आता वर्ल्डकपसाठी धोनीला टाळता येणार नाही

१६ मार्च २०१९

वाचन वेळ : ६ मिनिटं


सुरवातीच्या दोन मॅच जिंकूनही मायदेशातली ऑस्ट्रेलियाविरुद्धची वनडे सिरीज विराटसेना हरली. त्यामुळे टीम इंडियाच्या उणिवा उघड झाल्यात. अशावेळेस विराट कोहली आणि रवी शास्त्री धोनीशिवाय टीमचा विचारही करू शकत नाही. आता धोनीला पर्याय नाही.

क्रिकेट वर्ल्डकप २०१९ चं काऊंडडाऊन सुरू झालंय. सगळ्याच टीम वर्ल्डकपची कसून तयारी करताना दिसताहेत. दोनवेळा वर्ल्डकप जिंकलेली टीम इंडिया यंदाही विजेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे. गेल्या वर्षभरातली कामगिरी पाहता भारताकडून तमाम भारतीय क्रिकेटरसिकांना विराट कोहलीच्या नेतृत्वातल्या टीमकडून खूप मोठ्या अपेक्षा आहेत. त्यातही ऑस्ट्रेलियातल्या कामगिरीमुळे भारतीय फॅन्सच्या अपेक्षा आणखी उंचावल्यात.

कांगारूंविरोधातली चाचणी परीक्षा

वर्ल्डकपच्या कठीण परीक्षेआधी भारताची पुन्हा एकदा कांगारूंशी गाठ पडली. मात्र या चाचणी परीक्षेत टीम इंडिया नापास झाली. खरंतर भारताची ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच मॅचच्या सिरीजमधे दोन विजयासह दणक्यात सुरवात झाली होती. तरीही कांगारुंनी जबरदस्त कमबॅक करत सिरीज ३-२ ने खिशात घातली. या पराभवामुळे टीम इंडियाच्या वर्ल्डकपच्या तयारीला मोठा धक्का बसलाय.

पहिल्या दोन मॅचमधे विजय मिळवणाऱ्या भारताने सिरीज गमावण्याची अनेक कारणं आहेत. या सिरीजमधली सगळ्यात चिंतेची बाब प्रकर्षाने जाणवली ती चौथ्या आणि पाचव्या मॅचमधे. मोहाली इथे झालेल्या चौथ्या मॅचमधे भारताने पहिल्यांदा बॅटींग करत ३५८ धावांचा डोंगर रचला होता. हे आव्हान कांगारुंना पेलणं काही शक्य नाही असं वाटत असताना त्यांनी ५ गडी आणि १३ बॉल राखून ही मॅच खिशात घातली आणि सिरीजमधे बरोबरी साधली.

ही मॅच आपण का गमावला याची अनेक कारणं आहेत. तरी महत्त्वाचं कारण म्हणजे या मॅचमधे विकेटकीपर महेंद्रसिंह धोनीचं नसणं. आता अनेकांना प्रश्न पडेल की भारताने धावांचा डोंगर तर रचला होता आणि धोनीने बॅटिंग करून काय साधलं असतं? मात्र इथे अनेकांची गल्लत होईल. कारण बॅट्समॅन धोनीपेक्षा टीम इंडियाला विकेटकीपर धोनीची जास्त गरज आहे. कारण धोनीने बॅटिंगपेक्षा स्ट्म्पच्या मागे राहून टीमसाठी मोठं योगदान दिलंय.

धोनीचं विकेटकिपिंग अफलातून

धोनीचा फिटनेस, त्याची स्टम्पमागची चपळता, बॅट्समॅनला स्टम्पिंग किंवा रनआऊट करण्याची क्षमता याबाबत कुणाच्या मनात शंका नसेल. अनेकांना बांगलादेशसोबतची ती मॅच नक्कीच आठवत असेल. धोनीने अखेरच्या बॉलवर बांगलादेशी बॅट्समॅनला रनआऊट करत भारताला विजय मिळवून दिला होता. धोनीचं विकेटकिपिंग कौशल्य अफलातून आहे. ते वेळोवेळी सिद्धही झालंय.

