भारतात कोरोनाचा संसर्ग झालेल्यांच्या संख्येनं बुधवारी १८ मार्चला दीडशेचा टप्पा पार केला. सध्याचा प्रसाराचा वेग बघता भारत सध्या कोरोनाच्या दुसऱ्या स्टेजवर आहे, अशी माहिती आयसीएमआरचे संचालक बलराम भार्गव यांनी दिलीय. इटली, स्पेन तिसऱ्या स्टेजवर आहेत. त्यांच्याप्रमाणेच भारतही तिसऱ्या स्टेजवर जाऊ शकले. त्यासाठी सरकारसोबत आपण नागरिकांनीही काळजी घ्यायला हवी.
कोरोनाचा करंट स्टेटस किंवा कोरोनाबाबतीतली सध्याची परिस्थिती काय आहे असं कुणी विचारलं तर आपण काय सांगू? इंटरनेटवरून माहिती शोधून काढू आणि किती लोकांना कोरोना झालाय, किती लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय वगैरे सांगू. थोडक्यात, कोरोनाचा वायरस सध्या दीडशेहून जास्त देशात जाऊन पोचलाय आणि जगभरातून साधारण ७ हजार लोकांना या कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागलाय, हा झाला कोरोनाचा करंट स्टेटस.
आता हेच भारतातला करंट स्टेटस विचारला तर आपण भारताबद्दलच्या गोष्टी सांगू. आत्तापर्यंत भारतातल्या १५१ लोकांना कोरोनाचा संसर्ग झालाय. त्यातले सगळ्यात जास्त महाराष्ट्रात आहेत. आणि तीन जणांचा मृत्यू झालाय, असं सांगू. पण महत्त्वाची गोष्ट अशी की आता कुणी भारतातला कोरोना स्टेटस विचारला तर एवढा सगळा फापटपसारा सांगत बसण्याची गरज नाही. भारत स्टेज २ मधे आहे असंही आपण सांगू शकतो.
हेही वाचा : आपण कोरोनापेक्षा भयंकर वायरसशी लढलोय, त्यामुळे कोरोना से डरोना!
इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च म्हणजेच आयसीएमआरचे महासंचालक बलराम भार्गव यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या चार स्टेजपैकी दुसऱ्या स्टेजवर भारत पोचलाय. कोरोना वायरसचं लोकल ट्रान्समिशन म्हणजे स्थानिक लोकांच्यात पसरणं सुरू झालंय, असा या स्टेज २ चा अर्थ होतो. काल, बुधवारी १७ मार्चला एका पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिलीय. आयसीएमआर ही जैववैद्यकीय संशोधनातली सर्वोच्च सरकारी संस्था आहे. जगातल्या सर्वांत जुन्या संस्थांमधे आयसीएमआरचं नाव घेतलं जातं.
लोकल ट्रान्समिशन म्हणजे एखाद्याला कोरोनाची लागण झाली तर ती कुठल्या व्यक्तीमुळे झाली याचा पाठपुरावा आपण करू शकतो. नातेवाईक, घरातली व्यक्ती, मित्र किंवा मैत्रीण यांपैकी कुणीही परदेशी प्रवास करून आलं असेल आणि अशा व्यक्तीच्या संपर्कात आलो तर कोरोनाची लागण होऊ शकते.
परदेशी प्रवास करून आलेल्या व्यक्तिलाही ही लागण झालेली असते आणि त्या व्यक्तिनं ती पुढे पसरवलेली असते. अशा पद्धतीनं लागण करणाऱ्या व्यक्तीचा पाठपुरावा करण्याला कॉन्टॅक्ट ट्रेसिंग असं म्हणतात. आणि वायरसचा प्रसार थांबवण्यासाठीही ही पद्धत अत्यंत उपयुक्त ठरू शकते, असं फर्स्टपोस्ट वेबसाईटवरच्या एका बातमीत सांगण्यात आलंय.
‘कोरोना संक्रमणाच्या चार स्टेज असतात. आपण सध्या दुसऱ्या स्टेजवर आहोत. तिसरी स्टेज अजून यायची आहे. तिसरी स्टेज यापेक्षा भयंकर असेल. तिथं कम्युनिटी ट्रान्समिशन सुरू होईल. आपण तिथं पोचू नये अशी आशा आहे.’ असं भार्गव म्हणाले. ‘आपण तिथे पोचणार की नाही हे काही गोष्टींवर अवलंबून आहे. आपण आंतरराष्ट्रीय सीमा बंद करण्यात किती यशस्वी होतो याचाही त्यात समावेश होतो. कम्युनिटी ट्रान्समिशन होणारच नाही असं म्हणता येत नाही.’
