विद्या सिन्हाचं मन सुंदर होतं म्हणून ती सुंदर होती

१९ ऑगस्ट २०१९

वाचन वेळ : ५ मिनिटं


हिंदी सिनेमातल्या ज्येष्ठ कलाकार विद्या सिन्हा यांचं गेल्या आठवड्यात निधन झालं. घरातूनच सिनेमाचा वारसा मिळालेल्या विद्या सिन्हांनी सिनेसृष्टी गाजवली. ७० वर्षांच्या सिन्हा यांनी २०११ मधे शेवटचा सिनेमा केला. त्यांच्या कारकिर्दीवर प्रकाश टाकणारा हा लेख.

गोड, सोज्वळ चेहऱ्याची, प्रसन्न स्मित राखणारी विद्या सिन्हा सर्वांच्या लक्षात राहणार आहे. बरोबर १५ ऑगस्टला हा चेहरा निर्जीव झाला. ७० वर्षाची विद्या अलीकडे आजारी होती. तीनेक महिन्यांपूर्वी ती कुल्फीकुमार बाजेवाला नावाच्या टीवी सिरियलमधे दिसत होती. पण श्वसनाचा वारंवार त्रास होऊ लागला आणि तिचं काम थांबलं.

साधी, सोज्वळ विद्या

खरं तर मनानेही ती चांगली, दिसायलाही सुंदर. पण खासगी जीवनात तिला बरेच वाईट अनुभव आले. कदाचित त्यामुळे तिचा जीवन प्रवास लांबला नसावा. हिंदी सिनेसृष्टीतली ती एकेकाळची आघाडीच्या अॅक्ट्रेसपैकी एक होती. जेमतेम तिचे तीसेक सिनेमे आले असतील. पण त्यातले बरेच लक्षात राहण्यासारखे होते.

ती सिनेसृष्टीत आली तेव्हा समांतर सिनेमा निर्मितीचा काळ सुरु होता. मात्र १९६५ मधे शोले आला आणि हिंदी सिनेमाचे स्वरूपच बदलले. मात्र तरी सुद्धा साध्या, सोज्वळ पडद्यावर दिसणाऱ्या नायिका सपशेल लुप्त झाल्या नाहीत. विद्या सिन्हा, त्याआधीची जया भादुरी, झरिना वहाब, शबाना आझमी आणि दीप्ती नवल, स्मिता पाटील यांनी ग्लॅमरस नायिका होऊन शोभेच्या वस्तू म्हणून राहणं टाळलं. त्यांच्यामुळे काही दर्जेदार आणि अभिजात म्हणता येतील असे हिंदी सिनेमे आले.

विद्याची अॅक्टिंग असलेला राजाकाका हा पहिलाच सिनेमा सुमार होता. यात किरणकुमार हिरो होता. तरी तिला शोधणारे होते बसू चटर्जी. त्यांचा रजनीगंधा हा तिला मिळालेला पहिला सिनेमा होता. तिच्या घरचं वातावरण सिनेमामय होतं. वडील प्रताप राणा हे एक कलाकार होते. आईचे वडील बडे निर्माता मोहन सिन्हा. त्यामुळे ती मॉडेलिंग करायला लागली तेव्हा तिला कुणी अडवलं नाही.

डायरेक्टर्स अॅक्ट्रेस

ती १८ वर्षांची होती. तिला बऱ्याच जाहिराती मिळाल्या. यातली कुठली तरी जाहिरात बासूदांना भावली आणि त्यांनी तिला नायिकेवर कथा असलेला रजनीगंधा दिला. हा सिनेमा मारधाड किंवा नाचगाणी, हिरो हिरोईनचा रोमान्स, विलनची लुडबुड या नेहमीच्या पठडीतला नव्हता. वास्तवाचं भान ठेऊन मध्यमवर्गीय तरुणीची दोन तरुणांच्या सहवासात होणारी घालमेल अशा कथानकावर हा सिनेमा होता.

अमोल पालेकर आणि दिनेश ठाकूर या मराठी आणि हिंदी नाट्यसृष्टीतल्या दोन जबर कलाकारांसमोर विद्याला पदार्पण करायचं होतं. पण ती बुजली नाही. याचं कारण बासुदा. ती नंतर नेहमीच डायरेक्टर्स अॅक्ट्रेस राहिली. कधी नखरे करून, पटकथेत बदल करून, प्रेमप्रकरण करून स्वतःकडे लक्ष वेधण्याचा तिने कधीच प्रयत्न केला नाही.

हेही वाचाः खरोखरचा फुन्सुक वांगडू सांगतोय, लडाखमधे बाहेरचे लोक नकोतच

तरुणींमधे ‘विद्या लुक’ इफेक्ट

१९७६ मधे तिचा छोटीसी बात आला. बासूदांनी हलका फुलका विषय छान रंगवला होता. बावळट वाटावा असा नायक आणि ऑफिसला जाणारी नायिका याचं बसस्टॉपवर जुळणारं प्रेम यात रंगवलं गेलं होतं. यातली सलील चौधरींची गाणीही हिट झाली आणि सिनेमाही. त्यावेळेस ऑफिसला जाणाऱ्या तरुणींची संख्या हळूहळू वाढत होती आणि त्यांच्यासाठी विद्या सिन्हाचा एकूण लुक आदर्श ठरला होता.

