अनंत दीक्षित: मी अनुभवलेला पहिला संपादक जशाचा तसा

११ मार्च २०२०

वाचन वेळ : ६ मिनिटं


ज्येष्ठ संपादक अनंत दीक्षित यांचं ९ मार्च २०२० ला संध्याकाळी पुण्यात निधन झालं. राज्याच्या बहुसंख्य भागात धुळवडीमुळे पेपर बंद असल्यामुळे त्यांच्या निधनाची बातमी लगेच छापूनही आली नाही. पण सोशल मीडियावर अनेकजण व्यक्त झाले. त्यातून त्यांचे अनेक पैलू समोर आले. पण त्यापेक्षाही वेगळ्या दीक्षितांची ओळख करून देणारा हा लेख.

अनंत दीक्षित. खरं म्हणजे संपादक अनंत भगवान दीक्षित हीच त्यांची प्रेसलाईनमधून महाराष्ट्राला दीर्घकाळ परिचित असलेली ओळख. त्यांनी संचार, केसरी, सकाळ, लोकमत अशा अनेक दैनिकांमधे पत्रकार ते संपादक म्हणून काम केले. पण त्यांचा सर्वाधिक काळ सकाळमधे गेला. त्यातही कोल्हापूर सकाळचे संपादक म्हणून सलग दहा-पंधरा वर्ष काम करण्याची संधी त्यांना मिळाली. ते पुणे सकाळचे संपादक झाले तरी मनाने कोल्हापूरकरच राहिले.

दीक्षित हे केबिनमधे बसून काम करणारे संपादक नव्हते. त्यांचा सार्वजनिक जीवनात सदैव वावर असायचा. वेगवेगळ्या व्यक्ती, संस्था, नेते, संघटनांचे कार्यकर्ते यांच्याशी त्यांचा सतत संपर्क असायचा. मुळात त्यांचं वक्तृत्व अत्यंत प्रभावी होते. पत्रकारितेच्या वाटचालीत माझ्या वाट्याला आलेले ते पहिले संपादक.

हेही वाचाः गोविंद पानसरे: डोंगराला भिडणारा म्हातारा

माणूस आणि संपादक वेगवेगळे

अनंत दीक्षित हे सर्वगुणसंपन्न संपादक नव्हते. तसा कोणताही माणूस सर्वगुणसंपन्न नसतोच. दीक्षितांचा विचार माणूस आणि संपादक अशा दोन्ही पातळ्यांवर व्हायला हवा.

माझा आणि दीक्षितांचा पहिला सामना शिवाजी युनिवर्सिटीत झाला. घरी रिकामं बसून दिवस काढण्यापेक्षा पत्रकारितेचा अभ्यास केलेला बरा म्हणून मी साधारणपणे १९९०-९१ला बीजेसीला प्रवेश घेतला. दीक्षित मोटारीतून पत्रकारितेची लेक्चर घ्यायला यायचे. ते शिकवण्यापेक्षा लिहूनच जास्त द्यायचे.

त्यावेळी कोल्हापूरच्या सकाळमधे उपसंपादकाची जागा निघाली होती. अर्ज केल्यावर लेखी परीक्षा झाली. त्यात भाषांतर करायला सांगितलं. माझ्या वाट्याला आलेली कॉपी दक्षिण आफ्रिकेतल्या वर्णद्वेषाच्या संदर्भातली होती. बी.ए. इंग्रजी होतो. तरी त्यातलं काहीच कळत नव्हतं. अंदाजानं ठोकून लिहलं. मुलाखतीला दीक्षितांनी केबिनमधे बोलावून घेतलं. आत गेलो. खुर्चीवर बसलो. त्यांनी भाषांतराची कॉपी पाहिली. म्हणाले, काहीच येत नाही भाषांतर. सगळं चुकीचं केलं. जावा. फाईलमधली नाटक, साहित्य आणि कवितेला मिळालेल्या बक्षिसांची, पेपरात छापून आलेल्या कथांची कात्रणं त्यांना दाखवायचीच राहून गेली.

