लेखक कवींनो, कळपात नका राहू, माणसांत मिसळा

२२ जानेवारी २०१९

वाचन वेळ : ९ मिनिटं


सांगली जिल्ह्यातल्या विटा इथे नुकतंच ग्रामीण मराठी साहित्य संमेलन झालं. या संमेलनाला मोठी परंपरा आहे. पु.लं. देशपांडे गेल्या रविवारी २० जानेवारीला झालेल्या ३७ व्या संमेलनाचे अध्यक्ष होते, ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख. त्यांनी आपल्या भाषणात सद्यस्थितीचा विविधांगी आढावा घेत आपली परखड मत मांडली. त्यांच्या भाषणाचा हा संपादित अंश.

विटा इथल्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे १९८२ मधे पु. ल. देशपांडे अध्यक्ष होते आणि त्यापूर्वी ते इचलकरंजीच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. यंदा त्यांच्या जन्मशताब्दीचं वर्ष आहे आणि त्यांनी ज्या संमेलनाचं अध्यक्षपद भूषवलं त्याच विट्याच्या ग्रामीण संमेलनाचा मी अध्यक्ष आहे, यामुळे जशी धन्यता वाटते, तसाच संकोचही. पुल हे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होतं. मी मात्र केवळ लेखन आणि प्रशासन याच दोन गोष्टी केल्या.

प्रशासनात असताना ग्रामीण जीवन जवळून बघितलं. त्यांचे प्रश्न, त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या आणि त्यातून माझ्या काही साहित्यकृती निर्माण झाल्या. माझा ‘पाणी! पाणी!!’ हा पाणीटंचाई आणि दुष्काळाचा मानवी जीवनावर कसा परिणाम होतो, याचा वेध घेणार्‍या कथांचा संग्रह आहे. ‘गाव विकणे आहे’ हा ताजा कथासंग्रहही जागतिकीकरणानंतर कृषी क्षेत्रात सुधारणा न झाल्यामुळे शेतकर्‍यांची कशी परवड होते, अक्षरश: नापिकी आणि भुकेला कंटाळून सबंध गाव विकण्याचा ठराव केला जातो, त्यावर लिहिलेली शीर्षक कथा आहे ‘गाव विकणे आहे’.

दुष्काळात सरकारी धोरण, नोकरशाहीची निष्क्रियता

महाराष्ट्र, सांगली जिल्हा आणि हा विटा तालुकाही दुष्काळ, पाणी टंचाई आणि चारा टंचाईने होरपळतोय. चार्‍या अभावी जनावरं जगवणं कठीण झालंय. पाणी टंचाईनं मायमाऊलीचं श्कष्ट वाढलंय. आणि हाताला काम नाही, शेतमालाला योग्य दाम न मिळाल्यामुळे बळीराजा हताश आहे. संतप्त आहे. बळीराजाची जगण्याची, लेकराबाळांना पोटभर जेऊ घालण्याची आणि त्यांचं पैशाअभावी शिक्षण बंद पडू नये, यासाठी सातत्यानं धडपड चाललीय.

सरकारी धोरणं आणि नोकरशाहीची निष्क्रियता, असंवेदनशीलता यामुळे ती धडपडही निष्फळ ठरत आहे. खरं तर सामान्य माणूस, शेती करणारा शेतकरी फार काही मागत नाही. गदिमांच्या शब्दांत सांगायचं झालं तर, तो फक्त ‘पोटापुरता पसा’ मागतो, त्याला अंबानी-अदानी, महिंद्राप्रमाणे महाल-इमले वाड्या नकोयंत. गदिमांचे शब्द असे आहेत,

‘पोटा पुरता पसा पाहिजे, नको पिकाया पोळी

देणार्‍याचे हात हजारो, दुबळी माझी झोळी’

जवळच्या मंगळवेढ्यात जुन्या काळी दामाजी हा सरकारी अंमलदार होऊन गेला. त्यानं दुष्काळात माणसं तगवण्यासाठी सरकारी धान्य कोठारं उघडून त्यांना धान्य दिलं. आज अशी संवेदनशीलता दाखवणारं शासन पण नाही आणि नोकरशाही तर नाहीच नाही. त्यामुळे आज गदिमा म्हणतात तसे ‘देणारे हजारो हात’ सोडा पाच-पन्नास तरी आहेत का?

जागतिकीकरणाने शेतीचा फायदा किती?

