आणि पुढे दोघे बसले. उन्हाळ्याचे दिवस. पाठीमागे चारजण कसे बसले असू, त्याची कल्पना केलेली बरी. एकूण सात माणसांना घेऊन आचके देत गाडी एकदाची ढवळीला पोचली. आताची ढवळी आणि १९६०ची ढवळी यात जमीन-अस्मानाचा फरक आहे. मी तिथं पोचले आणि फारच घाबरून गेले.

तीन खोल्यांचं छोटंसं घर, छोटी मोरी. घरात पाच-सात कच्ची-बच्ची, दीर-जावा, सासू-सासरे, घरातच जनावरं, घोंगड्यावरची झोप, स्वयंपाकाच्या वेगळ्या पद्धती, स्वच्छतागृहांचा अभाव, डास पिसवांचं साम्राज्य. या वातावरणाची स्वप्नातही कल्पना केली नव्हती. मुळात जगात असंही काही असतं, हेही माहीत नव्हतं. धुळीची अॅलर्जी असल्यानं नाकातनं पाणी यायचं.

पण कमरेला रुमाल लावणं ‘बापईपणाचं लक्षण’ होतं. माझे केस खूप दाट, लांबसडक होते. पण उभं राहून केस विंचरणंही ‘बापईपणाचं लक्षण’ होतं. मला बसून केस विंचरताच यायचे नाहीत. स्वच्छतागृह नाही. त्यामुळं माझं पोट साफ नसायचं. मी तर आजारीच पडले. एके दिवशी संधी साधून मी त्यांना सांगितलं, ‘मला बरं वाटत नाहीय.’

त्यांनी दुसऱ्याच दिवशी बॅग भरायला लावली आणि अलिबागच्या बहिणीकडे सोडलं. लग्नापासून पुढची २०-२५ वर्षं म्हणजे माझ्यापुरता कटू आठवणींचा काळ. त्या काळात इतका संघर्ष करावा लागला की ती वर्षं आयुष्यातून खोलीच्या दरवाजासारखी बंद करावीत, असं वाटतं. हा संघर्ष होता परिस्थितीशी आणि आई म्हणून स्वत:शीसुद्धा!

हेही वाचा: शेणगोळ्यांची फुलं करणाऱ्या सावित्रीबाईंची शौर्यगाथा

पुरोगामी विचारांचं सासर

माझ्या सासरी त्या काळी सोयी नव्हत्या. गरिबी होती, शिक्षणाचा अभाव होता. पण अडाणी असली, तरी माणसं मनानं निर्मळ, चांगली होती. माझ्या छोट्या-छोट्या गोष्टीचंही कौतुक करण्याचा मोठेपणा त्यांच्याकडे होता. माझ्या इंदू नावाच्या एक जाऊबाई अडाणी होत्या. माझ्या सासूबाईंनी एकदा शेजारणीला बोलताबोलता सांगितलं, ‘अगं, मी जर इंदाच्या हातात लेखणी दिली आणि सरोजच्या हातात नांगूर दिला, तर ते कसं दिसंल? तेचा काय उपेग हाय काय?’

त्यांच्या या विचारांमुळे माझ्यावर टीका करणाऱ्यांची बोलती बंद व्हायची. ही माणसं साधी असली, तरी ती पुरोगामी विचारांची आहेत, बंडखोर प्रवृत्तीची आहेत, हे जाणवू लागलं. अजूनही मी जेव्हा ढवळीला जाते, तेव्हा सर्व मुलं माझ्याभोवती ‘काकी-काकी’ करत जमतात. मी त्यांच्यातच रमते. त्यांच्याबरोबरच जेवते. मला स्वयंपाकगृहात कधीच जावं लागत नाही. हा तिथल्या स्त्रियांचा मोठेपणा आहे.

माझ्या सासूबाई निरक्षर असल्या, तरी त्यांचे विचार पुरोगामी होते. त्यांचं मन पाण्यासारखं स्वच्छ आणि निर्मळ होतं. त्यांना माझा नेहमीच अभिमान वाटायचा. यांचं संसारात लक्ष नाही, हे पाहून सासूबाईंना माझी दया यायची. कधी-कधी चिडून म्हणायच्या, ‘कशाला यानं लग्न केलं? याचं बायका-पोरांकडं लक्ष नाही!’ गोरगरिबांना, अडलेल्यांना त्या नेहमी मदत करत. शिक्षण नसूनही जातिभेदाचा त्यांच्यात लवलेश नव्हता.

आमदारकीचे दिवस

माझं लग्न मेमधे झाले आणि ऑगस्टमधे ते आमदार झाले. मधल्या तीन महिन्यांच्या काळात मला अलिबागच्या बहिणीकडे आणि बारामतीत टाकून हे गायबच व्हायचे. केव्हा तरी महिन्याभरानं परत दर्शन व्हायचं. मधल्या काळात मला अगदी शरमल्यासारखं व्हायचं. पण हे त्यांच्या गावीही नसायचं. त्या काळी फोन वगैरे नव्हते. त्यामुळे फक्त वाट बघण्याशिवाय काहीच करता यायचं नाही.