‘संपूर्ण देश लॉकडाऊन करणं म्हणजेच बंद ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. आपल्याकडे ३० दिवसांचा अवधी आहे. याला विंडो पिरिअड असं म्हणतात. या काळातच आपण कोविड-१९ चा प्रसार होण्यापासून थांबवू शकतो. हीच वेळ कृती करण्याची आहे’ असंही भार्गव म्हणाले. भारत एकदा स्टेज ३ वर पोचला तर कोरोनाचा प्रसार रोखणं अत्यंत अवघड होऊन बसेल, असाच याचा अर्थ होतो.
हेही वाचा : कोरोनाः जागतिक आरोग्य आणीबाणी लागू केल्याने काय होणार
भार्गव यांच्या या वक्तव्यानंतर कोरोनाच्या या ४ स्टेजविषयी जोरदार चर्चा चालूय. पहिली स्टेज तर भारताने कधीचीच पार केलीय. या स्टेजमधे फक्त कोरोनाबाधित देशांमधून आलेल्या लोकांनाच कोरोनाची लागण होण्याची शक्यता असते. परदेशात न गेलेल्या व्यक्तीला कोरोना होणं अशक्य आहे. भारतात केरळमधे कोरोनाबाधित काही रूग्ण सापडले तेव्हा आपण या स्टेजवर होतो असं म्हणता येईल.
पण दुबईतून मुंबई विमानतळावर उतरलेल्या एका जोडप्याला कोरोनाची लागण झाली होती. त्याच्यासोबत दुबई प्रवास करणाऱ्या अनेकांची कोरोना टेस्ट पॉझिटिव आली. पण हे वेळीच लक्षात न आल्यामुळे आपण पहिल्या स्टेजवरून दुसऱ्या स्टेजवर जाऊन पोचलो. या स्टेजमधे परदेशातून आलेल्या कोरोना पॉझिटिव लोकांमुळे त्यांच्या संपर्कात येणाऱ्या स्थानिक लोकांनाही त्याची लागण होते. आधी सांगितल्याप्रमाणे, या स्थितीत निदान वायरसचा पाठपुरावा तरी करता येतो.
पण तिसरी स्टेज जास्त धोकादायक असते. यात जास्त लोक प्रभावित होऊ लागतात. मग फक्त परदेशातून आलेल्या लोकांमुळेच नाही तर इथल्या स्थानिक लोकांमुळेही आजार पसरायला सुरवात होते. पुन्हा त्या वायरसचा पाठपुरावा करणंही शक्य नसतं. इटली आणि स्पेन आत्ता या स्टेजमधे आहेत. तर चीनमधली स्थिती म्हणजे चौथी स्टेज. आजार महाभयंकर रूप घेतो आणि नेमका त्यावर इलाज काय करायचा हेही कळेनासं होतं.
बलराम भार्गव यांनी सांगितल्याप्रमाणे भारताला तिसऱ्या स्टेजवर जाण्यापासून रोखायला हवं. त्यासाठी सरकारचे प्रयत्न चालू आहेतच. मात्र, खुद्द आयसीएमआरसुद्धा हातपाय हलवतेय. भारतात नव्या लॅबोरेटरीस उभारण्यापासून ते वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन अर्थात डब्लूएचओला मदत मागण्यापर्यंत सगळे प्रयत्न जोमाने सुरू आहेत. भारतातल्या अनेक खासगी लॅबवाल्यांनी मोफत कोविड-१९ चाचणी सुरू करावी असं आवाहनही आयसीएमआर करणार आहे.
पण त्यासोबतच नागरिकांचीही मोठी जबाबदारी आहे. कोरोनाला घाबरून अगदी दारं खिडक्या बंद करून बसण्याची गरज नसली तरी मला काहीही होणार नाही असा दृष्टीकोन ठेवूनही चालायचं नाही. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सरकारनं सुट्टी जाहीर केलीय. असं असताना पिकनिकला किंवा कुठं फिरायला न जाता घरात बसून रहावं असं वारंवार सांगितलं जातंय. सरकारच्या सुचनांचं शक्य तितकं पालन केलं तर आपण भारताला तिसऱ्या स्टेजवर जाण्यापासून वाचवू शकू.
हेही वाचा :
कोरोनाग्रस्त मृतदेह जाळायचा की पुरायचा?
तुम्हाला कोरोना फेक न्यूज रोगाची लागण झालेली नाही ना?
कोरोनाला रोखण्यासाठी तैवानकडून आपण काय शिकलं पाहिजे?
कोरोनाशी पंगा घेणारी बाईः हॉस्पिटलमधे न जाता कोरोना केला बरा
विलगीकरण कक्षात डॉक्टर काय करतात, पत्रकार सांगतेय स्वानुभव
केरळनं तुटवडा बघून स्वतःचं सुरू केली मास्क, सॅनिटायझरची निर्मिती