गिरीश कर्नाड या ग्रेट कलाकाराविषयी इतकं वाचायला हवंच

१० जून २०१९

वाचन वेळ : ५ मिनिटं


गिरीश कर्नाड यांच्या जाण्याचं दु:ख साऱ्या जगाला आहे. त्यांनी आपलं नुसतं मनोरंजन केलं नाही, आपल्याला विचार करायला भाग पाडलं. मग ती त्यांची नाटकं असोत, सिनेमा असोत आणि त्यांचं जगणंही. त्यामुळे त्यांच्या कलाकृतींचा जगभर सन्मान झालाच, शिवाय ते जगभर आदरणीयही ठरले. आज आपण त्यांना शेवटचा निरोप देत आहोत. त्यांनी केलेलं काम मात्र अजरामर झालंय.

गिरीश कर्नाड एक फार मोठा कलाकार. त्यांनी फक्त महाराष्ट्र आणि कर्नाटकापुरतेच लोकप्रिय नव्हते. तर त्यांनी नाटकांतून, सिनेमांतून आणि अभिनयातून मांडलेल्या विचारांचे चाहते पूर्ण देशातच नाही तर जगभरातही पसरलेले होते. निशांतपासून टायगर जिंदा हैं पर्यंत वेगवेगळ्या हिंदी सिनेमात अभिनय केल्यामुळे ते देशभर माहीत होतेच. पण त्या माहितीच्या पलीकडेही एक नाटककार, दिग्दर्शक, लेखक म्हणून ते ग्रेट होते. ते एक समृद्ध कलावंत होते.

कर्नाड यांनी मागच्याच महिन्यात आपला ८१ वा वाढदिवस साजरा केला होता. ते मल्टिपल ऑर्गन डिसिजेसमुळे बऱ्याच महिन्यांपासून आजारी होते. बंगळुरूच्या राहत्या घरी त्यांच्यावर उपचार सुरु होते. १० जूनला सकाळी सहा वाजताच्या सुमाराला त्यांना जगाचा निरोप घेतला. 

ऑक्सफोर्डमधून मास्टर्स केलं

या ग्रेट कलावंताचा यांचा जन्म १९३८ मधे आपल्या माथेरानला एका कोकणी कुटुंबात झाला. त्यांनी सातवीपर्यंतच शिक्षण मराठीत घेतलं. तर चौदाव्या वर्षी त्यांचं कुटुंब  कर्नाटकातल्या धारवाडमधे स्थायिक झालं. मग तिथेच कर्नाटक युनिवर्सिटीतून ग्रॅज्युएट झाले. त्यांनी मॅथेमॅटिक्स आणि स्टॅटेस्टिक्सचा अभ्यास केला. पुढच्या शिक्षणासाठी मुंबईत आले. पण त्यांना -होड्स शिष्यवृत्ती मिळाली आणि ते इंग्लंडला गेले.

सगळ्या जगात प्रसिद्ध असलेल्या ऑक्सफर्ड युनिवर्सिटीच्या मॅगडेलन कॉलेजमधे त्यांनी प्रवेश घेतला. तिथे अर्थशास्त्र, राज्यशास्त्र आणि तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला. आणि मास्टर्सची पदवी मिळवली. मग ते शिकागो युनिवर्सिटीत प्रोफेसर म्हणून काम करत होते. पण त्यांना मात्र कवी व्हायचं होतं.

हेही वाचा: हेमा मालिनीच्या आईला गिरीश कर्नाडांना जावई करायचं होतं

त्यांना कवी व्हायचं होतं

कर्नाड मोठे होत असताना त्यांनी खूप नाटकं बघितली. नाटक कंपन्यांचा पसाराही पाहिला. त्यांच्या आई वडलांनादेखील नाटक बघण्याचा छंद होता. त्यामुळे त्यांनासुद्धा नाटकाची आवड निर्माण झाली. तसंच त्यांना कर्नाटकी लोककलेतल्या यक्षगानानेही त्यांच्यावर गारूड केलं. 

या सगळ्यामुळे ते नाटकाकडे वळले. पण त्यांच्यातली कवी बनण्याची उर्मी त्यांना वयाच्या बाविसाव्या वर्षापर्यंत अस्वस्थ करत होती. बाविसाव्या वर्षी त्यांचं पहिलं आणि त्यांनाही आवडणारं नाटक ययाती लिहित असतानासुद्धा त्यांनी नाटककार व्हायचं ठरवलं नव्हतं कारण त्यांचा ओढा कवी बनण्याकडे होता.

