तरुण संपादकांनी संपादित केलेले दिवाळी अंक

१० नोव्हेंबर २०१९

वाचन वेळ : ६ मिनिटं


दिवाळी अंक ही महाराष्ट्राची शंभरहून अधिक वर्षांची परंपरा आहे. गेल्या काही वर्षांत दिवाळी अंकांच्या मांडणीत अनेक उलटफेर झालेत. दिवाळी अंकांची परंपरा पुढे नेण्यासाठी तरुणांनीही मोठा पुढाकार घेतलाय. यंदाच्या दिवाळी अंकांचा ज्येष्ठ कवी, साहित्यिक पी. विठ्ठल यांनी धावता आढावा घेतलाय.

दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळी अंकांनी आपला सांस्कृतिक भवताल खूप उन्नत केलाय. तरुण संपादकांनी संपादित केलेले दिवाळी अंक हे यंदाचं वैशिष्ट्यं म्हणायला हवं. मुखपृष्ठ, अंकाची मांडणी, बांधणी, रेखाटणं या सर्वच बाबींवर लक्ष केंद्रित करून ‘आपला अंक अधिकाधिक आकर्षक कसा होईल’ हे पाहिलं गेलंय. मजकुराशी कोणतीही तडजोड न करता अत्यंत वाचनीय आणि संग्राह्य लेखन यातल्या बहुतेक अंकांनी प्रसिद्ध केलंय.

बहुपदरी ‘अक्षरलिपी’

‘अक्षरलिपी’ हा यंदाचा एक लक्षणीय दिवाळी अंक. महेंद्र मुंजाळ हे या अंकाचे संपादक आहेत. १७६ पानांचा हा अंक आपल्याला दोनशे रुपयांत मिळू शकेल. ‘बहुपदरी वर्तमानाचा वेध घेणारं दमदार साहित्य’, ‘देश-विदेशातल्या घटितांचा माग घेणारे अनोखे लेख/शोधलेख आणि रिपोर्ताज’, ‘दमदार चित्रकथा सांगणारं फोटोफिचर’, ‘स्व-पलीकडचा शोध घेणाऱ्या समाजसंस्थांच्या कहाण्या’ आणि ‘धगधगता भवताल ओंजळीत घेणाऱ्या कविता’ अशा पाच विभागात विभागलेला हा अंक म्हणजे एक पर्वणीच.

नव्या जुन्या लेखक, कवींचे लेख आणि कथा, कवितांमुळे हा अंक वाचनीय झालाय. ‘नो पॉर्न ओके प्लिज’ हा मुक्ता चैतन्य यांचा लेख डोळे उघडवणारा आहे. या अंकासाठी आपण महेंद्र मुंजाळ यांना ७७४४८२४६८५ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधू शकता.

हेही वाचाः शाळेच्या पुस्तकांमधे आपण कधी जग जिंकणारे ग्लोबल संत नामदेव वाचलेत?

विचारप्रवर्तक ‘मुक्त शब्द’

‘मुक्त शब्द’ हे मराठीतलं एक महत्त्वाचं मासिक. येशू पाटील या अंकाचे संपादक आहेत. ‘सांस्कृतिक भांडवल आणि साहित्याचे समाजशास्त्र’ हे हरिश्चंद्र थोरात यांनी लिहिलेलं संपादकीय विचारप्रवर्तक आहे. या अंकाच्या मुखपृष्ठावर ग्रेटा थनबर्ग या पर्यावरण कार्यकर्तीला स्थान दिले आहे. ‘कॉमिक्सचा बादशाह स्टॅन ली’ यांची ओळख करून देणारा वासंती फडके यांचा लेख सर्वांना विशेषतः कुमारवयीन मुलांना आवडेल असा आहे.

