काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांची विधानसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून निवड झाली. विधानसभेची निवडणूक चारेक महिन्यांवर आली असताना ही निवड झालीय. वडेट्टीवारांनी विरोधी पक्षनेत्याचं पद स्वीकारताना भाषण दिलं. त्यावेळी त्यांनी बाळासाहेबांचे आभार मानले.
होणार, नाही म्हणतं काल २४ जूनला शेवटी विधानसभेच्या विरोधी पक्षनेत्याची निवड झाली. कधीकाळी एनएसयूआयमधे कार्यकर्ता राहिलेले काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांना संधी मिळाली. विधानसभेचं कामकाज अजून १२ दिवस चालणार आहे. तसंच सुट्टया वगैरे पकडून सातेक दिवसच विधानसभा सुरू राहील. या पार्श्वभूमीवर वडेट्टीवार केवळ दोनेक आठवड्यांचे विरोधी पक्षनेते म्हणून ओळखले जातील.
राधाकृष्ण विखे पाटील यांनी गेल्या आठवड्यातच काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला. त्याआधी त्यांनी विरोधी पक्षनेतेपदाचाही राजीनामा दिला होता. मुलगा डॉ. सुजय विखे पाटील याच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने अहमदनगरची जागा काँग्रेसला सोडली नसल्यामुळे ते नाराज होतो. मुलगा भाजपच्या तिकिटावर निवडून येताच विखे पाटलांनीही कमळ जवळ केलं. काँग्रेसचा हात सोडल्याने त्यांना भाजपमधे लगेच कॅबिनेट मंत्रीही करण्यात आलं.
विशेष नोंद घेण्याजोगी गोष्ट म्हणजे वडेट्टीवार हे चालू विधानसभेचे तिसरे विरोधी पक्षनेते आहेत. २०१४ मधे विधानसभेची निवडणूक झाल्यावर शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांनी काही दिवस हे पद भूषवलं. नंतर शिवसेनेने फडणवीस सरकारमधे जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर विखे पाटील यांनी हे पद भूषवलं. गेल्या आठवड्यात तेही फडणवीस सरकारमधे मंत्री झाले. त्यामुळे पुन्हा हे पद रिकामं झालं.
ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला नवा विरोधी पक्षनेता निवडावा लागला. आता विधानसभेची निवडणूक वडेट्टीवारांच्या कारकीर्दीतच होणार आहे. चारेक महिन्यांवर विधानसभेची निवडणूक आलीय. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ते सरकारविरोधात कसं रान पेटवतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. गेल्या २१ वर्षांपासून ते आमदार आहेत. यामधे विधान परिषदेची एक तर विधानसभेच्या तीन टर्म आहेत.
लोकांच्या प्रश्नांसाठी संघर्ष करणारा जमिनीवरचा कार्यकर्ता म्हणून वडेट्टीवार ओळखले जातात. १९८४ मधे त्यांनी राजकारणात उडी घेतली. सुरवातीला बरीच वर्ष ते काँग्रेसची विद्यार्थी संघटना नॅशनल स्टूडंट्स युनियन ऑफ इंडिया अर्थात एनएसयूआयमधे काम केलं. विद्यार्थ्यांचे प्रश्न लावून धरले. त्याकाळी आदिवासी तरुण नोकरीधंद्यापासून वंचित राहायचा. आदिवासी तरुणांसाठी नोकरीच्या जागा निघूनही त्या रिकाम्या राहायच्या.
बऱ्याच आदिवासी तरुणांसाठीच्या या राखीव जागांवर दुसरेच लोक डल्ला मारायचे. त्या काळात वडेट्टीवार हे आपल्या स्कूटरवर गावोगावी फिरून ग्रामपंचायतीच्या बोर्डवर नोकरीच्या नोटीसा लावत फिरायचे. आदिवासी तरुणांच्या हक्कासाठी लढायचे. आक्रमक स्वभावामुळे पुढे ते शिवसेनेत गेले. १९९५ मधे शिवसेना-भाजप युतीचं सरकार आल्यावर वडेट्टीवार १९९६ ते ९८ या काळात वनविकास महामंडळाचे अध्यक्ष राहिले.
वडेट्टीवारांना राजकारणाचं बाळकडू वडिलांकडून मिळालं. त्यांचे वडील नामदेव वडेट्टीवार गडचिरोली जिल्ह्यातील गोडपिंपरी तालुक्यातल्या करंजी गावाचे सरपंच होते. वडील अकाली वारल्याने वडेट्टीवार संपूर्ण कुटुंबासह गडचिरोलीला राहायला गेले. तिथूनच त्यांच्या राजकारणाला वळण मिळालं.