कानात थोडे मोठे इअरिग्ज, छोटा पदर असलेली साडी, डोळ्याला काजळ, कोरलेल्या भुवया आणि खांदयावर लटकवायची पर्स या विद्याच्या लुकची कॉपी अनेकजणी करत होत्या. विशेष म्हणजे बहुतेक सिनेमांतून विद्या साडीमधेच अधिक दिसली. तिला बड्या बड्या अॅक्टरसोबत एक्टिंग करायला मिळाली. कलीमधे राजेश खन्ना कली, पती पत्नी और वोमधे संजीव कुमार, मुकीमधे शशी कपूर यांच्यासोबत ती आपल्याला दिसली. पण सिनेमाची कथाच अशी असायची की तंग, तोकडे, अंगप्रदर्शन करणारी कपडे घालायची तिच्यावर वेळच आली नाही.

मंत्रीही प्रेमात पडल्याची खबर

ती अल्पावधीत तिच्या सौंदर्याने आणि अभिनयाने एका उंचीवर पोचली. एवढी की तो आणीबाणीचा काळ होता आणि विद्याचरण शुक्ला नावाचे नभोवाणी आणि सांस्कृतिक विभाग सांभाळणारी एक असामी होती. त्यांनी तर एकदा तिला आपल्या जाळ्यात खेचण्यासाठी ‘तू भी विद्या मैं भी विद्या’ असा डायलॉग मारल्याची खबर सर्वत्र पसरली. पण विद्याचं आधीच लग्न झालेले होतं.

तिच्या शेजारीच राहणाऱ्या व्यंकटेश अय्यर याच्याशी तिने लग्न केलेलं होतं. अय्यर खूप लवकर गेले. आणि पुढे ऑस्ट्रेलियाला गेल्यावर तिच्या जीवनात आणखी एक पण आला. डॉ. नेताजी भीमराव साळुंखे. दोघांमधे वयाचे अंतर होते. तिचं हे लग्न टिकलं नाही. आपल्या छळणुकीबाबत तिला कोर्टातसुद्धा जावं लागलं. या दोन्ही लग्नांतून तिने एकेका मुलीला मात्र दत्तक घेतलं होतं.

हेही वाचाः सुपरहिरो खूप आहेत, पण ओबामांनाही आवडतो केवळ स्पायडर मॅनच!

शोलेच्या प्रभावाने संपलं करिअर

राज सिप्पी, गुलजार, बासू चटर्जी अशा डायरेक्टर्सनी तिला आवर्जून सिनेमा दिले. गुलडार यांनी ‘मीरा’मधे तिला निवडलं होतं. पण हळूहळू शोलेच्या प्रभावामुळे मल्टीस्टारकास्ट आणि तद्दन मसाला सिनेमांची लाट आली आणि त्यात ही सोज्वळ चेहऱ्याची नायिका वाहून गेली.

बऱ्याच वर्षानंतर तिने टीवी मालिका केल्या. काव्यांजली, कुबूल है अशा तिच्या मालिका बऱ्या होत्या. ती नंतर आपल्या आवडीचे क्षेत्र म्हणून एक्टिंगमधे होती. २०११ मधे आलेल्या सलमान आणि करीनाच्या बॉडिगार्डमधे ती आपल्याला दिसली. हा तिचा शेवटचा सिनेमा ठरावा हे दुर्दैव.

अमोल पालेकरांची काव्यांजली

ती माणूस म्हणून खूप चांगली होती. निगर्वी आणि नम्र होती. सेटवर कुणाशीही नीट बोलायची, वागायची. मोठ्या डायरेक्टर, अॅक्टरचा मान ठेवायची. अमोल पालेकर तिच्या जाण्याच्या वृत्ताने खरोखरच सद्गदित झाला. ती आताही त्याच्या संपर्कात होती. तिची मोठी मुलगी जान्हवीशी त्याने विद्याच्या जाण्याच्या आदल्या रात्री संभाषण करून विचारपूसही केली होती.

२०१५ मधे अमोल पालेकर यांनी आपल्या चित्रांचं प्रदर्शन भरवले होते. ते बघायला ती आली होती. आणि अमोलने तिथेच तिचं चित्रही काढले होते. ते खूपच सुंदर झालं होतं. ते बघून तिला खूप आनंद झाला होता. पण अमोलच्या मते. ती स्वतः एवढी सुंदर होती की चित्र सुंदर दिसणं साहजिकच होतं. मग २०१६ मधे अमोलच्या ७० व्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याच्या बायकोने पुण्याला त्यांच्या घरी अमोलच्या सगळ्या नायिकांना बोलावलं होतं.

त्यात विद्या तर होतीच शिवाय बिंदिया, झरिना, दीप्ती याही होत्या. मुंबईत आल्यावर अमोल आणि तिच्या भेटीगाठी व्हायच्या, गप्पा व्हायच्या. रजनीगंधामधे अमोलचे दिल्लीमधे आणि दिनेश ठाकूरचे मुंबईमधे शुटींग झाले. वास्तवात उलटे होते. अमोल मुंबईचा होता तर दिनेश दिल्लीचा. यावरून दोघं नेहमी हसायचे. 

अमोलने विद्याला श्रद्धांजली वाहताना एक कविता लिहिलीय. त्यात तो म्हणतो, ‘तिचं मन सुंदर होतं. म्हणूनच ती सुंदर होती.’

हेही वाचाः 

शाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला

भारतात बॉलिवूडसारखे आणखी किती वूड आहेत?

बूक माय शो: ऑनलाईन तिकीट बुकिंगमधला असली किंग

सुषमा स्वराज यांनी ट्विटरचा एका शस्त्रासारखा वापर केला

म्हणून आता आपण पारशी वाचवा मोहिम राबवायला हवी!