परत भेटल्यावर काही बोललं, तर ते स्पष्टपणे सांगायचे, ‘हे बघ, सगळ्या गोष्टींची मी आधीच स्पष्ट कल्पना दिली होती. आता त्यावर चर्चा नाही.’ मग बोलणंच खुंटायचं. मनस्वी, सडेतोड, स्पष्ट विचारांच्या, कर्तव्यकठोर आमदाराशी गाठ होती ना? आमदार झाल्यावर ते मुंबईला घेऊन गेले. तेव्हा मी खुशीत होते. आता मुंबई कशी असते, ते पाहता येईल, सिनेमे, गाण्यातून भेटलेल्या मुंबईची ओळख करून घेऊ शकू, असं वाटलं होतं.

पण कसलं काय? आमदार निवासातल्या एका खोलीत माझी वळकटी टाकून त्यांनी थोडे पैसे दिले. ‘जवळच कॅन्टीन आहे. तिथं जेवण नाष्ट्याची सोय आहे,’ असं यांनी सांगितलं आणि निघून गेले. मग काय, कॅन्टीनमधलं जेवायचं आणि यांची वाट पाहायची, हा माझा कार्यक्रम. रात्री केव्हातरी हे यायचे आणि सकाळी लवकर बाहेर पडायचे.

त्यांचा पूर्ण वेळ पक्षासाठीच असायचा. मी गॅलरीतून दिसेल तेवढी मुंबई पाहत राहायची. ‘परत कधी येणार,’ असं विचारलेलं त्यांना आवडायचं नाही. सुरवातीच्या काळात कधी विचारलंच तर ‘काम संपलं की येईन’ हे ठरलेलं उत्तर असायचं. एक पण नक्की, जेवायला घरी येणार का नाही, आणखी कुणी येणार आहे का, हेही ते न चुकता सांगायचे.

शिवाजी पार्कातला संसार

मुंबईत इंदूलकर नावाचे त्यांचे एक मित्र होते. शिवाजी पार्कजवळ त्यांची इंदूलकर चाळ होती. कॉमन व्हरांडा आणि दोन लहानशा खोल्या असं चाळीचं स्वरूप होतं. एकदा इंदूलकरांनी आम्हा दोघांना जेवायला बोलावलं. जेवण झाल्यावर ते यांना म्हणाले, ‘एन. डी., आमची शिवाजी पार्कजवळ चाळ आहे. त्यातल्या दोन खोल्या तुम्हाला देतो. तुम्ही आमदार निवासापेक्षा तिथं राहा.’ त्या काळात पागडी न घेता, भाड्याविषयी काही न बोलता त्यांनी खोल्यांच्या चाव्या दिल्या.

असे मित्र ही यांची श्रीमंती आहे. त्यांनी तळागाळातल्या लोकांसाठी केलेल्या कष्टांची, समाजावर केलेल्या प्रेमाची त्यांच्याकडून आम्हाला अशा अनेक रुपांनी भरपाई मिळते. त्यांचं मोठेपण आमचा त्यांच्याबद्दलचा आदर वाढवतं. तर अशा रीतीने आम्ही दोन खोल्यांत राहायला आलो. आईनं येऊन संसार लावून दिला. जुजबी सामान आणलं, इथंही तीच तऱ्हा! सकाळी लवकर पक्षाच्या कामासाठी हे बाहेर जायचे. घरासाठी अगदी थोडा वेळ.

तिथल्या शेजारणींना वाटायचं की, मला नवऱ्यानं फसवून इथं आणून ठेवलंय. त्या म्हणायच्या, ‘तुझा नवरा घरी कधी दिसत नाही. त्यानं फसवलंय का? तसं असलं, तर सांग. आम्ही तुला मदत करू.’ मी हसून ते नाकारायचे. मग त्या विचारायच्या, ‘तो नेमकं काय करतो?’ मी सांगायची, ‘ते सोशल वर्कर आहेत.’ त्यावर त्यांना प्रश्न पडायचा, ‘नेमकं कोणतं सोशल वर्क करतो?’ अशा अनेक गमतीदार गोष्टी घडायच्या.

याच काळात मोठ्या मुलाच्या, सुहासच्या वेळेस मला दिवस राहिले. पुन्हा मी बारामतीला आले. या वेळी बरेच दिवस मुक्काम पडला. तोपर्यंत तिकडे इंदूलकरांनी चाळीच्या वरच्या मजल्यावर ३५० चौरस फुटाचे तीन फ्लॅट बांधले. एक त्यांच्या मुलाला, एक पुतण्याला आणि एक आम्हाला दिला. हेच आमचं घर. मी या घरात २५ वर्षं काढली.

हेही वाचा: सावित्रीआईचं एनजीओ नको करुया

कोल्हापूरच्या घरासाठी संघर्ष

कोल्हापूरमधे रुईकर कॉलनीत बांधलेल्या घराचंही असंच. बरीच वर्षं तो प्लॉट तिथं पडून होता, तोही दौंडकरांच्या नावे होता. शेवटी सोसायटीने जागा ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू केल्यावर तिथल्या एका मेंबरने ती जागा परस्पर स्वत:च्या सासूबाईंच्या नावावर चढवली. ती जागा मोकळी करून घे, असं मला सांगितलं गेलं. बरीच वर्षं को-ऑपरेटिव कोर्टात हेलपाटे घातले. मन:स्ताप सहन करावा लागला.

दहा वर्षांपूर्वीपासूनचा पत्रव्यवहार दाखवण्याचा आदेश कोर्टानं दिला. कुणीच नीट लक्ष न घातल्यानं सगळी कागदपत्रं मिळवणं महामुश्किल होतं. प्रशांतच हे सगळं करत होता. शेवटी २००१ला, वीस वर्षांनी केस जिंकली आणि जागा दौंडकरांच्या नावावर झाली. त्यांनी ती आमच्या नावावर केली. घर बांधायचं ठरवलं. प्लॅनही मंजूर झाला.