काही महिन्यांनी पुणे सकाळमधे प्रशिक्षणार्थी पत्रकार, उपसंपादक पाहिजे अशी जाहिरात आली. त्यालाही अर्ज केला. लेखी परीक्षा झाल्यावर मुलाखतीसाठी निवड झाली. त्यावेळी मुलाखतीला संपादक विजय कुवळेकर होते. त्यांनी खोचकपणे काही प्रश्न विचारले. पण मुलाखत मोकळेपणाने झाली. तुम्ही कोल्हापूर सकाळमधे जॉईन व्हा. मी दीक्षितांशी बोलतो. तुम्ही त्यांना जाऊन भेटा, असं त्यांनी मला सांगितलं. दीक्षितांना भेटलो. निरोप देऊन कळवतो, असं सांगून त्यांनी पिटाळलं.

हेही वाचा : रा. ना. : महाराष्ट्राच्या इतिहासाचा संगणक

दीक्षितांचा फोन म्हणजे धडकीच

काही महिने गेले तरी कोल्हापूर सकाळमधून निरोप आला नाही. विजय चोरमारे हा मित्र तेव्हा सकाळमधे काम करत होता. राज्य नाट्य स्पर्धेतल्या नाटकांचं परीक्षण त्यावर्षी विजयकडे होतं. स्पर्धा सुरू असतानाच रत्नागिरीचं साहित्य संमेलन कवर करण्यासाठी विजयला जावं लागलं. नाटकांचं परीक्षण लिहिण्याची जबाबदारी त्यानं माझ्यावर टाकली. माझ्या नावावर सकाळमधे रोज परीक्षणं छापून येत होती. त्यानंतर विजयबरोबर दीक्षितांनी भेटायला येण्याचा निरोप पाठवला. भेटल्यावर पाचशे रुपये पगारावर माझी नेमणूक करून घेतली.

दशरथ पारेकर हे तेव्हा सहाय्यक संपादक होते. डेस्कवर दिलीप लोंढे, सुधीर कुलकर्णी, संजय पाटोळे, शिवाजी पाटील, आदिनाथ चव्हाण, शीतल महाजनी असे अनुभवी लोक होते. डेस्कवरचं वातावरण मोकळं होते. पण दीक्षितांबद्दल मनात एक प्रकारची दहशतच बसलेली. त्यांनी आत बोलावलं की प्रचंड दडपण वाटायचं. त्यांचा फोन आला तरी घशाला कोरड पडल्यासारखी व्हायची. एकदा तर दोन तास त्यांनी केबिनमधे नुसतं बसवून ठेवलं होतं. रोज लिहलेल्या कॉपीतल्या चुका काढून खरडपट्टी व्हायची.

रोज रात्री दीक्षितांचा फोन यायचा. त्यांना सगळ्या बातम्यांची माहिती द्यावी लागे. फोन करण्याचा वेळ आणि रिंगचा आवाज यावरून आम्ही त्यांचा फोन ओळखावा अशी त्यांची अपेक्षा असे. ते फक्त हॅलो म्हणायचे. फोन घेणाऱ्यानं प्रतिसाद दिला नाही तर ‘दीक्षित बोलतोय’ एवढंच म्हणायचे. हा फोन किती वेळ चालेल ते सांगता यायचं नाही.

हेही वाचा : ‘थप्पड’च्या आरशात दिसणारा पुरुष आपण पाहिलंय का?

ऑफिसबाहेरही वचक कायम

दिवस जात होते. काम सरावाचं व्हायला लागलं. दोन अडीच वर्ष गेली आणि पर्मनण्टची ऑर्डर मिळाली. तेव्हा आमचा बेसिक पगार शिपायासारखा होता. पण आम्हाला ते माहीत नव्हतं. ऑर्डर देताना दीक्षित म्हणाले, ‘तुमचं काम काही समाधानकारक नाही. पण एक माणुसकी म्हणून आम्ही तुम्हाला मदत करतोय.’ काम करत गेलो. मेमो मिळत गेले. हळूहळू सुधारणा होत गेली. आत्मविश्वासानं काम करतो हे लक्षात आल्यावर दीक्षितांनी वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सोपवायला सुरवात केली. साहित्य, नाट्य संमेलनाच्या कवरेजला पाठवलं. निवडणुकीच्या काळात विशेष वृत्तांकनासाठी पाठवलं.

