पंढरीची वारीः माऊलींच्या दिंडीतला एक दिवस

०२ जुलै २०१९

वाचन वेळ : ६ मिनिटं


आळंदीहून ज्ञानेश्वर माऊलींची पालखी पंढरीच्या दिशेने रवाना झाली. पुणे मुक्कामानंतर पालखीने आता सासवडचा दिवेघाटही पार केलाय. पालखी रवाना होतानाच्या दिवशी आलेल्या अनुभवावरचा हा लेख.

मागची तीन वर्ष पंढरीची वारी पुर्ण केल्यानंतर गेल्यावर्षी झालेल्या अर्ध्या वारीची हुरहूर मनाला लागलेली होती. त्यामुळे यंदा पूर्ण वारी करण्याचा संकल्प केला. सकाळी सहाला उठलो. बुधवारी दुपारी बारापर्यंत आळंदीला पोचण्याची गरज होती. रणजित पाटील यांच्या कारमधून आम्ही सगळे आळंदीला जायला निघालो. यंदा पहिल्यांदाच वारी काय असते हे पाहण्याची उत्सुकता असलेले आमचे मित्र देशमुख साहेब मुद्दामहून आमच्याबरोबर आले होते.

पुढील अठरा दिवस घरदार पाहायला मिळणार नाही याचं थोडं दुःख होतं. कारमधे बसून पुण्याला जायला निघालो. दुपारी दीडच्या सुमारास आळंदीत पोचलो. वैष्णवांचा मेळा आळंदीत जमा होऊ लागला होता. इंद्रायणीवर असलेल्या पुलावरून माऊलींच्या मंदिराचं दुरून दर्शन घेतलं.

यंदा प्रथमच जाणवलं की माऊलींच्या सोहळ्यासाठी वारकऱ्यांची गर्दी गेल्या दोन-तीन वर्षाच्या तुलनेत फार कमी होती. यंदा पडलेला भीषण दुष्काळ आणि जून महिना उलटत आला तरी महाराष्ट्रातील अनेक भागात न पडलेला पाऊस हे या कमी उपस्थितीमागचं कारण असल्याचं विविध भागातील भेटलेल्या व्यापाऱ्यांशी बोलताना ध्यानात आलं.

आळंदी झाली माउलीमय

इंद्रायणी पात्रामधे गेलो. हातपाय स्वच्छ धुऊन नमस्कार केला आणि पुढे आमच्या कराडकरांच्या मठामधे पोचलो. या मठात दुपारच्या पंगती संपल्या होत्या. बारा नंबर दिंडीतील वारकरी विणेकरी निवांत पहुडले होते. विठ्ठल मंदिरात माऊलींचे आणि वैकुंठवासी मामांच्या प्रतिमेचे दर्शन घेऊन आम्ही सर्वजण जेवायला बसलो. जेवण झाल्यानंतर लगेच माऊलींच्या मंदिराकडे प्रस्थान सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी निघालो.

माऊली सोहळ्यासाठी ज्ञानेश्वर मंदिरात एकेक दिंड्या जात होत्या. पूर्ण आळंदी माउलीमय झाले होते. वारकरी माऊलींचा उत्साह वाढत होता. मंदिराच्या प्रवेशद्वारा नजीक आमचे मार्गदर्शक सोहळ्याचे प्रमुख चोपदार राजाभाऊ माऊली यांची भेट झाली. कडक शिस्तीच्या राजाभाऊंनी माऊलीच्या मंदिरात फक्त वारकरीच जावेत. दिंडीमधून कोणीही हौशीगौशी घुसू नयेत यावर चांगलेच लक्ष ठेवले होते.

हेही वाचा: 'वारीच्या वाटेवर' ही महाकादंबरी म्हणजे भागवत धर्माची बखर

वातावरणात भक्तिमय सुगंध

त्यानंतर आम्ही माऊलींच्या मंदिरात जाण्यासाठी पुढे निघालो. माऊली मंदिराच्या प्रवेशद्वारावर पोलीस खात्याने अतिशय कडक पोलीस बंदोबस्त ठेवला होता. मंदिरात कमीत कमी वारकरी जावेत आणि फार गर्दी होऊन गोंधळ निर्माण होणं तसंच दाटीवाटी होऊ नये यासाठी पोलिसांनी विशेष लक्ष ठेवलं होतं. चारच्या सुमारास माऊली मंदिरात प्रवेश केला. मंदिराला केलेली सजावट आणि इथलं भक्तिमय वातावरणात आलेला वेगळा सुगंध पाहून प्रवासाचा सर्व कंटाळा निघून गेला.

आता मंदिरांमधे एक दिंडी येत होती. वारकऱ्यांचा उत्साह वाढू लागला होता. प्रत्येक दिंडी येऊन माऊलींच्या मंदिरासमोर ज्ञानोबा माऊली तुकाराम चा जयघोष करत होती. कुणी नाचत होता, कुणी गात होता. माऊली माऊली माऊली नावाचा जयघोष सुरू होता. साडेपाचच्या सुमारास मंदिरामधे बहुतांश दिंड्यांचं आगमन झालं.

