गुड फॅट आणि बॅड फॅट ही नेमकी भानगड काय?

१३ जुलै २०१९

वाचन वेळ : ४ मिनिटं


ओह् नो, आज मी भात खाल्ला. म्हणजे कार्बस् खाल्ले मग खूप बॅड फॅट्स पोटात गेले. उद्या ना फक्त सॅलेड खाणार, अशी वाक्य आपण आपल्या मित्र मैत्रिणींच्या तोंडून खूपदा ऐकलीयत. यावरुन जाणवतं की आपण किती मोजून, मापून, शोधून खाऊ लागलो आहोत. पण भात हा बॅड फॅट नाही. चार प्रकारचे फॅट असतात आणि त्यातलं एकच फॅट वाईट असतं.

आज प्रत्येकाच्याच तोंडावर डाएट हा शब्द आहे. आपण डाएट करायचं ठरवलं. तर लगेच आपल्या आजूबाजूची माणसं आपल्याला फॅट्स अर्थात मेदयुक्त पदार्थ खायचेच नाही किंवा टाळायचे किंवा शक्यतो बंद करायचे असे सल्ले देऊ लागतात. प्रोटीन खा प्रोटीन असं सांगतात जसं की ते आहारतज्ज्ञच आहेत. अर्थात ही मंडळी आपल्या प्रेमापोटीच सगळं सांगत असतात. पण आपण आणि आहारतज्ज्ञांनी ठरवलं पाहिजे आपल्या शरीरासाठी काय चांगलंय आणि वाईट.

कोणत्या प्रकारचे मेद असतात?

आता मेद चांगले की वाईट हा प्रश्न मात्र उरतो. त्यासाठी आपण आधी फॅट म्हणजे मेद आपल्या शरीरात नेमकं काय काम करतं हे जाणून घेतलं पाहिजे. आपण लहानपणापासून ऐकलंय की शक्ती हवीय ना मग जेवण कर. शक्ती आणि जेवण? आपल्याला जी काही दिवसभरात काम करायची असतात त्यासाठी ऊर्जा लागते ती आपल्याला अन्नातून मिळते. आणि प्रत्येक पदार्थात फॅट्स हे असतातच.

आपण कोणताही पदार्थ खाल्ला की त्यातून आपल्याला पौष्टीक घटक मिळतच असतात. मग त्यात प्रथिनं, कर्बोदकं, मेद, लोह, जीवनसत्त्वं आणि बरंच काही मिळत असतं. आता कधी त्यात मेद जास्त असतं तर कर्बोदकं तर कधी एखादं जीवनसत्त्व. पण आपण जेवताना कोशिंबीर, भाजी, चटणी किंवा लोणच, भात, डाळ, पोळी किंवा भाकरी खातो. त्यामुळे आपलं जेवण बॅलन्स होतं. आणि डाएट करतोय म्हणून एकच पोष्टीक तत्त्व मिळणारे पदार्थ खाल्ल्यास, कदाचित आपण बारीक होऊ पण आपलं आरोग्य खरंच चांगलं राहिल का?

पण मेद जास्त खाल्ल्यामुळेच वजन वाढलंय असं सांगितलं जातं. मग हे मेदाच प्रकार कुठून तर पाकिटबंद पदार्थ आणि पटकन खाल्ले जाणारे फुड स्टॉलवरचे पदार्थ यांच्यातून. मग किती प्रकार आहेत मेदाचे असा प्रश्न पडतो. तर ४ प्रकार आहेत. त्यात सॅच्युरेटेड, मोनाऊनसॅच्युरेटेड, पॉलियनसॅच्युरेटेड आणि ट्रान्स इत्यादी. यातल्या ट्रान्स फॅटबद्दल तर आपण सगळ्यांनीच ऐकलं आहे.

हेही वाचा: वेगन म्हणजे वेजिटेरीअन नाही, त्यापेक्षा बरंच काही

हे मेद चांगलंय पण वाईटसुद्धा आहे

सॅच्युरेटेड मेदाबद्दल गेल्या अनेक वर्षांमधे खूप काही वाईट बोललं गेलं आहे. आणि पाश्चात्या आहाराच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार हे मेद आपल्याला आजारी पाडू शकतात. पण आता सूर बदलतोय. आणि युएसच्या पब्लिक हेल्थने दिलेल्या गाईडलाईननुसार या कॅटगरीत मोडणारे काही पदार्थ अचानक सुपर फुड झालेत. म्हणजे उदाहणार्थ दूध, तूप, वेजिटेबल तेल इत्यादी. त्यामुळे पदार्थ जरूर आहारात असावेत. हे पदार्थ शरीरात उष्णता वाढवत नाहीत तर शरीराचं पोषण करतात, असं शीला शेहरावत म्हणाल्या. त्या आहारतज्ज्ञ आणि डाएटीक क्लिनिकच्या संचालिका आहेत.