शेवटी कर्नाड नाटककार बनले

पण पुढे जाऊन त्यांच्यातल्या नाटकाच्या आवडीमुळे त्यांनी नाट्यकर्मी, सिनेकर्मी, दिग्दर्शक, अभिनेते म्हणून काम केलं. त्यांचं ययातीनंतरही त्यांची अनेक नाटकं गाजली. त्यात सर्वाधिक गाजलेलं नाटक म्हणजे तुघलग. त्यांना या नाटकासाठी साहित्यातल्या सर्वोच्च पुरस्कराने म्हणजेच भारतीय ज्ञानपीठ पुरस्काराने गौरवण्यात आलं.

अग्नि मत्तु मळे, ओदकलु बिम्ब, अंजुमल्लिगे, मा निषाद, टिप्पुविन कनसुगळु, तलेदंड, हित्तिन हुंज, नागमंडल, हयवदन ही त्यांनी लिहिलेली काही महत्त्वपूर्ण नाटकं आहेत. कर्नाड यांनी नाटक लिहायला सुरवात केलं त्यावेळच्या नाटककारांवर पाश्चात्य साहित्याचा प्रभाव होता. 

तेव्हाचे लेखक काहीतरी वेगळं, लोकांना माहिती नसलेलं लिहित होते. मात्र कर्नाड यांनी ऐतिहासिक आणि पौराणिक पात्रांना सध्याच्या स्थितीशी आणि व्यवस्थेशी जोडून दाखवत. त्यांची ही पद्धत खूपच लोकप्रिय ठरली. त्यांनी तेव्हाच्या नाटकांत एक  नवीन दृष्टिकोन, नवी पद्धत आणली.

हेही वाचा: गिरीश कर्नाड: भारतीय कलासंस्कृतीचा अस्सल प्रतिनिधी

अभिनय आणि दिग्दर्शनात केलेलं काम

त्यांनी खरं तर सिनेमांत जाण्याचा विचार केला नव्हता. पण एकदा त्यांच्याकडे अनंतमूर्ती यांच्या कादंबरीवर बनवण्यात येणाऱ्या संस्कार सिनेमासाठी ऑफर आली. यात त्यांनी अभिनय आणि पटकथाकार म्हणून काम केलं. या सिनेमाला बेस्ट फिल्मचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.

याच सिनेमातून त्यांनी सिनेक्षेत्रात पाऊल टाकलं आणि पुढे जाऊन हे क्षेत्र गाजवलं. त्यांनी कन्नडसह मराठी, तमिळ, हिंदी, मल्याळम आणि तेलगु भाषेतल्या जवळपास ७० सिनेमांमधून काम केलं आहे. निशांत, शिवाय, मंथन, स्वामी, चॉक अँड डस्टर, उंबरठा, पुकार, इक्बाल, तस्वीर ८ बाय १०, डोर, आशाएं इत्यादी काही प्रमुख सिनेमे आहेत.

त्यांनी १९७१ला दिग्दर्शक म्हणून काम करण्यास सुरवात केली. बीवी कारंथ यांच्या कन्नड कादंबरीवर आधारलेल्या वंशवृक्ष या सिनेमाला दिग्दर्शनाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. पुढेही त्यांनी गोधुली, उत्सव अशा काही सिनेमांचं दिग्दर्शन केलं. या दोन्ही सिनेमांनाही अनेक पुरस्कार मिळाले. तसंच त्यांनी अनेक कवी, गीत प्रकारांवर डॉक्युमेंट्री बनवल्या. ज्यांना देश, परदेशात पुरस्कारांनी गौरवलं.

हेही वाचा: विष्णू खरे : कवी गेल्यावर सोबत काय राहिलं?

कर्नाड यांना नाटकच जास्त आवडतं

कर्नाड यांनी टीवीवरसुद्धा काम केलं. मालगुडी डेजमधे अभिनय करत होते. ते स्वामीच्या वडलांचा रोल करत होते. तसंच दूरदर्शनवरचा विज्ञानवरच्या टर्निंग पॉईंट कार्यक्रमचं ते निवेदन केलं. त्याचबरोबर डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या अग्निपंख या ऑडियो बुकसाठी कर्नाड यांनी आपला आवाज दिलाय.

