तळझिरा: ओलसर आठवणींचा ठेवा

१० जानेवारी २०२२

वाचन वेळ : ६ मिनिटं


विद्या बयास-ठाकूर यांचा 'तळझिरा' हा लेखसंग्रह नांदेडच्या इसाप प्रकाशननं प्रकाशित केलाय. यात गावातल्या विहीरीभोवतालच्या जीवनापासून ते आत्महत्येपर्यंत लिहिलेल्या लेखांचा समावेश केलेला आहे. आठवणी केवळ स्मृतिरंजनाचं काम करत नाहीत. त्या व्यक्तिगत आणि आपलं सामाजिक जीवन यात होत असलेल्या स्थित्यंतराचं आकलन करून घेण्याची एक संधी देतात. यातूनच या ललित गद्यलेखनाला आकार प्राप्त झालाय.

व्यवसायाने इंजिनियर असलेल्या एका तरुणाने पुण्यात आपल्या आईची हत्या केली आणि त्यानंतर स्वत: आत्महत्या केली. मन हेलावून टाकणारी ही घटना आहे. पण अशी घटना तशी अगदीच दुर्मिळ आहे, असंही अगदी नाही. अलीकडे आत्महत्येचं प्रमाण बरंच वाढलंय.

आयुष्यात एक वेळ अशीही येऊ शकते की, संघर्षात जगण्याच्या सगळ्या शक्यता नष्ट होतात. आशेची किरणं विरून जातात. कधीकाळी स्वागतशील असलेली दारं अनपेक्षितपणे बंद होतात. मदतीचे आश्वासक वाटावेत असे हात अचानकपणे आखडून घेतले जातात. अशावेळी, माणसं आत्महत्या करायला प्रवृत्त होतात.

अलीकडे आत्महत्या करणार्‍यांचं प्रमाण वाढत चाललंय. त्यातून समकालीन मानवी जीवनातलं शोषण, वंचना, अगतिकता आणि परात्मता यांचा प्रत्यय येतो. अशा आत्महत्याग्रस्त समाजाला आत्महत्येपासून कसं वाचवता येईल, हा प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहे. यासंदर्भात साहित्याची भूमिका काय असू शकते, हा प्रश्नही अलीकडे जवळपास अनुत्तरीत आहे.

समुपदेशनाची कोरडी आणि यांत्रिक मात्राही फारशी उपयोगाची  पडताना दिसत नाही, हेही अगदीच स्पष्ट दिसतंय. विशेषत: ललित साहित्य काय करू शकतं, याचा प्रत्यय विद्या बयास-ठाकूर यांचा नुकताच प्रसिद्ध झालेल्या ‘तळझिरा’ या ललित गद्यलेखनातल्या शेवटच्या लेखातून दिसून येतं. आत्महत्या करु पाहणाऱ्या एका व्यक्तीला न्यूज पेपरमधे वाचलेला ‘अल्पविराम’ हा लेख मनाला उभारी देतो.

हेही वाचा: या तीन लेखिका जग गाजवत आहेत

सिनेसृष्टीतल्या एका तरुण व्यक्तीच्या आत्महत्येवर लिहिलेल्या लेखाला ज्या प्रतिक्रिया आल्या त्यातून एखादा ललित लेख हा माणसाला जगण्याची नवी उमेद कशी देऊन जातो, याचा प्रत्यय येतो. तसं पाहिलं तर ललितलेखन हे काहीतरी मनस्वी आनंदासाठी, हौसेखातर आणि कल्पनेच्या भराऱ्या घेत अलवारपणे केलं जाणारं लेखन असतं, असं साधारणपणे समजलं जातं. ललितलेखन आनंदाशिवाय आपल्याला विचारप्रवृत्त करू शकतं आणि जगण्याची नवी उमेदही देऊ शकतं, याची प्रचिती या ललित लेखसंग्रहातून मिळते.

साधारणपणे, गतस्मृतींना उजाळा देणं, असं स्वरूप जरी 'तळझिरा' लेखसंग्रहाचं असलं तरी इतिहासाकडे पाहताना एक प्रकारची स्वअर्जित अंतर्दृष्टी ही लेखिकेच्या लेखनातून दृग्गोचर होते, यांचा अनुभव वाचकांना येतो. हा लेखसंग्रह लेखिकेच्या खासगी अनुभवांवर तोलला गेलेला आहे. खरं म्हणजे, तल्लख स्मृति आणि ती अभिव्यक्त करण्यासाठी सर्जक अशी शब्दकळा यांच्या आधारे लेखिकेने हे अनुभव तोलून धरलेले आहेत.

काळ झरझर पुढे जातो. मानवी आयुष्यातल्या सगळ्या बऱ्यावाईट घटना कालौघात  इतिहासाच्या पोटात स्थिरावतात. जीवन सदोदित अनित्य असतं. या सततच्या संक्रमणप्रक्रियेत आपल्या समाजातल्या जगण्याच्या बऱ्यावाईट रितीभाती, दीर्घकाळ स्थिरावलेल्या सामाजिक संस्था, माणसांनी निगुतीने जपलेले नातेसंबंध यामधेही बदल होत जातो. या बदलातले काही बिंदू मग व्यक्तींच्या आठवणी म्हणून टिकून राहतात.

