कोरोनाच्या साथीनंतर गेल्या कित्येक महिन्यांपासून दररोज नवनवीन जीवजंतूंच्या नावांची चर्चा होतेय. सध्या मंकीपॉक्स आणि स्वाईन फ्लूची चर्चा सुरू आहे. वास्तविक, हे सर्व वायरस अचानक जन्माला आलेले नाहीत. मुलाच्या जन्मापासून ते पाच वर्षांपर्यंत अंदाजे ४ हजार प्रकारचे वायरस, बॅक्टेरिया, बुरशी आणि इतर रोगजंतू त्याच्यावर आक्रमण करत असतात. या आक्रमणांना समर्थपणे तोंड देतच मानवी प्रतिकारशक्ती विकसित होतेय.
मार्च २०२०च्या मध्यावधीपासून सुरू झालेला वायरस या नावाचा जप काही केल्या कमी होताना दिसून येत नाही. सुरवातीला काही आठवड्यात, नंतर महिन्यात आणि शेवटी शेवटी वाटलं की, एका वर्षात तरी वायरस या शब्दप्रयोगातून सुटका होईल; पण असं झालं नाही.
ऑक्टोबर २०२०पर्यंत भारतातल्या सर्वच लोकांचा असा समज होता की, वायरस म्हणजेच कोरोना. पण तो फारच मोठा गैरसमज आहे, हे नोव्हेंबर २०२०ला समजलं, जेव्हा ब्रिटनमधून पहिल्यांदा कोरोना वायरसचा नवीन स्ट्रेन जगभरात पसरला.
वायरस प्राण्यांसारखाच स्वतःमधे बदल घडवतो. तो वयोवृद्ध लोकांसारखा उपचारांना प्रतिसाद देत नाही. तो बहुरूप्यांसारखा नवनवीन रूपांत पुन्हा समोर येतो. अशा वायरसबद्दलच्या नानाविध गोष्टी हळूहळू लोकांसमोर येऊ लागल्या. आजवर वायरस हे सर्व गुणधर्म काही ठरावीक शास्त्रज्ञांनाच माहीत होते. आता मात्र हे सर्वमान्य झालेत.
अलीकडच्या काही महिन्यांत वायरसचे इतर प्रकारही असू शकतात, हेपण माध्यमांमुळे लोकांसमोर येऊ लागलं. कोरोना वायरस, त्यानंतर म्युकर मायक्रोसिस बुरशी आणि आता काही दिवसांपासून ज्या वायरसचं नाव दररोज बातम्यांमधे येतंय. तो मंकीपॉक्स किंवा मारबुर्ग वायरस अशा साखळीने लोकांसमोर वायरसच्या किंवा निसर्गातल्या सूक्ष्मजीवांच्या नवीन प्रजाती आपल्यासमोर येत आहेत.
बहुतांश लोकांचा आजही गैरसमज आहे की, हे सर्व सूक्ष्मजीव किंवा जंतू प्रजाती जगातल्या कुठल्या तरी देशातल्या प्रयोगशाळेत तयार केले जात आहेत. पण असं नाही. मानव खूप प्रगत आहे, पण तो इतकाही प्रगत झाला नाही की, नवीन प्रकारचे सूक्ष्मजीव; मग ते वायरस, बॅक्टेरिया, किंवा बुरशी हे प्रयोगशाळेतच तयार करेल.
आज आपल्याला माहीत होत असलेले वायरस किंवा इतर जंतू मानवाच्या आधीपासून कोट्यवधी वर्षांपासून पृथ्वीवर आहेत आणि पुढेही ते राहतील. उदाहरणच द्यायचं झालं, तर कोरोना वायरस हा लाखो वर्षांपासून वटवाघळांमधे राहतो. कोरोनाचा उपप्रकार असणार्या मर्स या वायरसचा अधिवास उंटांमधे आहे. आश्चर्य म्हणजे मंकीपॉक्सचा अधिवास लाखो वर्षांपासून मानवातच आहे.
हेही वाचा: कोरोना वायरसः मोदींनी कुणाकडून घेतली जनता कर्फ्यूची आयडिया
काही दिवसांपासून जगभरातल्या माध्यमांमधे मंकीपॉक्स या विषाणूजन्य आजाराबद्दल नवनवीन माहिती समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी ‘वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन’ने मंकीपॉक्ससाठी उच्च पातळीचा इशारा दिला आहे आणि या वायरसच्या संसर्गाला ‘आंतरराष्ट्रीय चिंतेची सार्वजनिक आरोग्य आणीबाणी’ म्हणून घोषित केलंय.