दीक्षित संपादक होते तो काळ आजच्यापेक्षा नक्कीच वेगळा होता. कंपनीतल्या मॅनेजरपेक्षा संपादकाच्या शब्दाला किंमत होती. जाहिरात किंवा वितरणचे लोकही संपादकाच्या केबिनमधे शिरताना नम्रपणे जायचे. आता कोणती बातमी कुठे, कशी लावायची हे जाहिरात किंवा वितरण मॅनेजर सांगतात. तशी परिस्थिती दीक्षितांच्या काळात नव्हती. बातमी, बातमीचं मूल्य, तिचं लेखन यावर चर्चा, वाद व्हायचे. त्यात संपादकाचा शब्द अंतिम असायचा.

ऑफिसमधेच नाही तर समाजातही संपादक म्हणून दीक्षितांची स्वतःची ओळख होती. कोल्हापूर, सांगली, सातारा, बेळगाव, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कार्यक्षेत्रातल्या बहुतेक गावातून दीक्षितांची व्याख्यानं व्हायची. व्याख्यानांचं वेगळं मानधन मिळायचं. ही व्याख्यानं मॅनेज करण्याचं काम त्या भागातले बातमीदारच बहुतेकवेळा करायचे.

दैनिकाचा संपादक ही एक सत्ता असते. संपादक हा लेखक विचारवंत असतो. तो महत्त्वाकांक्षी आणि राजकीय डावपेचांमधे तज्ञ असावा लागतो. दीक्षित त्यात पुरेपूर पटाईत होते. ऑफिसमधील सहकाऱ्यांवर त्यांचा वचक होता. तसा तो कोल्हापूरच्या विविध क्षेत्रातही होता. त्यांचे चाहतेही होते.

खोडकर, खट्याळ आणि चालूबाज

बोलणारे किंवा लिहिणारे असे संपादकांचे दोन वर्ग असतात. दोन्ही गोष्टी जमणारे संपादक फार कमी असतात. दीक्षित बोलणारे संपादक होते. गोविंद तळवळकर, अरुण टिकेकर त्यांच्यासारखे अभ्यासपूर्ण लेखन त्यांच्या हातून झाले नाही. पण त्यांनी समाजातल्या अनेकांना लिहितं केलं. अभिनेते चंद्रकांत, गणपत पाटील, त्यागराज पेंढारकर, शाहीर पिराजीराव सरनाईक यांची आत्मचरित्रं समाजापुढे आली ती दीक्षितांमुळेच!

नसीमा हुजरूक यांच्या ‘हेल्पर्स ऑफ द हॅण्डिकॅप्ड’ अशा सामाजिक संस्थांना त्यांनी समाजातून मदत गोळा करून दिली. अशा काही संस्था उभा करण्याची ताकद त्यांच्याकडे होती. संपादक, पत्रकार म्हणून काम करणारे लोक खोडकर, खट्याळ तसंच चांगल्या अर्थानं चालूबाज असावे लागतात. तसे दीक्षित नक्कीच होते. जवळच्या लोकांशी बोलताना किंवा चर्चा करताना याचा अनुभव यायचा. एखाद्याचं समर्थन करायचं असेल तर ते शेवटपर्यंत त्या माणसाच्या किंवा पत्रकाराच्या पाठीशी उभं राहायचे.

