कोरोनाची जुनी-नवी लक्षणं कोणती? त्यांच्यापासून संरक्षण कसं करायचं?

२६ मे २०२०

वाचन वेळ : ४ मिनिटं


एखाद्याला कोरोना वायरसची लागण झालीय हे कसं कळतं? कोरोना वायरसची तपासणी केली जातेच. पण या वायरसमुळे होणाऱ्या कोविड 19 या आजाराची लक्षणं दिसणाऱ्या व्यक्तींनाच ही तपासणी करायला सांगितलं जातं. आणि आता कोरोनाच्या लक्षणांमधे आता काही नव्या गोष्टींचाही समावेश झालाय. त्यामुळेच कोरोना वायरसच्या लक्षणांविषयी आपल्याला सगळी माहिती असायला हवी.

एखाद्याला कोरोना वायरसची लागण झालीय हे कसं कळतं? कोरोनाचे हे वायरस काही माणसाच्या शरीरात घुसताना आपल्याला दिसत नाहीत. किंबहुना ते वायरस नुसत्या डोळ्यांना दिसतंही नाहीत. शिवाय, हे वायरस आपल्या शरीरात जाण्याआधी ‘मी आलोय’ वगैरे सांगत नाही. ज्याच्या शरीरात आपण पाहुणे म्हणून राहणार असतो, त्या माणसाला साधी ‘हाय, हॅलो, नमस्कार’ करायची पद्धतही या वायरसमधे नसते. मग कोरोना वायरसची लागण झालेली कळते कशी?

उत्तर सोपं आहे. कोरोना वायरस शरीरात गेल्यावर माणूस आजारी पडू लागतो. जागतिक आरोग्य संघटनेनं या आजाराला ‘कोविड-१९’ असं नाव दिलंय. या कोविड १९ आजाराची काही लक्षणं असतात. काही लक्षणं सुरवातीला अगदी सौम्य स्वरूपात दिसतात. नंतर मात्र ही लक्षणं तीव्र स्वरूप धारण करतात. किंवा सुरवातीला काही लक्षणं दिसतात आणि आजार वाढल्यावर वेगळीच लक्षणं दिसू लागतात. म्हणूनच या लक्षणांविषयी आपल्याला सगळीच्या सगळी शास्त्रीय माहिती असायला हवी.

हेही वाचा : कोविड टो म्हणजे काय? हे कोरोनाचं नवं लक्षण आहे का?

सहा प्राथमिक लक्षणं

कोरोनाचा पहिला पेशंट चीनमधे सापडला तेव्हा त्याला न्यूमोनियासारखी लक्षणं दिसत असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं होतं. म्हणजे, त्याची फुफ्फुसं सुजली होती, श्वास घ्यायला त्रास होत होता असं काहीसं. त्यानंतर असे अनेक पेशंट समोर येऊ लागले. त्या सरसकट सगळ्यातच ही काही लक्षणं दिसत होती.

ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी ही लक्षणं तर एकूणएक माणसांत वायरसची लागण झाल्याच्या सुरवातीला दिसत होती. त्यातल्या काही लोकांचे मृत्यूही होत होते. हा माहीत असलेल्या एखाद्या आजाराचा प्रकार नसून एक वेगळाच आजार निर्माण झालाय हे कळाल्यावर या आजाराविषयी आणि त्यामागे असणाऱ्या वायरसविषयी डॉक्टरांचं संशोधन चालू झालं. तेव्हा कोरोना वायरसची काही नवी लक्षणं समोर आली. या नव्या लक्षणात श्वास घेण्यात त्रास होणं, तापाबरोबरच थंडी भरून येणं, घसा खवखवणं अशा काही गोष्टींचा समावेश केला गेला.

कोरोना वायरसची लागण जसजशी अनेक लोकांना होऊ लागली तसतशा अनेक नव्या गोष्टी समोर येऊ लागल्या. कोविड १९ आजाराचीही वेगवेगळी लक्षणं समोर आली. पुरेशा लोकांत दिसल्यावर या नव्याने समोर येणाऱ्या लक्षणांना वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनकडून मान्यता मिळत गेली. अमेरिकेतल्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोल या संस्थेनंही आजाराची नवी लक्षणं शोधण्याचं खूप मोठं काम केलंय. आज या संस्थेच्या अभ्यासाकडं सारं जगाचं लक्ष आहे.