कर्नाड यांनी वेगवेगळ्या कलाक्षेत्रात काम केलं असलं तरी त्यांना मात्र नाटकच आवडतं. त्यांच्या मार्जिनलाईज्ड वेबसाईटवरच्या मुलाखतीत म्हणाले, ‘मला सिनेमापेक्षा नाटक जास्त आवडतं. तिथे एकाच गोष्टीला वेगवेगळ्या पद्धतीत मांडता येतं, प्रयोग करता येतात आणि नाटक हा एक मुक्त अनुभव आहे.’ 

तसंच नाटक रिसर्च करून लिहिलं पाहिजे, असा त्यांचा कटाक्ष होता. त्यांना एकाच जागी बसून लिखाण संपवणं मान्य नव्हतं. त्यांना फिरून, बोलून, वाचून, माहिती गोळा करून, ती तपासून मग लिहिलेलं आवडत होतं. त्यांनी त्यांच्या कलाकृतीतून बाईला जशी आहे तशा रुपात ठेवलं. तेव्हाच्या कथेतलं बाईच सोशिक रुप कर्नाडांना काढून टाकलं होतं.

हेही वाचा: लेखक, कवींनी बहिष्कार टाकला, संमेलनाध्यक्ष काय करणार?

मीसुद्धा अर्बन नक्षल

कर्नाड हे जरी कलाकार म्हणून काम करत होते तरी ते सामाजिक कार्यात नेहमी पुढे होते. हल्ली कलाकार कोणत्याही सामाजिक गोष्टींवर आपलं मत व्यक्त करत नाहीत पण कर्नाड बिनधास्त आपले विचार व्यक्त करायचे. देशातली असहिष्णुता असो किंवा साहित्यिक, पत्रकारांवर होणारे हल्ले या विरोधात त्यांनी वेळोवेळी आवाज उठवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटरवरच्या शोकसंदेशातही कर्नाड यांचं हेच वैशिष्ट्य आवर्जून नोंदवलंय. मात्र त्यांचं नाटककार असण्याचा या ट्विटमधे उल्लेखही नाही.
पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येच्या स्मृतिदिनाच्या कार्यक्रमात 'मीसुद्धा अर्बन नक्षल' असं म्हणाले. कलबुर्गी यांच्या हत्येच्या निषेध मोर्चातही सहभागी झाले होते. ते ७५व्या वर्षीसुद्धा सार्वजनिक कार्यक्रम, चर्चासत्रे आणि साहित्य संमेलनांच्या व्यासपीठावर हजेरी लावत होते. 

जागतिक रंगभूमीचे राजदूत

कर्नाड यांनी ’आडाडता आयुष्य’ म्हणजे `खेळता खेळता आयुष्य` हे कन्नड भाषेत आत्मचरित्र लिहिलं. यात त्यांच्या आई वडिलांचा वादग्रस्त विवाह ते स्वत:चं लग्न एवढा प्रवास मांडलाय. यांना भारत सरकारने १९७४ ला पद्मश्री, १९९२ ला पद्मभूषण आणि ११९९८ ला ज्ञानपीठ पुरस्कार देऊन गौरव केला. 

१९७२ ला संगीत नाटक अकादमी पुरस्कार, १९९२ ला कन्नड साहित्य अकादमी पुरस्कार, १९९४ ला साहित्य अकादमी पुरस्कार, १९९८ ला कालिदास सम्मान पुरस्कार इत्यादी. कर्नाड यांच्या पुरस्कारांची यादी लांबच लांब आहे.

१९७४-७५ मधे त्यांनी पुण्यातल्या एफटीआयआय संचालकपद भूषवलं. १९७६-७८ मधे कर्नाटक साहित्य अकादमीचे अध्यक्ष बनले. आणि १९८८-९३ मधे नाटक अकादमीचे सभापती. त्यांना त्यांच्या नाट्यक्षेत्रातील योगदानासाठी कर्नाटक विद्यापीठाने डॉक्टरेट तर युनिवर्सिटी ऑफ सदर्न कॅलिफोर्नियाने डी.लिट. या पदवीने त्यांना सन्मानित केलं. युनेस्कोने तर त्यांना जागतिक रंगभूमीचे राजदूत म्हणून निवडलं.

हेही वाचा: स्मिताने नव्या नवरीसारखं नटून घेतला जगाचा निरोप