पापणी लवते न लवते तोच बॅट्समॅनला स्टम्पिंग करणं किंवा मग बॅट्समॅनच्या ध्यानीमनी नसताना अनोख्या पद्धतीने फिल्डरकडून आलेला थ्रो स्टम्पवर ढकलणं असो यात धोनीचा हात कुणीच पकडू शकत नाही. त्यामुळे आजघडीला भारताकडे धोनीसारखा दुसरा विकेटकीपर नाही हे वास्तव आहे. रिषभ पंत काय किंवा दिनेश कार्तिक काय दोघंही धोनीच्या आसपासही नाही हे साऱ्यांनाच मान्य आहे. हे तर झालं धोनीच्या विकेटकिपिंग कौशल्याविषयी.

त्यामुळे कॅप्टन विराट कोहली आणि टीम इंडियाच्या मॅनेजमेंटला धोनी २०१९ च्या वर्ल्डकपसाठी हवाय. धोनीच्या गैरहजेरीत मोहालीच्या चौथ्या आणि दिल्लीतल्या वनडे मॅचमधे या गोष्टी भारताने मिस केल्या. धोनीच्या गैरहजेरीत टीममधे असलेल्या रिषभ पंतचा कमी अनुभव, विकेटकिपिंगमधल्या चुका दोन्ही मॅचमधे भारतीय टीमला महाग पडल्या.

टीम इंडियाचा अर्धा कॅप्टन

या गोष्टीसोबत आणखी एका गोष्टीमुळे टीम इंडियाला आणि विशेषतः कॅप्टन कोहलीला धोनीची जास्त गरज आहे. धोनीचं टीममधे असणं म्हणजे कोहलीसाठी मोठा आधार असतो. क्षेत्ररक्षणावेळी धोनीचं विकेटकीपर असणं कोहलीसाठी सगळ्यात मोठा दिलासा असतो. माजी कॅप्टन आणि तोही वर्ल्डकप विजेता टीमचा लीडर असलेल्या धोनीचा अनुभव भारतीय टीमसाठी आणि विराटसाठी खूप महत्त्वाचा आहे.

टीम इंडियाला लाभलेल्या अनेक महान कॅप्टनमधे धोनीचं नाव अग्रक्रमाने घेतलं जातं. धोनीचा एक उत्तम कॅप्टन म्हणून तर नावलौकीक आहेच, शिवाय त्याला क्रिकेटची चांगली जाण आहे. कोणत्या क्षणी काय डावपेच आखायचे हे तो चांगलं जाणतो. क्रिकेटमधे दोन पद्धतीने निर्णय घेतले जातात. एक म्हणजे मॅच जसा पुढे जाईल त्या पद्धतीने पुढे नेला जातो किंवा मग बॅट्समॅन आणि बॉलर्सच्या मनातलं ओळखून डावपेच आखणं.

जो कॅप्टन किंवा जो क्रिकेटर दुसऱ्या पद्धतीने म्हणजेच समोरचा चाल करण्याआधी स्वतः चाल रचतो तो सर्वात यशस्वी ठरतो. बॉलर काय बॉल टाकणार हे सचिन तेंडूलकर चांगलं ओळखायचा. त्यामुळेच तर तो शतकांचा बादशाह बनला. तेच बॅट्समन विराटबद्दलही म्हणता येईल. हीच गोष्ट क्रिकेटर धोनीबाबतही तितकीच लागू पडते.

स्ट्म्पसमागचा मार्गदर्शक

खासकरून विकेटकिपिंग करताना बॅट्समॅनच्या मनात काय चालू आहे ते हेरण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. त्यामुळेच कॅप्टनपद सोडल्यानंतरही तो आजही बॉलर्सना फिल्डिंग लावण्यात किंवा त्यांनी कशारितीने बॉलिंग करावी याबाबत तो मार्गदर्शन करताना दिसतो. गेल्या वर्षभरात तर त्याने विकेटकीपर धोनीच्या याच मार्गदर्शनाचा बराच फायदा कुलदीप आणि चहल या युवा स्पिनर्सना झाला. 

स्ट्म्पसच्या मागून धोनीने केलेल्या मार्गदर्शनामुळे या दोघांच्या फिरकीची धार आणखी वाढलीय. बॅट्समनला चकवा देण्याबाबत धोनीचा कानमंत्र कुलदीप आणि चहल यांच्यासाठी मोलाचा ठरला. वनडेमधे तर धोनी टीम इंडियाचा निम्मा कॅप्टन आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. कारण फिल्डींग लावण्यापासून ते बॉलर्सना मार्गदर्शन करण्यापर्यंत धोनी योगदान देत असतो.

