विष्णू सूर्या वाघः जखमांचे चर्च बांधणारा आनंदभोगी

२१ फेब्रुवारी २०१९

वाचन वेळ : ६ मिनिटं


कवी, नाटककार, राजकारणी विष्णू सूर्या वाघ यांचं गेल्या आठवड्यात दक्षिण आफ्रिकेतल्या केपटाऊन इथे निधन झालं. गोवा आणि महाराष्ट्रामधल्या सांस्कृतिक घडामोडींमधे त्यांनी एखाद्या पुलासारखं काम केलं. गोव्याच्या सुशेगाद भुमीवरून त्यांनी ‘तुका अभंग अभंग’ नाटकातून अवघ्या जगाला विद्रोही तुकारामाची आठवण करून दिली. वाघ यांच्या बहुरंगी व्यक्तिमत्त्वाचा वेध घेणारा हा लेख.

काव्यानंदात ओतप्रोत डुंबून गेलेल्या त्या सभागृहात चाललेल्या कविसंमेलनाच्या अखेरीस त्या संमेलनाचे अध्यक्ष कविता गायला उठले. बुटकासाच पण उभ्यापेक्षा आडवाच अस्ताव्यस्त पसरलेला देह. कवितेच्या नाजुकपणाशी या आक्राळ देहाचं कसं काय नातं जुळलं असाच प्रश्‍न पाहताक्षणी मनात यावा. नाजूक कविता आणि अक्राळ देह यांचं एक विरुद्धलिंगी आकर्षण निसर्गत:च असतं की काय असा एक संशय यापूर्वीच एका ‘दादा’ने गझलेच्या रूपात मनात पेरला होता.

अतिशय संथपणे माईकसमोर येत त्या आगडबंब देहानं सभागृहातल्या श्रोत्यांवर नजर फिरवली आणि किंचित घसा खाकरून सुरवात केली. भल्यामोठ्या नगार्‍यामधून तेवढ्याच धीरगंभीरतेनं घुमत यावा तसा स्वर आला...

मी जखमांचे चर्च बांधतो तेव्हा,

ख्रिस्ताच्या गाभार्‍यात कृष्णाचा घुमतो पावा.

आणि एकदम पूर्ण सभागृह टाळ्यांच्या कडकडात निनादून गेलं. ऐकणारा प्रत्येकजण शब्दांनी आणि त्या शब्दांतून प्रकटणार्‍या भावनांनी अक्षरशः अंतर्बाह्य थरारून गेला होता. काही क्षणापूर्वी बाह्य शरीरयष्टीकडे बघून कवीपणाविषयी निर्माण झालेली शंका नुसती वितळून गेली नाही, तर हा मनुष्य अंतर्बाह्य कवीच आहे याची प्रत्येकालाच साक्षात्कारी जाणीव झाली.

नाटकातून सांगितला विद्रोही तुकाराम

या अद्भुत क्षणाचा मीही साक्षीदार होतो. पूर्वी साप्ताहिक साधना वाङ्मय प्रकारांना अनुलक्षून दरवर्षी एक साहित्य संमेलन घ्यायचं. यावेळी ते गोव्यात पणजी इथे कविता हा वाङ्मय प्रकार मध्यवर्ती ठेवून भरवलं गेलं होतं. त्या संमेलनाचाच एक भाग म्हणून हे कवी संमेलन होतं. पण या निमित्ताने एका थोर कवीची आणि अद्भुत व्यक्तीशी आपली दोस्ती होणार आहे हे मला माहीत नव्हतं. नंतर नाव कळलं. विष्णू सूर्या वाघ आणि पुन्हा एकदा खरंच थरारून गेलो.

याआधी या माणसाला मी त्याच्या वाङ्मयातून चांगलाच ओळखत होतो. पण कवी म्हणून नाही तर नाटककार म्हणून. त्याच्या ‘तुका अभंग अभंग’ या नाटकानं माझ्यावर मोठंच गारूड केलं होतं. कारण विद्रोही तुकाराम म्हणून तुकोबांची ओळख डॉ. आ. ह. साळुंखेनी महाराष्ट्राला करून देण्यापूर्वी गोव्यामधे विष्णूच्या या नाटकाने विद्रोही तुकाराम दाखवायला सुरवात केली होती.

