लॉकडाऊनचा विचार केला तर जगभरात वेगवेगळं चित्र दिसतं. परदेशातल्या लॉकडाऊनची स्थिती आपल्यापेक्षा वेगळी आहे. अमेरिका, इंग्लंड, जर्मनी या सारख्या विकसित देशातली जनता मुळात शिस्तप्रिय आहे. तिथंही आपल्या सारखी गजबज असते. पण त्यात एक शिस्त असल्याचं जाणवतं. आपल्याकडे मात्र ’ब्रेक द चेन’चा अर्थ कुणालाच समजलेला नाही, किंवा समजूनही आपण त्याकडे दुर्लक्ष केलंय.
मागच्या वर्षापासून सगळ्या जगाचा गाडा थांबल्यासारखा झालाय. चुकार बैल जसा शेत नांगरताना मधेच बसकण मारतो, तसं झालंय. जरा कुठे जगाचा कारभार नेहमी प्रमाणे सुरु होतोय असं वाटत असतानाच कोरोनाच्या पहिल्या दुसर्या तिसर्या लाटा थडकू लागतात आणि जगाचं रहाटगाडगं थांबून जातं. कोरोनाने चालत्या गाड्याला असा घुणा लावलाय जणू.
हेही वाचा: कोरोनाः बिल गेट्सनी २०१५ मधेच दिलेल्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष आपल्याला भोवतंय
गेल्यावर्षीपासून लॉक अनलॉकच्या फेर्यात सगळं जग अडकून पडलंय. प्रत्येक देशात या लॉक अनलॉकच्या नाना तर्हा! पण समानता एकच, की काही काळासाठी व्यवहार सगळ्या जगात ठप्प झालेत.
आपल्या देशात जनता कर्फ्यूपासून या सगळ्याला सुरवात झाली. जनता कर्फ्यू नंतर देशस्तरावर लॉक अनलॉकचा खेळ सुरू झाला. मार्च २०२० पासून जवळपास जून अखेरपर्यंत लॉकडाऊन लागू होता. या काळात अनेकांचे रोजगार गेले, अनेकजण देशोधडीला लागले. कोरोनामुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाले. हे दुष्टचक्र आजही सुरु आहे.
सुरवातीला शहरी भागात कडक लॉकडाऊन होता. मुंबई पुण्यासारख्या मोठ्या शहरांची तर गतीच थांबली होती. लॉकडाऊनचा विचार केला, तर जगभरात चित्र वेगवेगळं दिसतं. आपल्याकडे लोकांनी लॉकडाऊन गांभीर्याने घेतल्याचं क्वचितच दिसून आलं. त्यामुळे प्रसंगी पोलिसी बळाचा वापर करण्याची वेळ आली.
इतर देशातही लॉकडाऊन होता आणि आजही काही ठिकाणी आहे. परदेशातल्या लॉकडाऊनची स्थिती मात्र आपल्यापेक्षा वेगळी असल्याचं दिसून येतं. अमेरिका, इंग्लंड, जर्मनी या सारख्या विकसित देशातली जनता मुळात शिस्तप्रिय आहे. तिथंही आपल्या सारखी गजबज असते. पण त्यात एक शिस्त असल्याचं जाणवतं.
भारतातला लॉकडाऊन आणि परदेशातला लॉकडाऊन यातला फरक समजून घेण्यासाठी परदेशात स्थायिक झालेल्या काही भारतीयांशी या निमिताने संवाद साधला. स्नेहा आणि वरूण शर्मा हे कॅनडा या देशात स्थायिक झालेलं दाम्पत्य. आपल्या सारखं तिथं मास्क वापरा, अंतर राखा असं कानी कपाळी ओरडून सांगावं लागत नाही, की जाहिराती कराव्या लागत नाहीत.
प्रत्येक व्यक्ती मास्क शिवाय घराबाहेर पडत नाही. पाश्चिमात्य देशात प्रामुख्याने सुपर मार्केटमधून खरेदी होते. आपल्या सारखी टपर्या वजा दुकाने तिथं कमीच असतात. सुपर मार्केटमधे एका वेळी मोजक्या लोकांनाच प्रवेश दिला जातो. विशेष म्हणजे तिथं लॉकडाऊन संपला की शाळाही सुरु होतात, असं स्नेहा सांगते.
कदाचित या देशांची लोकसंख्या कमी असल्यामुळे शिवाय आपल्या सारखं एका वर्गात ५० ते ६० मुलं कोंबून बसवली जात नसतील, त्यामुळे शाळा सुरू ठेवणं शक्य होत असावं.
हेही वाचा: किराणा दुकानातून आपण कोरोनाला घरी नेण्यापासून कसं वाचू शकतो?
सायली तांबे ही ऑस्ट्रेलियात उच्च शिक्षण घेत असलेली मुंबईची मुलगी. तिथल्या मेलबर्न शहरात ती राहते. मेलबर्न शहर हे ब्रिटानिया राज्याचा भाग आहे. त्यामुळे लॉकडाऊन लागू झाला की तो फक्त मेलबर्न मधेच नसतो तर पूर्ण ब्रिटानियात लागू होतो. तिथले लोक आरोग्याची खूप काळजी घेतात. कोरोनाची प्रचंड दहशत आहे. त्यामुळे लोक विनाकारण बाहेर पडत नाहीत, असं सायली सांगते.