पण लक्षात आलं की, बरीच वर्षं जागा पडून असल्यानं आजूबाजूच्या अनेकांनी अतिक्रमण करत आपले प्लॉट पुढे घेतलेत. मूळचा कॉलनीतला रस्ता बाजूला करून या प्लॉटमधून रस्ता दाखवलाय. पुन्हा वर्षभर न्यायासाठी झगडत होते. एकटीच सगळीकडे जात होते. कॉलनीच्या नियमाप्रमाणे आणि प्लॅनप्रमाणे प्लॉट मिळण्यासाठीसुद्धा खूप हेलपाटे मारावे लागले.

मुलांसाठी कसली कंबर

यापूर्वी घरात स्टोववर स्वयंपाक करावा लागायचा. एक मूल कडेवर, एक हाताशी असं माझं काम चालायचं. ते वडलांना खटकलं. ते म्हणाले, ‘त्यापेक्षा मी पैसे देतो. तू तुझ्यासाठी गॅस घे.’ गॅस नोंदवल्याचं समजल्यावर त्यांना राग आला. तीन महिने हे माझ्याशी बोललेच नाहीत. ‘त्यांनी दिला म्हणून काय झालं? आपल्याला काय परवडतं, ते कळायला नको? ते उद्या गाडी आणून दारात लावतील. आपल्याकडे पेट्रोलला पैसे आहेत का?’ असले त्यांचे प्रश्न!

स्त्री स्वत:साठी काही मागत नाही. पण मुलांसाठी तडजोड करताना पण तिला खूप झगडावं लागतं. हे मला मुलांच्या जन्मानंतर तीव्रतेने जाणवायला लागलं. इतके दिवस थोडे पैसे देऊन हे गेले तरी मी काही बोलत नव्हते. माहेरचा भक्कम आधार होता. पण तो यांच्या तत्त्वात बसत नाही. मलाही ते आवडत नव्हतं. शरमल्यासारखं वाटायचं. अनुभवातून तावून निघाल्यावर मी विचार करायला लागले. दोन मुलं आहेत. त्यांचा खर्च वाढतच जाणार. तो मेळ आपण कसा घालणार?

एका अपरिहार्यतेतून मला बाहेर पडायचं होतं. रस्ता शोधायचा होता. कुढणं, रडणं संपवायचं होतं. मग विचार करून मी निर्णय घेतला. बी. ए. पर्यंतचं शिक्षण झालंच होतं. मी बी.एड. करायचं ठरवलं. त्या वेळी माझा मोठा मुलगा दुसरीत तर धाकटा माँटेसरीत होता. मुलांना कोण सांभाळणार? शेवटी मी घराला ‘लॅच की’ करून घेतली. मुलांच्या गळ्यात ती किल्ली बांधून दिली म्हणजे हरवण्याची भीती नाही.

मी घरात टेबलावर अन्न मांडून झाकून जात होते. तेव्हा फळ म्हणून फक्त केळीच परवडायची. मग केळ्याची फणी सुतळीला बांधून मुलांच्या हाताला येईल, अशी टांगून ठेवायची. मुलांना फूटपाथवरून सावकाश यायला शिकवलं. ती घरी येऊन खायची. दार बंद करून खेळायला जायची. या सगळ्याचा परिणाम म्हणजे मुलं जबाबदार, शहाणी, स्वतंत्र झाली. माझ्याऐवजी खरं तर त्यांनीच घर सांभाळलं. त्यावर्षी मी बी.एड. झाले.

अंधेरीत दारिद्य्राचं दर्शन

याचदरम्यान अंधेरीतून आमदारकीसाठी इंदूलकरांचा मुलगा उभा होता. त्याचा प्रचार करण्यासाठी हेही फिरायचे. तेव्हा तिथल्या झोपडपट्टीतल्या मुलांसाठी शाळेची सोय नव्हती. शाळेची मागणी होती. शेवटी इंदूलकरांनी त्यांना शाळेचं आश्वासन दिलं. त्यांचा मुलगा निवडूनही आला. त्यानंतर शाळा सुरू करूया, असा एन.डीं.नी तगादा लावला. त्या भागातच इंदूलकरांचा छोटा प्लॉट होता. तिथं शेड मारून शाळा सुरू झाली. बी.एड. झाल्याबरोबर मला त्या शाळेत नोकरी लागली. तेव्हा दोनशे रुपये पगार होता.

त्या शाळेत दहा वर्षं मी शिक्षिकेची नोकरी केली. त्या काळात गरिबीची खूप जवळून ओळख झाली. तेव्हा शाळेत जे हेडमास्तर आणि क्लार्क होते, त्यांनी संगनमताने मुलांच्या फीचे पैसे खाल्ले. मग मॅनेजमेंटकडून चौकशी सुरू झाल्यावर ते दोघे पळून गेले. उरलेल्यांमधे मी सर्वांत सीनियर होते. त्यामुळे हेडमास्तर झाले. तब्बल १९९७पर्यंत मी या शाळेत जीव ओतून काम केलं. प्रशासनाचा अनुभव नव्हता. मग मी परिसरातल्या नामवंत शाळांत जाऊन सारं शिकून घेतलं.

