सावरकरांनी लिहिलेल्या रोमँटिक कविता वाचायलाच हव्यात

२६ फेब्रुवारी २०२०

वाचन वेळ : ६ मिनिटं


देशप्रेम आणि क्रांतीने ओतप्रोत भरलेल्या कविता लिहिणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी रोमँटिक कविताही लिहिल्यात. वेलीवरची फुलं तोडताना तरुणीची चोळी कशी तटतटून येते किंवा महादेवाचे वीर्यबिंदू कसे ताऱ्यासारखे दिसतात, अशी वर्णनं त्यांच्या कवितेत सापडतात. सागरा प्राण तळमळलाच्या पलीकडे असणाऱ्या वि. दा. सावरकरांनाही आपण भेटायला हवं.

कवी सावरकर म्हटले की `सागरा प्राण तळमळला` आठवते. काहीजणांना `जयोस्तुते` आठवू शकते. त्याशिवाय `हिंदूनृसिंहो प्रभो शिवाजी राजा` ही शिवाजी महाराजांवरची कविताही स्वातंत्र्यवीर सावरकरांची म्हणून लक्षात राहते. या तीनपैकी एकच कविताही त्यांनी लिहिली असती तरी मराठी साहित्याच्या इतिहासात नाव नोंदवले असते.

आपल्याला फक्त या तीनच माहीत असल्या तरी सावरकरांनी आयुष्यभर अनेक कविता लिहिल्यात. त्यापैकी या तीन सर्वसामान्य मराठी वाचकांपर्यंत पोचू शकल्या, त्या मंगेशकरांचा संगीताचा स्पर्श झाल्यामुळे. थोरल्या मंगेशकरांनी म्हणजे मास्टर दीनानाथ सावरकरांचं `संन्यस्त खड्ग` हे नाटक बसवलं होतं. त्यातलं `मर्मबंधातली ठेव ही` आणि `शतजन्म शोधिताना` ही नाट्यगीतं गाजली. पण ती प्रत्यक्ष गाण्यापेक्षाही पुस्तकांची, लेखांची, कार्यक्रमांची शीर्षकं म्हणून नव्या पिढीला माहीत आहेत.

हेही वाचाः आजही सावरकरांना माफीच्या कोठडीतच का उभं केलं जातंय?

क्रांतीचा कवी मंगेशकरांमुळे घरोघरी

दीनानाथ सावरकरांचे भक्त होतेच. त्यांनी सावरकरांची नाटकं करण्यासाठी आपलं सर्वस्व पणाला लावलं. तेच सावरकरप्रेम त्यांच्या पुढच्या पिढ्यांमधेही आलं. सावरकरांची गाणी पंडित हृदयनाथ मंगेशकरांनी स्वरबद्ध केली. त्यांनी आणि त्यांच्या बहिणी लता मंगेशकर, आशा भोसले, उषा मंगेशकर ती गायली. त्या गाण्यांनी इतिहास घडवला.

त्यामुळे याच कविता सावरकरांची ओळख बनल्या. पण सावरकरांनी इतरही अनेक कविता लिहिल्यात. त्यांनी सप्तर्षी, गोमांतक, सप्तर्षी ही महाकाव्य लिहिली. त्यांची नाटकं ही संगीत नाटकंच होती. त्यामुळे त्यातही गाणी होती. त्याशिवाय त्यांची प्रतिभा कुमारवयापासून काव्यरूपाने व्यक्त होत आलीय. त्यात कविता आहेत, गाणी आहेत, पोवाडे, फटके, गजला, आरत्या, श्लोक, प्रार्थना अशा सर्वप्रकारच्या कविता आहेत.

सावरकरांची कविताही हिंदुत्ववादी

सावरकरांच्या कवितांमधे देशप्रेम आणि त्यातून आलेली क्रांतीची आस शब्दाशब्दांपर्यंत जाणवते. आपल्या अनुयायांना प्रेरणा मिळावी यासाठीच ते लिहित होते. त्यांनी केलेली हिंदुत्वाची वैचारिक मांडणी आणि त्यानुसार हिंदुत्ववादी दृष्टिकोनातून लिहिलेला इतिहास हाच त्यांच्या लिखाणाचा गाभा होता. तेच विषय कवितेमधूनही आले.

