आज साईबाबांचा शंभरावा पुण्यतिथी सोहळा आहे. आजच धम्मचक्र प्रवर्तनदिन आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि साईबाबा हे समकालीन होते. ते एकमेकांना भेटले नाहीत. पण एकमेकांना माहीत असणारच. बाबासाहेबांना साईबाबांविषयी काय वाटत होतं, याचा अंदाज येऊ शकेल, असं एक भाषण बाबासाहेबांच्या भाषणांच्या खंडात सापडलंय.
धर्मांतराची घोषणा केल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी वेगवेगळ्या धर्मांचा अभ्यास केला. यासाठी ते वेगवेगळ्या देशांत, शहरांत गेले. तिथं विविध धर्मातल्या लोकांच्या सभांपुढं भाषणं केली. सोमवंशीय गुरुदत्त प्रासंगिक भजन समाजाचा दत्त जयंती उत्सव असो की शीख मिशनची परिषद असो अशा वेगवेगळ्या जातीधर्माच्या सभांमधे जाऊन त्यांनी मार्गदर्शन केलं.
बाबासाहेबांची इथं झालेली भाषण वाचणं ही खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. या भाषणांचेही आपल्याला दोन भाग करता येतात. एक म्हणजे धर्मांतरासाठी धर्म निवडीच्या चाचपणीचा काळ आणि दुसरा म्हणजे बौद्ध धर्म स्वीकारायचं ठरल्यानंतरचा काळ. सुरवातीच्या काळात ते धर्मांतर का केलं पाहिजे, यासारख्या प्रश्नांविषयी बोलायचे. दुसऱ्या टप्यात मात्र, ते वेगवेगळ्या जातीधर्मातल्या समूहांपुढे बौद्ध धर्माची दीक्षा घेणं सर्वांच्याच कसं हिताचं आहे, हे सांगताना बघायला मिळतं. सध्या धर्मांच्या चर्चेनं जोर धरलेला आहे. अशा काळात तर ही सर्व भाषणं वाचलीच पाहिजेत.
बाबासाहेबांनी असंच एक भाषण मुंबईच्या सेंट झेवियर कॉलेजच्या मैदानावर भरलेल्या अखिल भारतीय साईभक्त संमेलनात दिलं. २४ जानेवारी १९५४ ला संमेलनाच्या उद्घाटनावेळी केलेल्या भाषणाचा आता उपलब्ध असणारा हा भाग.
हेही वाचाः धम्मचक्र प्रवर्तन दिन : तिथीनुसार की तारखेनुसार?
आज तर मूर्तिपूजा, साधुसंत आणि चमत्कार करणाऱ्या व्यक्तींची पूजा हाच धर्म होऊन बसला आहे. आपल्या धर्मात आता देव आणि नीतीही राहिली नाही. आजची अवस्था म्हणजे मानवी मनाचा संपूर्ण अध:पात आहे. म्हणूनच खऱ्या आणि श्रेष्ठ धर्माची पुन:स्थापना करण्याचे बिकट कार्य भावी पिढीवर येऊन पडले आहे.
साईबाबांना प्रत्यक्ष भेटण्याचे किंवा पाहण्याचे भाग्य मला लाभले नाही. त्यांच्याबद्दल मी थोडफार ऐकून आहे, एवढचं. म्हणून अशावेळी साईबाबांच्या जीवनाचे अष्टपैलू माहीत असलेल्या व्यक्तीला बोलावले असते तर फार बरे झाले असते. माझे साईबाबांबद्दलचे ज्ञान अगदी शून्य आहे आणि जे आहे त्याचे अधिष्ठानदेखील ऐकीव गोष्टींवरच आहे. साईबाबा कालवश होऊन बरेच दिवस लोटले असले, तरी त्यांचा भक्तगण मात्र इंदुकलेप्रमाणे सारखा वाढत आहे. साईबाबा हे धर्मगुरु म्हणूनच पुष्कळांना माहीत आहेत.
हिंदुस्थानात अनेक धर्मांची स्थित्यंतरे झाली. माणसाच्या आत्म्याला मुक्ती मिळण्याचे साधन हीच धर्माची प्राथमिक अवस्था, अशी समजूत होती. कालांतराने धार्मिक दृष्टीकोन, हेतू आणि साधना यामुळे मूळ कल्पनेत आमूलाग्र बदल झाला आणि धर्म हा नैतिक मूल्यांनी परस्पराविषयी आदरभाव निर्माण करुन विश्वबंधुत्वाची उभारणी करण्याचे साधन आहे, असाही अर्थ लावला गेला.