मंकीपॉक्स रोग हा मंकीपॉक्स या वायरसमुळे होणारा एक रोग आहे. हा वायरस चेचक अर्थात स्मॉलपॉक्स ज्या वायरसमुळे होतो, त्याच कुटुंबातला आहे. काही वर्षांपासून हा रोग पश्चिम आणि मध्य आफ्रिकेसारख्या प्रदेशांमधून पसरला, असा गैरसमज होता; पण काही संशोधकांच्या मते, हा रोग सर्वात आधी युरोपमधल्या डेन्मार्क देशामधे सापडला आहे. कालांतराने आफ्रिकेमार्गे हा आजार संपूर्ण जगभर पसरला.
काही दिवसांपूर्वी भारतात परदेश प्रवासाचा कोणताही इतिहास नसलेल्या दिल्लीतल्या एका ३४ वर्षीय पुरुषाची मंकीपॉक्सची चाचणी सकारात्मक आढळली. आज देशातल्या मंकीपॉक्स बाधित पेशंटची संख्या सध्या चार झालीय. केरळमधे यापूर्वी मंकीपॉक्सची तीन प्रकरणं समोर आली होती.
मंकीपॉक्स रोग हा या वायरसने संक्रमित व्यक्ती किंवा प्राण्याद्वारे मानवांमधे संक्रमित होऊ शकतो. काही वेळा हा वायरस दूषित सामग्रीद्वारेही पसरू शकतो. उदाहरणार्थ - मंकीपॉक्स बाधित व्यक्तीच्या शरीरातला द्रवपदार्थ, जखमा, श्वासोच्छ्वासाचे थेंब आणि संक्रमित व्यक्तीच्या बिछान्यासारख्या सामग्रीच्या जवळ आल्याने याचा संसर्ग होऊ शकतो. रक्त, शारीरिक द्रव किंवा संक्रमित प्राण्याच्या त्वचेच्या किंवा श्लेष्मल त्वचेच्या जखमांच्या थेट संपर्कात आल्याने वायरसचा प्राण्यापासून मानवापर्यंत प्रसार होऊ शकतो.
मानवासहित माकडांच्या अनेक प्रजातींसह इतर प्राणी या वायरसने संक्रमित झाल्याचं आढळून आलंय. त्यामुळे अशा संसर्गित प्राण्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांना संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, मंकीपॉक्स चेचकसारखा संसर्गजन्य नाही आणि त्यामुळे गंभीर आजार होत नाही. वायरसचा उष्मायन काळ किंवा संसर्गापासून लक्षणं दिसू लागेपर्यंतचा कालावधी ६ ते १३ दिवसांचा असतो. काही वेळा तो ५ ते २१ दिवसांच्या दरम्यान असू शकतो.
या वायरसची लागण झालेल्या व्यक्तीला ताप, तीव्र डोकेदुखी, पाठदुखी, स्नायू दुखणं, तीव्र अस्थिनिया आणि लिम्फॅडेनोपॅथी किंवा लिम्फ नोड्समधे सूज येऊ शकते. साधरणपणे ही लक्षणं पाच दिवस टिकू शकतात. त्वचेचा उद्रेक सामान्यतः ताप दिसल्यानंतर एक ते तीन दिवसांनी होतो. चेहर्यावर आणि शरीराच्या हातापायांवर पुरळ अधिक प्रमाणात दिसतात.
मंकीपॉक्सच्या ९५ टक्के केसेसमधे हे पुरळ चेहर्यावर परिणाम करते, तर ७५ टक्के केसेसमधे हातांचे तळवे आणि पायांच्या तळव्यांवर परिणाम करते. या वायरसचा प्रसार रोखण्यासाठी, एखाद्याने अपुरं शिजवलेलं मांस आणि इतर प्राणीजन्य पदार्थ खाणं टाळलं पाहिजे. संक्रमित व्यक्तीशी थेट संपर्क टाळला पाहिजे, वायरसची लागण झालेल्या लोकांशी शारीरिक अंतर राखलं पाहिजे. संक्रमित व्यक्तीच्या बिछान्यासारखी सामग्री वापरू नये.
हेही वाचा: एकदा बरं झाल्यानंतर पुन्हा कोरोनाचा संसर्ग होतो का?