त्यासाठी सनातन्यांकडून त्याच्यावर आणि त्याच्या नाट्यप्रयोगावर हल्लेही झाले होते. तुकोबांची क्रांतिकारी भूमिका दाखवणारा एक नाटककार म्हणून विष्णूची मला ओळख झाली होती. या संमेलनाच्या निमित्ताने मला कवी विष्णू भेटला. प्रत्यक्ष ओळख झाली आणि मग आमच्या ओळखीचं रुपांतर आधी स्नेहात आणि नंतर जीवलग मैत्रीत कसं होत गेलं, हे कळलंसुद्धा नाही.

नाट्यसृष्टीतला ब्रह्मदेव

विष्णू सूर्या वाघ हे नावच त्याच्या देहयष्टीसारखंच दणदणीत. विष्णू अभिमानाने सांगायचा की गेल्या आठ पिढ्या हे नाव आलटूनपालटून आहे. म्हणजे विष्णू सूर्याचे वडील सूर्या विष्णू वाघ. तर आजोबा पुन्हा विष्णू सूर्या वाघ. विष्णूची परंपराच नाटकवाल्यांची होती. गोव्याच्या आधुनिक रंगभूमीचे प्रवर्तक म्हणून विष्णूच्याच वडलांचं नाव घेतलं जातं. आणि तो वारसा विष्णूकडे काकणभर जास्तच आला होता. केवळ रंगभूमी नाही तर एकूणच गोव्याचं सगळं सांस्कृतिकपण परंपरेनं विष्णूमधे एकवटलं होतं.

नृत्य, गीत, संगीत आणि भाषेचे विविध पैलू हे सारं विष्णूसाठी भगवान विष्णूप्रमाणे लाभलेली आयुधं होती आणि संपूर्ण आयुष्यभर विष्णूने ती प्रभावीपणे चालवली. लोककला आणि मंचिय कला या सार्‍यांचा सुरेख संगम त्याच्या सगळ्या नाट्यकृतीतून सातत्यानं होत राहिला. तो गीतकार होता. तो कवी होता. तो नाटककार होता. तो नट होता. तो दिग्दर्शक होता आणि निर्माताही होता. एका अर्थानं भारतीय पुराणात सांगितल्याप्रमाणं सृष्टीकर्त्या ब्रह्मदेवासारखा तो नाट्यसृष्टीतला ब्रह्मदेवच होता.

विष्णूने आपल्या पंचावन्न वर्षांच्या आयुष्यात तीस पस्तीस नाटकं लिहिली. प्रत्येक नाटक वैविध्यपूर्ण आणि वास्तवाकडे पाहण्याची एक अनोखी शैली. त्यामुळे त्याची नाटकं गोव्याच्या आणि एकूण कोकणी रंगभूमीवर सतत प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद देऊन डोक्यावर घेऊन ठेवली. मंगलोरपासून सिंधुदुर्गपर्यंत सर्वसामान्य नाट्यरसिकांच्या गळ्यातला तो ताईत होता. राज्य नाट्य स्पर्धेत विष्णूचं नाटक करणं म्हणजे यशाची हमखास खात्री, असाच हौशी रंगभूमीवाल्यांचाही पक्का समज झालेला.

पण नाट्यक्षेत्रात एवढं प्रचंड करूनही केवळ गोव्याच्या हद्दीमुळे महाराष्ट्रासाठी मराठी भाषिक कलाकार असूनही विष्णू परकाच राहिला. याला विष्णूपेक्षा मराठी संकुचितपणाच जास्त कारणीभूत असावा. पण विष्णूची लोकप्रियता मात्र मंगलोरपासून नागपूरपर्यंत होती. 

हेही वाचाः विष्णू सुर्या वाघ यांनी केलेल्या मरणापूर्वीच्या काही सूचना

मानवतावादाला साद घालणारी कविता

विष्णूच्या कवितेमधे गीत आणि गीतामधे कविता इतकी बेमालूम असायची की ऐकणार्‍याला आपण कधी कवितेचे रसिक झालो आणि स्वरांचे समजदार झालो, हे कळायचं नाही. विष्णूच्या कवितेमधे प्रेमातली आतुरता होती. ढोंगावरती विडंबनात्मक प्रहार होते. पण सर्वांत थोर म्हणजे या सार्‍यात एक सामाजिक प्रचंड कळवळा होता. त्यामुळे त्याच्या कवितेमधे एका निर्णायक क्षणी मानवतावादालाच साद घातलेली असायची. त्याने कधी बाजारू पद्धतीने टाळ्या मिळवण्यासाठी गीत किंवा कविता लिहिली नाही.
 