‘मराठीतील मार्क्सवादी साहित्य समीक्षा’ हा हरिश्चंद्र थोरात यांचा प्रदीर्घ लेख अभ्यासकांसाठी उपयुक्त आहे. मेघना भुस्कुटे, छाया दातार यांच्यासह इतरही अनेक लेख यात आहेत. सात कथा, तीन कादंबरी अंश, तीन अनुवादित कथा आणि दहा कवींच्या दीर्घ कविता असा उत्तम मजकूर या अंकात आहे. संपर्कः ९८२०१४७२८४

माणसाच्या जगण्याचं सूत्र सांगणारा ‘प्रतिभा’ 

इस्लामपूरहून प्रसिद्ध झालेला ‘प्रतिभा’ दिवाळी अंकही विशेष म्हणावा लागेल. धर्मवीर पाटील हे या अंकाचे संपादक आहेत. मुखपृष्ठ आणि आतील चित्रे अन्वर हुसेन यांची आहेत. ‘माणूस जगतो कशासाठी?’ असे सूत्र घेवून संपादकांनी काही लेखकांना लिहिते केले आहे.

विनोद शिरसाठ, निलांबरी जोशी, गणेश देवी, नसीमा हुरजूक, तारा भवाळकर, मंगेश नारायणराव काळे, विजय चोरमारे यांच्यासह आणखीही काही लेखकांचा सहभाग आहे. ‘बोली भाषेतल्या कविता’ हा विशेष विभाग आणि कथा, कविता, रिपोर्ताज, ललित इ. मजकूर यात आहे. १६० पानांचा हा अंक २०० रुपयात उपलब्ध होवू शकेल. संपर्कः ७५८८५८६६७६

परिवर्तनाचा वाटसरू

‘परिवर्तनाचा वाटसरू’ या पाक्षिकाचा दिवाळी अंक अनेकार्थाने महत्त्वाचा आहे. आधुनिक भाषाशास्त्राचे जनक नोम चॉम्स्कीच्या कर्तृत्त्वाचा परिचय करून देणारा हा वैचारिक अंक आहे. अभ्यासकांनी हा अंक संग्रही ठेवायला हरकत नाही. याशिवाय विशेष लेख, कथा, अनुवादित कविता असा भरगच्च मजकूर या अंकात आहे. १५५ पानांच्या या अंकाची किंमत केवळ पन्नास रुपये एवढी आहे. अभय कांता हे संपादक आहेत. संपर्कः ८८८८७०८९६३

हेही वाचाः वसईचे फादर फ्रान्सिस दिब्रिटो साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले, कारण

‘वाघूर’ नव्या कादंबऱ्यांचा अंश

‘वाघूर’ या दिवाळी अंकानं अल्पावधीतच आपली ओळख निर्माण केलीय. नामदेव कोळी या कल्पक आणि अभ्यासू तरुणाने दरवर्षीप्रमाणे यंदा वाघूरचं वेगळेपण जपत अत्यंत उत्तम साहित्य उपलब्ध करून दिलंय. सुमारे १५ नव्या लेखकांचे कादंबरी अंश हे या अंकाचं वैशिष्ट्य. ‘आगामी मराठी कादंबरी’ या विभागाचे दत्ता घोलप यांनी संपादन केलंय.

प्रभाकर कोलते यांचं मुखपृष्ठ असलेल्या या अंकात कथांचा विभागही समृद्ध आहे. शिवाय ललित, व्यक्तिचित्र आणि संस्मरणं वाचनीय. सुमारे शंभरहून अधिक कवींचा समावेश असलेला कविता विभाग वाचायलाच हवा. अनुवादित कवितांचं दालनही महत्त्वाचं. वसंत आबाजी डहाके, यशवंत मनोहर, श्रीकांत देशमुख, किरण येले, अविनाश गायकवाड यांच्यासह नव्या लेखकांची उपस्थिती खूप आश्वासक. रमजान मुल्ला यांचं अनुभव कथन अस्वस्थ करणारं आहे. या अंकातली रेखाटनं अप्रतिम आहेत. सुमारे २६० पानांचा हा अंक म्हणजे भरगच्च दिवाळी फराळ. संपर्कः ९४०४०५१५४३

नव्या पिढीसाठी प्रेरणादायी ‘शब्दमल्हार’

‘शब्दमल्हार’ हा स्वानंद बेदरकर या तरुण संपादकाने प्रकाशित केलेला संपूर्ण रंगीत अंक आहे. सुमारे २१४ पानांचा हा अंक आपल्याला दोनशे रुपयात मिळू शकेल. शेखर सेन, नरेंद्र चपळगावकर यांच्यासह इतर महत्त्वाच्या लेखकांचे लेख आणि अनुभवकथन यात आहे.

ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी शंख घोष आणि आपल्या बाऊल गायनाने भारत आणि भारताबाहेरही ज्यांनी अपार कीर्ती मिळवली अशा पार्वती बाऊल यांच्या मुलाखती हे या अंकाचं आकर्षण. या मुलाखती नव्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरतील. नव्वदनंतरचे आणि २०१० नंतरचे असे कवितेचे दोन विभाग यात आहेत. प्रत्येक विभागात प्रत्येकी पाच कवी आहेत. समीक्षक एकनाथ पगार आणि कविता मुरुमकर यांचे अभ्यासपूर्ण टिपण या विभागाच्या शेवटी आहे. जिज्ञासूंनी ते वाचायलाच हवे. संपर्कः ९६७३१९१९८५

युगांतर

साप्ताहिक ‘युगांतर’चा दिवाळी अंक सुमारे २२२ पानांचा आहे आणि किंमत केवळ १२० रुपये असून संपादक आहेत भालचंद्र कांगो. लक्ष्मीकांत देशमुख यांचा ‘अण्णा भाऊ साठे आणि कैफी आझमी’ यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विश्लेषणात्म असा एक उत्तम लेख यात आहे.

याशिवाय जयदेव डोळे, दत्ता देसाई, बी. व्ही. जोंधळे, राम जगताप, वीरा राठोड, मेघा पानसरे, नंदिनी आत्मसिद्ध, तृप्ती डिग्गीकर यांच्यासह इतरही अनेक लेख महत्त्वाचे आहेत. पंकज कुरुलकर, आनंद विंगकर यांच्या कथा आहेत. कवितांचा विभाग समृद्ध. संजीव खांडेकर यांचे मुखपृष्ठ अप्रतिम.

शब्दशिवार

‘शब्दशिवार’ हाही एक उल्लेखनीय अंक. इंद्रजित घुले हे या अंकाचे संपादक आहेत. महावीर जोंधळे, राजदीप सरदेसाई, राजेंद्र दास, आसाराम लोमटे, श्रीरंजन, आवटे यांच्यासह इतरही अनेक लेखकांची उपस्थिती यात आहे. श्रीधर अंभोरे यांची चित्रे अप्रतिम. कथा, कविता, ललित असा अन्य मजकूर वाचनीय. संपर्कः ९४२३०६०११२

‘पुणे पोस्ट’ आणि ‘ललित’ हे अंकही मुद्दामहून वाचायला हवेत. पुणे पोस्टमधील आशा बगे यांची मुलाखत आणि ‘वेटिंग फॉर गोडो: एक वाचन’ हा वसंत आबाजी डहाके यांचा लेख छानच.

याशिवाय ‘गंधाली’, ‘पत्रीसरकार’ हे दिवाळी अंकही वाचकांना नक्कीच आवडतील. ‘पृथा’, ‘अक्षरदान’ हे अंक मात्र मला उपलब्ध झाले नाहीत. या दिवाळी अंकाबद्दल उत्सुकता आहे. वरील काही अंकात माझीही उपस्थिती अर्थात आहेच!

हेही वाचाः 

कवयित्री सावित्रीबाईंची ओळख करून देणाऱ्या कविता

हिंदी पत्रकारितेनं हिंदी भाषिक प्रदेशांना अंधारात ठेवलंय!

तीन वर्ष लोटली, नोटाबंदीचे दूरगामी परिणाम कधी दिसणार?

मार्वलच्या सुपरहिरोंना मार्टिन स्कॉर्सेसी सिनेमा का मानत नाही?

मुख्यमंत्री कोणः राज्यपाल फक्त घोड्याला विहिरीपर्यंत नेऊ शकतात