हेही वाचाः 'लाल श्याम शाह' हे पुस्तक मी का लिहिलं?
वडेट्टीवार सध्या काँग्रेसमधे असले तरी आपल्यातल्या आक्रमकपणाचं श्रेय बाळासाहेब ठाकरेंना जात अशी कबुली ते देतात. विधानसभेत पदभार स्वीकारताना दिलेल्या भाषणातही त्यांनी माझा इथपर्यंतचा प्रवास बाळासाहेबांमुळेच शक्य झाल्याचं कबुल केलं. १९९८ मधे शिवसेनेने त्यांना विधान परिषदेत पाठवलं.
२००४ मधे वडेट्टीवारांनी शिवसेनेच्या तिकिटावर विधानसभेची निवडणूक जिंकली. पण २००५ मधे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेत बंड केलं. काही आमदार घेऊन काँग्रेसमधे आले. त्याचवेळी राणे समर्थक वडेट्टीवारही स्वगृही काँग्रेसमधे आले. २००८ मधे काँग्रेस आघाडी सरकारमधे वन आणि आदिवासी कल्याण खाते राज्यमंत्री झाले. २००९ ची निवडणूक ३० हजाराच्या मताधिक्याने जिंकले. यावेळीही ते वर्षभर राज्यमंत्री राहिले.
पुढे २०१४ मधे काँग्रेसची सत्ता जाताच नारायण राणेंनी पक्ष नेत्यांवर दोषारोप करत काँग्रेसला रामराम ठोकला. पण वडेट्टीवार काँग्रेसमधेच राहिले. आपल्यालातला आक्रमकपणा संयमीपणे हाताळल्यामुळेच वडेट्टीवार विरोधी पक्षासाठीच्या सर्वोच्च पदापर्यंत पोचले.
२०१४ मधे प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या गेल्या ३४ वर्षांपासून भाजपच्या ताब्यात असलेल्या ब्रम्हपुरीच्या जागेवरून निवडणूक लढवली आणि वडेट्टीवारांनी ही जागा काँग्रेसकडे खेचून आणली. पण वडेट्टीवारांना विरोधी पक्षनेता करण्यामागे एक महत्त्वाचं कारण आहे. आणि या निवडीने त्याची सध्या चर्चाही सुरू आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेसला सपाटून मार खावा लागला. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांनाही नांदेडची जागा राखता आली नाही.
काँग्रेसला एकच जागा जिंकता आली. ती म्हणजे चंद्रपूर. चंद्रपूरच्या उमेदवारीवरूनच तर काँग्रेसमधे खूप राडा झाला होता. खुद्द चव्हाणांनी राजीनामा देण्याची भाषा केली होती. तशी ऑडिओ क्लिपही वायरल झाली. आणि शेवटी शिवसेनेतून आलेल्या बाळू धानोरकर यांच्या गळ्यात लोकसभेची उमेदवारी पडली. धानोरकरांना निवडून आणण्यात वडेट्टीवार यांचा मोठा वाटा आहे. या कामगिरीची पावती म्हणून आता वडेट्टीवारांना हे बक्षीस मिळालंय.
आता तुम्हाला कळालं असेल वडेट्टीवारांनी बाळासाहेबांना थँक्स का म्हटलं. हो. तेच. शिवसेनेतून आलेल्या बाळू धानोरकरांमुळेच वडेट्टीवारांची कॉलर टाईट झालीय. आता मात्र ही कॉलर अशीच टाईट ठेवायची असेल तर वडेट्टीवारांना विधानसभा निवडणुकीत खूप फाईट द्यावी लागणार आहे. अशी फाईट देण्यासाठीच तर काँग्रेसने आपल्या पडत्या काळात वडेट्टीवारांसारख्या सामान्य कार्यकर्त्याची विरोधी पक्षनेतेपदासाठी निवड केलीय.
हेही वाचाः
शाहू महाराजांनी खरंच ब्रिटिशांना मदत केली होती?
चंद्रपूर, गडचिरोलीत विरोधकांना साथ की सत्तेला साथसोबत?
अशोक चव्हाणांच्या जागी कोण होऊ शकतं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष?
आपली आजीही बावन्नला पन्नासवर दोन म्हणते, मग वादाचं कारण काय?
मोदी सरकारमधले बडे अधिकारी कार्यकाळ संपण्याआधीच राजीनामे का देताहेत?