जागतिकीकरणानं माणसाला खास करून शेतकर्‍याला विकास नाही दिला, समृद्धी नाही दिली; तर स्वार्थ दिला, स्पर्धा दिली आणि गावकीतलं प्रेम, आस्था आणि परस्परांबाबतची आपुलकी आटत गेली. गावगाड्यात निवडणुकीचं आणि सहकाराचं स्वाहाकारी राजकारण शिरलं आणि गावगाड्याची निष्पापता, साधं पण समाधानी जीवन हरवलं.

हे असं का झालं? कुणामुळे झालं? त्यात सरकार किती जबाबदार, जागतिक धोरणं, खाऊजा म्हणजे खासगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरणाची धोरणं किती जबाबदार आहे आणि आपण गावकरी किती जबादार आहोत? याचा आपण कधी तरी शांतपणे विचार केला पाहिजे. असा विचार जेव्हा मी करतो, तेव्हा अस्वस्थ होतो. आणि लक्षात येतं की जागतिकीकरणाचे फायदे शहराला आणि उद्योग, सेवा क्षेत्राला जेवढे झाले, उच्च आणि मध्यमवर्गीय शहरी माणसांना झाले, तेवढे सोडा पण त्याच्या शतांशानंही ग्रामीण भारताला, शेतकरी, शेतमजुरांना झाले नाहीत.

बहुजन तरुणाचं भरकटलेपण

ग्रामीण युवक अस्वस्थ आहे, निराश आहे. एक तर तो दैवाधीन होत अंधश्रद्धाळू होतोय किंवा व्यसन, गुन्हेगारीकडे वळतोय. सनातन संस्थेच्या प्रभावाखाली या भागातला तरुण का गेला? द्वेषावर आधारित धर्मवाद, हजारो वर्षांपासून गावात आपला शेजार्‍याचा धर्म वेगळा आहे, म्हणून त्याचा द्वेष करायला कोण शिकवतंय या प्रश्नापेक्षाही तरुण का कट्टर धार्मिक, अंधश्रद्धाळू होतोय? त्याला या भागातले सुधारक पुरोगामी विचारवंत जसं की, डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे यांचे विवेकी विज्ञाननिष्ठ विचार का पटत नाहीत? का ते सनातन किंवा महाराजांचे नाव घेऊन चालणार्‍या प्रतिष्ठानच्या भूलथापांना बळी पडत आपलं तारुण्य नासवत आहेत? का संशयावरून पकडले गेलेले तरुण सांगलीच्या बहुजन समाजातलेच आहेत?

हे सारे चिंतेचे, काळजीचे प्रश्न आहेत. पण त्याचं खरं कारण आहे कुंठीत झालेली ग्रामीण अर्थव्यवस्था, कुचकामी आणि निष्कृष्ट शिक्षण आणि शेतकर्‍यांची मुलं असलेले नेते आमदार-खासदार झाल्यावर मुंबई-दिल्लीला जाऊन शेतकर्‍यांचे नाही तर उद्योगपतींचे हित पाहणारे दलाल का बनतात, हे न उलगडणारं कोडं आहे.

हे असं आजचं अस्वस्थ आणि स्फोटक वर्तमान आहे. आज देशाचा कळीचा प्रश्न म्हणजे शेतीचं संकट, बेरोजगारी आणि कौशल्य न शिकवणारं, जगण्यासाठी समर्थ न करणारं भरताड, कुचकामी शिक्षण.

पण हे लक्षात कोण घेतं? या नावाची ह. ना. आपटे यांची कादंबरी आहे. आजचा प्रश्न हाच आहे, हे अस्वस्थ, स्फोटक वर्तमान लक्षात कोण घेतं? हरिभाऊंची एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभी पडलेल्या ब्रिटिश आमदानीतल्या दुष्काळावर एक कथा होती, काळ तर मोठा कठीण आता. आजचा काळ गरीब आणि ग्रामीण भारतासाठी कुळवाड्यासाठी आणि ग्रामीण तरुणतरुणींसाठी खरंच अधिक प्रमाणात कठीण आणि खडतर आहे.

लेखकाने काय केलं पाहिजे?

