फारुख इंजिनिअर बीसीसीआयच्या कारभारावर बोलले, त्यात चूक काय?

२० नोव्हेंबर २०१९

वाचन वेळ : ५ मिनिटं


बीसीसीआयची निवड समितीत नेहमीच वेगवेगळ्या कारणांनी वादात, चर्चेत राहते. सध्या ही समिती कॅप्टन विराट कोहलीच्या मर्जीत काम करत असल्याचा आक्षेप माजी क्रिकेटपटू फारुक इंजिनिअर यांनी घेतलाय. एवढंच नाही तर इंजिनिअर यांनी निवड समितीचे सदस्य अनुष्का शर्माला चहाचं कप भरून द्यायचंही काम करत असल्याचा खळबळजनक दावा केला. 

फटकळ फारुख इंजिनिअरने भारतीय क्रिकेट निवड समितीवर टीका करायला जाताना एक वाद ओढवून घेतला. त्याने अभिनेत्री आणि टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीची बायको अनुष्का शर्मा हिचा संदर्भ घेतला. त्यामुळे उलट इंजिनिअरवरच आता टीका होतेय.

नेमका वाद कशावरून?

निवड समितीच्या एका सदस्याने अनुष्काला चहा आणून दिल्याचं इंजिनिअरचं म्हणणं आहे. हे सदस्य हीच कामं करून विराटची मखलाशी करतात. त्यांची अजिबात लायकी नाही. हे पाच जण मिळून जेमतेम १७ इंटरनॅशनल मॅच खेळलेत असा इंजिनिअरचा आक्षेप आहे.

यावर अनुष्काने खुलासा केला की कधी खेळाडूंच्या भागात बसून मॅच बघत नाही आणि मूळात चहाच पीत नाही. माझावरच वारंवार टीका का होते? असा प्रश्नही तिने विचारलाय. दुसरीकडे भारतीय महिला क्रिकेट टीमच्या माजी कॅप्टन डायना एडूलजी यांनी इंजिनिअरचं क्रिकेट ज्ञान तोकडं असल्याचा हल्ला चढवला.

एडूलजींच्या मते, निवड समिती सदस्य एक मॅच खेळला म्हणून त्याला नालायक ठरवता येत नाही. आणि कुणी शंभर मॅच खेळलेला असला म्हणजे तो चांगला निवड समिती सदस्य होतोच असंही नाही. या अशा दोघा नावाजलेल्या नामांकीत महिलांकडून इंजिनिअरला झापलं गेलं. त्यामुळे इंजिनिअरला ज्या मुद्द्याकडे लक्ष वेधायचं होतं तो दूरच राहिला.

हेही वाचाः कलम ३७० रद्द केल्यानंतर काश्मीरमधला शेतकरी कोलमडलायः राजू शेट्टी

इंजिनिअर यांचा राग कुणावर?

इंजिनिअरचा खरा राग निवड समितीचे सदस्य खूप चांगले काम करताना दिसत नाहीत याबद्दल आहे. त्यांचं म्हणणं असं, की आज कोहलीच्या मर्जीवर टीमची निवड होते. हे सदस्य नावापुरतेच आहेत. त्यांचं विराटसमोर काही चालत नाही. याचं कारण एकतर विराटकडे आता भरपूर आंतरराष्ट्रीय अनुभव आहे. तो बॅटिंगमधे सातत्य ठेऊन आहे आणि कॅप्टन म्हणूनही छाप पाडलीय.

मग त्याला टोकण्याची किंवा त्याच्याबरोबर वाद घालायची हिंमत हे सदस्य कसं दाखवणार? तशात त्यांचा आंतरराष्ट्रीय अनुभव तर अगदीच बेताचा आहे. त्यामुळे ते दबून गेलेत आणि विराटची मर्जी राखायचे प्रयत्न करताहेत. इंजिनिअरच्या या टीकेत दम नक्कीच आहे.

पण त्याने अनुष्काच्या उपस्थितीवर फारसं भाष्य करायला नको होतं. अनुष्का अभिनेत्री असल्याने तिच्याकडे सर्वांचे लक्ष वेधलं जातंच. पण खरं तर इतर क्रिकेटपटूचा कुटुंब काबिलाही मॅच बघायला असतो. जेव्हा त्यापैकी कुणी अपयशी ठरतो तेव्हा कुणी फारसं त्यांच्या बायकोच्या उपस्थितीवर बोलत नाही. अनुष्का मात्र नेहमीच टार्गेटवर येते. कारण ती मुळात वलयांकित आहे.

आता निवड समितीच्या कारभाराबद्दल मात्र इंजिनिअर यांनी केलेली टीका अगदीच अनाठायी नाही. या निवड समितीच्या कमी आंतरराष्ट्रीय अनुभवाबद्दल बोलायची गरज नाही. कारण ऑस्ट्रेलियातसुद्धा कमी आंतरराष्ट्रीय अनुभव असलेले सदस्य निवड समितीवर आहेत आणि ते आपलं काम चोखपणे पार पाडताना दिसतात.

चौथ्या क्रमांकाचा शोध संपता संपेना

सुमारे ४० वर्षांपूर्वी तर फर्स्ट क्लास क्रिकेट खेळलेले इयॉन इनवेरॅरिटी हे ऑस्ट्रेलियन बोर्डाचे अध्यक्ष होता. त्यांनीच ऑस्ट्रेलियाची बलाढ्य टीम तयार करून दाखवली. तेव्हा तो आंतरराष्ट्रीय अनुभवात कमी असूनही कौतुकाचा विषय ठरला होता. पण भारताचे सध्याचे जे निवड समिती सदस्य आहेत ते नेमकं कुठल्या दिशेने चाललेत तेच समजत नाही.

