बराक ओबामांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होऊन नवा इतिहास घडवला. सलग दोन टर्म ते राष्ट्राध्यक्ष होते. त्यावेळी ते रोज कोणतं काम करतायंत, कोणता निर्णय घेतायंत, कुठे भाषण करतायंत या सगळ्यांची इत्यंभूत माहिती मिळायची. पण आता तसं होत नाही. फक्त सोशल मीडियावरुन थोडीफार माहिती मिळतेय. मग ओबामा असतात तरी कुठं आणि करतात तरी काय?
४ नोव्हेंबर २००८ ला अमेरिकेत एक इतिहास घडला. त्यावेळच्या त्या घटनेने संपूर्ण जगाला आश्चर्याचा धक्का दिला. विषमतेची वेगवेगळी बंधन अक्षरश: तोडून बराक ओबामा ४४ वे राष्ट्राध्यक्ष बनले. ते आफ्रिकी अमेरिकी वंशाचे पहिले राष्ट्राध्यक्ष होते. जागतिकीकरणाच्या त्या वळणार ओबामांचं येणं हे खूप सकारात्मक मानलं गेलं.
अमेरिकेचे सर्वच राष्ट्राध्यक्ष हे आपल्याला खूपच आकर्षक वाटतात. पण ओबामांबद्दल नेहमीच आपल्याला खूप आदर वाटतो. आणि मुख्य म्हणजे ते आपलेसे वाटतात. २०१० ला ओबामा दाम्पत्याने मुंबईला भेट दिली होती. त्यावेळी ते अगदी आपल्या लोकांमधे इतकं सहज मिसळले की नंतर वाटलंच नाही की हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. आणि त्यांनी केलेलं कोळीनृत्य कुणी विसरूच शकत नाही.
ओबामांचा जन्म ४ ऑगस्ट १९६१ ला होनुलुलुतल्या हवाईमधे झाला. त्यांनी अर्थशास्त्रात एमए केलं. राज्यशास्त्राचीही पदवी घेतली. बिझनेस इंटरनॅशनल कॉर्पोरेशन या सल्लागार म्हणून काम करणाऱ्या कंपनीत नोकरी केली. ही त्यांची पहिली नोकरी होती. पण तिथे ते फार काळ रमले नाही.
मग ते अमेरिकेतल्या वेगवेगळ्या चर्चसोबत कम्युनिटी डेवलपमेंटचं काम करू लागले. पुढे त्यांनी हावर्ड युनिवर्सिटीत कायद्याचं शिक्षण घेतलं. आणि इथेच त्यांना त्यांची दोन ध्येय मिळाली. एक म्हणजे बायको मिशेल रॉबिन्सन आणि दुसरं म्हणजे राजकारणात एंट्री.
हेही वाचा: ट्रम्पतात्यांनी भारतासोबत खोटारडेपणा का केला?
शिकत असतानाच ओबामांनी लॉ रिव्ह्यूची निवडणूक लढवली. आणि ते पहिले कृष्णवर्णीय अध्यक्ष बनले. पुढे ते शिकागो युनिवर्सिटीत प्राध्यापक म्हणून रुजू झाले. मग १९९२ ला त्यांनी मिशेल यांच्याशी लग्न केलं. लग्नानंतर काही वर्षांनी त्यांची इलियानाईट स्टेटसाठी सिनेटवर निवड झाली.
यानंतर २००४ ला यू एस हाउस ऑफ रिप्रेझेंटेटिव झाले. आणि १० फेब्रुवारी २००७ ला राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणुक लढवण्याची त्यांनी अधिकृत घोषणा केली. त्यावेळी ओबामांवर बरीच टीका झाली. पण घडलं काहीतरी वेगळंच. जे घडलं तो इतिहासच होता.
ओबामांबद्दल सगळ्यांच्याच मनात कुतूहल आहे. म्हणूनच त्यांच्यावर आतापर्यंत वेगवेगळी सुमारे ४० पुस्तकं लिहिली गेली आहेत. आणि ही पुस्तकं जवळपास जगातल्या प्रत्येक भाषेत उपलब्ध आहेत. ओबामा २००८ ते २०१७ पर्यंत राष्ट्राध्यक्ष म्हणून कार्यरत होते. राष्ट्राध्यक्षाचं आयुष्य हे पूर्णपणे वेगळं आणि सार्वजनिक असतं. मग त्यानंतर त्यांचं खासगी आयुष्य पुन्हा सुरु झालं.
व्हाईट हाऊसमधून बाहेर पडल्यावर ओबामा हे मिशेल आणि त्यांच्या दोन मुलीसह वॉशिंगट डीसी इथे एक घर घेऊन राहू लागले. पण आता ते काम काय करतात हा आपल्याला सतावणारा मोठा प्रश्न आहे. आणि गंमत म्हणजे गुगलवरही ओबामांबद्दल हाच प्रश्न सगळ्यात जास्त वेळा विचारला गेलाय. द वॉशिंगटन पोस्ट या वर्तमानपत्राने नुकतीच बातमी दिली होती. त्यात ओबामांचं वार्षिक उत्पन्न ४० हजार युएस डॉलर्स आहे असं म्हटलंय.