एक लेखक म्हणून, एक समाजभान असलेला आणि लोकांप्रती संवेदना ठेवणारा कलावंत म्हणून हा कठीण काळ मी आज मांडतोय. साहित्य हे कधीच क्रांती घडवून आणत नाही, पण क्रांतीचा विचार मांडतं. जाणत्या, संवेदनशील मनात ठिणगी पेटवतं आणि त्याला कृतीसाठी प्रवृत्त करतं. महात्मा गांधींनी रस्किन, थोरो, टॉलस्टॉय यांची निवडक पुस्तकं वाचली आणि ती पचवली. आणि विचार करून त्यांनी सत्याग्रह, असहकार आंदोलन अशी निशस्त्रांची अहिंसक पण जालीम शस्त्रं शोधली. त्यामुळे ब्रिटिशांना चालतं व्हावं लागलं. हा इतिहास आहे, तो साहित्य आणि विचारांचं महत्त्व आणि सामर्थ्य अधोरेखित करतो!

मला एक लेखक म्हणून स्वत:ची नेहमीच शरम वाटते. कारण शेतकरी, ग्रामीण आणि एकूणच जगण्याची लढाई रोज लढणार्‍या आणि रोज पराभूत होणार्‍या, प्रसंगी आत्महत्त्या करणार्‍या सामान्य माणसाचं दु:ख मी कमी करू शकत नाही. १९५० च्या दशकात उर्दूतले प्रसिद्ध शायर साहिर लुधियानवी यांनी एक गीत लिहिलं होतं,

‘जब इन काली सदियों के सरसे

जब रात का आंचल ढलकेगा

जब दु:ख के बादल पिघलेंगे

जब सुख का सागर छलकेगा

जब अंबर झूमके नाचेगा

जब धरती नग्मे गायेगी

वो सुबह कभी तो आयेगी !’

पण असा दिलासा आज एक लेखक म्हणून माझ्या जगण्यासाठी संघर्ष करणार्‍या सामान्य कष्टकरी माणसाला मी देऊ शकतो का? दुसरा कोणी, खुद्द आज पुन्हा साहिरसाहेब अवतरले तरी देऊ शकतील का? याचं उत्तर माझ्या मते स्पष्ट ‘नाही’ असं आहे.

मग आम्ही का लिहायचं? आम्ही लेखक, कवी शेतकरी, गरीब आम आदमीवर लिहितो म्हणजे त्यांच्या दु:खावर फुंकर घालतो की त्याची जखम खरवडून ताजी करतो? का लिहून त्यांच्या वेदनेशी आम्ही खेळतो? हे प्रश्न तुम्हा रसिकांना तुमच्यातल्या साहित्यिकांनाही कधी ना कधी पडले असतीलच ना?

सर्वसामान्यांना दुःखात मदतीचा हात द्या

भारतातले सर्वश्रेष्ठ लेखक हिंदी, उर्दूचे कथा, कादंबरीकार प्रेमचंद यांचा आणि ते ज्या प्रगतीशील विचारधारेचे अध्वर्यू होते, त्यांचा दाखला देऊन मी असं म्हणेन की, लेखक शब्दांच्या, कलाकार कलेच्या माध्यमातून सामान्य माणसांच्या दु:खाचा आवाज आणि वेदनेचा स्वर प्रखर करतं आणि त्याच्या दु:खाचा काही प्रमाणात का होईना निचरा करतं, त्याला दिलासा देतं. 

लेखकाचं दु:खाचं चित्रण करण्याचं प्रयोजन स्पष्ट करताना नोबेल पारितोषिक विजेते लेखक विल्यम फॉकनर यांनी जे उद‍्गार काढले, तेच तर कलेचं, साहित्याचं मर्म आहे, प्रयोजन आहे. विल्यम फॉकनरनी नोबेल पारितोषिक स्वीकारताना भाषणात म्हटलं होतं,

‘मानव जातीचा शेवट जवळ आलाय हे मान्य करायला मी तयार नाही. कारण मानव जात ही अमर आहे. याला इतिहासाची साक्ष आहे. माणूस दु:ख आणि वेदना सहन करत, त्यावर मात करत जगतो आणि वाटचाल करतो. कारण त्याला मन आहे, आत्मा आहे. त्याच्यात अपार अशी सहनशक्ती आहे. त्याच्यात त्याग आणि करुणेची भावना आहे. त्यामुळे लेखक-कवीचे माझ्या मते हे कर्तव्य आहे, नव्हे तो त्याचा वाङ्मयीन धर्म ठरतो. त्यांनी सामान्य माणसांना दु:ख सहन करण्यासाठी, त्यांचं मन कणखर करण्यासाठी मदत करावी. त्याला हे पुन्हा पुन्हा सांगावं, पटवून द्यावं की, त्याच्यात म्हणजे माणसांत विपरीत परिस्थितीतून मार्ग काढत जगण्याचं अपार धैर्य आहे, सामर्थ्य आहे.’

