विरार लोकल आज १५२ वर्षांची होतेय. कधीकाळी दुर्गम म्हणून ओळखला जाणारा हा प्रदेश आता मुंबईचा अविभाज्य भाग झालाय. हे अतूट नातं तयार होण्यात लोकलने खूप मोठा हातभार लावलाय. लोकलमुळे या भागातली सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि राजकीय परिस्थितीत फेरबदल झालेत. या बदलांचा घेतलेला हा वेध.
देशाची आर्थिक राजधानी मुंबईची लाईफ लाईन म्हणून लोकल ट्रेन ओळखली जाते. लोकलचं वेळापत्रक बदलल की लोकांचही वेळापत्रक बदलत. त्यामुळे लोकल मुंबईकरांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलीय.
भारतात १८५३ मधे बोरीबंदर ते ठाणे अशी पहिली ट्रेन धावली. पण ती आताच्या सेंट्रल लाईनवर धावली. त्यानंतर १४ वर्षांनी वेस्टर्न लाईनवर पहिली लोकल धावली. ही ट्रेन १२ एप्रिल १८६७ला विरॉर ते बॅकबे दरम्यान धावली. विरॉर म्हणजे आताचं विरार. आणि बॉम्बे बॅक बे हे स्टेशन वेस्टर्न लाईनचं मुख्यालय. हेच आता चर्चगेट स्टेशन म्हणून ओळखलं जातं. हे स्टेशन चर्चगेट आणि मरीन लाइन्सच्यामधे होतं.
हेही वाचाः युरोपात धावणारी ट्राम पुन्हा मुंबईची लाईफलाईन होईल?
त्यावेळी बॉम्बे बडोदा आणि सेंट्रल इंडिया या खासगी कंपनीतर्फे संपूर्ण वेस्टर्न लाईनचे रुळ, स्टेशन, रेल्वेगाड्यांचं काम करण्यात आलेलं, ही माहिती वेस्टर्न रेल्वे संग्रहालयातून मिळाली.
पहिली ट्रेन विरारहून सकाळी ६.४५ ला सुटली आणि बॅकबेहून संध्याकाळी ५.३० वाजता सुटली. त्यावेळी ही ट्रेन नीअल म्हणजे आताच नालासोपारा, बसिन म्हणजे वसई, पंजो म्हणजे पूर्वी वसईच्या टेकडीलगतची जागा होती. बेरेवला म्हणजे बोरिवली, पहाडी म्हणजे गोरेगाव, अंड्रु म्हणजे अंधेरी, सांताक्रूझ, बंडोरा म्हणजे वांद्रे, माहिम, दादुरे म्हणजे दादर आणि ग्रॅंट रोड आदी स्थानकांवर थांबली.
या रेल्वेगाडीत १८६९ पासून फर्स्ट, सेकंड आणि थर्ड क्लासची मासिक आणि तिमाही तिकिटं म्हणजे पास मिळू लागले. तिकिटांची रक्कम ७ पैसे, ३ पैसे आणि १६ आणे एवढी होती. गाडीत महिलांसाठी विशेष बोगी होती, अशी माहिती वेस्टर्न रेल्वेच्या संग्रहालयातून मिळाली.
रेल्वेगाड्यांना सर्रास वापरला जाणारा शब्द म्हणजे लोकल. हा शब्द १९६५ला कल्याणपर्यंत धावणाऱ्या ट्रेनसाठी वापरण्यात येत होता. नंतर वेस्टर्न लाईन सुरु झाली. महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थानला जोडण्यासाठी या रेल्वेचं मुख्यालयही सुरवातीला बडोद्यात होत. त्यानंतर १८७०ला चर्चगेट स्टेशन आणि मुख्यालय बनलं. त्यानंतर सबर्बन रेल्वे म्हणजे विरारपर्यंत लोकल ट्रेनचं काम चर्चगेट मुख्यालयातून होऊ लागलं.