विष्णू नट होता, नाटककार होता, कवी होता हे जितकं खरं, त्याहीपेक्षा खरं की तो आयुष्य भरभरून जगू पाहणारा एक अतिशय टोकाचा रसिक आनंदभोगी माणूस होता. सगळं जग आनंदानं भरलेलं असावं आणि सगळं जग हे केवळ माणसाच्या सुख आणि आनंदासाठीच निर्माण झालेलं आहे, याच्यावर त्याची अतोनात श्रद्धा असावी. हे त्याच्या शब्दाशब्दांतून आणि प्रत्येक क्षणाच्या वर्तनातून नेहमीच व्यक्‍त होत असायचं. 

तो सतत राजकारणात कृतिशील राहिला. पण राजकारणाकडं बघण्याचा त्याचा दृष्टीकोन हा व्यवहारी राजकारण्याचा स्वकेंद्री नव्हता तर तिथेही तो अतिशय रोमॅटिक पद्धतीनेच विचार करायचा. त्याची एकूण राजकारणामागची भूमिका जेव्हा मी समजून घेतो, तेव्हा तो मला भेटलेला मुहमद तुघलकच वाटतो. अशाच एका मैफिलीत मी त्याला विचारलं होतं की, ‘एवढं कलेचं साम्राज्य तुमच्याकडे असताना तुम्ही या राजकारणाच्या दलदलीत का जाता?’

जग सुंदर बनवण्यासाठी राजकारणात

विष्णू त्याच्या नेहमीच्या पद्धतीनं गडगडाटी हसला. मग म्हणाला, ‘राजाभाऊ, जग सुंदर बनवायचं असेल, आपल्याला हवं तसं आनंदाचं करायचं असेल तर सत्ता हवी. केवळ प्रबोधन करीत राहिल्याने ते साध्य होईल, म्हणजे लवकर साध्य होईल असं मला वाटत नाही. सत्तेच्या माध्यमातून आपण हे खूप वेगाने करू शकतो. आणि सत्ता हवी असेल तर या राजकारणात भाग घेतल्याशिवाय पर्याय नाही.’

ज्या ज्या पक्षात त्याने तत्कालीन राजकारणासाठी प्रवेश केला, तिथे तो ‘वन मॅन आर्मी’ राहिला. सर्वसामान्य माणसं विशेषतः तरुण वर्ग त्याचा सतत चाहता राहिला, पाठिशीही राहिला. पण राजकारणातले त्याचे सहकारी आणि त्याचे विरोधक मात्र सातत्याने त्याचे अंतस्थ शत्रू राहिले. कारण विष्णूची कुठलीच भूमिका स्वार्थासाठी कधीच नव्हती. त्यामुळे आपल्या स्वार्थाच्या आड येणारा हा एकमार्गी राजकारणी त्याच्या बाकीच्या सहकार्‍यांना तसा विश्‍वासार्ह वाटणे शक्य नव्हतेच.

विष्णू कधी कधी गंमतीने म्हणायचा, ‘मला फक्त एक दिवस या देशाचा पंतप्रधान होऊ द्या, जेवढे म्हणून या देशातले जटील प्रश्‍न वाटतात, म्हणजे काश्मीरपासून तमिळपर्यंत ते मी चुटकीसरशी सोडवीन.’ विष्णूचं हे विधान मी जरी विनोद म्हणून ऐकून घेत होतो तरी मला खात्री आहे की तो त्याच्या त्या भाबड्या श्रद्धेने हे गंभीरपणेच म्हणत असणार. जगण्यावरच्या आणि जगावरच्या विलक्षण प्रेमाने विष्णूचं जगणंही अफाट, आरभाट आणि बरंचसं बेतालही होतं हेही खरं.

