विराट कोहलीला अद्दल घडवणारी लीड्स कसोटी

३१ ऑगस्ट २०२१

वाचन वेळ : ४ मिनिटं


इंग्लंडविरुद्ध लीड्स कसोटी मॅचमधे भारताचा दारुण पराभव झाला. पहिल्या दोन कसोटीत इंग्रजांच्या छाताडावर नाचणारा भारत बॅकफूटवर आला. विराट कोहलीची अवाजवी आक्रमकता आणि अतार्किक टीम निवडीचा बालहट्ट यामुळेच हे झालं. लीड्सने विराट कोहलीला चांगलीच अद्दल घडवली आहे. आता या चुकांमधून विराट शिकणार की आपला हट्टीपणा सोडणार नाही हे काळच ठरवेल.

इंग्लंड विरुद्ध भारताच्या लीड्स कसोटीत तिसऱ्या दिवसअखेर विराट कोहली आनंदाने मैदान सोडताना दिसला. टीम इंडियासाठी लीड्स कसोटीतला तोच एक समाधानाचा क्षण होता. चौथ्या दिवसाची भारतीय चाहते मोठ्या अपेक्षेने वाट पाहत होते. कारण त्यांना विराट सेना २००२ मधल्या इतिहासाची पुनरावृत्ती करणार आहे असा गाढ विश्वास होता.

मात्र चौथ्या दिवसाचा खेळ सुरु झाला आणि भारतीय प्रेक्षकांची उत्सुकता निराशेत बदलली. ज्याच्या शतकाची सर्वचजण चातकासारखी वाट पाहत होते तो पुजारा ९१ धावांवर बाद झाला. सर्वांच्याच मनात शंकेची पाल चुकचुकली.

हेही वाचा: आरसीबीचा विराट म्हणजे उथळ पाण्याला खळखळाट फार!

चाचपडणारा ‘आक्रमक’ विराट

खेळपट्टीवर अजूनही विराट कोहली होता त्यामुळे सर्व चाहते पुजाराच्या दुःखातून सावरत टीवीकडे डोळे लावून बसले. विराटचा वैरी अँडरसन बॉलवर विराटचा ऑफ स्टम्पच्या बाहेर सारखा पाळणा हलवत होता. त्यामुळे भारतीय चाहत्यांचा बीपी चेंडूगणिक हाय होत होता. दरम्यान विराट विरुद्ध दोन अपिल झाल्या होत्या, त्यात तो थोडक्यात बचावला होता.

विराट कोहलीने आपलं अर्धशतक पूर्ण केलं. या अर्धशतकाचा आनंद फार काळ टिकला नाही. ऑली रॉबिन्सनने त्याला ऑफ स्टम्पच्या बाहेर जाणारा आऊट स्विंग टाकला आणि आपल्या हट्टी विराट बाळाने तो खेळला. तो बॉल विराटच्या बॅटची कडा घेऊन रुटच्या हातात विसावला आणि भारताच्या ड्रेसिंगरुमवर पराभवाचे ढग गडद झाले.

विराट कोहली पुन्हा एकदा त्याच स्टाईलमधे बाद झाला. तो बाद होताच सुनिल गावसकरांचे शब्द आठवले. ‘आता बस झालं.. विराटने त्वरित सचिन तेंडुलकरला फोन करुन काय चुकत आहे हे विचारण्याची गरज आहे.’ पण, विराटने जरी तेंडुलकरला फोन केला तरी त्याच्यात सुधारणा होईल का?

तेंडुलकरसारखं बलिदान जमेल?

सचिन तेंडुलकरही विराट सारखाच सातत्याने एकाच प्रकारे बाद होता होता. सचिन तेंडुलकरची स्ट्रेट ड्राईव बरोबरच ऑफ स्टम्प आणि मिडल स्टम्पवर पडलेला चेंडू फ्लिक करण्यात महारत होती. पण त्याच्या कारकिर्दीत असा क्षण आला की तो हा फ्लिक शॉट खेळताना सातत्याने बाद होऊ लागला.

हा फटका खेळताना त्याच्या बॅट आणि पॅडमधे मोठा गॅप निर्माण होत होता. याचाच फायदा जगभरातले बॉलर घेऊ लागले. सातत्याने फ्लिकवर बाद होत असलेल्या सचिन तेंडुलकरने तो आवडता फटका खेळण्यावर नियंत्रण आणलं. विराट सध्या अशाच फेजमधून जात आहे. त्याला ऑफ स्टम्पच्या बाहेरचा चेंडू ड्राईव करण्याचा मोह आवरत नाही.