हेही वाचा : अरुण सरनाईक: शोकांत नायकाचा सगळ्यांना विसर

एकाचवेळी मेमो आणि कौतुकाचं पत्र

वृत्तपत्रात काम करताना वास्तव परिस्थितीचे भान सदैव असावे लागते. आम्हाला कमी चारा खाणारी जास्त दूध देणारी आखूड शिंगी म्हैस हवी असते. आपली भूमिका म्हणजे एकपात्री तमाशासारखी आहे. रंगमंचावर एकट्यानंच गायचं, नाचायचं आणि मधेच विंगेत जाऊन वाजवायचं, असं काम आपल्याला करावं लागतं. तसंच जिथं आपण जाऊ तिथं तसं वागलं पाहिजे, उदा. आरपीआयच्या मेळाव्यात गेलं त्यांच्यासारखं, संघाच्या शाखेत गेलं किंवा कॉंग्रेसवाल्यांच्या मेळाव्यात गेलं तर त्यांचसारखं वागता आलं पाहिजे. अशी काही त्यांची वाक्यं लक्षात राहिलीत.

कोल्हापूरमधे त्यांचे जिव्हाळ्याचे अनेक मित्र होते. कॉम्रेड गोविंद पानसरे यांचा मुलगा अविनाशचं निधन झाल्यावर ते रात्रीतून कोल्हापूरमधे आले होते. चांगली बातमी, चांगला लेख, अग्रलेख किंवा बातमीचं चांगलं हेडिंग याला दाद देण्याइतका मोकळेपणा त्यांच्याकडे होता. टेबलावर आल्यावर त्यांचे चुकांबद्दलचे मेमो मिळाले तसंच लेख वाचून अभिनंदनाचं पत्रही मिळालं. वाईट आणि चांगलं अशा दोन्ही प्रसंगात आपल्या माणसांसोबत असलं पाहिजे अशी त्यांची भावना होती. मात्र जवळची माणसं कोणती हे निवडण्याची त्यांची वेगळी पद्धत होती.

मी घराघरात पोचलेला संपादक

अनेकदा त्यांची व्यक्तिगत मतं एकांगी किंवा पूर्वग्रहदूषित वाटायची. स्वतःबद्दलही त्यांचे काही गैरसमज असावेत, अशी शक्यता वाटते. महाराष्ट्रात घराघरात पोचलेला मी एकमेव संपादक आहे, असं ते एकदा मला म्हणाले होते. तेव्हा ते पुणे सकाळचे संपादक होते. आणि सकाळ अजून विदर्भात सुरू व्हायचा होता.

दीक्षित कोल्हापूरमधे संपादक होते तेव्हा सकाळ आणि पुढारी यांच्यामधली स्पर्धा टोकाला पोचली नव्हती. सकाळच्या तुलनेत पुढारी आक्रमकपणे वाढत होता. अनेक प्रसंगात सकाळचं कातडी बचाव धोरण दिसायचं. अर्थात हा दोष सदैव दीक्षितांचा नसावा. पुणे हे सगळ्या धोरणांचं केंद्र होतं. तिथे धोरणं ठरायचं. त्याची अंमलबजावणी कोल्हापूरमधे व्हायची. बाबरी मशीद पाडल्यानंतर मराठीतल्या बहुतेक पेपरांचं हेडिंग होतं ‘बाबरी मशीद जमीनदोस्त’ पण सकाळचं हेडिंग होतं ‘वादग्रस्त वास्तू जमीनदोस्त.’ त्याचप्रमाणे गणपती दूध पिण्याची अफवा हे इतरांचं हेडिंग होतं. तर सकाळचं हेडिंग होतं, `थक्क करणारे अफवेचे आव्हान`.

कोल्हापूर ते ऑस्करः भानू अथैय्या यांचा आज ९० वा वाढदिवस

कोल्हापुरातच राहिलो असतो तर 

कोणत्याही दैनिकात संपादकीय, जाहिरात आणि व्यवस्थापक त्यांच्यात मतभेदाचे, वादाचे प्रसंग निर्माण होत असतातच. अशावेळी संपादकीय बाजू कौशल्याने सांभाळणं संपादकाला गरजेचं असतं. अशा परिस्थितीत विषयाला कलाटणी देऊन बाजू पलटवण्यात किंवा वादगस्त विषय पुढे येणारच नाही याची दक्षता दीक्षित अगोदरच घ्यायचे. संघटनांशी संबंधित सभा, समारंभातून आपल्या उपस्थितीची दखल घेण्याइतपत ते स्वतःच्या प्रतिमेची काळजी घ्यायचे.