सध्या तर ओबामा दाम्पत्य नेटफ्लिक्ससोबत काम करतायंत. त्यांनी २०१८ लाच वेगवेगळ्या सिरिअल्स आणि प्रोग्रामची निर्मिती करण्याची घोषणा केली. हे कार्यक्रम म्हणजे फक्त मनोरंजन नसून यातून वेगवेगळ्या सामाजिक विषयांना हात घातला जाणार आहे. यातून लोकांचं शिक्षण होईल याची काळजी घेतली जाणार असल्याचं ओबामांनी ट्विट करून सांगितलं होतं.
त्यांचा दुसरा कमाईचा स्त्रोत म्हणजे पेंशन. माजी राष्ट्राध्यक्ष म्हणून त्यांना अमेरिकी सरकारकडून पेंशन मिळतं. तसंच ते वेगवेगळ्या कंपन्यांमधे मोटिवेशनल ट्रेनिंग देतात. त्यांचं पुस्तकांवरही काम सुरु आहे. पुढच्या वर्षी त्यांचं पुस्तक बाजारात येईल. ही माहिती ओबामांनी गेल्या महिन्यात एका मुलाखतीत दिली.
हेही वाचा: काट्याच्या शर्यतीत भारताचा जावई झाला इंग्लंडचा पंतप्रधान
ओबामा वेगवेगळ्या सामाजिक कार्यांमधे गुंतलेले आहेत. २०१८ मधे त्यांनी डेमोक्रॅटिक पार्टीसाठी कॅम्पेनसुद्धा केलं होतं. पण त्यांनी वेळेवेळी मीडियामधून सांगितलंय की त्यांना सध्या राजकारणात काम करण्याची इच्छा नाही. त्यांनी कोणत्याही उमेदवार किंवा सध्याच्या राष्ट्राध्यक्षांवर टीकटिपण्णी केलेली नाही.
पण सुरवातीला त्यांनी कोणतंच काम केलं नाही. ते वेगवेगळ्या देशांच्या दौऱ्यावर होते. पण ते फक्त फिरत नव्हते. ते वेगवेगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावत होते, वेगवेगळ्या विषयांवर भाषण करत होते, त्या त्या देशातल्या पंतप्रधानांना भेटत होते.
त्यांचं फुटबॉल खेळावर प्रेम आहे. त्यांना २०१७ पर्यंत मनसोक्त मॅच बघता आली नव्हती. त्यामुळे त्यांनी खूप फुटबॉल मॅच बघितल्या. प्रत्यक्ष जाऊनही मॅच बघत होते. आणि मुख्य म्हणजे कुटुंबासोबत वेळ घालवत होते. आपण त्यांचे तेव्हाचे अनेक इनफॉर्मल, कुटुंबाबरोबर मजा-मस्ती करतानाचे खूपसे फोटो सोशल मीडियावर पाहिलेत.
हेही वाचा: चे गवेराची मुलगी दिल्लीत येऊन काय बोलली?
ओबामा राष्ट्राध्यक्ष असताना त्यांच्या दोन्ही मुलींचीसुद्धा चर्चा व्हायची. त्यांचे फोटोसुद्धा सोशल मीडियावर वायरल व्हायचे. आतासारखं तेव्हा वायरल हे कॉमन नव्हतं. पण त्यांचे वीडियोज आजही युट्यूबवर मोठ्या प्रमाणात पाहिले जातात. ओबामांची मोठी मुलगी मालिया ४ जुलैला २१ वर्षांची झाली. तिच्या बड्डे पार्टीचा फोटो ओबामांनी सोशल मीडियावर शेअर केला होता. ती तिच्या वडलांप्रमाणेच हावर्ड युनिवर्सिटीतून कायद्याचं शिक्षण घेतेय.
तर लहान मुलगी साशा १० जूनला १८ वर्षांची झाली. सध्या ती सिडवेल फ्रेंड्स शाळेतून पदवीचं शिक्षण घेतेय. साशा आणि मालिया यांच्यातलं प्रेम, जिव्हाळा आणि मैत्री ही त्यांच्या फोटोंमधून दिसून येते.
तर बराक ओबामांचं आणि त्यांच्या कुटुंबाचं आयुष्य असं सुरु आहे. ते रोज काय करतायंत, कुठे जातायंत हे सगळं तर आपल्याला सोशल मीडियावरुन समजणार आहेच.
हेही वाचा:
आयफोनः नव्या जगाचा स्टेट्स सिम्बॉल