विद्यार्थ्यांना रोजची हजेरी अनिवार्य केली. दोन-तीन दिवस मुलगा शाळेत आला नाही, तर मी स्वत: स्कूटर काढून झोपडीत जायचे. तेव्हा दारिद्य्राचं अगदी जवळून दर्शन झालं. एवढ्याशा झोपडीत दहा-बारा माणसं! त्यांच्या अडचणींचा विचार केला, तरी अंगावर काटा यायचा. एकच उदाहरण सांगते. पावसाळ्यात शाळेत गुडघाभर पाणी साठायचं. मग शाळेला सुट्टी दिली, तरी मुलं शाळेतच. विचारल्यावर काहींनी सांगितलं, ‘शाळेत एवढंसंच पाणी आहे. पण घरात कमरेइतकं पाणी आहे. एकाच कॉटवर आम्ही किती जणं बसून राहणार? त्यापेक्षा शाळेतच बरं आहे.’

मी कधीतरी काही कारणानं त्यांच्या घरी गेले, तर त्यांची धावपळ उडायची. घरची बाई मोलकरीण असायची. मग ती दोन रुपयांची चुरगाळलेली नोट कुठून तरी काढायची. मुलांना थंड पेय आणायला पिटाळायची. पाहुणचार करायची इच्छा असायची. पण परिस्थिती आड यायची. खरं सांगते, ते थंड पेय घशातून खाली उतरायचं नाही. या शाळेनं, मुलांनी, पालकांनी आणि समाजानंही मला भरभरून प्रेम दिलं. मी शाळेत रमले.

हेही वाचा: लॉकडाऊनमधल्या स्थलांतरितांच्या व्यथा का वाचायला हव्यात?

चांगल्या निकालासाठी वेगवेगळे उपक्रम

दहा वर्षं शिक्षिका म्हणून काम करताना या मुलांच्या क्षमता, त्यांचे सुप्त गुण, संधीचा अभाव हे सारं लक्षात येत होतं. शाळेचा निकाल शून्य ते दहा टक्केच असायचा. वाईट वाटलं, तरी मी काही करू शकत नव्हते. पण मी हेडमास्तर झाले. मुलांच्या मदतीनं मी शाळेत अनेक उपक्रम राबवले. वृक्षारोपण, मुली दत्तक देणं, लोकांकडून दान रुपात पुस्तकं मिळवणं, बोलका व्हरांडा अशा अनेक उपक्रमांचा समावेश होता. शाळेतले शिक्षक, मुलांनी, परिसरातल्या लोकांनीही उत्तम साथ दिली.

एक गंमत सांगते. या मुलांना खासगी शिकवणी परवडणं शक्य नव्हतं. त्यांचा अभ्यास व्हावा म्हणून मी शाळेत रात्र अभ्यासिका सुरू केली. मुली आठ-साडेआठपर्यंत असायच्या. मुले पण रात्री अकरापर्यंत थांबायची. त्यांच्यावर लक्ष ठेवायला कुणीतरी हवं होतं. मी परिसरातल्या ज्येष्ठ नागरिकांशी बोलले. त्यांना विनंती केली की, रात्रीचे दोन-तीन तास आमच्या मुलांसाठी द्या. मुलं आपापला अभ्यास करतील, तुम्ही फक्त तिथं खुर्चीत बसा. एखादी शंका कुणी विचारली, तर ती सांगा.

त्या परिसरात सगळे क्लास वन, क्लास टू अधिकारी म्हणून निवृत्त झालेले लोक होते. हे सारे सहकार्यासाठी आनंदानं पुढं आले. उलट तेही या मुलांमधे रमले. शालेय अभ्यासाबरोबरच धार्मिक गोष्टी, विज्ञानाचे प्रयोग रंगू लागले. या सगळ्याचा परिणाम म्हणून पुढच्या काळात निकाल ९० ते १०० टक्क्यांपर्यंत गेला.

वृक्षारोपणाची मोहीम

वृक्षारोपणाचा एक आगळा प्रयोग मी राबवला. मुलांच्या सहकार्यानं शाळेचा परिसर तर हिरवागार केलाच. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी झाडंही लावली. नंतर पार्ल्यातल्या सोसायट्यांची आम्ही परवानगी मिळवायचो आणि आमची मुलं तिथं झाडं लावून जगवायची सुद्धा! झाड थोडं मोठं होईपर्यंत त्याला पाणी घालावं लागतं. नंतर ते आपोआप वाढत जातं, हे मी मुलांना समजावलं.

दूरवरून येणारी मुलं झाडांना पाणी कसं घालणार, हा प्रश्न आला. मी म्हटलं, घरातल्या दुधाच्या पिशवीतून पाणी आणून घाला. मुलांनी ते आनंदानं केलं. पार्ल्याला आजही गेलात, तर स्टेशनपासून आमच्या शिवाजी विद्यालयापर्यंतचा परिसर हिरवागार दिसतो. तो माझ्या या मुलांनी मोठ्या कष्टातून उभा केलाय. त्यामुळंच मला म्हणजे आमच्या शाळेला आणि या मुलांना सलग पाच वर्षं राज्यपालांच्या हस्ते मोठी ढाल आणि निसर्गमित्र पुरस्कार मिळाला.