रेस्टॉरंटमधल्या प्रवेशासाठी कडक नियम आहेत. प्रत्येक रेस्टॉरंटच्या बाहेर ’क्यू आर कोड’ असतो. तो स्कॅन करावा लागतो. स्कॅन केला की तुमची माहिती तात्काळ स्थानिक आरोग्य यंत्रणेकडे नोंद होते. समजा तुम्ही कोरोना बाधित असल्याचं लक्षात आलं तर तुम्हाला ट्रेस केलं जातं.
तुम्ही ज्यावेळी रेस्टॉरंटमध्ये होता, तेव्हा तुमच्या आजूबाजूला बसणार्या इतर ग्राहकांचाही शोध घेतला जातो. त्या रेस्टॉरंटमधून नंतर तुम्ही कुठे कुठे गेला, कोणाला भेटला हे ट्रेस केलं जातं. घरून काम करणं शक्य नसणार्या लोकांना पास दिले जातात. लॉकडाऊनच्या काळात खरेदी काही किलोमीटर अंतराच्या परिघातच करावी लागते.
आपल्या प्रमाणे या देशांमधेही कोरोना वाढला की लॉकडाऊन लागू होतो. पेशंटची संख्या कमी झाली की लॉकडाऊन शिथिल किंवा रद्द होतो. आपल्या देशात कुठेही शाळा सुरु नाहीत. पण परदेशातल्या अनेक देशात शाळा काही प्रमाणात सुरु असतात.
मुळात आपल्या प्रमाणे तिथे लोक विनाकारण भटकत बसत नाहीत, पारावर, नाक्यावर चकाट्या पिटत बसत नाहीत. तिथे लॉकडाऊन संपला की आपल्यासारखी बाजारपेठेत झुंबड उडत नाही. लोक बाहेर पडतात, पण नियम पाळूनच!
हेही वाचा: कोरोना वायरसबद्दल मुलांशी आपण कसं बोलायचं?
लॉकडाऊन हा आपल्या हिताचा आहे, ही भावना प्रत्येक अमेरिकन नागरिकांची होती. लाचखोरी न करता पोलीस कायद्याची कडक अंमलबजावणी करतात. व्यापार उद्योग पूर्ण बंद ठेवले जातात. अमेरिकेची लोकसंख्या भारताच्या एक चतुर्थ एवढी आहे.
शहरांचं नियोजन उत्तम आहे. सरकारने कोरोना स्थिती प्रभावीपणे हाताळली. इथल्या राजकारण्यांनी परस्परांवर आरोप न करता सहकार्याची भूमिका घेतली, अशी माहिती वाशिंग्टन पासून ४० मैलावर असलेल्या अशबर्न वर्जिनिया इथं नोकरीला असलेले गिरीश खरात सांगतात.
भारतात गेल्यावर्षी मार्च पासून वेगवेगळ्या शहरात टप्याटप्याने लॉकडाऊन लागू झालं. आजही हे चक्र सुरूच आहे. परदेशातले लोक शिस्तप्रिय असूनही तिथं कोरोना का वाढला असा प्रश्न काही जण उपस्थित करतात. पण असले प्रश्न उपस्थित करण्यात काही अर्थ नाही. त्यापेक्षा आपण कसे वागतो, हे महत्वाचं आहे.
आपल्याकडे लॉकडाऊनच्या काळातही समारंभ साजरे झाले. कोरोनाचा प्रादुर्भाव असतानाही अनेक राज्यात निवडणुका झाल्या. धार्मिक कार्यक्रम झाले. लॉकडाऊनच्या काळातही पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. सरकारी नियम तर कागदावरच राहिल्याचं दिसलं. हॉटेल सुरु झाल्यानंतर दोन टेबलांमधलं अंतर किती असावं, किती लोकांना प्रवेश द्यावा याबद्दल नियम केले. पण कोणीही नियम पाळल्याचं दिसलं नाही.
मास्क कसा वापरावा अशा साध्या गोष्टी शिकवण्यासाठी जाहिरातींचा आधार घ्यावा लागला. पंतप्रधानांपासून ते अगदी मुख्यमंत्री यांच्यावर लोकांची विनवणी करण्याची वेळ आली. मुळात आपल्याकडे ’ब्रेक द चेन’ चा अर्थ कुणाला समजलाच नाही, किंवा समजूनही दुर्लक्ष झाल्याचं दिसलं. त्यामुळे लॉक अनलॉकचा खेळ सुरूच राहिला. लॉक अनलॉकची ही चेन ब्रेक करायची असेल तर लोकांनीच मानावर घेतलं पाहिजे.
हेही वाचा:
ये दोस्ता, लस कशी तयार केली जाते?
हात धुण्यासाठी साबण वापरायचा की सॅनिटायझर?
(दैनिक पुढारीतून साभार)