मंकीपॉक्सच्या बरोबरीने स्वाईन फ्लू या वायरसचे काही पेशंट सध्या महाराष्ट्रासह केरळ, उत्तर प्रदेश, राजस्थान राज्यांमधे आढळल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. हा रोग भारतीयांना नवा नसून, २००९ला याची एक साथ भारतामधल्या काही राज्यांमधे आली होती.
स्वाईन फ्लू किंवा इन्फ्लूएंझा हा इन्फ्लूएंझा वायरसचा एच१ एन१ प्रकारामुळे होणारा श्वसन विषाणूजन्य रोग आहे. या वायरसचा प्रसार हवेतून होतो किंवा रोगी व्यक्तीच्या शिंकेतून येणार्या द्रव थेंबापासूनपण होतो. याचा उष्मायन कालावधी २ ते ८ दिवसांचा असतो आणि हा आजार फ्लूसारख्या लक्षणांद्वारे प्रकट होतो. महाराष्ट्रात मुंबई आणि आसपासच्या वर्तुळात एकूण पेशंट आढळून आलेत. यात शेजारच्या ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांचाही समावेश आहे.
स्वाईन फ्लूची लक्षणं नेहमीच्या फ्लूसारखीच असतात. सर्दी, खोकला, ताप, थकवा, डोकेदुखी, घसा खवखवणं, खोकला ज्यामुळे श्वास लागणं, भूक कमी होणं, उलट्या होणं किंवा अतिसार यांचा समावेश होतो. गंभीर परिस्थितीत श्वसनक्रिया बंद पडून मृत्यू होऊ शकतो; पण हे असामान्य आहे. बहुतेक लोक फक्त मध्यम लक्षणे अनुभवतात.
स्वाईन फ्लूवर ओसेल्टामिवर आणि झमनीवर सारख्या अँटीवायरल औषधांनी उपचार केले जातात. रेलेन्झा हा एक अनुनासिक स्प्रे आहे, तर टॅमिफ्लू ही गोळी आहे. न्यूमोनिया किंवा छातीत संसर्ग झाल्यास, अधिक प्रतिजैविक उपचार आवश्यक असू शकतात. रुग्णालयात दाखल करणं आवश्यक नसल्यास, तुम्ही त्यानंतरच्या सुरक्षा उपायांचं पालन केलं पाहिजे आणि हात आणि श्वासोच्छ्वासाची चांगली स्वच्छता राखली पाहिजे.
मंकीपॉक्सनंतर आणखी एका वायरसबद्दल सध्या चर्चा होतेय, तो म्हणजे मारबुर्ग वायरस. सर्वप्रथम सन १९६७मधे जर्मनीमधल्या मारबुर्ग या शहरात या वायरसचा पहिला पेशंट सापडला. मारबर्ग हा वायरस इबोलासारख्याच कुटुंबातला आहे.
‘वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन’च्या मते, या वायरसचा संसर्ग सुरवातीला आफ्रिकेत सापडणार्या रौसेटस प्रकारच्या वटवाघळांमधे किंवा त्यांच्या वसाहतींमधे राहणार्या लोकांना याचा संसर्ग होतो. ही वटवाघळं आफ्रिकेतल्या खाणी किंवा गुहांमधे वास्तव्याला असतात.
एकदा का एखाद्या व्यक्तीला संसर्ग झाला की, हा रोग माणसापासून इतर माणसापर्यंत पसरू शकतो आणि हे संक्रमित लोकांच्या रक्त, अवयव किंवा इतर शारीरिक द्रव्यांशी थेट संपर्क साधून आणि या द्रव्यांनी आधीच दूषित असलेल्या पृष्ठभाग आणि सामग्रीद्वारे होऊ शकतं.
हेही वाचा: कोरोना रोखण्यासाठी डिग्लोबलाइज होणं ही तर आपली घोडचूक ठरेल
या वायरसमुळे होणारा आजार अचानक सुरू होतो आणि साधरणपणे दोन ते २१ दिवसांच्या उष्मायन कालावधीनंतर लक्षणं दिसायला सुरवात होते. या लक्षणांमधे ताप येणं, थंडी वाजणं, स्नायू दुखणं आणि सर्व शरीरभर वेदना होणं यांचा समावेश होतो. अमेरिकन सरकारी आरोग्य यंत्रणेच्या माहितीनुसार, ही लक्षणं दिसू लागल्यानंतर छाती, पाठ आणि पोटावर पुरळ येऊ शकते. याहीपुढे मळमळ, उलट्या होणं, छाती दुखणं, घसा खवखवणं, पोटदुखी, आणि अतिसारही दिसू शकतो.
'वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन'च्या माहितीनुसार, पेशंटना सात दिवसांच्या आत गंभीर रक्तस्राव होऊ शकतो आणि प्राणघातक प्रकरणांमधे शरीरातल्या अनेक भागांतून सहसा रक्तस्राव होताना दिसून येतो. तर गंभीर अवस्थेतल्या पेशंटना सतत उच्च ताप दिसून येतो आणि याचबरोबर पेशंटची चिडचिड वाढते, गोंधळ वाढतो आणि काही वेळेला ते अतिशय आक्रमक होतात.
'वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन'च्या मते, मारबुर्ग वायरसमुळे झालेल्या संसर्गासाठी कोणताही एक पूर्ण उपचार उपलब्ध नाही. असं असलं तरी विशिष्ट लक्षणांवर सहायक काळजी आणि उपचार उपलब्ध आहेत. यामधे सपोर्टिव केअरमधे तोंडावाटे आणि इंजेक्शनद्वारे री-हायड्रेशन द्रवपदार्थ, रक्त शुद्ध ठेवणारी औषधं, तसंच काही प्रथिनंयुक्त औषधं यांचा समावेश होतो.
खरं तर कोरोनाच्या साथीनंतर गेल्या कित्येक महिन्यांपासून दररोज नवनवीन जीवजंतूंच्या नावांची चर्चा होतेय. लाखो लोकांना टीवीवरची बातमी पाहताना किंवा वर्तमानपत्रात वाचताना हे सर्व अचानक जन्माला आले आहेत, असा समज होतो. पण वास्तव तसं नाही. जन्मल्यापासून पाच वर्षांपर्यंत लहान मुलावर अंदाजे ४ हजार प्रकारचे वायरस, बॅक्टेरिया, बुरशी आणि इतर रोगजंतू आक्रमण करत असतात. या आक्रमणांना समर्थपणे तोंड देतच मानवी प्रतिकारशक्ती विकसित होत जाते.
पृथ्वीवर मानवी अस्तित्व निर्माण होण्यापूर्वी लाखो वर्ष वायरस, बॅक्टेरिया आणि बुरशींनी आपलं अस्तित्व निर्माण केलं होतं. पृथ्वीवर त्यांनी स्वतःचे अधिवास निर्माण केले होते. काहींनी स्वतःचा अधिवास वनस्पतीमधे, तर काहींनी इतर प्राण्यांमधे-पक्ष्यांमधे निर्माण केला होता. एवढंच नाही, तर या सर्वांनी वातावरणातल्या अत्युच्य परिस्थितींना जुळवून घेण्याची क्षमता निर्माण केली होती.
आज जरी आपल्याला यातल्या काही जीवजंतूंची नव्याने ओळख होत असली, तरी ते निसर्गात लाखो वर्षांपासून आहेत. फक्त यापूर्वी मानवाचा निसर्गात हस्तक्षेप मर्यादित होता. त्यामुळे त्यांच्यावाटे होणारा संसर्गपण खूपच मर्यदित होता. आज आपला निसर्गातला हस्तक्षेप वाढल्यामुळे, अशा प्रकारचे जीवजंतू मानवामधे फार वेगाने आणि सहजपणे संसर्गित होत आहेत.
यामुळे लगेचच घाबरून जाण्याची गरज नाही. आपली नैसर्गिक प्रतिकारशक्ती याविरुद्ध लढण्यासाठी सक्षम असते आणि काही वेळेलाच आपल्याला बाहेरील औषधांची गरज लागू शकते. योग्य ती काळजी घेतली, तर अशा प्रकारच्या विषाणूजन्य रोगांपासून आतापण दूर राहू शकतो.
हेही वाचा:
ये दोस्ता, लस कशी तयार केली जाते?
कोरोना कुटुंबातलं सातवं पोरच इतकं वात्रट कसं निघालं?
कोरोनाला रोखण्यासाठी तैवानकडून आपण काय शिकलं पाहिजे?
तैवान कोरोना डायरी ३ : भीतीच्या सावटातही शिस्त विस्कटली नाही
लोकांचा विज्ञानावरचा विश्वास कमी व्हावा यासाठीच धडपडताहेत आपले राजकारणी
(दैनिक पुढारीच्या बहार पुरवणीतून साभार)