समाजातला बदल व्यक्ती म्हणून आपल्या नियंत्रणात असतो हे जसं खरं आहे; तसाच तो समाजातल्या प्रबळ शक्तींच्या नियंत्रणात असतो, हेसुद्धा नाकारता येत नाही. अशावेळी, व्यक्ती हतबल असतात. आपल्या हातातून काळ आणि जुन्या जगण्याच्या रितीभाती, परंपरा निसटून जात आहेत, या भावनेतून एक आगळीच परात्मता त्या व्यक्तीला अनुभवायला मिळते आणि मग मनाची जीवघेणी घालमेल सुरू होते. आपण काहीतरी गमावलंय ही एक तीव्र संवेदना संपूर्ण मन व्यापून टाकतं तेव्हा तो क्षण निर्मितीचा ठरतो. बऱ्याचशा कलाकृतींच्या मुळाशी अशा अस्वस्थ संवेदनेचा क्षण कारणीभूत आहे.

हेही वाचा: लेखक कवींनो, कळपात नका राहू, माणसांत मिसळा

विशेषतः बालपण सोडून शहरांमधे स्थिर झालेल्या एखाद्या लेखिकेच्या जीवनात अनेक प्रकारची स्थित्यंतरं येत असतात. एकतर, बाल्यावस्था संपलेली असते, लग्नामुळे माहेर तुटलेलं असतं आणि ग्रामीण भागात शहराकडे झालेला प्रवास हा एका अस्थिरतेकडे आणि कृत्रिमतीकडे नेणारा असतो. अशावेळी, आठवणी केवळ स्मृतिरंजनाचं काम करत नाहीत; तर त्या आपल्याला स्वतःचं व्यक्तिगत जीवन आणि आपलं सामाजिक जीवन यात होत असलेल्या स्थित्यंतराचं आकलन करून घेण्याची एक संधी बहाल करतात. यातूनच या ललित गद्यलेखनाला आकार प्राप्त झाला.

ललितलेखन करण्यासाठी विचक्षण दृष्टी आवश्यक असते; पण ती पुरेशी नसते. तर, त्यासोबतच आपल्या जगण्यातला अंतर्विरोध, अनुभवांमधे सुखावणाऱ्या दुखऱ्या क्षणांचं खोलवरचं मुरलेपण आणि स्वत:च्या दृष्टिकोणाचं विशिष्टत्व न सोडता अविशिष्ट अशा अनुभवांचं विशिष्टीकरणाची हतोटी लेखिकेकडे हवी असते. असं सामान्य जीवनातलं असामान्यत्व टिपण्याची क्षमता विद्या बयास-ठाकूर यांच्याकडे निश्चितच आहे.

'तळझिरा' या लेखसंग्रहात एकूण अठरा लेख आहेत. या लेखांमधे गावातल्या विहीरीभोवतालच्या जीवनापासून तर आत्महत्या या विषयावर लिहिलेल्या लेखांचा समावेश केलेला आहे. या पुस्तकाचा सार ‘गाव हरवलं आहे...!’ या लेखात आलेला आहे. आधुनिक भांडवलदारी समाजात शहरांसह खेडीही आमूलाग्र बदलली. या बदलामुळे  लेखिका अस्वस्थ होते. यांचं गावाबद्दलचं आकलन हे ‘स्वच्छंदतावादी’ आहे. खेड्यातलं वैभव, आनंद संपला आणि शहरी जीवनातील वरपांगीपणा खेड्यांनी मनोमन स्वीकारला, अशी त्यांची तक्रार आहे. त्यांना पूर्वीच्या खेड्यात ‘सामाजिक एकोपा’ दिसतो. त्यांचं हे आकलन स्मृतिरंजनवादी ग्रामीण साहित्य या वाड्.मयप्रकारात मोडतं.

खेड्यांचं हे संक्रमण सामंती व्यवस्थेकडून भांडवलदारी समाजाकडे होतं. नव्या भांडवलदारी व्यवस्थेने तिच्या हिताला अनुकूल नसलेल्या संस्था मोडीत काढल्या. गावातल्या मंदिराची भूमिका सामंती व्यवस्थेला सांस्कृतिक मान्यता मिळवून देणं ही होती. नव्या भांडवलदारी समाजाने स्वत:च्या मान्यतेचा प्रश्न सोडवण्यासाठी मंदिरांपेक्षा भिन्न आणि अधिक प्रभावी सांस्कृतिक संस्थांना जन्माला घातलेलं आहे.

हेही वाचा: सिमोन द बोव्हुआर: महिलांनो, आपण हिचं फार मोठं देणं लागतो!

