विष्णू खरे : कवी गेल्यावर सोबत काय राहिलं?

२७ ऑक्टोबर २०१८

वाचन वेळ : ९ मिनिटं


हिंदीतले प्रसिद्ध कवी, भाषांतरकार, पत्रकार विष्णू खरे यांचं नुकतंच निधन झालं. पेशानं पत्रकार राहिलेल्या खरे यांनी कविता, अनुवाद, सिनेसमीक्षा या क्षेत्रांमधे मोठं काम केलंय. राजकीय व्यवस्थेवरील आपल्या सडेतोड भूमिकेसाठी ते ओळखले जातात. त्यांच्या व्यक्तित्वाचा वेध घेतानाच विष्णुजींच्या आठवणींना कवी, अनुवादक गणेश विसपुते यांनी दिलेला हा उजाळा.

ज्यांच्या ज्यांच्या संपर्कात विष्णू खरे आले, मग ते समकालीन वा तरूण कवी-लेखक असोत, सच्चे वाचक असोत ते सगळे त्यांच्याशी जोडले जात असत. भारतभर त्यांनी अशी कितीतरी नाती त्यांच्या स्पष्टवक्तेपणाच्या प्रयोगानिशी पण आत्मीयतेनं विणली होती. अखेरपर्यंत विष्णूजी लिहिते होते, सक्रिय होते. त्यांच्यात अनेक व्यक्तिमत्त्वं एकवटलेली होती. कवी, भाषांतरकार, टीकाकार, संपादक, पत्रकार, जागतिक साहित्याचं सखोल वाचन असणारे व्यासंगी, बहुभाषी, संगीत-सिनेमा-कलेचे मर्मज्ञ अशी त्यांची बहुरुपं होती.

पण ते अखंड सतर्क असलेले, चर्चा-वादविवादासाठी हरघडी तयार असलेले, बारकाईनं ऐकून घेणारे, चांगल्याचं आठवणीनं कौतुक करणारे आणि न आवडलेल्या कोणत्याही गोष्टीचा समाचार कुणाचाही मुलाहिजा न बाळगता घेणारे, कोणत्या प्रसंगी काय बोलतील याची काहीही खात्री देता न येणारे (पण जे बोलतील ते मूल्यवान आणि चर्चेचा दर्जा आणि नूर वाढवणारं असे), संवादोत्सुक, तीक्ष्ण स्मरणशक्ती असल्यानं त्यांच्या पोतडीतून वेगळीच माहिती-संदर्भ देणारे, मूल्यमापनाच्या आपल्या कसोट्या ठरवताना कुणाचीही पत्रास न बाळगणारे, विनोदाची तेज धार असणारे, धाडकन समोरच्याला अनपेक्षित असं टाकूनही बोलणारे, प्रेमळपणे चौकशी करणारे, चौकस नजरेनं सगळीकडे नजर ठेऊन असणारे असेही होते.

किंबहुना त्यांच्या पहिल्या भेटीत यातल्या अनेक बाबींचा प्रत्यय येत असे. त्यांच्या 'करना पड़ता है' नावाच्या एका कवितेत (करना पड़ता है) त्यांनी स्वतःचंच वर्णन केलंय की, "मेरी ख्याती कोई मिलनसार या परोपकारी आदमी की नहीं । बल्कि मुझे बददिमाग़ और अमानवीयही माना गया है।" ही त्यांची प्रतिमा साहित्यविश्वात घडवलेलीही होती. पण प्रत्यक्षात ज्यांचा त्यांच्याशी परिचय असे ती याउलटच अधिक होती.

नावासारखा सच्चेपणा

पण ते नावाप्रमाणेच खरे होते. त्यांच्या फटकळपणातूनही त्यांचा सच्चेपणा लपत नसे. विष्णुजींची आठवण आली की मला बेंजो नावाच्या झेन मास्टरची गोष्ट आठवते. विष्णूजी त्या झेन मास्टरसारखे होते. स्वतःही दर क्षणी सतर्क असत आणि कोणत्या क्षणी तडाखा हाणला जाईल याच्या विचारापासून समोरच्याला मुक्त होऊ द्यायचे नाहीत.

