वि. रा. शिंदेः ते रोज एकदा अस्पृश्यांबरोबर जेवत

०२ जानेवारी २०१९

वाचन वेळ : १३ मिनिटं


महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी फक्त महाराष्ट्रातल्याच नाही तर देशातल्या समाजसुधारणांमधलं बेसिक काम करून ठेवलंय. अस्पृश्यतेचा मुद्दा त्यांनीच पहिल्यांदा देशाच्या अजेंड्यावर आणला. वैचारिक क्षेत्रातलं त्यांच्या भूमिका आज तेव्हापेक्षाही जास्त मोलाच्या ठरत आहेत. तरीही आज ३ जानेवारीला त्यांच्या स्मतिदिनी नाही चिरा, नाही पणती अशीच स्थिती आहे.

महाराष्ट्रातल्या समाजसुधारकांच्या इतिहासात महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचं स्थान एकमेव आहे, असं म्हणण्यात काहीही अतिशयोक्ती नाही. शिंदे यांच्या कार्यपद्धतीचा विचार केला, तर ते सुधारणेच्या तेव्हाच्या कोणत्याच संप्रदायात बसत नाहीत. त्यांचा स्वतःचाच असा एक वेगळा मार्ग होता. त्यात जसा त्यांना कुणी गुरू नव्हता, तसा त्यांना नंतर कुणी शिष्यही लाभला नाही.

दोन पंथांमधे विभागलेला काळ

शिंद्यांच्या काळी समाजसुधारणा करणाऱ्यांचा एक पंथ आणि राजकीय सुधारणा म्हणजेच स्वातंत्र्याची चळवळ करणारा दुसरा पंथ अशी परिस्थिती होती. सामाजिक सुधारणा करू इच्छिणारे लोक राजकीय स्वातंत्र्याच्या बाबतीत उदासीन असत. इतकंच नाही, तर आपल्या आजच्या सामाजिक परिस्थितीत आपण स्वराज्याला पात्र नाही, त्यामुळंच ब्रिटिश सत्ताधाऱ्यांच्याच मदतीने सामाजिक सुधारणा करून घेऊ, असंही हे लोक म्हणत. त्यांचा भर मुख्यतः स्त्रीशिक्षण, पुनर्विवाह अशा गोष्टींवरच होता.

हेही वाचाः वाचकानं सजगपणे वाचन संस्कृती कशी घडवावी?

राजकीय स्वराज्याचा पुरस्कार करणाऱ्यांना इंग्रजांच्या गुलामीच्या जोखडातून देशाला मुक्त करणं, हा तातडीचा आणि निकडीचा प्रश्न वाटायचा. त्यांच्यापैकी काहींना सामाजिक सुधारणांचं महत्त्व पटलेलं होतं. परंतु त्यांना स्वराज्याची मागणीही महत्त्वाची वाटत होती. सामाजिक सुधारणांना विरोध करणाऱ्यांचा दुसरा वर्ग सरळ सरळ सनातनी प्रतिगाम्यांचा होता.

शिंद्यांचं उठून दिसणारं वेगळेपण

सामाजिक सुधारणेच्या लुडबुडीमुळे स्वराज्य मिळायला विरोध होतो, म्हणून या मंडळींनी पुण्यात भरलेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात नेहमीप्रमाणे सामाजिक परिषद भरवायला विरोध केला. इतकंच नाही, तर सामाजिक परिषद भरविण्याचा कुणी प्रयत्न केला, तर अधिवेशनाचा मंडपच जाळून टाकू, अशी धमकी देऊन त्यांनी सामाजिक परिषदेला गाशा गुंडाळायला लावला. याच पार्श्वभूमीवर आणि याच संदर्भात शिंदे यांचं वेगळेपण आणि महत्त्व उठून दिसतं.