मुलांच्या कल्पकतेतून उभारला निधी

या मुलांमधे कल्पकता असते. आपण मध्यमवर्गीय लोक आपली मुलं पुस्तकी माहितीत वाढवतो. पण आर्थिकदृष्ट्या कमी परिस्थिती असली, तरी ही मुलं अनेक गोष्टींमधे तरबेज असतात. एखादी कलाकृती करणं असेल आणि विजेची कनेक्शन्स हलवणं असेल, तांत्रिक बाबीही त्यांना चांगल्या जमतात आणि कलात्मकतेतही ती मागे नसतात.

या शाळेतल्या मुलांना मी आकाशकंदील करायला लावायचे. शाळेच्या व्हरांड्यात दोरी लावून त्याला आम्ही आकाशकंदील लटकवायचो. मुलं धडपड करून त्यात लाईट सोडायची. सगळी शाळा लख्ख तेजानं उजळून निघायची. आसपासची माणसं आमचे आकाशकंदील विकत घ्यायची. त्यातून मी हजारो रुपये शाळेसाठी मिळवले. शाळेला देणग्याही मोठ्या प्रमाणात मिळाल्या. मी जेव्हा १९९७ला रिटायर झाले, तेव्हा माझ्या शाळेकडे तब्बल २५ लाख रुपये शिल्लक होते. त्याच्या व्याजातून आजही शाळेचे अनेक खर्च भागवले जातात.

हेही वाचा: समर्पणाचं दुसरं नाव मेधा पाटकर!

मुलांमधेही स्वावलंबनाचे धडे

हे सगळं इतक्या विस्तारानं सांगायचं कारण की, जसजशा माझ्या जाणिवा विकसित झाल्या, तसतसं माझं व्यक्तिगत दु:ख मला जाणवेनासं झालं. माझी मुलंही छान स्वावलंबी झाली. आमच्या दोघांमधलं मतभेदाचं आणि दुराव्याचं मूळच माझ्या नोकरीमुळं नष्ट झालं. त्यामुळं पुढच्या काळात एकमेकांबद्दल तशा अर्थाने तक्रारीच उरल्या नाहीत.

माझ्या मोठ्या मुलाला, सुहासला, मेडिकलला प्रवेश घ्यायची इच्छा होती. पण त्यासाठी त्याला एक-दोन मार्क्स कमी पडत होते. त्यावेळी हे सहकारमंत्री होते आणि माझा भाऊ शरद पवार मुख्यमंत्री! तरीही त्यानं नागपूरला इंजिनिअरिंगला प्रवेश घ्यायचं ठरवलं. त्याच वेळी नागपूरमधे विधिमंडळाचं अधिवेशन सुरू होतं. पण तोही स्वाभिमानी! प्रवेशाच्या रांगेत उभा राहिला. वडलांच्या व्यवसायाच्या कॉलममधे शिक्षक लिहिलं आणि स्वत:च्या हिमतीवर प्रवेश मिळविला.

कोणाच्या तरी वशिल्यानं आपण प्रवेश मिळवला, असं कुणी बोट दाखवणं त्यालाही आवडत नव्हतं आणि आम्हालाही नको होतं. सरळपणे मिळालेला प्रवेश घेऊन तो इंजिनिअर झाला. प्रचंड बुद्धिमत्ता, अफाट कष्टाची तयारी, प्रामाणिकपणा या गुणांच्या बळावर तो आज अमेरिकेत नामवंत उद्योजक झालाय. वडिलांचा साधेपणा दोन्ही मुलांमधे आलाय.

कार्यकर्त्यांना मूल मानणारे एनडी

आमच्या घरी कार्यकर्त्यांचा सदैव राबता असतो. काही कामात गुंतल्यामुळे आणि इतर कारणानं आलेल्यांना चहा-बिस्किटं द्यायला उशीर झाला, तरी ते अस्वस्थ होतात, आत-बाहेर करतात. एखाद्याला तुरीची डाळ चालत नाही, तर त्याच्यासाठी वेगळं काही केलंय का, याची खात्री केल्याशिवाय चैन पडत नाही.

मला एकदा टायफॉईड झाला होता. त्यावेळी माझा मोठा मुलगा चौथीत शिकत होता. दौरा टाळून ते घरात थांबले नाहीत. आम्हीही ‘थांबा’ असं म्हटलं नाही. कार्यकर्त्यांच्या छोट्या-मोठ्या आजारपणातही धावून जाणारा हा माणूस घरच्यांबद्दल इतका कोरडा कसा काय राहू शकतो, हे मला कधी कळलं नाही. हा कठोरपणा मला खटकलाय. यांनी आमदारकीचे पैसे, प्राध्यापक म्हणून मिळणारी पेन्शन असा त्यांना म्हणून मिळणारा एकही पैसा कधी घरी दिला नाही.

त्याबद्दल माझी कधीच तक्रार नव्हती आणि नाही. हा सर्व पैसा त्यांनी एस.टी. आणि रेल्वेचा प्रवास, कार्यकर्त्यांच्या गरजा आणि समाजासाठीच वापरला, हे मला माहीतच आहे. या बदल्यात त्यांच्याबरोबर आम्हीही समाजाचे निरतिशय प्रेम, आदर अनुभवतो. आम्हीही त्यांची मूल्यं जपतो. त्यांच्या मूल्यांच्या चौकटीतलं स्वातंत्र्य ते आम्हाला पूर्णपणे देतात. त्यामुळे एकमेकांना समजून घेत आमची आजपर्यंतची वाटचाल झाली आहे.