कवी म्हणून पुढच्या दोन पिढ्यांवर सगळ्यात जास्त प्रभाव त्यांचाच आहे. व्यवस्था आणि व्यक्ती यांच्या संघर्षातल्या राजकीय पेचांची नेमकी कळ त्यांना सापडलेली असे. ती ते चिमटीत पकडून दाखवत. आणि त्यातल्या शोकात्म परिणतीतलं कारूण्य त्यांच्या कवितेत ज्या सहजपणानं येई ते चकित करणारं होतं. टाईपरायटर घेऊन मुलीसोबत तिच्या नोकरीच्या मुलाखतीसाठी आलेला पिता असो, किंवा 'सिर पर मैला ढोती औरतें' किंवा 'टेंपो से घर बदलती लड़कियां' अशा कितीतरी कविता त्यांच्या संवेदनशील कवीमनाच्या साक्ष आहेत.

सामान्यातला सामान्य माणूस, अटीतटीनं जगण्याची एकतर्फी लढाई लढणारा माणूस, वंचित आणि श्रमिक हा त्यांच्या कवितेच्या आस्थेचं केंद्र होता. 'कठिनतर' शीर्षकाच्या एकाच कवितेत आपल्याला बाबू, चतुर्थ श्रेणी कर्मचारी, मिस्त्री, प्लम्बर, हॉकर, रद्दीवाले, माळी, चांभार, न्हावी, धोबी, इस्त्रीवाले असे अनेक जण दिसतात. यात वर्गरचना काहीशी बदलत जाईल, पण अंतिमतः आतले आणि बाहेरचे संघर्ष तीव्र आणि कठिणतर होत जाणार आहेत, तेव्ही करोडो लोक वंचितच असतील असा इशारा त्यांनी या कवितेत देऊन ठेवलेला आहे. ते सांगतांनाच हे वंचित असलेले लोक ओळखता येतील पण मित्र आणि शत्रु यांची ओळख होणं अवघड होत जाईल असंही त्यांनी म्हटलेलं आहे.

त्यांना कवितेत काहीही वर्ज्य नव्हतं. जागतिक साहित्याच्या वाचनानं, डोळस जगभ्रमंतीनं त्यांचं विश्वभान समृद्ध झालेलं होतं. सृष्टीपल्याडच्या आणि आभाळाखालच्या सगळ्या गोष्टी त्यांच्या कवितेत येऊ शकत असं म्हणता येईल. २००७ मधे आंतरभारती अनुवाद सुविधा केंद्रातर्फे आयोजित संमेलनात त्यांची निशिकांत ठकारांनी एक प्रदीर्घ मुलाखत घेतली होती. ती मुंबईकरांना दीर्घकाळ लक्षात राहील. तिथं त्यांनी ‘हो, आहे मी मार्क्सवादी, आहे मी कम्युनिस्ट’ असं ठामपणे सांगितलं होतं. हा ठामपणा, रोखठोक असणं त्यांच्या विचारात स्पष्टपणे दिसत असे.

सॅमसंगविरोधात थेट भूमिका

कॉर्पोरेट कॅपिटॅलिझमपासून मुक्ती मिळवायचा मार्क्सवाद हाच एक मार्ग आहे असं त्यांनी जयपूरच्या समांतर लिटररी फेस्टिवलमध्ये यंदाच्या जानेवारीतच स्पष्टपणे सांगितलेलं होतं. हरिओम, डरो, अयोध्या या त्यांच्या कविता म्हणजे त्यांचं राजकीय भान किती प्रखर आहे याच्याच निदर्शक आहेत. आणखीही अनेक कविता आहेत. या राजकीय भानासह मला पूर्ण कवी म्हणून ओळखलेलं आवडेल हे त्यांनी त्यांच्या अखेरच्या मुलाखतीत म्हटलं आहे.