शिंद्यांनी प्रयत्नपूर्वक १९२१ मध्ये नागपुरात भरलेल्या काँग्रेसमध्ये सामाजिक परिषदेची पुनर्स्थापना केली. मनुष्य जीवनाची सामाजिक आणि राजकीय फाळणी, शिंदे यांना मान्य नव्हती. स्वराज्याची सबब सांगून सामाजिक सुधारणा करण्यास चालढकल करणं आणि सामाजिक सुधारणांमागे दडून स्वराज्यापासून पळ काढणं त्यांना पटत नव्हतं.

अर्थात शिंद्यांचं हे वेगळेपण त्यांना लौकिक जीवनात मारक ठरलं. कारण राजकीय जहालांना त्यांचे पुरोगामी विचार अडचणीचे वाटत असत, तर सामाजिक सुधारणा करणाऱ्यांना त्यांची राजकीय जहाल मतं पटत नसत. त्यामुळं दोन्ही प्रकारच्या लोकांकडून ते अलग पडले.

वारकरी कुटुंबात जडणघडण

जमखिंडी संस्थानच्या जमखिंडी गावातच २३ एप्रिल १८७३ ला विठ्ठल रामजी शिंद्यांचा जन्म झाला. सुरवातीला श्रीमंत असणारं शिंदे कुटुंब नंतरच्या काळात गरिबीकडे वाटचाल करत होतं. परंतु त्या काळातही त्यांच्या वडिलांनी म्हणजे रामजी शिंदे यांनी विठ्ठलरावांना कधीही शाळेपासून दूर केलं नाही. शिंद्यांच्या विचारांची मूळ जडणघडण त्यांच्या कुटुंबातच झाली. कारण हे कुटुंब पिढीजात वारकरी होतं. भागवत धर्माचे संस्कार घरामधूनच मिळत गेल्यामुळं पुढच्या आयुष्यात अस्पृश्यता निवारणाचं कार्य आणि प्रार्थना समाजात उपदेशक म्हणून वावर या दोन्ही गोष्टी त्यांनी सहजपणे केल्या.

आगरकरांचे निबंध आणि ह. ना. आपटे यांच्या कादंबऱ्या  वाचून त्यांची मतं सुधारकी बनलेली होती. म्हणूनच धाकटी बहीण जनाक्का हिचा सासरी छळ होतोय म्हटल्यानंतर विठ्ठलरावांनी त्या काळात तिला परत आणण्याचं धाडसी पाऊल उचललं.

हेही वाचाः पुस्तक माणसाला कसं घडवतं?

विठ्ठल रामजी शिंदे तेव्हा जमखिंडीच्या शाळेतली शिक्षकाची नोकरी सोडून पुण्याला शिकायला आले होते. बहीण जनाक्कालाही त्यांनी माहेरी न ठेवता पुण्यात आणण्याचं नियोजन केलं. त्यामागेही त्यांची स्पष्ट भूमिका होती. जनाक्कानं माहेरी लाचारीचं जिणं न जगता शिकून स्वतःच्या पायावर उभं राहावं, अशी त्यांची इच्छा होती. त्यामुळंच त्यांनी पुण्यात जनाक्काच्या शिक्षणाची सोय करण्याचं ठरवलं. जनाक्काला पुण्यात घेऊन आल्यानंतर विठ्ठल रामजी शिंदे यांना अनेक खटपटी कराव्या लागल्या. त्यात त्यांना यश येईना.

बहिणीच्या शिक्षणासाठी धडपड

शेवटी हुजूरपागेच्या मुलींच्या हायस्कूलमध्ये तिला प्रवेश मिळाला. जनाक्कांची अशा तऱ्हेने झालेली सुरवात शेवटपर्यंत त्यांना निराळं बळ देत गेली. जनाक्का नंतर मॅट्रिक झाल्या आणि अखेरपर्यंत विठ्ठल रामजींबरोबर अस्पृश्यता निवारणाचं कार्य करीत राहिल्या. त्या काळामध्ये माहेरी आलेल्या मुलीला शिक्षण देऊन सन्मानाचं जिणं बहाल करायचं, हे खरोखरच क्रांतिकारी पाऊलच होतं. बालपणी झालेल्या संत संस्कारांमुळं धर्म हा विठ्ठलरावांच्या जीवनातला प्रभावी घटक ठरला.

महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी ते पुण्यातल्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये दाखल झाले, तेव्हा गोपाळ गणेश आगरकर प्राचार्य होते. जर्मन तत्त्ववेत्ता मॅक्सम्युलर याच्या तत्त्वज्ञानाचा शिंद्यांवर जास्त प्रभाव होता. कॉलेजमधे असतानाच शिंद्यांचा ब्राह्मो समाजाशी जवळून परिचय झाला. प्रार्थना समाजही काही प्रमाणात तरी बंगाली ब्राह्मो समाजाची मराठी आवृत्ती होती. विठ्ठलरावांनी रीतसर समाजाची दीक्षा घेतली.

इंग्लंडला जाऊन घेतलं धर्मशिक्षण

सुरवातीला पुण्याच्या सभेमधे आणि नंतर एलएलबीचा अभ्यास मुंबईत करताना प्रार्थना समाजात ते उपासना करू लागले. समाजाचा प्रचारक होणं, हेच त्यांनी जीवनध्येय मानलं. अर्थात त्यासाठी उच्चप्रतीचं धर्मज्ञान असणं आवश्यक होतं. लवकरच शिंदे ब्राह्मो समाजाच्या प्रोत्साहनाने आणि बडोद्याच्या सयाजीराव महाराजांच्या आर्थिक मदतीने तौलनिक धर्माभ्यासासाठी ऑक्सफर्ड इथल्या मँचेस्टर कॉलेजमधे दाखल झाले. तिथं धर्माच्या अभ्यासाबरोबरच त्यांनी बौद्ध धर्माचा आणि पाली भाषेचा विशेष अभ्यास केला.

१९०३च्या नोव्हेंबर महिन्यात मायदेशी परत आलेल्या शिंद्यांना मुंबई प्रार्थना समाजानं आपलं प्रचारक नेमलं. शिंदे यांनी तन, मन, धन अर्पण करून काम केलं. तेव्हा ‘सुबोधपत्रिका’ या नियतकालिकाचं संपादनही ते करत होतेच. गिरगावातल्या प्रार्थना समाजातल्या राम मोहन आश्रमात त्यांचं बिऱ्हाड होतं. त्यांची बहीण जनाक्काही त्यांच्याबरोबर तिथं राहत असत. त्यासुद्धा अस्पृश्यांसाठी काम करत असत. 

हेही वाचाः सगळ्यांना आवडणारे, हवे हवेसे वाटणारे गो. मा. पवार

प्रार्थना समाजाच्या कामासाठी शिंदे अहमदनगरला आले होते. बरोबर स्वप्नानंद स्वामी होते. जवळच असलेल्या भिंगार टेकडीजवळ अस्पृश्यांची सभा ठेवली होती. दिवसभर अस्पृश्य लोक काम करत असल्यामुळं ही सभा रात्री होणार होती. या सभेचे अध्यक्ष म्हणून जेव्हा विठ्ठल रामजी शिंदे हे स्वप्नानंद स्वामी यांच्याबरोबर गेले. लहानथोर बायकामुलांनी भरलेल्या त्या अस्पृश्यांच्या सभेचं दुःखं पाहून महर्षी शिंद्यांचं मन कळवळून गेलं.

अहमदनगरच्या सभेत केला अस्पृश्योद्धाराचा संकल्प

कष्ट, दारिद्रय, मागासलेपणा ओतप्रोत असूनही हा समाज प्रकाशाची वाट पाहत होता. वऱ्हाड नागपूरच्या अस्पृश्य मंडळींनी ‘सोमवंशी हितचिंतक समाज’ या नावाची संस्था काढली होती. त्यांनी मार्गदर्शक असं एक जाहीर पत्र या सभेसाठी पाठवलं होतं. ते सभेत वाचून दाखविताना महर्षी शिंदे यांनी तिथंच मनामधे काही संकल्प सोडले.

