मदतीला धावून येणाऱ्या टीम मॅनेजमेंटकडून नंतर वासीम जाफरने पैसेही घेतले नाहीत

१६ फेब्रुवारी २०१९

वाचन वेळ : ६ मिनिटं


वासिम जाफर आज वयाच्या ४१ व्या वर्षात पदार्पण करतोय. गेल्याच आठवड्यात विदर्भाने सलग दुसऱ्यांदा रणजी करंडक उंचावलाय. विदर्भाच्या या विजयात जाफरचा मोठा वाटा राहिला. याआधी त्याने ८ वेळा मुंबईकडून रणजी ट्रॉफीची फायनल खेळत ट्रॉफी जिंकलीय. पण टीम इंडियात काही त्याला पुरेशी संधी मिळाली नाही. मुंबईतल्या एका गरीब कुटुंबात वाढलेल्या जाफरच्या संघर्षाचा हा प्रवास.

‘देव मुंगीला मुंगीच्या गरजेनुसार खायला देतो, तर हत्तीला हत्तीच्या गरजेनुसार. मला जे काही मिळालंय त्यात मी खूप समाधानी आहे. टीम इंडियासाठी दीर्घकाळ क्रिकेट खेळू शकलो नाही, याबद्दल माझ्या मनात किंचितशीही असमाधानाची भावना नाही. देवाने जे काही दिलंय ते माझ्या योग्यतेनुसारच दिलं असणार.’

वयाच्या चाळीसाव्या वर्षी विदर्भाच्या टीमला रणजी करंडक जिंकून देण्यात महत्वाची भूमिका निभावणारा वासिम जाफर ‘इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत सांगतो.

बस चालवणाऱ्या वडिलांचं स्वप्न

१६ फेब्रुवारी १९७८ रोजी मुंबईच्या वांद्रयातल्या एका चाळीत अतिशय गरीब घरात वासिम जाफर जन्मला. वडील बस चालवून आपल्या संसाराचा गाडा ओढायचे. मात्र वडिलांना क्रिकेटचं प्रचंड वेड. रमाकांत देसाई आणि पाकिस्तानचा हनीफ मोहम्मद या दोघांचे ते जबरी फॅन. आपल्या मुलाने एक दिवस भारतासाठी क्रिकेट खेळावं अशी त्यांची मनोमन इच्छा. त्यामुळेच अभ्यासात चांगली गती असलेल्या वासिमला वडलांनी क्रिकेटवर ध्यान द्यायला सांगितलं.

वसीमलाही खेळ आवडायचाच. मग त्यानेही मेहनत घ्यायला सुरवात केली. हळूहळू त्याच्या मेहनतीला रंग यायला लागला. वयाच्या पंधराव्या वर्षीच जाईल्स शिल्ड ट्रॉफीत आपल्या अंजुमन इस्लाम टीमकडून खेळताना त्याने ४०० रन्सची इनिंग साकारली. यामुळे त्याचं नाव तर चर्चेत आल. पण तरी त्याला फर्स्ट क्लास क्रिकेटचे दरवाजे काही उघडत नव्हते. वासिमने आपल्या कामगिरीतलं सातत्य काही हरवू दिलं नाही. शेवटी मुंबईच्या १६ वर्षाखालच्या टीममधे त्याची निवड झाली आणि त्यानंतर मुंबईच्या रणजी टीमचं तिकीटही मिळालं.

फर्स्ट क्लास क्रिकेटमधल्या दुसऱ्याच मॅचमधे त्याने मुंबईकडून खेळताना धडाकेबाज नाबाद ट्रिपल सेंच्युरी ठोकली. सौराष्ट्राविरुद्धच्या या मॅचमधे जाफर आणि सुलक्षण कुलकर्णी यांनी मुंबईसाठी ४५९ रन्सची ओपनिंग पार्टनरशिप उभारली. त्यावेळी मुंबईसाठी असा पराक्रम करणारी ही पहिलीच जोडी ठरली होती. फर्स्ट क्लास क्रिकेटमधल्या सातत्यपूर्ण कामगिरीनंतरही त्याच्यासाठी टीम इंडियाची दारं थोडी उशिराच उघडली.

टीम इंडियात उशिरा संधी

फर्स्ट क्लास क्रिकेटमधल्या ज्या स्पर्धेतल्या खेळीच्या आधारे एखाद्याला टीम इंडियाची दारं उघडतात, त्या रणजी ट्रॉफीमधे ११ हजार रन्सचा टप्पा ओलांडणारा एकमेव खेळाडू म्हणा, किंवा रणजीच्या १० फायनल खेळून त्या प्रत्येक वेळी आपल्या टीमला विजेतेपद मिळवून देणारा खेळाडू म्हणा, किंवा रणजीच्या दोन सिझनमधे हजार पेक्षा अधिक रन्स ठोकणारा खेळाडू म्हणा, किंवा मग फर्स्ट क्लास क्रिकेटमधे १९ हजार १४७ रन्सचा पाऊस पाडणारा खेळाडू म्हणा. जाफरकडे असं काय नव्हतं की ज्यामुळे त्याला टीम इंडियाचं दीर्घकाळ प्रतिनिधित्व करता आलं नाही, हा प्रश्न कायमच सतावत राहतो.