सॅमसंग या आंतरराष्ट्रीय कंपनीनं साहित्य अकादेमीचे पुरस्कार प्रायोजित करायचे ठरल्यावर त्याचा निषेध म्हणून ते जागतिक पुस्तक मेळ्यात प्रगती मैदानावर एकटेच गळ्यात निषेधाचा बॅनर लटकाऊन असलेले आम्हाला दिसले होते. अशी तात्काळ प्रतिक्रिया त्यांच्यासारखा प्रतिबद्ध कवीच देऊ शकतो.

त्यांच्या कवितामध्ये गद्याच्या अंतिम सीमेपर्यंत जाऊन केलेले प्रयोग आहेत. प्रयोग फसण्याची पर्वाही त्यांनी कधी केली नाही. ते त्यांनी जाणीवपूर्वक केलेले होते आणि तरीही त्यात परीघावरच्या लोकांबद्दल करूणा, समकाळातल्या विकृती आणि विखार, भ्रष्ट होणं आणि निर्लज्जतेच्या हद्दीपर्यंत निर्दय होणं हे येतं. त्यांच्या कवितेची मोहिनी तरूण कवींवर पडणं स्वाभाविक होतं, पण त्यांच्यासारखं ताणलेलं गद्य साधणं दुसऱ्या क्वचितच एखाद्या कवीला शक्य झालं.

नेहरूंना घातली प्रस्तावनेसाठी गळ

उत्कृष्ट साहित्य सगळ्यांपर्यंत पोचलं पाहिजे, सर्वांना ते उपलब्ध व्हायला पाहिजे असा त्यांच्या आग्रह असे. यातूनच त्यांना भाषांतराची प्रेरणा मिळत राहिली असली पाहिजे. मौजेची बाब ही की त्यांनी पहिलं भाषांतर केलं तेव्हा त्यांचं वय होतं जेमतेम १०-११ वर्षं. छिंदवाड्याच्या शनवारात एक लायब्ररी होती. तिथं रोम, ग्रीक, इजिप्त अशा देशांवरच्या इतिहासाची मालिका होती. तिथं त्यांनी 'जेसन अॅड द ऑर्गनॉट्स' वाचलं. त्यानं ते प्रभावित झाले. त्यावयातही त्यांना वाटलं की हे हिंदीत यायला पाहिजे. मग त्याचं भाषांतर करून त्यांनी अलाहाबादच्या 'लल्ला' नावाच्या मासिकाला पाठवून दिलं आणि प्रकाशितही झालं. पुढं १८-१९वर्षांच्या वयात टी. एस. एलियटच्या 'वेस्ट लॅन्ड'चं भाषांतर केलं. त्यासाठी त्यांनी थेट पं. नेहरूंनाच प्रस्तावना लिहिण्यासाठी गळ घातली होती.

पुढच्या ५०-५५ वर्षांत त्यांनी भाषांतराचं प्रचंड काम केलं. ते जर्मन भाषेचे जाणकार होतेच. कितीतरी हिंदी कवी-लेखकांच्या साहित्यकृतीची त्यांनी भाषांतरं केलं. त्यांच्यामुळे अनेक हिंदी कवी-लेखक जर्मनमध्ये भाषांतरित होऊ शकले. लोठार लुत्स यांचा त्यांच्याशी घनिष्ठ स्नेह होता. लोठार यांनीही विनोद कुमार शुक्ल यांच्यासह अनेकांचं साहित्य जर्मनमध्ये नेलंय.