संसारापेक्षा समाजकार्याला महत्त्व

नोकरीला लागल्यावर पण मी त्यांच्याशी युक्तिवाद करायला शिकले. त्यांच्या तत्त्वांबाबत ते तडजोड करत नाहीत. त्यापलिकडच्या गोष्टींना त्यांची हरकत नसते, हे एव्हाना माझ्या लक्षात आलं होतं. त्यामुळे एखादी वस्तू आणल्यानंतर ‘माझ्या पैशातून मी वस्तू आणली. कोणती गैर गोष्ट केली नाही ना? त्यासाठी तुमच्याकडून पैसे मागितले नाहीत ना?’ असं मी म्हणायची. यावर ते काही बोलायचे नाहीत. त्यामुळे नंतर भांडणाचा, संघर्षाचा प्रश्नच आला नाही.

नोकरीच्या पैशातून हळूहळू संसारातील एक-एक वस्तू जमवत गेले. मला स्वच्छतेची, नीटनेटकेपणाची हौस आहे. ती हळूहळू पुरवत गेले. मुलं लहान असताना मी ‘महात्मा’ नावाचा एक सिनेमा पाहिला होता. त्यात ‘मोठ्या व्यक्तींच्या उतार वयात त्यांना कुटुंबातील सदस्यांचा द्वेष स्वीकारावा लागतो,’ हे दाखवलं होतं. अगदी मोठ्या माणसांची मुलंही ‘यांनी समाजासाठी खूप केलं. पण आमच्यासाठी काय केलं? त्यांच्यामुळेच आमचे हाल झाले ना?,’ असं म्हणतात. मला पण माझ्या घरात ते होऊ द्यायचं नव्हतं.

‘तुमचे वडील म्हणजे कोरा चेक आहे. लोकांसाठी ते झटतात. त्यांनाच काय, उद्या तुम्हालाही कुठली अडचण आली, तर यांचे दहा कार्यकर्ते मदतीसाठी धावून येतील. हीच श्रीमंती खरी असते,’ असं मी मुलांना सांगायचे. त्यामुळं मुलांच्याही मनात त्यांच्याबद्दल कधी राग, द्वेषभावना आली नाही. आजही त्यांना पित्याबद्दल प्रचंड आदर वाटतो. त्यांच्याशी तात्त्विक वाद झाले, तरी त्यांचे मोठेपण वादातीत राहते.

आज आमच्या आयुष्याची संध्याकाळ झाली आहे. दोन्ही मुलं स्वकर्तृत्वावर उभी आहेत. वडलांनी संसारात कधीच लक्ष दिलं नाही, हे ओळखतात. पण तरीसुद्धा त्यांना वडलांविषयी आदर आहे, अभिमान आहे. कधी तरी येणाऱ्या आजोबांना नातवंडं ‘बाबा, बाबा’ करत चिकटतात. पण या भावनेच्या ओलाव्यात ते अडकून पडत नाहीत. मन घट्ट करून घराबाहेर पडतात.

हेही वाचा: आप्पासाहेब सा. रे. पाटील: असाही असतो 'साखर कारखान्याचा चेअरमन'

नातवंडांचा गोतावळा

मोठ्या मुलाच्या मुलाला सागरला घेऊन मी अमेरिकेला गेले, तेव्हा तो अतिशय लहान होता. तरीही माझ्याबरोबर एकटा असतानाही तो कुठे कमी पडला नाही. लंडनमधे उतरून दुसरं विमान पकडणं, कनेक्टिंग फ्लाईट, सगळीकडे तो मला मदत करत होता. त्याचा मित्रपरिवारही प्रचंड होता. मित्रांबरोबर खूप उत्साहाने वाढदिवस साजरा केला जायचा. तो अतिशय उत्तम भाषणं करायचा.

प्रसिद्ध सिनेदिग्दर्शक आशुतोष गोवारीकर आणि अग्रगण्य उद्योगपती मुकेश अंबानी यांची मुलं त्याचे मित्र होते आणि कित्येक दिवस आम्हाला घरात येणारी मुलं ही एवढ्या नावाजलेल्या प्रसिद्ध लोकांची आहेत, हे माहीतच नव्हतं. ती अगदी सर्वसामान्य मुलांसारखी आमच्याकडे यायची. सागरच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि त्या लहान वयातही त्याने दाखवलेल्या कर्तृत्वाचा तो परिणाम होता. आपल्याबरोबर अंबानींचा आणि जैनांचा मुलगा असतो, यामुळे सागरला कधीच फरक पडला नाही.

मी त्याला म्हटलं की, ‘अरे सागर, एवढ्या मोठ्या लोकांची मुले तुझ्याबरोबर असतात. तू कशी काय त्यांच्याबरोबर मैत्री करतोस? तुला हे कसं झेपणार?’ त्यावर त्याचं अगदी सरळ साधं उत्तर होतं, ‘आई, मी त्यांच्याकडे जात नाही, ते माझ्याकडे येतात. ते आनंदाने आपल्यामधे वावरतात. त्यांना काही त्यामधे अडचण वाटत नाही, तर मग आपण कशाला काही वाटून घ्यायला पाहिजे? आमची निकोप मैत्री आहे.’

ती मुलं कोणत्या गाड्यांतून फिरतात, कशी राहतात, कोणत्या ब्रँडचे कपडे-शूज, घड्याळ घालतात, त्याच्याशी त्याला काही घेणे-देणे नव्हते. फक्त ब्रँडेड शर्ट पण घालायला त्याला आवडायचे. ते सोडले, तर गॉगल, शूज, कोट असा कोणताही आग्रह त्याने धरला नाही. मला आठवते की, सागरच्या आजारपणात आम्ही लंडनला होतो.

