विराट असा कसा तू वेगळा वेगळा

१५ जून २०१९

वाचन वेळ : ५ मिनिटं


भारतीय क्रिकेट संघातला सर्वात वात्रट खेळाडू म्हणजे विराट कोहली. भारत आणि ऑस्ट्रेलियातल्या मॅचेसमधे जी टशन असायची त्यात विराट नेतृत्व करायला आघाडीवर असायचा. हल्ली मात्र तो बदला बदलासा दिसतोय. स्ट्रॅटेजिक आक्रमकपणा आणि स्वभाव यात गल्लत करु नका असं तो प्रेक्षकांना सांगतोय.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या क्रिकेटच्या मैदानात तापलेल्या वातावरणाचे अनेक किस्से आपण ऐकत आलो आहोत. पण, सध्याच्या काळात दोन देशांमधली राजकीय परिस्थिती आणि तणावाच्या वातावरणामुळे दोन्ही देशांदरम्यान तुरळकच क्रिकेट सामने होतात. त्यामुळे ती परंपरागत टशन आता पहायला मिळत नाही. जरी भारत, पाकिस्तान टशन आता दुर्लभ झाली असली तरी त्याची जागा भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या सामन्यांनी घेतलीय.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अशी टशन निर्माण होण्याची कारणं बरीच आहेत. यात गेल्या दशकभरात बलाढ्य ऑस्ट्रेलियाची मोडून काढलेली मक्तेदारी, भारतीय खेळाडूंनी स्लेजिंगविरुद्ध बदललेली आपली भुमिका यांचा प्रामुख्याने यात समावेश होतो.

ऑस्ट्रेयिलाच्या स्लेजिंगला टॅकल करण्याचं ‘विराट’ औषध

या बदललेल्या भुमिकेचं मुर्त स्वरूप म्हणजे भारताचा कर्णधार विराट कोहली. ऑस्ट्रेयिलाचे खेळाडू हे स्लेजिंग करुन आपल मन विचलीत करतात. त्यांच्या या डावपेचांना शांत राहून, कोणतीही प्रतिक्रिया न देता उत्तर दिलं पाहिजे असा कानमंत्र प्रत्येक ज्येष्ठ खेळाडू देत असायचा. पण, संघातील सर्वात वात्रट खेळाडू म्हणून ओळखला जाणाऱ्या विराटचं या स्लेजिंगला टॅकल करण्याचं औषध वेगळंच होतं.

त्याने काट्यानं काटा काढण्याचं तंत्र अवलंबलं. स्लेजिंगला उत्तर स्लेजिंगच असा त्याचा शिरस्ता त्याने कर्णधार झाल्यावरही बदलला नाही. त्याची आक्रमक देहबोली जास्तच अंगावर आल्यानंतर सचिनने त्याला जरा शांततेनं घेण्याचा सल्ला दिला होता. हा सल्ला त्याने काही प्रमाणात अंमलात आणत आक्रमक हावभावांवर थोडंसं नियंत्रण आणलं. भारतीय क्रिकेटनं अपवाद वगळता आपला सभ्यपणा सोडला नाही. त्यामुळेच सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि व्ही. व्ही. एस. लक्ष्मण यांची उदाहरणं आजही दिली जातात.

हेही वाचा: वर्ल्डकपमधे तगड्या टीमला, लहान टीमने हरवण्याचा रेकॉर्ड भारताच्या नावावर

असा हा सचिनचा वात्रट वारसदार

विराट फलंदाजीच्या बाबतीत जरी तेंडुलकरच्या रेकॉर्ड्सचा यशस्वी पाठलाग करत असला तरी त्याला सचिनचा वारसदार म्हणण्याचं धाडस करवत नव्हतं. कारण त्याच्या वागण्यातून विरोधी संघातील खेळाडूंना तो आदर देत नाही. सचिन तेंडुलकरच्या सभ्यतेचे दाखले सर्वचजण देतात. अशा सभ्य क्रिकेटरचा वारसदार इतका वात्रट कसा असू शकतो असा प्रश्न विराटच्या बाबतीत सतत विचारला जातो.

सचिननेही ऑस्ट्रेलियाच्या स्लेजिंग मास्टर असलेल्या खेळाडूंचा निदान दशकभर तरी सामना केला असेल. पण, कधीही सचिन कोणत्याही वादात अडकला नव्हता. विराटचं तसं नाही बऱ्याच वेळा विराटने स्वतःहून अती आक्रमकपणा दाखवत वाद ओढवून घेतलेत. त्याचा आणि ऑस्ट्रेलियाचा तत्कालीन कर्णधार स्टिव्ह स्मिथ यांच्यातला वाद सर्वश्रुत आहे.

स्टिव्ह स्मिथ, विराट आणि वाद

ऑस्ट्रेलिया भारत दौऱ्यावर असताना स्मिथने रिव्ह्यु घेण्यासाठी पॅवेलियनमधे बसलेल्यांची मदत घेण्याचा प्रयत्न केला होता असा आरोप करत विराटने जाहीर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर विराटने वेळोवेळी त्याला वेडे वाकडे हावभाव करत चिडवण्याचा प्रयत्न केला. यावरुन त्याच्यावर बरीच टीकाही झाली. या दोघांमधल्य या वादाला किनार होती ती सध्याचा जगातला सर्वात चांगला फलंदाज कोण? या प्रश्नाची.

स्मिथ बॉल टॅम्परिंग प्रकरणाच्या वर्षभर आधी चांगलाच फॉर्मात होता. त्यामुळे विराट आणि स्मिथमधे जागतिक स्तरावरील एक नंबरचा फलंदाज ठरण्यासाठी मोठी चुरस लागली होती. रॅकिंगमधेही ते एकमेकांना वेळोवेळी पिछाडत होते. याच स्पर्धेचं रुपांतर त्यांच्यात आलेल्या कट्टरतेत झालं असावं.