तीन प्रसिद्ध गाणी सोडली तर अगदी सावरकरभक्तांनाही सावरकरांच्या कविता फारशा माहीत नसतात. त्यातल्या त्यात `अखिल हिंदू विजयी ध्वज` हे भगव्या झेंड्यांची थोरवी सांगणारं ध्वजगीत आणि `तुम्ही अम्ही सकल हिंदू बंधूबंधू` हे हिंदू एकता गान हिंदुत्ववाद्यांमधे प्रचलित आहे. `सकळ जगामधी छान, अमुचे प्रियकर हिंदुस्तान` हेही एक बाळबोध देशभक्तीगीत थोडंफार लोकांना माहीत आहे

आजच्या पिढीला अर्थ लागणं कठीण

पण भाषाशुद्धीचा अतिआग्रह धरणाऱ्या सावरकरांना परदेशी शब्दांचा विटाळ होता. त्यांना इंग्रजी शब्द चालत नसतच पण त्यांचा विरोध प्रामुख्याने मराठीत रूढ झालेल्या फारशी, अरबी, उर्दू, तुर्की शब्दांना होता. या शा‍ब्दिक सोवळ्याओवळ्यात त्यांनी संस्कृत शब्द मराठीत रुजवण्याचा प्रयत्न केला. त्यातले काही मराठीत रुळलेही.

पण संस्कृतच्या आग्रहामुळे त्यांची कविता चांगल्या मराठी वाचकासाठीही कठीण बनली. आजच्या पिढीसाठी तर त्यांची कविता दुर्बोध म्हणावी इतकी संस्कृताळलेली आहे. ती कविता संस्कृत आहे की मराठी हेही अनेकदा कळत नाही.

लेखणी तोडा आणि बंदुका उचला, असं लेखकांना आवाहन करणाऱ्या सावरकरांच्या कवितेत प्रामुख्याने वीररसच दिसतो. अशा सावरकरांच्या कवितेत शृंगाररस असू शकेल अशी शंकाही कुणाला येणार नाही. पण त्यांची अत्यंत शृंगारीक म्हणजे आजच्या भाषेत सेक्सी म्हणावी अशी एक कविता आहे. तनुवेल नावाची. सावरकरांच्या समग्र साहित्याच्या खंडात ही कविता सापडते.

त्यात सकाळीच जाईजुईच्या वेलीवरून फुलं तोडणाऱ्या सुंदरीचं वर्णन आहे. फुलांच्या वेलीपेक्षा या सुंदरीची तनुवेलच अधिक सुंदर असल्याची ही कविता सांगते. त्या तरुणीचं वर्णन करताना सावकरांची कविता मोहरून आलीय. ही तरुणी फुलं तोडण्यासाठी हात वर करताना तिची चोळी कशी घट्ट दिसते आणि पदर खोवल्यावर कंबर दिसते असं रोमँटिक वर्णन या कवितेत आहे.

हेही वाचाः सरदार पटेल पंतप्रधान झाले असते तर

वाचा सावरकरांची ही रोमँटिक कविता

सकाळीच तू तोडित असता जाई जुईच्या फुलां

माडीवरुनी सुंदर कन्ये, पाहियलें मी तुला

उंचविता कर छातीवरी ये चोळी तटतटुनी

कुरळ केश रुळताती गोरट्या मानेवरी सुटूनी

पदर खोविले पातळ गेले कटितटिला लगटुनी

स्मृति सखये तव मनी माझियां संगतीच्या उठुनी

बघसि चोरटे मी तुज दिसतो वरती का कुठुनी

दिसतांची मी हंसूं उषेसम मुखिं तव ते फुटुनी

अशी सकाळीं फुलें तोडितां पाहियली जैं तुला

फुलवेलीहुनि तनुवेलची तव मोहक दिसली मला!

रोमँटिक कविता लिहिली तुरुंगात

जयेश मिस्त्री यांनी तरुण भारत लिहिलेल्या प्रेमकवी सावरकर लेखात माहिती दिलीय की सावरकरांनी ही कविता अंदमानच्या तुरुंगवासात असताना लिहिलंय. हा लेख मुळातून वाचावा इतका माहितीपूर्ण आहे. त्यातलं खरं मानलं तर मानायला हवं की आपल्या माणसांपासून दीर्घकाळ लांब राहिल्यानंतर लिहिलेली हे विरहकाव्य आहे. त्यांच्या मनात बसलेल्या एका तरुणीचं वर्णन त्यांनी रसरसून केलंय. त्या वेळची त्यांची मानसिकता कोणताही पुरुष समजून घेऊ शकतो.