आत माऊलींच्या प्रस्थानाची तयारी करण्यात गावकरी आणि विश्वस्त मंडळ व्यग्र होते. बाहेर शेकडो वारकरी, टाळकरी, झेंडेकरी, विणेकरी, मृदंग, वादक यांनी माऊली नावाचा ठेका, ताल धरला होता. सहाच्या सुमारास माऊलींचे मानाचे अश्व मंदिरामधे दाखल झाले. आणि पुन्हा वारकऱ्यांचा उत्साह वाढला. अश्वाला स्पर्श करण्यासाठी अनेकजण पुढे गेले. माऊलींच्या अश्वाने मंदिराला प्रदक्षिणा घातली. दोन्ही अश्व पुन्हा मंदिरासमोरून थांबले. साडेसहा वाजले. सुमारे अडीच तीन तास टाळ-मृदंगाच्या तालावर नाचून दमलेले, थकलेले वारकरी आता माऊली केव्हा येणार याची वाट पाहत होते.

हेही वाचा: रमजान ईद दिवशी अमर हबीब यांची वाचायला हवी अशी कथा

माऊली माऊली नामाचा जयघोष

सातच्या सुमारास माऊलींची आरती झाली. साडेसात वाजले तरी वारकऱ्यांचा उत्साह जराही कमी झाला नव्हता. अनेकांचे लक्ष माऊलींच्या कळसाकडे होते. मंदिराचा कळस माऊली मंदिरातून बाहेर पडतात तेव्हा हलतो, मंदिरालासुद्धा माऊली येथून जातात हे दुःख सहन होत नाही, अशी वारकऱ्यांची भावना आहे. अनेकांचे लक्ष त्या कळसाकडे होतं.

घामाने चिंब झालेले वारकरी पावसाची प्रतीक्षा करत होते. मधूनच हवेची थंड झुळूक गारवा देत होती. मात्र पाऊस काही येत नव्हता. माऊलीच्या नामामधे ते तल्लीन होऊन गेल्यामुळे त्यांना माऊलींच्या येण्याची प्रतीक्षा होती, दर्शनाची ओढ होती. साडेसातच्या सुमारास माऊलींची पालखी मंदिराबाहेर आली आणि वारकऱ्यांनी माऊली माऊली नामाचा जोरदार जल्लोष केला. 

अवघी आळंदी माऊली नामाने दुमदुमून गेली. पालखीजवळ जाऊन दर्शन घेण्यासाठी वारकरी पुढे सरकले, आळंदी ग्रामस्थ पालखी आपल्या खांद्यावर घेऊन नाचवत होते. मंदिराला प्रदक्षिणा घालून पालखी मंदिरा बाहेर पडली आणि आळंदी गावात वारकऱ्यांचा उत्साह पुन्हा संचारला.

हेही वाचा: रमजान विशेषः मक्केतल्या आर्थिक शोषणाविरोधात मोहम्मदी विद्रोह

वारीचं एक वेगळंच दर्शन

माऊलींची पालखी नगर प्रदक्षिणेसाठी बाहेर पडली आणि आम्ही मंदिराच्या कळसाचं दर्शन घेऊन बाहेर पडलो. आळंदी गावाबाहेर एक किलोमीटर अंतरावर आमची गाडी उभी केली होती तिथे पोचलो. तीन-चार तास मोबाईलवर खूप काम झाल्यामुळे बॅटरी डाउन झाली. मोबाईल चार्जिंगला लावले. काही फोटो आणि बातम्याचे मुद्दे ऑफिसला पाठवले. चहा पाणी घेतले आणि पुन्हा पुण्याच्या दिशेने चालायला लागलो.

या अगोदर तीनवेळा वारी करताना मी आळंदीमधे मुक्काम केला होता आणि पहाटे पाचला चालायला सुरवात केली होती. यंदा मात्र थोडा बदल केला. सायंकाळी साडेआठच्या सुमारासमाझ्यासोबत असलेले रणजित पाटील, माणिक पाटील, प्रकाश पाटील आम्ही चौघांनी पुण्याच्यादिशेने चालायला सुरवात केली. आमच्यासोबत आमच्यासारखंच रात्री चालणारे अनेक वारकरी पुण्याच्या दिशेने निघाले होते. मात्र ही संख्या फार कमी होती.

आळंदी सोडून बाहेर आलो. माऊली माऊली माऊली नामजप करत आम्ही मार्गक्रमण करत होतो. रस्त्याकडेला उभारण्यात आलेल्या खासगी तंबत, फूटपाथवर अनेकांनी निवारा तयार केला होता. रात्रीचं एक वेगळंच वारी दर्शन मला बघायला मिळालं. पुलाखाली, रस्त्याकडेला, फुटपाथवर, दुकान गाळ्याखाली, पार्किंगजवळ, एटीएम सेंटरच्या शेजारी मिळेल त्या जागेवर वारकऱ्याने निवारा शोधला होता.