त्यांनी म्हटलंय, ‘हजारो वर्ष वरच्या जातीचा जुलूम सहन करूनही वरिष्ठ वर्गाची मनं न दुखावता किंबहुना कोणत्याही प्रकारे त्यांच्या वाट्याला न जाता अस्पृश्य वर्गाने आपल्या स्वतःच्या हिताचे प्रयत्न करावेत, जाहीर पत्रकातला उद्देश मी सभेला समजावून सांगत होतो आणि त्याच वेळा मनामधे माझ्या काही निश्चय होत होते. त्याच रात्री मी यापुढचं आयुष्य अस्पृश्य कार्याला वाहून घ्यायचं अशी शपथ घेतली. एका क्षणाचाही विलंब न लावता या कार्याला वाहून घेण्याचा मी संकल्प केला. त्यानंतरच्या काळात या अपूर्व सभेची आठवण ठेवून मी काढलेल्या मिशनचं धोरण आणि पद्धत सहिष्णुतेच्या जोरावर राबवायचं, हे माझ्या मनानं पक्क केलं. हे जाहीर पत्रक मला पुढच्या काळात ध्रुव ताऱ्याप्रमाणे मार्गदर्शक झालं.’

महर्षीच्या संकल्पाचं रुपांतर थोड्याच दिवसात सिद्धीमध्ये झालं. मुंबईला गेल्यानंतर प्रार्थना समाजाला आणि सुधारणा मंडळाला त्यांनी स्वतःच्या मनातली अस्पृश्योद्धाराची कल्पना सांगितली आणि १८ ऑक्टोबर १९०६ ला मुंबईमध्ये मुरारजी वालजी यांच्या बंगल्यात भारतीय निराश्रित साहाय्यकारी मंडळींची ‘डिप्रेस्ड क्लास मिशन’ची स्थापना झाली. या स्थापनेच्या दिवशीच मंडळाची पहिली शाळा सुरू झाली.

हेही वाचाः शिवरायांचं प्रतीक ही वारसदारांनी गमावलेली संधी

अस्पृश्यांमधे शिक्षणप्रसार, नोकऱ्या मिळवून देणं, सामाजिक अडचणींचं निवारण करणं, सार्वजनिक धर्म-व्यक्तिगत शील आणि नागरिकता या गुणांचा प्रसार करणं हे हेतू संस्थेची घडी बसवतानाच विठ्ठल रामजी शिंदे यांनी स्पष्ट केले होते. उपासनालय काढल्यावर ज्यात जातिभेद आणि मूर्तीपूजा या गोष्टींना फाटा द्यायचा, हेही त्यांनी ठरवलं होतं. भविष्यात संस्थेमार्फत उद्योगशाळा, वसतिगृह, दवाखाना उभारणीचंही नियोजन त्यांनी केलं होतं.

सनातन्यांसोबतच जातभाईंकडूनही अवहेलना

‘डिप्रेस्ड क्लास मिशन’ची स्थापना हा अस्पृश्यता निवारणाचा हा एक अभिनव प्रयोग होता. शिंद्यांना आता या कार्याला अखिल भारतीय स्वरूप द्यायचं होतं. त्यासाठी विठ्ठलरावांच्या घरातली मंडळीही पुढं आली. जनाक्कानं शिक्षिकेच्या नोकरीचा राजीनामा दिला आणि मिशनच्या कार्याला संपूर्णवेळ वाहून घेतलं. संस्थेच्या कामाचा व्याप वाढला. शाळांची संख्या वाढायला लागली. दवाखाने, उद्योगालय हेही सुरू झालं.