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी `माझी जन्मठेप` या आत्मचरित्रपर पुस्तकात अंदमानातल्या हालअपेष्टांचं वर्णन केलंय. त्यामुळे त्यानंतर तो बलिदानाचा आणि त्यागासाठी जणू वजनकाटाच बनला. पण त्यानंतर काही अभ्यासकांनी अंदमानातल्या कागदपत्रांचा अभ्यास करून दावे केले की सावरकर सांगतात तितका त्रास त्यांना अंदमानात झाला नाही. तुरुंगात जातना आणि सुटताना सावरकरांचं वजन नोंदवलं गेलंय. त्यात सुटतानाचं वजन अधिक असल्याचा दावा नव्या लेखकांनी केलाय. या पार्श्वभूमीवरही ही कविता पाहायला हरकत नाही.

हेही वाचाः आपल्याला स्वातंत्र्य मिळवून देणारा १९४२ चा लढा नेमका होता कसा?

ताऱ्यांना वीर्यबिंदूंची उपमा देणारा महाकवी

१९०६मध्ये मुंबई सोडून लंडनला बॅरिस्टरकीचा अभ्यास करण्यासाठी जाताना सावरकरांनी प्रवासातच तारकांस पाहून ही कविता लिहिली. आकाशात दिसणाऱ्या तारकांना त्यांनी पुराणातल्या कथांच्या आधारे निरनिराळ्या उपमा दिल्यात. उदा हे तारे नसून समुद्रमंथनात सापडलेले अमृतबिंद आहेत किंवा शंकरपार्वती प्रेम करत असताना अचानक विष्णू आला. त्यामुळे घाईगडबडीत पार्वतीच्या गळ्यातला हार तुटला. त्यातले मोती म्हणजे तारे आहेत.

त्याचबरोबर महादेवाच्या आणखी एका पुराणकथेचा उल्लेख या कवितेत येतो. त्यात पार्वतीच्या रूपातली भिल्लीण आणि तिच्यासाठी आतुर झालेला शंकर यांचं वर्णन असणारं कडवं जयेश मिस्त्री यांच्या लेखात सापडतं. त्यात देवाच्या वीर्याचे थेंब पडले, तेच ज्योतिषांना आता तारे वाटतात, असं वर्णन या कडव्यात आहे. ते कडवं असं,

कामव्याकुल शंभु लागला भिल्लिणीचे पाठी

पुराणीच ही कथा, कथीनची मी कुठला खोटी

नाचत निसटे माया भिल्लिण तोही तिजमागे

कामव्याकुल, आकाशाच्या अंगणात लागे

टपकत संचितवीर्य प्रभुचे बिंदु बिंदु गेले

तयांचि तारे म्हणूनी ज्योतिषी भले भले चकले

सावरकरांनी उर्दू गजलाही लिहिल्या

मराठी लिहिताना एकही उर्दू किंवा फारशी शब्द येऊ नये म्हणून आग्रही असणारे सावरकरांनी थेट उर्दू गजला लिहिल्या असतील, यावर विश्वास बसत नाही. पण अंदमानात असताना त्यांनी लिहिलेल्या गजलांची वही सापडलीय. त्याची माहिती स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाच्या वेबसाईटवर आहे. 

या वहीत थेट उर्दू गजला आहेत. त्याही अरबी लिपीत आहेत. पण त्यातल्या सगळ्या गझला प्रेमावरच्या नसून देशप्रेमाने ओतप्रोत भरलेल्या आहेत. त्यातला एक शेर रोमँटिक आहे. तो असा, 

मुनव्वर अंजुमन होती हैं, महफिल गरम होती हैं

मगर कब जब के खुद जलती हैं, शमा-ए-अंजुमन पहिले

मराठी शायर प्रदीप निफाडकर यांनी या शेराचा मराठी अनुवाद केलाय, तो असा – अहो, मैफिल केव्हा सुंदर दिसते, तिला शोभा कधी येते, जेव्हा मेणबत्ती स्वतःला जाळून घेते, आपल्यालाही तसेच करावे लागेल.

हेही वाचाः 

पाकिस्तानचा `टांग उपर` डे

महात्मा गांधी म्हणजे आधुनिक काळातले महादेवच!

खरंच पाकिस्तान जिंदाबादचा नारा देणं म्हणजे देशद्रोह आहे?

डोनाल्ड ट्रम्प यांच्या दौऱ्याबद्दल अमेरिकन मीडियाचं म्हणणं काय?