त्यावेळी एका फ्लॅटमधे राहत असताना माझा एक नातेवाईक सागरला भेटायला आला होता. तो कोट तिथंच विसरून गेला. मी म्हटलं, की त्यांचा कोट विसरलाय. परत येईल तेव्हा नेईल. पण सागरची तो कोट विसरलाय हे सांगायची गडबड चालू होती. तेव्हा तो म्हणाला, ‘आई तो काही साधा कोट नाही, अरमानी कंपनीचा अतिशय किमती कोट आहे. त्याने त्या कोटाची किंमत शांतपणे मला सांगितली आणि ती किंमत ऐकून थक्कच झाले.

अनमोल विचारांचा वारसा

मला माझ्या नातवंडांसाठी कधी असे ब्रँडेड कोट आणि इतर वस्तू देता आल्या नाहीत. अशा महागड्या वस्तू वापरणाऱ्या समाजामधे त्यांचाही वावर होता. लाखो रुपयांच्या वस्तू ही मुलं अंगावर घालत होती. पण सागरला कधीही त्याचं वाईट वाटलं नाही. तो अगदी आत्मविश्वासाने आणि निवांतपणे त्यांच्यात वावरायचा. खऱ्या अर्थाने त्याच्या आजोबांचे गुण त्याच्यात उतरले होते.

त्याचे आजोबा नेहमीच त्याला सांगायचे की, ‘माणसाची जगण्यासाठीची गरज कितीय? किती लागतं पोट भरायला? ३५ रुपयांत आपण घरी पोटभर जेवू शकतो. गरजा कमी असल्या की, जगणं फार अवघड नसतं. कामाच्या ठिकाणी येण्या-जाण्याचा खर्च, दोन वेळचं जेवण, दोन कपडे आणि फार थोडी रक्कम लागते.’ असे सरळ-साधे विचार समोर ठेवून एन. डी. पाटील आपले आयुष्य जगले आणि आजूबाजूलाही त्यांनी तेच विचार रुजवले.

साधेपणात रमणारे एनडी

ही त्यांची तत्वं ठीक आहेत. पैसे मिळवण्याऐवजी लोकांसाठी काम करत राहिलो, याचा अभिमानही असावा. पण हे अतिशय व्यवहारशून्य आहे. बाहेरच्या जगामधे एखाद्या वस्तूची किंमत काय आहे, व्यावहारिक जगात काय चाललंय, याची त्यांना जराही कल्पना नाही. मुंबईच्या घरात आम्ही बऱ्याच वर्षांनी थोडं फर्निचर करायला घेतलं होतं. एक तर मी एकटी खूप वर्षं नोकरी करत होते. कसंबसं सगळं चालवत थोडे पैसे बाजूला टाकले होते आणि फर्निचर करायचं ठरवलं होतं.

ते आलं की, एखादी वस्तू करायची तर त्याचा खर्च किती येणार? याची किंमत किती? याची गरज आहे का? असे प्रश्न विचारत सतत राहायचे. एखाद्या टेबलचा खर्च समजा ५ हजार रुपये येणार असेल आणि आम्ही ५०० रुपये येणार, असं सांगितलं, तरी ते म्हणायचे, ‘अरे बापरे! एवढ्याशा टेबलसाठी ५०० रुपये खर्च? एवढा खर्च कशाला करता? जरा कमी करता आला, तर पाहा.’

घरात दागिने घ्यायचे असतात, साड्या-कपडे घ्यायचे असतात, लग्न-समारंभ असतात, इतर काही सांसारिक, प्राथमिक गोष्टी असतात, याची त्यांना काही माहितीही नाही आणि देणं-घेणंही नाही. आपली जुनी म्हण आहे ‘अज्ञानातच सुख असतं.’ या म्हणीचा मी त्यांच्या बाबतीत खऱ्या अर्थाने अनुभव घेतला आणि घेतेय.

हेही वाचा: डॉ. जयसिंगराव पवार: इतिहासाला वर्तमानाशी जोडणारे संशोधक

कुटुंबासाठी सरकारी सोयी टाळणारे एनडी

ते आयुष्यभर मूल्यांना चिकटून राहिले. ढोंग, लबाडी, स्वार्थीपणा यांच्या पलिकडे राहिले. अफाट मेहनत, प्रचंड वाचन, ज्ञानाचा सागर असणारे असे ‘वडील’ मुलांना खूप आवडतात. कौतुक करणारे एन. डी. पाटील ‘आजोबा’ म्हणूनही नातवंडांना खूप प्रिय आहेत. नातवंडांना मिळालेल्या बक्षिसात आपला एक करकरीत रुपया टाकून त्यांना खूष करतात. मी मनात म्हणते, खऱ्या अर्थाने ते श्रीमंत आहेत.

सगळ्या सुख-दु:खाच्या पलिकडे गेलेलं, मोह नसणारं, अंथरुणावर पडताच घोरणारं असं हे व्यक्तिमत्त्व! श्रीमंत नाही तर काय? आज राजकीय पुढाऱ्यांची मुलं बिघडताना दिसतात. पण आपल्या मुलांवर वडलांचे चांगले संस्कार झालेत. वडलांच्या लाल दिव्याच्या गाडीत ती कधी बसली नाहीत. मुलं कधी कोणाशी अप्रामाणिकपणे वागली नाहीत. वरळीला आमदार कोट्यातून मिळणारा उत्कृष्ट फ्लॅट वडलांनी नाकारला, याचंही मुलांना कधी दु:ख होत नाही.