पण हाच फटका मारताना तो इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडसारख्या वेगवान बॉलरना साथ देणाऱ्या देशात त्याच्यासाठी अवघड जागेचं दुखणं झालंय. आता हट्टी विराट कोहली तेंडुलकरसारखं हा फटका जोपर्यंत चेंडू स्विंग होत आहे तोपर्यंत न खेळण्याचं पथ्य पाळणार का?

हेही वाचा: महात्मा गांधींचं क्रिकेटशी नातं सांगणारे हे किस्से आपल्याला माहीत आहेत का?

ऑफ स्टम्पच्या बाहेर लाळ टपकते

विराट कोहली ऑफ स्टम्प बाहेरचा बॉल खेळून बाद होतो हे आता गल्लीतलं शेंबडं पोरगंही सांगेल. याच्यावर सोपा उपाय काय तर तो चेंडू विकेट सोडूनच जात आहे. मग त्याला त्याच्या मार्गाने जाऊ द्यावं उगाच त्याला टोलावण्याचा अट्टाहास करु नये. हा उपाय कोणताही क्लब स्तरावरचा खेळाडूही सांगेल.

एवढा सोपा सल्ला विराट कोहलीच्या कानात का शिरत नाही. तर याला कारण म्हणजे विराट कोहलीचा आक्रमकतेचा बालहट्ट. विराट कोहलीला यापूर्वीही अनेकदा वरिष्ठ खेळाडूंनी कसोटीत प्रत्येक वेळी आक्रमक असणं योग्य नाही हे सांगितलंय. पण विराटच तो ऐकेल कसा?

पण, या हट्टी विराट कोहलीला लीड्स कसोटीनेच अद्दल घडवली. पहिल्या डावात नाणेफेक जिंकून त्याने बॅटिंग घेतली. खेळपट्टी तशी बॅटिंगला पोषकच होती. पण विराट कोहलीचा ड्रेसिंग रुममधे दंडक आहे की सर्वांनी आक्रमकपणे आणि धावा करण्याच्या इराद्यानेच बॅटिंग करायची. तशी बॅटिंग टीमने केली आणि धावफलकावर लागल्या ७८ धावा.

पिकल्या पानावर विराटचा सट्टा

हा इंग्रजांच्या मायभूमीत झालेला हा टीम इंडियाचा अपमान बॉलर धुवून काढतील अशी अपेक्षा होती. लॉर्ड्सवर तर त्यांनी इंग्रजांना यमुनेचं पाणीच पाजलं होतं. पण तसं काही घडलं नाही. कारण आपण एकाच प्रकारचे वेगवान बॉलर घेऊन खेळलो. या वेगवान बॉलरना हवेत स्विंग करण्यात अडचणी येतात.

इशांत शर्मा तर पिकलं पान आहे. पण, या पिकलेल्या पानावर सट्टा लावण्यात विराटला मोठी धन्यता वाटते. या इशांत शर्मानेच लीड्स कसोटीत घात केला. पहिल्या कसोटीत शार्दुल ठाकूरने मोक्याच्या क्षणी भारताला विकेट मिळवून दिली होती. त्याने गेल्या काही काळात पार्टनरशिप ब्रेकर म्हणून आपली ओळख तयार केली होती.

मात्र त्याला लॉर्ड्सवर कट्टा दाखवण्यात आला. लीड्सवरही त्याच्यावर विराट कोहली दया दाखवू शकला नाही. त्याला हाच हट्टीपणा आणि वेग, बाऊन्सचे प्रेम लीड्स कसोटीत महागात पडले. लॉर्ड्स कसोटी १५१ धावांनी जिंकणार लीड्स कसोटीत भारत एक डाव आणि ७६ धावांनी पराभूत झाला.

पहिल्या दोन कसोटीत इंग्रजांच्या छाताडावर नाचणारा भारत बॅकफूटवर आला. आता तरी विराट कोहली अवाजवी आक्रमकता आणि अतार्किक टीम निवडीचा बालहट्ट सोडणार की हा बालहट्ट मालिका गमावूनच स्वस्थ बसणार. लीड्सने विराट कोहलीला चांगलीच अद्दल घडवली आहे. आता या चुकांमधून विराट शिकणार की आपला हट्टीपणा सोडणार नाही हे आता येता काळच ठरवेल.

हेही वाचा: 

महेंद्र सिंग धोनी: वनडेतला ‘ग्रेट फिनिशर’

ख्रिश्चनांच्या पंढरीत अवतरलीय धर्मगुरूंची क्रिकेट टीम

फूटबॉलपटूच्या किकने बदलला मुस्लिमांकडे बघण्याचा दृष्टिकोन

भारत उगाच वर्ल्डकप खेळत नाही, तिथे घसघशीत कमाईही होते