हे कोरोना स्पेशलही वाचा : 

डॉक्टरांनी घातलेला सूट म्हणजे कोरोनाविरूद्धचं चिलखतच!

कोरोनाचे पेशंट या देशांत सापडले नाहीत की काही झोल आहे?

एकदा बरं झाल्यावरही पेशंटला का होतेय पुन्हा कोरोनाची लागण?

अमेरिकेला कोरोनानं ताब्यात घेतलं, सेंट लुईस शहर वेगळं राहिलं, कारण

कोरोना फक्त फुफ्फुसच नाही, तर आपल्या या अवयवांनाही करतोय टार्गेट

कोरोनापेक्षा खरा धोका आहे तो आपल्या आतल्या वायरसचाः युवाल नोवा हरारी

कोरोनाः बिल गेट्सनी २०१५ मधेच दिलेल्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष आपल्याला भोवतंय

कोविड टो हे लक्षण आहे की नाही?

सुरवातीला घसा खवखवणं, श्वास घ्यायला त्रास होणं, अंगदुखी, कोरडा खोकला ही कोरोना वायरसची प्राथमिक लक्षणं असल्याचं मान्य करण्यात आलं होतं. अलिकडेच त्यात अन्नावरची वासना उडणं आणि कुठल्याही गोष्टीचा वास न येणं ही दोन नवी लक्षणं जोडली गेलीत.

काही दिवसांपूर्वी या लक्षणांपैकी एकही लक्षण नसलेल्या पेशंटना वायरसची लागण झाल्यानंतर पायांवर पुरळ आणि जांभळ्या रंगाचे फोड येणं सुरू झालं होतं. नंतर ताप, सर्दी खोकला अशी लक्षणं दिसत होती. या पायावरच्या फोडांना कोविड टो असं म्हटलं गेलं.

मात्र या कोविड टोला अजूनही कोविड १९ आजाराचं लक्षण म्हणून मान्यता दिली गेलेली नाही. त्यामुळेच आजघडीला घसा खवखवणं, श्वास घ्यायला त्रास होणं, अंगदुखी, कोरडा खोकला, अन्नावरची वासना उडणं आणि कुठल्याही गोष्टीचा वास न येणं ही सहा लक्षणं कोरोना वायरसची प्राथमिक लक्षणं मानली जातात.  काल २४ मेला केलेल्या भाषणात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही कोरोनाच्या या प्राथमिक लक्षणांचा उल्लेख केलाय. शिवाय, सलग दोन तीन दिवस ताप येत असेल, खूप थकवा जाणवत असेल तर ते अंगावर काढू नका असा सल्लाही त्यांनी दिलाय.

हेही वाचा : लठ्ठ माणसांपेक्षाही कोरोना जास्त वजनदार का बनलाय?

चेहरा आणि ओठही निळे पडतात

एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. ती म्हणजे प्राथमिक लक्षणं याचा अर्थ वायरसची लागण झाल्याच्या सुरवातीला दिसणारी लक्षणं. काही पेशंटमधे ही लक्षणं जास्त तीव्र होत जातात. तर काहींमधे नवीन लक्षणं दिसू लागतात. फुफ्फुसांना सूज येणं हे त्यातलं एक महत्त्वाचं लक्षण आहे. कोरोना वायरस हा श्वसनसंस्थेचा आजार असल्याने हे लक्षण बहुतेक लोकांमधे दिसतं.

मात्र एप्रिल महिन्यात झालेल्या काही संशोधनातून कोरोना वायरसमुळे फक्त फुफ्फुसंच नाही तर किडनी, हृदय यांचेही आजार दिसून येतात असं समोर आलंय. शिवाय, काही पेशंटना मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा न झाल्यामुळे फिट येणं किंवा गोंधळल्यासारखं होणं असाही त्रास होतोय. तर काहींच्या पचनसंस्थेला इजा पोचते. जुलाब, उलट्या होणाऱ्या काही पेशंटना कोरोना वायरसची लागण झाल्याचंही समोर आलंय.

ही तीव्र स्वरूपाची लक्षणं सगळ्या पेशंटमधे वेगवेगळ्या स्वरूपात दिसून येतात. डब्लूएचओनं तर काही पेशंटचा चेहरा आणि ओठ निळे पडतात, असंही म्हटलंय. मात्र, ही लक्षणं खूप थोड्या पेशंटमधे दिसून येतात.

हेही वाचा : लॉकडाऊननंतर आपण महाराष्ट्रातल्या शाळा कसं सुरू करू शकतो?