दुर्धर आजाराने भटक्या आनंदाला खीळ

विष्णू आपल्या कारकिर्दीच्या ऐन शिखरावर जात असतानाच एका दुर्धर रोगाने अंथरुणावर आडवा झाला आणि मग सतत भटकणार्‍या, चालतं राहणार्‍या या आनंदाला खीळ बसली. गेली चार पाच वर्षे अत्यंत धीरोदात्तपणे तो सगळ्याशी सामना करत होता. कोमात जाणे, स्मृती हरवणे यातूनही तो काही काळ सावरला होता. अशा काळात त्याला भेटायला गेलो, तेव्हा त्याने आपला ‘सुशेगाद’ नावाचा कवितासंग्रह माझ्या हातात ठेवला.

सुशेगाद म्हणजे कोकणी भाषेत ‘निवांत, तणावविहीन, चिंतारहित, खुलालचेंडू’. मी थरथरत्या हाताने तो घेतला त्यावेळी विष्णूच्या खंगलेल्या देहावरच्या आत ओढलेल्या गालावर उठावदार हसू होतं. तर डोळ्यांमधे किंचित अश्रू होते. काल गोव्याहून मित्राचा फोन आला, ‘विष्णू गेला.’ दक्षिण आफ्रिकेतल्या केपटाऊनमधे. हे कधीतरी मी अपेक्षिलं होतंच. पण केपटाऊनमधे त्याला कधी नेलं वहिनींनी हे मला माहीत नव्हतं.

मला आफ्रिकेच्या क्रांतिभूमीला चुंबायचंय

कारण कधीतरी गप्पा मारताना विष्णू मला म्हणाला होता की, ‘मला एकदा दक्षिण आफ्रिका बघायला जायचं आहे. एक महात्मा तिथं घडला. त्या क्रांतिकारक भूमीला मला चुंबायचंय.’ विष्णूने केपटाऊनमधे देह ठेवला, एका वेगळ्या अर्थाने त्याने आपला शब्द खरा केला. विष्णूला सगळ्यांच महामानवांबद्दल प्रचंड प्रेम होतं. महात्मा गांधीबद्दल विशेष. खरं तर त्याला महात्मा गांधीच्यावर एक वेगळ्या पद्धतीचं आणि गांधींचं क्रांतिकारकत्व सांगणारं नाटक लिहायचं होतं.

तो म्हणायचा, ‘या माणसाचं जगणं भगतसिंगापेक्षा शौर्यशाली आहे. फक्‍त ते नीटपणे सांगायला हवं.’ विष्णूला लिहायला वेळ मिळाला नाही. पण त्याने आपल्या जगण्यातून ते नकळतपणे दाखवून दिलं असंच मला वाटतं. आता त्याचा सुशेगाद नावाचा कवितासंग्रह माझ्या हातात आहे आणि पंचवीस वर्षांपूर्वी त्याने लिहिलेली ही त्याची भविष्यदर्शी कविता वाचताना माझ्या डोळ्यांमधे धुके दाटून येते आहे.

मरण्यापूर्वीच्या काही सूचना
सर्वप्रथम मला शिफ्ट करा दुसर्‍या हॉस्पिटलात
असं हॉस्पिटल-
जिथं स्मशानवत शांतता असणार नाही
जिथं औषधांचा वास येणार नाही
जिथं डॉक्टरांच्या चेहर्‍यावर इस्त्री नसेल
आणि नर्सचं हसणंही रोबोटिक नसेल
डॉक्टर म्हणून शक्यतो कवींना ठेवा
पूर्णवेळ बिनपगारी
मला जाळू नये किंवा पुरू नये
फुलांच्या मुलायम हातांनी भिरकावून द्यावं
आभाळाच्या कॅनव्हासवर
तिथे आधीच असलेल्या तुकोबांनी
हात पुढे करीत मला झेलून घ्यावं
नि एवढंच म्हणावं
आपण जिवंत आहोत
विठू कधीच मेला होता!

विष्णूच्या जन्मजात वृत्तीनुसार मृत्यूदेखील त्यासाठी आंतरभोगच होता!

(राजा शिरगुप्पे यांच्या लेखाचा हा संपादित अंश असून मूळ लेख साप्ताहिक साधनामधे आलाय.)