एवढंच कशाला. गेल्या वर्षीच्या मार्च महिन्यात विदर्भाच्या टीमने आपल्या पहिल्यावहिल्या इराणी चषकाच्या विजेतेपदाला गवसणी घातली. या स्पर्धेच्या फायनलमधे जाफरने साकारलेली नॉट आउट २८५ रन्सची इनिंग आठवा. त्या जोरावरच तर विदर्भाने शेष भारताविरुद्ध पहिल्या डावात ८०० रन्सचा डोंगर उभारला आणि अनिर्णीत संपलेल्या या मॅचमधे पहिल्या डावातल्या आघाडीच्या जोरावरच इराणी चषकाचे विजेतेपदही आपल्या नावावर केलं. स्पर्धेच्या इतिहासात सर्वोच्च धावसंख्येचा विक्रमही त्याने आपल्या नावावर केला.

भावाने स्वतःचं क्रिकेट सोडून वासिमला दिलं ट्रेनिंग

२००० मधे वयाच्या बावीशीत त्याची आफ्रिका दौऱ्यासाठी टीममधे निवड झाली. हा क्षण जाफर फॅमिलीसाठी अतिशय आनंदाचा होता. कारण वासिमला टीम इंडियाकडून खेळता यावं, यासाठी त्याच्या अख्ख्या कुटुंबाने खस्ता खाल्ल्या होत्या. आर्थिक तंगीचा फटका त्याच्या करिअरला बसू नये म्हणून कुटुंबातील प्रत्येकानेच आपल्या क्षमतेच्या पल्याड जाऊन कष्ट उपसले होते.

घराला दोघांच्याही क्रिकेटवरचा खर्च परवडणारा नव्हता. म्हणून भाऊ कलीमनं आपल्या आवडीला मुरड घालून क्रिकेटिंग करिअरवर पाणी सोडून वासिमला प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. या सगळ्या गोष्टीचं त्या दिवशी चीज झालं होतं. आपल्या मुलाने टीम इंडियासाठी खेळावं, हे वडलांचं स्वप्न सत्यात उतरलं होतं.

टीम इंडियात निवड तर झाली पण अॅलन डोनाल्ड आणि शॉन पोलाकच्या तिखट माऱ्याला सामोरे जाताना तो थोडासा चाचपडताना दिसला. या दौऱ्यातल्या ४ इनिंग्जमधे त्याला फक्त ४६ रन्सच जमवता आले. साहजिकच त्याला टीममधून डच्चू मिळाला. पुढच्या काळात त्याची टीममधे ये-जा सुरूच होती. दरम्यानच्या काळात तो फर्स्ट क्लास क्रिकेटमधे मात्र सातत्याने रन्स काढत होता.

२००६ ठरलं लकी इयर

२००६ वर्ष मात्र वासीमसाठी लकी ठरलं. एक म्हणजे गर्लफ्रेंड आयेशा हिच्याशी त्याचा निकाह पार पडला. त्या जोडीला क्रिकेटिंग फील्डवर पण त्याला चांगलं यश मिळालं. याचवर्षात त्याने टीम इंडियाकडून खेळताना इंग्लंडविरुद्ध सेंच्युरी आणि वेस्ट इंडीजविरुद्ध डबल सेंच्युरी फटकावली. त्यानंतर पुढच्याच वर्षी त्याने पाकिस्तानविरुद्ध अजून एक द्विशतक झळकावलं. पण आपला हा फॉर्म त्याला टिकवता आला नाही. त्याला पुन्हा एकदा टीममधून वगळण्यात आलं.

तोपर्यंत वीरेंद्र सेहवागने टीममधे ओपनर म्हणून स्थान पक्कं केलं होतं आणि त्याच्या जोडीला गौतम गंभीरनेही आपली मजबूत दावेदारी सादर केली होती. त्यामुळे वासिम जाफरची टीममधली जागा धोक्यात आली ती कायमचीच. त्याला पुन्हा टीममधे पुनरागमन करताच आलं नाही. टीम इंडियासाठी खेळलेल्या ३१ मॅचेसमधे ५ सेंच्युरीज आणि ११ हाफ सेंच्युरीजसह जमवलेल्या १९४४ रन्स ही त्याची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधली शिदोरी.