विष्णूजींनी हिंदी साहित्यविश्वाला जागतिक कवितेचा विस्तृत परिचय भाषांतरांतून घडवला असं म्हणणं अतिशयोक्त होऊ नये इतके कवी त्यांनी हिंदीत भाषांतरित केले आहेत. त्यांच्या या कामाची दखल घेऊन हंगेरीनं त्यांचा दोनदा तर पोलंडनं एकदा सन्मान केला. फिनलंडचं महाकाव्य 'कालेवाला' त्यांनी भाषांतरित केल्यानंतर फिनिश सरकारनं त्यांना त्यांच्या देशातला सर्वोच्च सन्मान त्यांना दिला. इस्टोनियन सरकारनंही त्यांचा असाच सन्मान केला होता.

विश्वसाहित्याचं अफाट वाचन

विष्णूजींचं विश्वभान सुजाण, सखोल आणि व्यापक होतं. ते विश्वसाहित्याचे विक्राळ वाचक होते. त्यांच्याशी बोलतांना त्याचे असंख्य संदर्भ येत. एक प्रसंग यासंदर्भात आठवतो. दहा-एक वर्षांपूर्वी पुण्यात एका कादंबरीवरील संमेलनाचे प्रमुख पाहुणे म्हणून त्यांना निमंत्रित केलं होतं. त्यांचं तिथलं एक-दीडतासांचं भाषण मी कधीही विसरणार नाही. वस्तुतः त्यांनी भाषणाची लिखित संहिता तयार केलेली होती. त्याची एक प्रत माझ्याजवळ आजही आहे.

प्रत्यक्षात ते उत्स्फुर्त बोलले होते. अधिक विस्तारानं त्यांनी जागतिक कादंबरीचा, रामायण-महाभारतापासून परामर्श घेतला होता. लिखित संहितेत युरोपियन-अमेरिकन-लॅटिन अमेरिकन कादंबऱ्यांचे आणि लेखकांचे इतके संदर्भ होते की मी कुतुहल म्हणून सहज मोजायला घेतले आणि तीन-चार पानांवरच्या शंभरेक नावांनंतर कंटाळून मोजणं सोडलं होतं.

गंमत म्हणजे त्यांनी आयत्या वेळी केलेल्या भाषणात याहूनही अधिक विस्तृत तपशील आणि संदर्भ होते. त्यांची स्मरणशक्ती विलक्षण होती. एखाद्या विषयावर ते बोलू लागले की त्या विषयाचे अक्षांश-रेखांश इतके व्यापक होत की विषयाचं परिमाण बदलून जात असे आणि आकलनासाठी नव्यानं विचार करायला ते प्रवृत्त करत.

पन्नाशीची लेखन कारकीर्द

अर्धशतकाहूनही अधिक लाभलेल्या लिहित्या काळात त्यांनी प्रचंड लेखन केलं. त्यातलं खूपच कमी प्रकाशित होऊ शकलं. दहा कवितासंग्रह, तीस-पस्तीस भाषांतरांची-संपादनाची पुस्तकं, सिने-समीक्षेची दोन पुस्तकं, समीक्षेचं एक असं त्यांचं प्रकाशित लेखन असलं तरी बरंच लेखन अप्रकाशित आहे. शेकडो लेख, समीक्षेवरचं बरंच लेखन, कविता, भाषांतरं, पत्रकारितेतलं लेखन हे अद्याप प्रकाशित झालेलंच नाही.

समीक्षेवरच्या त्याच्या पहिल्या पुस्तकाचं नावच मुळी 'आलोचना की पहिली किताब' असं होतं. त्यांचं दुसरं समीक्षेचं पुस्तक त्यांच्या हयातीत प्रसिद्ध होऊ शकलं नाही. कबीरासारखं त्यांनी हाती 'लिए लुकाठ़ी हाथ' असं व्रत घेतलेलं होतं. त्यामुळे भले भले त्यांना बिचकून असत.