महर्षी शिंदे यांनी केलेल्या अस्पृश्योद्धाराच्या कामाची तुलनाच कशाशी करता येणार नाही. या विद्यार्थ्यांसाठी शाळा, उद्योगशाळा, दवाखाने यांचं जाळं त्यांनी देशभरात विणलं. ते स्वतः सहकुटुंब अस्पृश्यांच्या वस्तीत जाऊन राहिले. शिंद्यांचं हे कृत्य क्रांतिकारकच म्हणावं लागेल. अर्थात त्यासाठी त्यांना सनातन्यांकडून आणि ज्ञातीबांधवांकडून उपेक्षा, अवहेलना सतत सहन करावी लागली.

महर्षींच्या कार्याचा डंका भारतात सर्वत्र वाजू लागला होता. महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेहून पहिल्यांदा भारतात आले, तेव्हा पुण्याला आल्यानंतर त्यांनी स्वतःहून शिंद्यांची भेट घेतली.

जातवार मतदारसंघाला ठाम विरोध

`माँटेंग्यू चेम्सफर्ड सुधारणांमध्ये जातवार मतदारसंघाची तरतूद आहे. माझा या गोष्टीला ठाम विरोध आहे, कारण त्यामुळे समाजात जातीयता आणखी वाढून फूट पडेल. नवीन होऊ घातलेला ब्राह्मणेतर वाद हा ऐक्याला फार घातक होईल. योग्य रितीनं तो चालवला नाही, तर दोघांचं भांडण आणि तिसऱ्याचा लाभ, असा प्रकार होईल. ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद म्हणजे ब्रिटिशांच्या फोडा आणि झोडा या राजनीतीचं अपत्य आहे, त्या राजनीतीच्या अपत्याकडे बहुजन पुढाऱ्यांनी जाऊ नये. आधीच हिंदू आणि मुसलमान ही भारतीय समाजात दुही पडलेलीच आहे. त्यातून अस्पृश्यांसाठी वेगळा मतदार संघ निघाल्यास पुन्हा हिंदूंमध्ये फूट पडेल आणि ती फूट राष्ट्राला घातक होईल`, अशी भूमिका त्यावेळी शिंद्यांनी स्पष्टपणे घेतली होती.

याच काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारखा पुढारी अस्तित्वात येत होता. विठ्ठल रामजींच्या या मताला डॉ. आंबेडकरांचा विरोध होता. शिंद्यांनी स्वतः जातीयता कमी होण्यासाठी मराठ्यांसाठी राखीव असलेल्या जागेवर निवडणूक न लढवता, सर्वसाधारण जागेसाठी अर्ज भरला आणि पराभव पत्करला. शिंदे यांचं हे राजकीय बलिदान म्हणजे त्यांच्या जातियता विरोधी भूमिकेचं बोलकं उदाहरण होतं.

हेही वाचाः आधुनिक जगात प्रबोधन हेच समाजाला नवी दिशा देईल

याच दरम्यान पुणे नगरपालिकेत १४ वर्षाच्या मुलींच्या सक्तीच्या मोफत शिक्षणाचा ठराव आलेला होता. पालिकेतील पुराणमतवाद्यांनी पुरेसे पैसे नसल्याची सबब सांगत फक्त मुलांच्याच शिक्षणाचा पाठिंबा देऊन मुलींच्या शिक्षणाला विरोध केला. मुलींच्या शिक्षणाला सोयीस्करपणे विरोध केला जातोय, हे लक्षात येताच शिंद्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

मुलांच्याही आधी मुलींनाच शिक्षण द्या

‘पैशांचाच प्रश्न असेल, तर मुलांच्याही आधी मुलींनाच शिक्षण द्या. मुलगे मागे राहिले तरी चालतील. कारण एक मुलगी शिक्षित होणं, याचा अर्थ एक माता शिक्षित होणं आहे. आणि एक माता शिक्षित होणं म्हणजे एक कुटुंब शिक्षित होणं.’ असा परखड आणि निराळा पवित्रा शिंद्यांनी त्यावेळी घेतला.