हेही वाचाः तर पूल बांधायची कामं लष्करावरच सोपवावी लागतील
पहिल्यांदा इलेक्ट्रिक ट्रेन १९२८मधे बोरिवलीपर्यंत धावली होती. त्याआधी ट्रेन वाफेवर धावत होत्या. ३ मार्च १९६१ला ९ डब्यांची तर १९८६ला १२ डब्यांची ट्रेन सुरु झाली. सध्या वेस्टर्न लाईनवर २९०० हून अधिक गाड्यांच्या फेऱ्या होत आहेत. त्यातून साडे तीन लाखांहून अधिक लोक प्रवास करत असल्याची माहिती वेस्टर्न रेल्वेच्या वेबपार्टलवर दिलीय.
मुंबईच्या लगत असलेलीं गाव मिरा-भाईंदर, वसई, सोपारा, विरार, यांना विरार लोकलने रेल्वेने जोडली गेली. वसई-विरार भागात तांदुळ, फळं, फुलं भाज्यांची शेती होतहोती. तसेच लोक गाई म्हशी पाळायचे. त्यांना मुंबईची बाजारपेठ मिळाली.
पहाटे ४ किंवा ५च्या गाडीने वसईचे दूधवाले, भाजीवाले, फुलवाले आपलं सामानांच्या टोपल्यांची कावड घेऊन लोकलने प्रवास करत. मुंबईतल्या बाजारात जाण्यासाठी ते आदल्या रात्रीपासून तयारी करत. संध्याकाळी दूध काढणं, भाज्यांची कापणी, फुलं निवडणं इत्यादी काम करून त्याला टोपलीत, मडक्यात बांधत. मोठ्या जाड माती लावलेल्या टोपल्यांना दोर बांधून कावड बनवत आणि त्यात माल ठेवला जाई. ते घेऊन मुंबईतल्या बाजारात विकत असत, अस वसईत राहणारे शाल्डन रॉड्रीग्ज यांनी सांगितल.
हेही वाचाः सिनेमांची संख्या कमी होतेय, हे चांगलं की वाईट?
मुंबईतली वाढती लोकसंख्या, जागेचे वाढते भाव यामुळे स्वत जागेत आणि मुंबईजवळ राहण्यासाठी योग्य जागा म्हणजे वसई, विरार. त्यातच रेल्वेच्या फेऱ्या वाढल्यामुळे लोकांना एक, दीड तासात घरी पोहोचता येत होत. त्यामुळे लोक मोठ्या संख्येने या भागात येऊ लागले, अस वसईतले सतीश धुरी म्हणाले. सध्या वसई विरार भागाची साधारण २२ लाख लोकसंख्या आहे.
लोकलमुळे मुंबईत होणारा विकास वसई विरार मधेही होऊ लागले. इथली जागा स्वत मिळत असल्यामुळे अनेक कंपन्या प्लांटच्या जागा, गोडाऊन त्या भागात घेऊ लागले. वसई, विरारमधल्या लोकांनी २००९ला आंदोलन केल्यानंतर रेल्वेच चौपदरीकरण झालं. त्यानंतर अनेक मोठे बिल्डर्स वसई विरारमधे गेले. त्यांनी तिथे इमारती, शाळा, महाविद्यालय, क्लब, हॉटेल बांधण्यास सुरवात केली, अस लॉरेंस डाबरेने सांगितलं.
वसई, विरारभागात वाढती लोकसंख्या, इमारते, व्यवसाय यांमुळे गावातील शेती कमी झाली. लोक दुसरीकडे नोकरीला जाऊ लागले. अनेक स्थानिक परदेशी गेले. त्यामुळे फक्त केळी आणि भाज्यांचे उत्पन्न ते भुईगाव या पटट्यात साईड बिझनेस म्हणून घेतलं जातंय. त्याचबरोबर पुढच्या पिढीच शिक्षण आणि बदललेल करिअरमुळेही बॅंड वाजवण, मासेमारी, शेती सारखे पारंपरिक व्यवसाय मोठ्या प्रमाणात बंद झालेत.
वसई, विरार आता पूर्णपणे मुंबईच्या बरोबरीचं शहर म्हणूनच डेवलप होतंय. सध्या वसई, विरारला स्वतंत्र महापालिका आहे. सर्वाधिक लोकसंख्या वाढत असलेलं शहर म्हणून वसई, विरारकडे बघितल जात. मिरारोड भाईंदरचीही महापालिका बनलीय.
हेही वाचाः उर्मिला मातोंडकरसाठी उत्तर मुंबईचा गड अवघडच