त्यांना पहिल्यांदा ऐकलं ते १९९४साली. त्यांचं कवितावाचन होतं पुण्यात तेव्हा. पुढं त्यांच्याशी परिचय अधिक सघन झाला. दिवसातल्या वेगवेगळ्या प्रहरातल्या त्यांच्यासोबत झालेल्या मॅरथॉन गप्पांच्या अनेक मैफलींच्या आठवणी आहेत. अनेकदा ४-५ जणांसोबत, बरेचदा आम्हा दोघांतल्या. या गप्पांमधून विविध भाषांमधल्या हजारो लेखक-साहित्यकृतींचे-संगीतातल्या वैविध्याचे तपशिलातले संदर्भ येत असत. जागतिक सिनेमाचे संदर्भ येत.

सिनेमाचा प्रचंड व्यासंग

भारतीय सिनेमाचा त्यांचा व्यासंग थक्क करणारा होता. असंख्य गाणी त्यांच्या गीतकारांच्या-संगीतकारांच्या नावासह त्यांना लख्ख आठवत असत. तीन-चार वर्षांपूर्वी एका कार्यक्रमासाठी त्यांना निमंत्रित केलं होतं तेव्हा एक दिवस ते मोकळे होते तेव्हाही अशीच दीर्घ मैफल जमून आली होती. त्यावेळी त्यांनी रशिया-भारत सहकार्यानं निर्मिलेल्या परदेसी या सिनेमाबद्दल आत्मीयतेनं माहिती सांगितली होती. तो चित्रपट का महत्त्वाचा होता, त्याची कथा ही बहामनी राज्याच्या काळातल्या-१५व्या शतकातल्या व्यापाऱ्याची सत्यकथा कशी होती हे त्यांनी सांगितलं होतं. त्यात बलराज साहनीनं लोकशाहीराचं काम केलं होतं आणि त्याच्या तोंडी असलेली गाणी ते सांगत होते.

विशेषतः "फिर मिलेंगे जानेवाले, यार दस्विदानिया-" आणि लताचा एक तराणा त्यांनी गुणगुणून दाखवला होता. भारतीय सिनेमात दस्विदानिया हा शब्द या सिनेमात पहिल्यांदा आला होता. त्या चित्रपटात जो प्रश्न घेतला होता तो किती भविष्यवेधी होता हेही ते सांगत होते. यातूनच पुढे के. ए. अब्बासवर विषय वळला होता आणि ते त्याच्या आत्मचरित्राविषयी बोलू लागले होते, त्या पुस्तकात एक फिक्शनल कथाही येते. त्यातला हिरो म्हणतो माझा बाप हिंदू होता. त्यातल्या सुरस आणि चमत्कारिक कथांनी मी चकित होणं थांबवू शकत नव्हतो.

अब्बासविषयी त्यांना खूप आदर होता. एक तर तो प्रागतिक चळवळीतला सक्रिय लेखक होता. विशिष्ट ध्येयानं त्यानं चित्रपटनिर्मिती केली होती. सलग ३७ वर्षं तो वर्तमानपत्रात एक स्तंभ चालवत होता. मुंबई को जानना है तो इप्टा का इतिहास, पारसी और मराठी थिएटर का इतिहास और पृथ्वी का इतिहास जानना भी ज़रूरी है असं त्यांचं म्हणणं होतं.

स्मरणात राहिलेली गप्पांची आणखी एक मैफल म्हणजे ९-१० वर्षांपूर्वी दिल्लीतल्या कडाक्याच्या हिवाळ्यातली. सतीश काळसेकर, जयप्रकाश सावंत यांच्यासोबत आम्ही जागतिक पुस्तक मेळ्याच्या निमित्तानं गेलो होतो. त्यादिवशी एक किंवा दोन असं तापमान होतं. प्रेसक्लबवर हिरवळीवर आम्ही सकाळी अकरा वाजता गप्पा मारायला बसलो तेव्हा प्रसिद्ध कवी मंगलेश डबराल, वीरेन डंगवाल हेही विष्णूजींसोबत होते. सलग गप्पांमध्ये किती वेळ गेला हे कुणाच्या लक्षात आलं नाही. वीरेनजींना साडेपाचला ट्रेन होती म्हणून ते घाईनं पाचला उठले तेव्हा लक्षात आलं की आम्ही सहा तास सलग गप्पा मारत होतो. यात मुख्यतः विष्णूजींना ऐकणं हे आनंददायक होतं.