प्रत्येक माणसाचं आरोग्य वेगळं

गेले पाच महिने आपल्या सगळ्यांच्या जाणिवे नेणिवेत कोरोना वायरस ठाण मांडून बसलाय. जगभरात ५५ लाखाहून जास्त लोकांना कोरोना वायरसची लागण झाली. प्रत्येक माणसाचं आरोग्य वेगळं असतं. त्यामुळेच प्रत्येक माणसामधे हा वायरस वेगळ्या प्रकारची लक्षणं निर्माण करू शकतो. त्यात हा वायरस नवीन असल्यामुळे तो शरीरात जाऊन काय काय उलथापालथ करू शकतो याचा अंदाज आपल्याला पुरेसा आलेला नाही.

कोविड १९ ची पुरेशा लोकांमधे दिसणाऱ्या काही लक्षणांना डब्लूएचओ आणि सीडीसीने मान्यता दिलीय. या लक्षणांच्या आधारावर कोरोना वायरसची लागण झाली असेल की नसेल याचा अंदाज बांधला जातो. या दोन संस्थांनी मान्य केलेल्या लक्षणांपैकी कुठलंही लक्षण एखाद्या पेशंटमधे दिसलं तरी त्याला लगेचच कोरोना वायरसची टेस्ट करायला सांगितली जाते. 

पण सध्या जगापुढे कोविड१९ लक्षणं न दिसणाऱ्या पेशंटला ओळखण्याचं आव्हान आहे. आपल्या महाराष्ट्रात तर लक्षण न दिसणाऱ्या पेशंट्सची संख्या लक्षणं दिसणाऱ्यांपेक्षा खूप मोठी आहे.

कोरोनापासून सुरक्षित कसं रहायचं?

कोरोना वायरसची लागण होऊच नये यासाठी करायच्या गोष्टी तर आता आपल्याला पाठच झाल्या आहेत. वारंवार हात धुवा, तोंडाला मास्क लावा, खोकताना शिंकताना रूमालाचा वापर करा आणि घराबाहेर पडल्यावर शारीरिक अंतर पाळा, हे सांगणारी पोस्टर देशभर लागलीयत. या गोष्टी व्यवस्थित पाळल्या गेल्या तर कोरोना वायरसपासून आपलं संरक्षण होऊ शकतं.

'आता काहीच दिवसांत पावसाळा चालू होईल. पावसाळ्याच्या वेगळ्या साथी पसरतात. आपण उन्हाळ्यात पसरणाऱ्या साथींना यशस्वीपणे रोखून धरलं. तसंच, पावसाळ्यात पसरणाऱ्या फ्लूपासून स्वतःचं संरक्षण करणं म्हणजेच कोविड १९ पासून संरक्षण करणं,' असं आपल्या भाषणात उद्धव ठाकरे म्हणाले. त्यासाठी पाणी उकळून पिणं, उगाच पावसात न भिजणं असे काही उपाय करावे लागतील हेही त्यांनी सांगितलं.

तरीही, कोरोनाची काही प्राथमिक लक्षणं दिसू लागली तर लगेचच डॉक्टरांकडे जायला हवं, असंही ते म्हणाले. कोरोनावर औषध नाही, हे जागतिक सत्य असलं तरी काही औषधांचा एकत्रित डोस दिल्याने माणूस कोरोनातून बरा होऊ शकतो. प्राथमिक लक्षणं दिसल्यावर लगेचच डॉक्टरकडे गेलो तर कोरोनापासून आपण सुरक्षित राहू शकू.

 

हेही वाचा : 

कोरोना वायरसबद्दल मुलांशी आपण कसं बोलायचं?

जीवघेणा लॉकडाऊन संपवण्याचे चार साधेसरळ मार्ग

सुपर स्प्रेडर म्हणजे काय? ते मुद्दाम कोरोना पसरवतात का?

कोरोनाच्या R0 नंबरवर आपलं, लॉकडाऊनचं भवितव्य अवलंबून आहे?

हर्ड इम्युनिटी ठरू शकते का कोरोनाच्या युद्धातलं भारताकडचं ब्रम्हास्त्र?

लग्नासाठीची जमापुंजी खर्चून रिक्षाचालक अक्षय भागवतोय रोज चारशे जणांची भूक

ज्योती पासवानः जग तिचं कौतुक करतंय, खरंतर आपण तिची माफी मागायला हवी!