सकाळमधल्या काही घडामोडीतून ते पुणे सकाळचे संपादक झाले. पण तिथे ते मनापासून रमले नसावेत. आपण पुण्याऐवजी कोल्हापूरमधे राहिलो असतो तर बरं झालं असतं, अशी खंत ते शेवटच्या काळात व्यक्त करायचे. वर्षभरापूर्वी ज्येष्ठ पत्रकार सोपान पाटील आजारी पडले. त्यांचं ऑपरेशन झालं आणि नंतर ते निधन पावले. या काळात दीक्षित वारंवार फोन करून त्यांची चौकशी करत. कसेही असलो तरी आपण जुन्या सहकाऱ्यांच्या संपर्कात राहिलं पाहिजे, असं ते म्हणायचे.

हेही वाचा : शाहू महाराजांनी खरंच ब्रिटिशांना मदत केली होती?

शरीर खचलं तसं मनही

मध्यंतरी एका कार्यक्रमासाठी ते कोल्हापूरमधे आले होते. तेव्हा वरवर भेट झाली. मात्र ते पुण्याला परतत असताना त्यांचा मोबाईलवर कॉल आला. पाऊण तास ते अखंड बोलत राहिले. पूर्वी वागले त्याविषयीची खंत त्यांच्या मनात कुठेतरी असावी. बोलण्यातून तसं जाणवत होतं. मात्र संपादक झाल्यावर जबाबदारी असते, कोणत्या ताणतणावातून जावं लागतं, मॅनेजमेंटचा भाग म्हणून काही कटू निर्णय घ्यावे लागतात, याचा मला अनुभव आहे, असं मी त्यांच्या समाधानासाठी म्हणालो.

ज्या परिस्थितीत आणि प्रकारे त्यांना सकाळमधून बाहेर पडावं लागलं त्याबद्दलही त्यांच्या मनात कुठेतरी सल असावी. दोन्ही किडन्या निकामी झाल्याने ते अनेक वर्ष डायलेसिसवर होते. शरीर खचलं तसं मनानंही ते दुबळे झाले असावेत. औषधोपचारामुळे आर्थिक ताण वाढले. सामाजिक संस्थांच्या मदतीसाठी पुढाकार घेणाऱ्या दीक्षितांना स्वतःसाठी इतरांकडून मदत घेण्याची वेळ आल्याचं त्यांना वाईट वाटत असणारच.

वर्षभरापूर्वी त्यांच्या एका मुलीचं निधन झालं. उमेदीच्या वयात सार्वजनिक व्यासपीठावर श्रोत्यांना खिळवून ठेवणारा हा संपादक वृद्धापकाळात एकटा पडावा, हे वाईटच. त्यांना श्रद्धांजली!

हेही वाचा : 

५० वर्षांपूर्वी २०० शोध लावणारे, भारताचे एडिसन शंकर आबाजी भिसे

एन. डी. पाटील यांचं जीवन, सामाजिक संघर्षाचं एक धगधगतं अग्नीकुंडच

शाहू महाराजांनी शंभर वर्षांपूर्वी भाषणातून दिला पुरोगामी राष्ट्रवादाचा धडा

शिवाजी विद्यापीठाचं नाव बदलण्यावर यशवंतराव चव्हाण काय म्हणाले होते?

सत्यशोधक शामराव देसाईंनी बंद केलेल्या लक्ष्मीच्या जत्रा पुन्हा सुरू का होताहेत?

भाई माधवराव बागलः कोल्हापुरात उभारला आंबेडकरांचा देशातला पहिला पुतळा

(लेखक ज्येष्ठ पत्रकार, कवी आणि नाटककार आहेत. )