कर्मवीर शाहू महाराजांनी ब्राह्मण शंकराचार्यांना हटवून क्षात्र जगद्गुरूंचं पीठ निर्माण करायचं ठरवलं. तेव्हा कोणत्याही प्रकारची पुरोहितशाही वाईटच, असं म्हणत त्यांनी महाराजांना विरोध केला. त्यांनी महाराजांचा रोष ओढवून घेतला. अस्पृश्यांच्या राखीव जागांना अपवाद म्हणून मान्यता दिली तरी त्या जागा निवडणुकीद्वारे न भरता त्यासाठी नामनिर्देशन करण्यात यावं, या त्यांच्या भूमिकेमुळं आयुष्यभर ज्यांची निर्मळ मनानं सेवा केली, ती अस्पृश्य मंडळीही नाराज झाली. त्या नाराजीची परिणती म्हणून ज्या संस्थेचे बीज शिंद्यांनी लावलं होतं. त्या बिजाचा वृक्ष करताना शिंद्यांनी प्रचंड धडपड केली होती, पण त्याच डिप्रेस्ड क्लास मिशनचा आणि अहिल्याश्रमाचा त्यांना त्याग करावा लागला. परंतु हा अवमान त्यांनी आयुष्यभर स्थितप्रज्ञतेनं सहन केला.

संशोधक कार्यकर्त्याचा पिंड

महर्षींच्या समाजसुधारणेची व्याप्ती फक्त अस्पृश्यता निवारणापुरती नव्हती. विठ्ठलराव जितके कार्यकर्ते होते, तितके संशोधकही होते. अस्पृश्यतेच्या प्रश्नाोचा अभ्यास त्यांच्या इतका कोणीही केला नव्हता. इतिहास, समाजशास्त्र, भाषाशास्त्र अशा नाना विषयांमध्ये त्यांना गती होती. या विषयात त्यांनी मूलभूत आणि मार्गदर्शक संशोधनही केलं होतं.

हेही वाचाः रा. ना. : महाराष्ट्राच्या इतिहासाचा संगणक

राजकीयदृष्ट्या जागरूक आणि सामाजिक बाबतीत पुरोगामी, असा महाराष्ट्र निर्माण करण्यात शिंद्यांचा फार मोठा वाटा आहे. यशवंतराव चव्हाण यांच्यावर त्यांचा प्रभाव होता. टिळकांचा लढाऊ बाणा, फुल्यांची सामाजिक अन्यायाबद्दलची चीड आणि रानड्यांची दूरदृष्टी यांचा मिलाफ असलेलं महर्षी विठ्ठल रामजी शिंद्यांचं व्यक्तिमत्त्व आजही महाराष्ट्राला दीपस्तंभासारखं मार्गदर्शक आहे.

आजही प्रेरणादायी कार्य

कोणा एकाची विशिष्ट अशी बाजू न घेता सतत परखड आणि प्रामाणिक भूमिका घेतल्यामुळं शिंदे अनेक क्षेत्रामध्ये उपेक्षित राहत गेले. एकाकी होत गेले. पुढं नेतेपदी गेलेल्या अनेक पुढाऱ्यांच्या कितीतरी अगोदर शिंदे यांनी अनेक सुधारणांना अग्रक्रम दिला होता, तरीही त्यांची उपेक्षाच झाली.

आत्ताच्या समाजाला अस्पृश्यांच्या स्थानाबद्दल योग्य भान देणारे ते प्रमुख क्रांतिकारी समाजसुधारक होते. रोज एकवेळचं जेवण तरी अस्पृश्याबरोबर घ्यायचं, हा शिरस्ता आयुष्यभर पाळणारे शिंदे आजही समाजासाठी नेतेच आहेत आणि त्यांचं कार्य आजही प्रेरणादायकच आहे.

हेही वाचाः 

डिजिटल युगातही गवर्न्मेंट प्रिंटिंग प्रेसकडे पुढच्या दहा वर्षांचं काम

परिवर्तनशील जगात धर्माची जागा सांगणारं सयाजीरावांचं भाषण

(लेखक ज्येष्ठ विचारवंत आहेत.)