'अब एक नये तमीज़ की जरूरत होगी'

नवं काही चांगलं वाचायला मिळण्यासाठी ते अस्वस्थ असत. तरूण कवींच्या कविता आवर्जून वाचत. वाईट कवितांना फटकारत पण चांगल्या कवितेचं मनापासून कौतुक करत. तेव्हा व्योमेश शुक्लाच्या काही कविता प्रकाशित झाल्या होत्या. त्याचा कविता संग्रह अजुन यायचा होता. तेव्हा त्याच्या दहा-बारा कविता आणि सोबत त्या कवितेवरचा विष्णूजींचा विस्तृत लेख अशी एक पुस्तिका उद्भावनानं प्रकाशित केली होती. त्या लेखाचं शीर्षक होतं- 'अब एक नये तमीज़ की जरूरत होगी.'

एका चांगल्या नव्या कवीची अधिकारवाणीनं ओळख करून द्यायची विष्णूजींची ही रीत अद्भुत होती. मागच्या वर्षी अरुण देवांनी त्यांच्या समालोचन या वेबपत्रिकेत माझ्या दहा-बारा कविता आणि एक दीर्घ लेख (निर्वासन और स्मृती) प्रकाशित केला होता. तो वाचून त्यांनी फोन केला होता. थोडक्यात पण काय आवडलं ते सांगितलं होतं. क्या बढ़िया लिखा है तुने असं त्यांच्या तोंडून ऐकणं किती उत्साहवर्धक असू शकतं हे त्यांना ओळखणाऱ्यांना समजू शकेल. हे औदार्य असलं तरी त्यापलीकडे त्यांचं प्रेम आणि हळवेपणही दिसत असे.

माझ्या मुलीनं ती शाळेत असतांना मुंबई बॉम्बस्फोटावर लिहिलेली एक कविता वाचून त्यांनी लिहिलेला इमेल मी अजुनही जपून ठेवला आहे. इतनी छोटी बच्चीने यह लिखना इस दुनिया को शोभा नहीं देता असं त्यांनी म्हटलं होतं.

मोबाईल नंबरही डिअॅक्टिवेट होईल...

विष्णूजींचं जग अमर्याद होतं. एका पाठोपाठ तीन मोठे दिग्गज निघून जाणं हे खूपच रितं वाटायला लावणारं आहे. ते गेल्यानंतर असद ज़ैदींनी लिहिलं होतं, "अब हमारे शहर में ऐसा कोई आदमी है भी नहीं जिसकी मुहब्बत और ज़हानत, अदावत और मुरव्वत, सरोकार और बेदिली सब एक ही धातु की बनी हों, और जो हर चुनौती से हमेशा सामने से टकराता हो। " ते उत्कृष्ट समकालीन कवितेचे कवी, चांगल्या कवितेचे मर्मज्ञ आणि चांगले शिक्षक होते. असं आता कुणीही या शहरात नाही. 

त्यांची पुस्तकं, त्यांच्या कविता, त्यांच्यासोबतच्या गप्पा आणि त्यांचं गडगडाटी हसणं, त्यांच्या हस्ताक्षरातल्या काही ओळी आणि हस्तलिखित भाषणाची संहिता आणि झेन शिक्षकासारखा त्यांच्या सहवासानं शिकवलेला काळ एवढं आता सोबत आहे.

आणि त्यांचा इमेल आयडी. जो काही दिवसांनी आपोआपच डीअॅक्टिवेट होईल, आणि फोन नंबर. ज्यावरून आता त्यांचा आवाज कधीही येणार नाही - हां बोलो... क्या चल रहा है?