हेही वाचा: सत्यशोधक शामराव देसाईंनी बंद केलेल्या लक्ष्मीच्या जत्रा पुन्हा सुरू का होताहेत?

महाराष्ट्रातल्या संतांची एकात्मतेची शिकवण

तहान लागली म्हणून एका चौकात थांबलो. वसंतराव भोसेकर लोंढे प्रतिष्ठानतर्फे मंडप उभारण्याचं काम चालू होतं. कार्यकर्ते पाण्याच्या बाटल्या आणून ठेवत होते. यावेळी वसंतराव भोसेकर यांचा एक विचार मला खूप आवडला. महाराष्ट्रात अनेक संत जन्माला आलेत. आणि बहुतांश देव उत्तर भारतात जन्माला आलेले आहेत.

महाराष्ट्रातल्या संतांनी ही भूमी संतविचाराने आणि बुद्धिमत्तेने समृद्ध केली, एकात्मता वाढवली, जातीभेद संपवले आणि महाराष्ट्र पुढे पुढे गेला. याच महाराष्ट्रात उत्तर भारतातील, देवाच्या भूमीतील लोक नोकरी, कामासाठी येतात. इतका मोठा बदल संतांनी महाराष्ट्रात वैचारिक प्रगल्भतेवर घडवला. मला हा विचार खूप आवडला. वसंतरावांना नमस्कार करून पुढे निघालो

सहा किलोमीटर अंतर पार केल्यावर पावणे अकराच्या सुमारास एका ठिकाणी थांबण्याचा निर्णय घेतला. उमंग हॉटेलमधे जेवण केलं. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया मॅचचे शेवटचे चार ओवर पाहण्याचा आनंद घेतला. साडेअकरा वाजता आम्ही पुण्याकडे चालायला निघालो. रस्त्यावर वारकऱ्यांची गर्दी खुप कमी होती. दोन किलोमीटर झालं की आराम करायचा, निवांत चालत राहायचं असं आम्ही ठरवलं होतं.

हेही वाचा: साडेसातशे वर्षांपूर्वीचे संत गोरा कुंभार आजही थोर का आहेत?

वारकऱ्यांबरोबर वारकऱ्यांसारखं राहण्यातच मजा

मिलिटरी एरिया असलेल्या दिघी भागात आम्ही बाराच्या सुमारास पोचलो. एका ठिकाणी रस्त्यावरच बैठक मारली तेवढ्यात ग्राउंड वर असलेला एक फौजी तिथे आला. साहब यहा बैठने का नही, असे आम्हाला सांगू लागला. माऊली पाच मिनिट बसू द्या अशी त्याला विनंती केली. त्यानेही ती विनंती मान्य केली. पाच मिनिटांच्या विश्रांतीनंतर पुन्हा चालायला सुरवात केली.

विश्रांतवाडी दोन किलोमीटर अंतरावर होती, एका बाकड्यावर आम्ही बैठक मारली. साडेबारा वाजले होते. रस्त्याकडेला मिठाई आणि चहाची दुकानं सुरू होती. स्थानिक ग्रामस्थ बसले होते. त्यांच्यासोबत गप्पा मारल्या आणि पुन्हा चालायला सुरवात केली. एकच्या सुमारास आळंदी रोड पोलीस चौकीपासून पुढे आलो. आता शरीर आणि मन दोन्ही साथ देत नव्हते. त्यामुळे थांबायचा निर्णय घेतला.

रात्रीचा मुक्काम करण्यासाठी जागा शोधू लागलो. पुण्यात अनेक नातेवाईक आणि मित्र आहेत. त्यांनी फोन करून मुक्कामाला यावं असं कळवलं होतं. मात्र रात्री दीड वाजता केणाला उठवायला जायचं? वारकऱ्यांबरोबर वारकऱ्यांसारखं राहायला जी मजा आहे, ती घरामधे नाही असं नानानी बोलून दाखवलं.

वारकऱ्यांच्या स्वागतासाठी पुणेकरांनी अनेक ठिकाणी स्वागत कक्ष उभे केलेत. मंडप उभारलेत. अशा मंडपामधे अनेक वारकरी झोपलेले आम्ही पाहिले होते. असाच एक मंडप पाहून त्या स्टेजवर अंथरूण टाकलं. आमची गाडी शेजारी उभी केली आणि मध्यरात्री दीडच्या सुमारास अंथरुणावर अंग टाकलं.

हेही वाचा: 

वसंतराव नाईक यांचे राजकारणापलिकडचे किस्से 

संन्यास घ्यायला निघालेले विठ्ठलराव विखे पाटील सहकार चळवळीचे जनक कसे झाले?

दोन वर्षांत महाराष्ट्र अन्नधान्यात स्वयंपूर्ण झाला नाही तर मला फाशी द्याः वसंतराव नाईक