थोडक्यात, म्हणजे आम्ही दोघेही सुखी आहोत, समाधानी आहोत. माणुसकी हा धर्म मानून दोघेही कार्यरत राहिलो. आज आमच्याकडे थोडे पैसे असतील. पण त्यापेक्षाही मौल्यवान माणसं, मित्र आम्हाला भेटले. नेर्ल्याचे रावसाहेब पाटील, वाळव्याचे शिवाजी माने, शिवाजी रणदिवे, कोल्हापूरचे संभाजीराव चव्हाण, हिंदूराव साळोखे, पंढरपूरचे मुरलीधर थोरात, अशोक भुतडा अशा अनेक मित्रांनी यांच्यावर जिवापाड प्रेम केलं. मुंबईचे अशोक सरकार, सुरेश भाटवडेकर, कमलाकर म्हेत्रे, डॉ. जनक नाथन ही तर आमची मुलंच आहेत. आम्ही आजारी पडलो, तर आम्हाला कसलीच काळजी वाटत नाही.

वेळोवेळी दाखवला कणखरपणा

आमच्या जीवनातल्या तीन दु:खद घटना म्हणजे इस्लामपूरचा गोळीबार, दुसरी घटना म्हणजे त्यांच्या पायाला आलेलं अपंगत्व आणि तिसरी घटना म्हणजे आमचा नातू चि. सागर याचा अकाली मृत्यू. आपण पूर्वीप्रमाणे कार्यकर्त्यांना भेटू शकत नाही, त्यामुळे त्यांना फार दु:ख व्हायचं. कार्यकर्त्यांनी दिलेल्या गाडीतही त्यांना बसायला आवडत नसे. त्याचं त्यांना दु:ख होई.

मग मीच समजूत घालायचे, ‘तुम्हाला तुमचे कार्यकर्ते ओळखतात. नाईलाजानं तुम्हाला गाडीचा प्रवास करावा लागतोय.’ असे बोलल्यावर ते थोडे शांत होतात. अजूनही त्यांचा प्रवास अखंड चालू असतो. त्यांच्या प्रवासात नियोजन नसते. म्हणून मी कधी-कधी रागावते. ‘महिन्यातून किमान दोन दिवस विश्रांती घ्यायला हवी,’ असं कळकळून सांगते. पण ते ऐकत नाहीत.

रयत शिक्षण संस्थेचं काम ते अहोरात्र करत असतात. पण गाडीला पेट्रोल स्वखर्चानं घालत. संस्थेकडून ड्रायवरशिवाय काही घेत नाहीत. पण दिवसातून अनेक वेळा म्हणतात, ‘रयत शिक्षण संस्थेनं मला फार मोठं केलं. कर्मवीरांमुळे मी एवढ्या पायऱ्या चढलो. शेका पक्षाने मला कीर्ती दिली.’

तेजवीराची सावली

आजपर्यंतच्या आयुष्यात एकही रविवार त्यांनी घरी घालवलेला नाही. ४३ वर्षांच्या प्रवासात मोजून पाच सिनेमेही आम्ही एकत्र बसून पाहिलेले नाहीत. उभयतांचे जीवन खडतर गेले. पण आमची एकमेकाविषयी मने कधीच कलुषित झाली नाहीत. कारण एकमेकांवरचा अढळ विश्वास होय. जितक्या ओढीने ते बाहेर जातात, तितक्याच ओढीने ते घरीही येतात. ते अतिशय गरिबीत वाढले. आपली साधी राहणी त्यांनी कधीच सोडली नाही. स्वत:चे कपडे स्वत: धुण्याचा त्यांचा शिरस्ता आहे. एका स्लीपरवर राहण्यात त्यांना काहीच गैर वाटत नाही.

निरलस वृत्ती, कार्यकर्त्यांसाठी असलेली तळमळ, अभ्यासू वृत्ती, वाचन, चिकाटी, मनाचा सच्चेपणा, खुलेपणा, निर्भीडपणा, स्वत:ला प्रामाणिकपणे जे वाटते ते करताना कोणाला काय वाटेल, याची फिकीर न करण्याची वृत्ती, स्वत:च्या मूल्यांना असलेले प्रथम अधिष्ठान अशा गुणसमुच्चयांमुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व उन्नत आणि भव्य बनते. संन्यस्त वृत्तीने संसार करणाऱ्या आणि सामाजिक कामात स्वत:ला झोकून देणाऱ्या ‘तेजवीराची सावली’ होता आलं, यातच कृतार्थतेची भावना दाटून येते.

हेही वाचा:

महाराजा सयाजीरावः पहिले आणि एकमेव

‘जेजुरी’ समजवणाऱ्या एका दुर्लक्षित पुस्तकाची पंचविशी

महाराष्ट्राची निर्मिती भाषेच्या संघर्षातून नाही, तर वर्गसंघर्षातून

पॉलिटिकल इस्लामप्रणित इस्लामी समाजपरिवर्तनाचा दस्तऐवज

कष्टकऱ्यांच्या पोरापोरींनी आयएएस बनणं कुणाला खुपतंय का?