धोनी कॅप्टन कोहलीला सातत्याने काहीना काही बदल सुचवत असतो. त्याच्या याच मार्गदर्शनाचा फायदा टीमला झाला हे कुणीच नाकारू शकत नाही. इतकंच काय तर डीआरएस वापरण्याबाबतचा निर्णय घेण्यातही धोनीचा हात कुणीच धरू शकत नाही. डीआरएसचा निर्णय कधी घ्यावा किंवा घेऊ नये याबाबत धोनीचा अंदाज ९० टक्के बरोबर ठरल्याचं अनेकदा पाहायला मिळालंय.

याच गोष्टीमुळे भारताचे महान फिरकीपटू आणि माजी क्रिकेटर बिशनसिंग बेदी यांनी धोनीला भारताचा निम्मा कॅप्टन असं म्हटलंय. विराटचं नेतृत्वकौशल्य आणि कॅप्टनपद हे धोनीशिवाय अपूर्ण असल्याचंही त्यांनी नमूद केलं. धोनी टीमचा जवळपास निम्मा भार सांभाळतो. त्यामुळे त्याला विश्रांती का दिली असा सवालही बेदी यांनी केलाय. ३५९ रन्सचं खडतर आव्हान असताना आणि कांगारुंची निम्मी टीम गारद केलेली असतानाही भारतानं मॅच गमावली. त्यावेळी कुलदीप आणि चहल या युवा फिरकीपटूंना मार्गदर्शन करण्यासाठी धोनी नव्हता.

धोनीची कमतरता जाणवली

ऍश्टन टर्नर भारतीय ब़ॉलर्सची धुलाई करत असताना कोहलीला कानमंत्र देण्यासाठी स्टम्पच्या मागे धोनी नव्हता. त्याची उणीव प्रत्येकक्षणी जाणवली. धोनीच्या गैरहजेरीत कोहलीलाही निर्णय घेताना अडचण येत असल्याचं बघायला मिळालं. त्यामुळेच कांगारुंनी अगदी आरामात ३५९ रन्सचा पाठलाग केला.

दिल्लीतल्या शेवटच्या मॅचमधेही असंच काहीसं झालं. मात्र यावेळी बॅट्समॅन धोनीची कमतरता जाणवली. २७३ रन्सचा पाठलाग करताना भारताने सुरवातीचे बॅट्समॅन लगेच गमावले. रोहितनं झुंज दिली खरी मात्र तोही बाद झाला. त्यानंतर आलेला रिषभ पंत आणि विजय शंकरही काही करू शकले नाही. केदार आणि भुवनेश्वर कुमारने पराभव लांबवण्याचा काहीसा प्रयत्न केला. मात्र धावांचा वेग वाढवण्याच्या नादात ते दोघंही बाद झाले.

त्यावेळी धोनीसारखा कूल बॅट्समन असता तर मॅचचा निकाल बदलला असता असं अनेकांना वाटतं. धोनीने केदारच्या सोबतीने मॅच शेवटच्या बॉलपर्यंत नेली असती. कदाचित विजयही मिळवून दिला असता असंही काही फॅन्सनी म्हटलं. अशाच पद्धतीने दोघांनी भारताला ऑस्ट्रेलियात विजय मिळवून दिला होता. त्यामुळे पाचव्या मॅचमधे बॅट्समॅन धोनीची कमतरता प्रकर्षाने जाणवली.

टीम इंडियामधे धोनीचं स्थान काय, त्याची अनुपस्थिती भारताला किती महाग पडू शकते याची उत्तरं मोहाली आणि दिल्लीतल्या मॅचने साऱ्यांना दिलीत. वयानुसार धोनीचा बॅटिंगमधला आक्रमकपणा कमी झाला असला तरी शांत डोक्याने निर्णय घेण्याचा त्याचा अंदाज भारतासाठी मोलाचा आहे. धोनीची निर्णयक्षमता, चपळता, बॉलर्सना मार्गदर्शन आणि कठीणप्रसंगी कॅप्टन कोहलीला सल्ला या गोष्टीकडे या घडीला तरी कानाडोळा करता येणार नाही. त्यामुळेच धोनीचे चाहते म्हणतात ना, अनहोनी को होनी कर दे उसका नाम है धोनी.