खरं तर ही आकडेवारी फारशी चांगली नसली, तरी ती खूपच वाईट आहे असंही म्हणता येत नाही. त्यामुळे जाफरला टीम इंडियामधे अजून संधी मिळाली असती, तर चित्र कदाचित वेगळं असू शकलं असतं. पण तसं झालं नाही.

फर्स्ट क्लास क्रिकेटमधून फटकेबाजी सुरूच

टीम इंडियातून वगळला गेल्यानंतरही त्याने रणजीमधे सातत्याने अक्षरशः खोऱ्याने रन्स ओढल्या. पण एकूणच टीम इंडियामधे जागा नसल्याचं कारण आणि क्रिकेट प्रशासनातलं राजकारण या दोन्हीही गोष्टी कायमच त्याच्या पुनरागमनाच्या आड येत राहिल्या. जाफर मात्र निराश झाला नाही. तो मुंबईकडून खेळत राहिला.

मुंबईला ८ रणजी करंडक जिंकून दिले आणि त्यानंतर आता विदर्भालाही सलग २ रणजी जिंकून देण्यात मोलाची कामगिरी निभावली. हे करताना वय कधीच त्याच्या आड आलं नाही. वयाच्या चाळीसाव्या वर्षीही रणजीत शतक झळकावणारा जाफर दिवसेंदिवस चिरतरुण भासायला लागलाय. 

शांत, संयमी स्वभावातलं माणूसपण

स्वभावाने अतिशय शांत आणि संयमी असणारा जाफर माणूस म्हणूनही किती वेगळ्या उंचीवरचा आहे हे याचं उदाहरण आपल्याला गेल्यावर्षीच्या रणजी मोसमाच्या वेळी अनुभवायला मिळालं. जाफरने २०१६-१७ मधे विदर्भाच्या टीमसोबत करार केला. परंतु इंज्युरीमुळे या मोसमात तो टीमसाठी खेळू शकला नाही. परंतु विदर्भाने ठरलेल्या कराराप्रमाणे त्याला रक्कम दिली. त्यानंतर २०१७-१८ मधे रणजीच्या मोसमात तो विदर्भाकडून खेळला आणि टीमला विजेतेपदही मिळवून दिलं.

पण यावेळी त्याने टीम मॅनेजमेंटकडून फीस म्हणून एक रुपयाही घेतला नाही. आधीच्या मोसमात आपण करारातील रक्कम स्वीकारूनही खेळता न आल्याची भरपाई त्याने अशा पद्धतीने केली होती. प्रचंड प्रोफेशनल असण्याच्या काळात त्याच्या या निर्णयाचं क्रिकेटरसिकांनी खूप कौतुक केलं.

लव स्टोरीही तितकीच रंजक

वासिम जाफरची लव्हस्टोरीदेखील अतिशय रंजक आहे. आपल्या या लव्हस्टोरीचा किस्सा त्यानेच एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत सांगितलाय. २००२ मधे टीम इंडिया इंग्लंडच्या दौऱ्यावर गेली होती. त्यावेळी इंग्लंडमधेच जन्मलेली आणि वाढलेली आयेशा खरं तर आपल्या आवडत्या राहुल द्रविडला भेटायला टीमच्या हॉटेलवर आली होती. तिथेच तिची भेट वसीम जाफरशी झाली.

या भेटीसाठी जाफर कायमच द्रविडच्या ऋणात आहे. या भेटीनंतर मैत्री आणि मैत्रीच रुपांतर प्रेमात झालं आणि जवळपास चार वर्षे रिलेशनशिपमधे रहिल्यानंतर २००६ मधे त्यांनी लग्न केलं आणि इंग्लंडमधे वाढलेली आयेशा वासिमसाठी मुंबईला आली.

आज वयाच्या ४१ व्या वर्षात पदार्पण करणारा जाफर नेमका निवृत्त कधी होतोय याची अनेकजण वाट बघत असताना, जाफर मात्र रणजीचं पुढंच सेशन खेळण्याबद्दल आशावादी आहे. परिस्थिती अनुकूल राहिली आणि विदर्भाच्या टीमनेही इंटरेस्ट दाखवला तर हा चिरतरुण जाफर आपल्याला रणजी करंडकाच्या पुढच्या सेशनमधेही मैदानात बघायला मिळू शकतो. किंवा मग क्रिकेट हेच सर्व काही आहे असा हा खेळाडू क्रिकेट प्रशिक्षक म्हणूनही आपली नवी इनिंग सुरु करू शकतो. तशी इच्छाही त्याने बोलून दाखवलियं.

सध्या तरी त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा.
 

(लेखक हे मुक्त पत्रकार आहेत.)