हा गुन्हा प्रत्येकाने करायला पाहिजे

पण आजच्या या असंवेदनशील आणि राजकारणानं मन मानस भ्रष्ट झालेल्या जमान्यात कोडगे राज्यकर्ते असं कदाचित माझ्यासारख्या स्वत:ला गरिबाचा आवाज समजणार्‍या लेखकाला जेव्हा तुमच्या लिखाणानं का समाज बदलणार आहे? शेतकर्‍यांच्या का आत्महत्या थांबणार आहेत? असं विचारतात, तेव्हा मी त्यांना विल्यम फॉकनरचं हे उत्तर देतो आणि निरुत्तर करतो.

‘रात जितनी गमगीन होगी

सुबह उतनीही रंगीन होगी’

असं म्हणणारा साहिर स्वत:ला ‘शेतकरी, कामगारांचा कवी, फनकार’ म्हणून घेत लिहून जातो,

‘आज से मै जीवन को अंधियारे पथपर

मशाल लेकर निकलुंगा

धरती के फैले आंचल र्में

सुर्ख सितारे भर दुंगा

आज से ए मजदूर - किसानो

मेरे गीत तुम्हारे हैं.’

इथे मला कामगाराच्या जीवनाशी एकरूप झालेल्या कवी नारायण सुर्वेंच्या एका कवितेची आठवण येते.

‘कामगार आहे मी तळपती तलवार आहे

सारस्वतांनो थोडासा गुन्हा करणार आहे.’

असा गुन्हा प्रत्येक साहित्यिकाने केला पाहिजे. जे आपले आस्थेचे विषय आहेत, माणूस आहे, त्याच्यासाठी, त्याच्या बाजूने तलवार उपसली पाहिजे.

भूमिका घेणं, म्हणजे नक्की काय?

यालाच लेखक, कलावंतांनी भूमिका घेणं म्हणतात. भूमिका घेणं म्हणजे प्रचारी लिखाण करणं नाही. तर माणसाचं दु:ख हा आस्थेचा आणि व्यापक करुणेचा करून त्याचं मन, त्याच्या भावना प्रकट करणं होय! माणूस जगताना भूमिका घेऊन जगत नाही, हे खरं आहे. पण त्याचे अनुभव, त्याचे विचार आणि त्याचे संस्कार त्याच्या भूमिका ठरवत असतात, ज्या तो सहजतेनं जीवन जगताना प्रकट करीत असतो. 

मला इथं जमलेल्या नव्या, जुन्या लेखक, कवींना सांगावं वाटतं की, कळप करून राहू नका. उलट विशाल पसरलेल्या मनुष्यरूपी सागरात मिसळून जा. त्याच्या दु:ख, वेदनेचं खारट पाणी चाखा आणि शब्दातून त्याला प्रकट करा. त्यासाठी काय केलं पाहिजे? तर स्वत:ला रचत गेलं पाहिजे. स्वत:ला दलित, पीडित, वंचितांच्या दु:खाच्या सरणावर रचून घेता आलं पाहिजे. जळत्या आगीची धग कातडीच्या आत जाऊन अंतरंगात ती तप्त होत पसरली पाहिजे. तेव्हा एक करुणेचा हुंकार पोटातून ओठांवर येतो. आणि लेखक, कलावंतांचा त्याक्षणी जन्म होतो.

लेखनासाठी आजच्या इतका चांगला काळ भारतात कधीच आला नसेल. कारण हा काळ बदलाचा आहे. स्थित्यंतराचा आहे. खळबळीचा, घुसळणीचा आहे. सांस्कृतिक संघर्षाचा आहे. अस्मितेच्या टकरावाचा आहे. धर्मसत्तांच्या समाज नियंत्रण करण्याचा  आहे. आक्रमक प्रचाराचा आहे. संविधानिक मूल्यांचा आणि नैतिकतेच्या परीक्षेचा आहे. या सार्‍यांच्या केंद्रस्थानी असणार्‍या सामान्य माणसाच्या जगण्याचा आणि अनेक आघाडीवर लढण्याचा आहे. 