पण या कॅटगरीत चीज, क्रिम, मार्गारेट, बटर, कोको बटर, बीफ, पोर्क आणि लॅम्ब इत्यादी पदार्थ हे खूप जास्त मेदयुक्त असल्याचं सांगितलंय. यामुळे हृद्यविकाराचा त्रास, कोलेस्ट्रॉल वाढीचा त्रास होऊ शकतो. तसंच यामुळे शरीरात उष्णता मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे पोटाचे विकार, अल्सरसारखे, पित्त इत्यादी आजार वाढतात, असंही शेहरावत म्हणाल्या.

हेही वाचा: बॉटलबंद फ्रूट ज्यूस पिणं खरंच हेल्दी आहे की तब्येतीची वाट लागते?

हे आहेत सगळ्यात चांगले मेद

मोनाऊनसॅच्युरेटेड हे मेद शरीरासाठी चांगलं असतं. यात आवाकाडो, ऑलिव्ह ऑईल, ड्रायफ्रूट, शेंगदाणे इत्यादी पदार्थांचा समावेश होतो. या मेदामुळे आपलं वजन स्थिर राहतं ज्यामुळे कोलेस्टॉलही स्थिर राहतो, चयापचय क्रियेत सुधार होतो, रक्ताभिसरण क्रिया चांगली होते. पण हे सगळे पदार्थ अतिप्रमाणत सतत खाण्याचे नाहीत, असा सल्ला आहारतज्ज्ञ शेहरावत आपल्याला देतात.

पॉलियनसॅच्युरेटेड हे मेदसुद्धा चांगल्या मेदाच्या कॅटगरीत येतं. मात्र या मेदाची गरज आपल्याला अगदी थोड्या प्रमाणात असते. पण पाश्चात्यांकडून मोमोठ्या जाहिराती आणि चुकीच्या आहार फंड्यामुळे आपण हे मेद अधिक खाऊ लागलो आहोत, असं शीला शेहरावत सांगतात. यात मुख्यत्वे ओमेगा ३ आणि ६ हे मेद येतं. सूर्यफुलाचं तेल, कनोला तेल, तीळाचं तेल, माशांचं तेल, टोफू, सोयाबीन, पपईच्या बिया, अक्रोड आणि आळशी इत्यादी मधे असतं. यामुळे कोलेस्ट्रॉल वाढत नाही म्हणून हे तेल खाण्याचा सल्ला देतात. पण या घटकाची आपल्या शरीरात फार आवश्यकता नसते. आणि कोणतंही मेद जास्त खाल्ल्यास आजार होणारचं आहेत, असंही शेहरावत म्हणतात.

हेही वाचा: आयोडीनयुक्त मिठामुळे आपण आजारी पडतोय का?

ट्रान्स फॅट वाईटचं

संपूर्ण जगात सगळ्यात वाईट समजलं जाणारं मेद म्हणजे ट्रान्स. हे मेद नैसर्गिकरीत्या पदार्थांमधे नसतं. हे मानवनिर्मित आहे. ते कसं? कोणतंही प्रोसेस्ड फुड हे वाईट असतं. त्यात भाज्या डिहायड्रेट केलेल्या असतात, प्रिझर्वेटीव टाकलेले असतात, रेफ्रिजरेट केलेले असतात. हे पदार्थ टिकवण्यासाठी वापरलेले घटक हे ट्रान्स फॅटची निर्मिती करतात. त्यामुळे आपण पाकिटबंद, फास्ट फुड, बेकरीचे पदार्थ टाळलेच पाहिजेत.

तसंच आपल्या सगळ्यांना माहिती असलेली गोष्ट म्हणजे वापरलेलं तेल पुन्हा वापरलं की त्यात ट्रान्स फॅटची निर्मिती होते आणि तेलातले चांगले घटक निघून जातात.तेल कोणतंही असलं तरी ते वारंवार तापवल्यावर त्यातले घटक निघून जातात. पण हे फक्त तेलाच्या बाबतीत नाही तर सगळ्याच भाज्या, डाळी या प्रमाणातच शिजवल्या पाहिजेत.

ट्रान्स फॅट पदार्थ हे वाईटच असतात. पण इतर वेगवेगळे मेद आहेत ते पदार्थ आपण खाल्लेच पाहिजेत. आपल्याकडे जे पारंपरिक पद्धतीचं जेवणं जेवलं जातं होतं ते जेवल्यास आपल्यापासून आजार नक्कीच दूर पळून जातील. हो, पण त्याच्यासोबत व्यायाम करायला विसरू नका, असं आठवणीने आहातज्ज्ञ शेहरावत सांगतात.

हेही वाचा: 

सिंगल-डबलची स्ट्रॅटेजी फेल आणि भारत वर्ल्डकप बाहेर

देशाने लढाई करावी पासून विश्वचषक जिंकावा हा उन्मादच

आपल्या मुलांसाठी डाएट प्लॅन गरजेचा की हेल्दी लाईफ प्लॅन?

झोपाळू रोहित शर्मा आळस झटकून जगातला टॉप बॅट्समन बनला