हेही वाचा: पुरे झाली आता विराट कोहलीची कॅप्टनशिप?

आणि विराटचं सभ्यतेचं कातडं गळून पडलं

बॉल टॅम्परिंगच्या प्रकरणार स्मिथ बेनक्रॉफ्ट आणि वॉर्नरला ऑस्ट्रेलिया क्रिकेट जोरदार दणका देत १ वर्ष क्रिकेटपासूनच लांब राहण्याची शिक्षा दिली. या शिक्षेनंतर बऱ्याच गोष्टी बदलल्या स्मिथ अव्वल ठरण्याच्या स्पर्धेत पिछाडला गेला. त्यानंतर २०१८ ला भारताला ऑस्ट्रेलियात जाऊन खेळण्याची वेळ आली होती.  त्यावेळी कर्णधार विराटने नो स्लेजिंग असा नारा लगावला होता. विराटने हा नारा दिल्यानं सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या.

अरे हे वात्रट पोरगं सुधारलं कसं असं सर्वजण विचारू लागले. सर्वांनीच याची जोरदार चर्चा केली. पहिल्या काही सामन्यात विराटच्या देहबोलीवरच फोकस राहिला. पण, हा नारा फेल गेला ऑस्ट्रेलिया दौरा आणि वाद विवाद हे पाचवीला पुजल्यासारखं पंत आणि पेन यांच्यात ‘बेबीसिटर’ वाद उफाळून आला. त्यामुळे विराटचं सभ्यतेचं कातडं गळून पडलं.

विराट वात्रट आहे असा आपण शिक्का मारून रिकामे झालो. पण, याच शिक्क्यावर आपणाला विराटने पुन्हा विचार करायला लावला आहे. विराटचा जागतिक स्पर्धक स्टिव्ह स्मिथने एका वर्षानंतर ऑस्ट्रेलियाच्या संघात पुनरागमन केलंय. आयपीएलमधे चाचपडणाऱ्या स्मिथने वर्ल्डकप सुरु होताच आपला फॉर्म पुन्हा मिळवला. त्यामुळे आता भारत, ऑस्ट्रेलिया सामन्यावेळी या दोघांचे पुन्हा खटके उडतात का? अशी भिती व्यक्त होत होती पण, झालं उलटंच.

हेही वाचा: फूटबॉलपटूच्या किकने बदलला मुस्लिमांकडे बघण्याचा दृष्टिकोन

स्ट्रॅटेजिक आक्रमकपणा आणि स्वभावाची प्रेक्षकांकडून गल्लत

इतर वेळी भारतीय प्रेक्षकांना संघाचं मनोबल वाढवा असं सतत सांगणाऱ्या विराटने ओव्हलवरीच्या काही वात्रट भारतीय प्रेक्षकांना गप्प बसवलं. हे प्रेक्षक स्मिथला बॉल टॅम्परिंगच्या अनुषंगाने चिटर चिटर असं म्हणत चिडवत होते. हे वागणं पटलं नाही त्याने प्रेक्षकांना त्याला चिडवण्याऐवजी प्रोत्साहन देण्याचा सल्ला दिला.

ज्या विराटने ऑस्ट्रेलिया २०१७ ला भारताचा दौरा करत होती त्यावेळी याच स्मिथला वेडे वाकडे हावभाव करून चिडवण्याचा प्रयत्न केला होता. त्याला आता तो प्रोत्साहन देण्याचं आवाहन करत होता. याबद्दल स्मिथने त्याचे आभारही मानले. पण, आपण वात्रट समजत असलेला विराट अचानक सभ्य कसा काय झाला? तर विराट आक्रमक देहबोलीचा आहेच तो क्रिकेट खेळताना याच शैलीत खेळतो त्याला त्याचा फायदाही होतो असं खुद्द त्यानेच एका मुलाखतीदरम्यान सांगितलं होतं.

विराटचा आक्रमकपणा हा त्याच्या क्रिकेटिंग स्ट्रॅटेजीचा भाग मानला तर तो तसा वाईट खेळाडू नाही हे त्याने आपल्या वागण्यातून सिद्ध केलंय. त्याने या प्रकरणाबद्दल बोलताना सांगितलं होतं की स्मिथ ज्या परिस्थितीतून गेला आहे ती परिस्थिती माझ्यावरही येऊ शकते. त्याने केलेल्या प्रकाराबद्दल माफी मागूनही त्याला अशी वागणूक देणं योग्य नाही. म्हणूनच मी प्रेक्षकांना असं न वागण्याची विनंती केली होती.

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ॲशेस मालिकेमुळे जोरदार टशन पहायला मिळतं. त्यामुळेच दोन्ही देशातले चाहते एकमेकांवर टीका करणं, डिवचणं असे प्रकार करत असतात. त्यामुळेच त्यांनी वॉर्नर आणि स्मिथचे इंग्लंडमधे अशाच चिटर चिटरच्या घोषणेनं स्वागत केलं होतं. पण, या प्रकरणात भारतीय प्रेक्षकांनी पडण्याचं कारण नव्हतं. विराटने या प्रेक्षकांना गप्प बसवून आपला स्ट्रॅटेजिक आक्रमकपणा आणि स्वभाव यांची गल्लत घालू नका असाच संदेश आपल्या टीकाकारांना दिलाय.

हेही वाचा: 

मदतीला धावून येणाऱ्या टीम मॅनेजमेंटकडून नंतर वासीम जाफरने पैसेही घेतले नाहीत 

आता वर्ल्डकपसाठी धोनीला टाळता येणार नाही