लेखिकेचं आकलन असं नसलं तरी त्यांनी बदललेल्या परिस्थितीचं वर्णन केलंय: 'गावातली मंदिरं हे त्या गावचं मोठंच सांस्कृतिक वैभव होतं. नित्यनेमानं  तिथं भजन, कीर्तन, धर्मग्रंथांची पारायण होत. अनेक पिढ्यांची मानसिक जडणघडण या धार्मिक कार्यक्रमांच्या माध्यमातून झालेली आहे.' लेखिकेचं हे आकलन अगदीच स्वीकारार्ह नसलं तरी त्यांच्या नजरेतून गावाचं संक्रमण सुटलेलं नाही. 'गावात दिसणारे हे बदल निव्वळ वरवरचे आहेत.' हे त्यांचं मत अगदीच अग्राह्य आहे, असंही नाही.

आधुनिक काळात भारतीय गावातल्या विकासातून निर्माण झालेली नवी विषमता आणि वंचना यांचा वेध जगभरातल्या अभ्यासकांनी घेतलेला आहे. अतिविशाल अभ्यासप्रकल्पांतून जे निष्कर्ष अभ्यासकांनी काढलेत काहीसे तसेच निष्कर्ष बयास-ठाकूर यांनी स्वत:च्या गावाच्या निरीक्षणातून काढले आहेत.

'रोजगार मिळवण्यासाठी, चांगल्या शैक्षणिक सुविधांसाठी जवळपासच्या गावांवर अवलंबून रहावं लागतं. अवर्षणाने मोडून पडलेला शेतकरी, बेरोजगरीने त्रस्त तरुणाई, शैक्षणिक सुविधांच्या अभावंत पायाच कमकुवत राहून जाट असलेलं बालपण असं काहीसं निराशाजनक चित्र खेड्यात पहायला मिळतं.' हे त्यांनी त्यांच्या गावाचं केलेलं वर्णन भारतीय खेड्यांचं प्रातिनिधिक चित्रण ठरावं असं आहे.

विद्या बयास-ठाकूर यांचा हा लेखसंग्रह प्रसिद्ध करण्यामागचा हेतू वाचकांचं मनोरंजन करणं हा नाही. लेखनात उपरोधाचे टोकदार वार न करता आणि समाजसमीक्षेचे कोरडे रतीब न घालता त्या वाचकांना विचार करायला प्रवृत्त करतात. त्यांनी निवडलेले प्रसंग तसे पाहू जाता दैनंदिन जीवनातले सामान्य भासणारे प्रसंग असले तरी त्या प्रसंगांतून त्यांनी ‘बदल’ हा अनुभव शब्दबद्ध केला आहे.

हेही वाचा: बाहेरच्या झगमगाटात काळजात कँडल पेटवते ग्लुकची कविता

विलक्षण वेगाने बदलत जाणाऱ्या समाजातल्या स्त्रियांच्या जगण्यातले ताणेबाणे लेखिकेच्या नजरेतून सुटले असते तरच नवल! लेखसंग्रहातल्या अनेक लेखांमधे लेखिकेने हे ताणेबाणे टिपले आहेत. ‘जावे त्याच्या वंशा’ यासारख्या लेखातली भाषा आणि युक्तिवादाचा पोत तर लेखिकेला अगदी ताराबाई शिंदेंच्या जवळ घेऊन जातो.

‘प्लॅटफॉर्म’ हा लेख भाषेची नजाकतता सांभाळत विविध आर्थिक स्तरांमधे विभागलेल्या स्त्रियांच्या आयुष्यातल्या आईपणाची सामायिकता चित्तारतो.  ‘बाबा बदलतोय’ या लेखात पुरुषांमधे बदललेली संवेदना शब्दबद्ध करण्यात आलेली आहे. ‘बंदा रुपया’ आणि  ‘नवा जिवलग’ यांसारखे लेख या संग्रहात फारसे प्रस्तुत नसले तरी ते वाचताना मनात कल्लोळ उठत राहतोच.

लेखांच्यामधे काहीवेळा लेखिकेने स्वत:ची म्हणून पेरलेली मतं ललितलेखनाच्या अंगभूत रचनेशी विसंगत वाटतात. तरीही वेगाने बदलत जाणाऱ्या समकालीन जीवनाचा वेध घेणं सोपं नाही. ललितलेखनासारखा कोमल वाड्.मयप्रकार यासाठी हाताळण्यात लेखिकेला यश आलेलं आहे, असं नक्कीच म्हणता येतं.

पुस्तक - तळझिरा
लेखिका - विद्या बयास-ठाकूर
प्रकाशन - इसाप प्रकाशन, नांदेड
किंमत - १८०

हेही वाचा: 

जे बोललो तेच लिहित गेलो: अनिल अवचट

तरुण संपादकांनी संपादित केलेले दिवाळी अंक

तंत्रज्ञानाच्या युगात अश्मयुगातल्या मानवी मेंदूचं काय होणार?

मराठीतलं ऐतिहासिक ललित लेखन म्हणजे फॅन फिक्शन: नंदा खरे

संमेलनाध्यक्ष फादर दिब्रिटोंच्या भाषणाचं सारः लेखक हुजऱ्या नसतो

(लेखक नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात इंग्रजी शिकवतात)