नव्या पिढीच्या लिहित्या, लिहू पाहणार्‍या लेखक, कवींना माझा लेखक म्हणून जो थोडाफार नैतिक अधिकार आहे, त्याच्याआधारे मित्रत्वाचा सल्ला आहे की, तुम्ही समाज बघा, माणूस वाचा आणि त्याचं जीवन व्यक्त करा. तुम्ही मग खरेच मोठे साहित्यिक व्हाल आणि सामान्य माणसाला त्याची आत्म्याची भाकरी देऊन त्याला जगण्याला बळ द्याल. हेच तुमचंमाझं काम आहे. लेखनाचं प्रयोजन आहे. हेच ठामपणे भूमिका घेणं आहे.

आज अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच होत असताना, विचार लोकांनी ऐकू नये आणि करू नयेत असा प्रयत्न होत असताना आपण सार्‍यांनी आपला आवाज, विचार बुलंद केला पाहिजे. त्यासाठी बौद्धिक मिंधेपणा सोडला पाहिजे. यावर मी यवतमाळ संमेलनात सविस्तर बोललो आहे, म्हणून इथं एवढंच बोलून थांबतो.

स्वत:च्या नजरेने भवताल शोधा

आता मी माझं उदाहरण देत, माझ्या लेखनाचे संदर्भ देत लेखन प्रक्रियेबद्दल थोडसं बोलणार आहे. पर्सनल इज पॉलिटिकल, वैयक्तिक ते राजकीय. हे व्यापक अर्थानं माझ्या लेखनाचं सूत्र आहे. मी कथा, कादंबर्‍यातून जागतिक दहशतवाद, धर्मांमुळे, जातींमुळे माणसांची होणारी गळचेपी, बालमजुरी, स्त्रीभ्रूण हत्या, वाढता भ्रष्टाचार, शासन संस्थेची असंवेदनशीलता, दुष्काळ, पाणी टंचाई हे प्रश्न मांडलेत. कारण ते माझ्या आस्थेचे, काळजीचे विषय आहेत.

मला कोवळ्या मुलांनी काम करणं. बालमजूर होत त्यांचं कोवळेपण करपून जाणं कदापि मंजूर नाही. माझ्या या काळजीतून ‘हरवलेलं बालपण’ ही कादंबरी जन्मास आली. आज आपण स्त्रीपुरुष समतेच्या मोठमोठ्या गप्पा मारतो. पण संख्येचा विचार केला तर हजार मुलांमागे केवळ ८८३ मुली जन्मतात. म्हणजेच शे-सव्वाशे मुली गर्भातच मारल्या जातात. त्यामुळे स्त्रीपुरुष लोकसंख्येचे प्रमाण स्त्रीसाठी विषम आहे. या प्रश्नाची सामाजिक बाजू मी पाहिली. अभ्यासली. त्यामुळे वाढते स्त्री अत्याचार जाणले आणि माझ्या ‘सावित्रीच्या गर्भात मारलेल्या लेकी’ या पुस्तकाची निर्मिती झाली.

मित्र हो, मला माझं उदाहरण देत स्वस्तुती करायची नाही. कारण ‘आपुली आपण करी जो स्तुती, तो एक मूर्ख’ हे समर्थ वचन मला माहीत आहे. पण इथे जमलेल्या तरुण लेखक, कवींना माझ्या निर्मितीमागेचे माझे आस्थेचे विषय सांगायचे आहेत. प्रत्येकाची एक प्रतिभा असते, ती माणूस नामक प्राण्याचं जीवन आकळत असते. ते अफाट आहे, पण त्यातले काही पैलू गवसतात, त्यातून आपली कथा सापडते. मानवी जीवनातले हे कथा, प्रश्न टिपता आले पाहिजे. त्यासाठी मन उघडं हवं आणि स्वत:ची खास नजर हवी. ती तुमच्यात आहे का, याचा शोध घ्या आणि मग सराव आणि जागृत कलावंतांच्या मनानं तुम्हांस तुमची कथाबीजं, काव्यविचार सापडू लागतील. कलावंताला स्वत:चा आत्मस्वर सापडला पाहिजे, तो तुम्हाला सापडो अशी सदिच्छा व्यक्त करून मी माझं अध्यक्षीय भाषण पूर्ण करतो.

(लेखक ज्येष्ठ साहित्यिक आहेत.)