बघावं तर प्रत्येक मालिकेत आणि दौऱ्यात दोन तरी अगदी नवोदित खेळाडूंना ते निवडतात. त्यांनी भारताची टोपी अगदी स्वस्त केल्यासारखी आहे. ज्यांना निवडतात त्यांना एक दोनवेळा संधी देऊन बाहेर काढलं जातं. मग पुन्हा आठवण आल्यागत परत कधी तरी त्यांना खेळवलं जातं. आता नवदीप सैनी आणि शार्दूल ठाकूर यांच्या बाबतीत आत-बाहेर प्रकार झालाय.

या निवड समितीला संपूर्ण विश्वचषक स्पर्धेत चौथ्या क्रमांकाचा बॅट्समन ठरवता आला नाही. याचाच फटका टीम इंडियाला बसला. वास्तविक या जागेसाठी खूप आधीपासून तरतूद व्हायला हवी होती. अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा यांना निवड समितीने वनडे क्रिकेटच्या लायकीचे नाहीत असं आधीच ठरवून टाकलेलं दिसतंय. खरं तर या दोघांना इंग्लंडमधे न्यायलाच हवं होतं. 

हेही वाचाः कॉमन मिनिमम प्रोग्रामः सत्तेसाठी एकत्र यायचं की विकासासाठी?

ऑलराऊंडरही निवडता आला नाही

ऑलराऊंडर म्हणून कुणा खेळाडूची पाठराखण करणंही या समितीला जमलेलं नाही. रवींद्र जडेजा, हार्दिक पंड्या आणि विजयशंकर यांची नावं घेतली जातात. जडेजाला मध्यंतरी डच्चू दिला गेला होता. विजय शंकरच्या मर्यादा अनेकदा स्पष्ट झाल्यात. आणि पंड्या नको तितका उतावळा असल्याने मैदानाबाहेरच्या लीला करण्यातच मश्गूल दिसलाय.

या समितीने अश्विन-जडेजा ही जमलेली फिरकी जोडीही बसवली. त्याऐवजी कुलदीप यादव, युजुवेंद्र चहल यांना पसंती दिली. वर्ल्डकपनंतर या जोडीलाही आता गुंडाळलं गेलंय. रविचंद्रन अश्विन हा फिरकीपटू असताना आता तो कसोटीपुरता राहिलाय.

या निवड समितीला महेंद्रसिंग धोनीचं काय करायचं, हेही नीट समजत नाहीय. महान खेळाडूला त्याच्या निवृत्तीबाबत सक्ती करायची नसते. त्याला विश्वासात घेऊन कल्पना द्यायची असते. पण भारतात अगदी सचिन तेंडूलकर, राहुल द्रविड, सौरव गांगुली, वी. वी. एस. लक्ष्मण यांच्याबाबतीतही निवड समितीने म्हणावी तशी आपुलकी दाखवली नव्हती हा इतिहास आहे. 

निवड समितीचा चक्रावणारा इतिहास

खरं तर भारतीय निवड समितीचा इतिहास चक्रावणारा आहे. फार पूर्वी तर हे काम कुणीही करायचं. नवाब आणि महाराजे निवडायचं आणि खेळायचं. मग दत्तारे नावाचा कुणी निवड समितीवर होता. तो होता फुटबॉलवेडा. तो मॅच बघताना झोप काढायचा आणि कुणी चौकार मारला तर खडबडून उठत गोल असं ओरडायचा. असे विनोद भारतातच घडू शकतात. आता निदान खरोखरचं क्रिकेट खेळणारे निवड समितीवर आहेत हे नशीब.

विराट कोहलीच्या आधी मोहम्मद अझरूद्दीन कॅप्टन असताना त्याची अभिनेत्री असलेली मैत्रीण संगीता बिजलानीही सर्वांचं लक्ष वेधून असायची. अझरला फोन केला तर ती उचलायची. इंग्लंडचा जेफ बॉयकॉटने भारताचा बारावा खेळाडू अशी तिची संभावना केली होती. तेव्हा विराटनेही आपल्या वलयांकित बायकोचा वावर स्टेडियमवर मर्यादित राहील हे बघायला हवं. आणि निवड समिती आपल्या खिशात आहे असं वागू नये.

भारतात प्रतिभावंत, गुणी खेळाडूंची वाण नाही. त्यामुळे सर्वांना खूश ठेवण्याची कसरत निवड समितीने करू नये. क्रिकेट व्यावसायिकपणे खेळावं, धंदेवाईकपणे नव्हे. इंजिनिअरला फक्त हेच सांगायचं असावं.

हेही वाचाः 

कधीकाळी बालिश वाटणाऱ्या विराटची प्रगल्भ तिशी

सौरव गांगुली बीसीसीआयमधे दादागिरी करू शकेल?

श्रमिक कष्टकऱ्यांचा आवाज लोकशाहीर द ना गव्हाणकर

निवड समिती रोहित शर्माला टेस्ट क्रिकेटमधे नारळ देणार?

सगळं संपलंय, असं वाटेल तेव्हा शाहबाज नदीमची ही गोष्ट वाचा