धर्माची तिसरी अवस्था म्हणजे मानवी जीवनातील दैनंदिन गरजांची जी व्यक्ती पूर्तता करील, तिची देवाप्रमाणे पूजा करणे ही होय. कुणाला मुले हवी होती, कुणाला सोने हवे होते, कुणाला संकटमुक्त व्हायला पाहिजे होते. ज्या व्यक्तीने या इच्छा पूर्ण केल्या ती व्यक्ती त्या त्या इसमांचा देव होऊन बसली. त्यानंतर तर सामान्य माणसापेक्षा काहीतरी चमत्कृती करुन दाखविणाऱ्या व्यक्तीचीही पूजा होऊ लागल्याचे सर्व हिंदुस्थानभर आपण पाहत आहोत.
हेही वाचाः वाचा धम्मदीक्षा घेताना बाबासाहेबांनी केलेलं ऐतिहासिक भाषण
धर्माच्या बाबतीत आपण चुकीच्या मार्गाने गेलो आहोत. एवढेच नव्हे, तर आजकालच्या काळात धर्माच्या नावावर पैसा गोळा करुन तो अनिष्ट बाबींवर खर्च केला जातो. आज जगात दारिद्रय आणि दु:ख असताना, अशारीतीने धर्माच्या नावावर पैसा जमवून तो ब्राह्मणादी आणि उत्सवावर खर्च करणे हा एक भयंकर गुन्हा आहे. गौतम बुद्धांनी हा प्रश्न व्यवस्थितपणे हाताळला होता. त्यांनी आपल्या नैतिकशास्त्रात पंचशील, अष्टांगमार्ग आणि निर्वाण फार उत्कृष्ट रीतीने सांगितले आहेत.
याशिवाय त्यांनी आपल्या अनुयायांना पुढील दहा तत्वे आत्मसात करण्यास सांगितली आहेत ती अशी – (१) प्रज्ञा, (२) शील, (३) नेखम्म, (४) दान, (५) वीर्य, (६) खन्ति, (७) सच्च (८) अधित्थान, (९) मैत्री, (१०) उपेख्खा.
ज्यामुळे अज्ञानांधकार नाहीसा होतो ती प्रज्ञा म्हणजे ज्ञानरुपी प्रकाश; शील म्हणजे नैतिक विचार; कोणतीही वाईट गोष्ट करु नये परंतु चांगली गोष्ट मात्र सतत करत राहावे. नेखम्म म्हणजे ऐहीक सुखापासून अलिप्त राहणे. दान म्हणजे कोणत्याही प्रकारची अपेक्षा न करता दुसऱ्यासाठी तनमनधन अर्पण करणे. वीर्य म्हणजे धैर्य, कसोटी, की ज्यामुळे हाती घेतलेल्या कामात कधी माघार न घेणे. खन्ति म्हणजे सहनशीलता. द्वेषाला द्वेषाने उत्तर न देणे. सच्च म्हणजे सत्य. प्रत्येकाने खोटे कधी बोलू नये, सत्य बोलावे. जे बोलावे ते सत्यच असावे. अधित्थान म्हणजे मनोनिग्रह. मैत्री म्हणजे प्रेम, मग ती मित्राविषयी असो किंवा शत्रूविषयी असो, मानवाविषयी असो किंवा इतर प्राणिमात्राविषयी असो.
उपेख्खा म्हणजे उपेक्षा; ज्यामुळे मन सुखदु:खाच्या पलीकडे गेले असून, कोणत्याही परिणामाने विचलित न होता कर्तव्यपरायण राहणे. यापैकी जास्तीत जास्त गुण प्रत्येक माणसाने आत्मसात करावे अशी बुद्धाची अपेक्षा होती. म्हणूनच पाली वाड्.मयात असे म्हटले आहे, की गौतम बुद्धांनी वरीलप्रमाणे ‘दान पारमिता’ जरी शिकवली असली तरी दान ते सत्पात्री असण्याबद्दल त्यांचा कटाक्ष होताच.
दान देण्यासाठी दाता जरी प्रवृत्त झाला तरी त्यामुळे ज्याला दान दिले जात, त्याला मात्र त्याने कमीपणा येता कामा नये. पददलितांना एक दिवस स्वत:च्या पायावर उभे राहण्यास सामर्थ्य निर्माण करणारी शक्ती- जिला आपण मदत म्हणतो – तेच खरे दान. साधुसंतांच्या नावावर पैसा जमा केला असेल तर त्याचा पारमितामध्ये सांगितलेल्या तत्वाप्रमाणे विनियोग करणे अत्यंत आवश्यक आहे.
दारिद्र्य, अज्ञान, रोगराई इतकी आहे की सध्याच्या काळात ती नष्ट करण्यासाठी असा पैसा खर्च न करता तो धनिकांसाठी खर्च करणे म्हणजे दुष्टपणा ठरेल. त्या पैशांचा विनियोग रुग्णालये, शिक्षण, बेकारांसाठी छोटे छोटे धंदे, गरीब व अनाथ महिलांसाठी काही तरी धंदेशिक्षण देणे अशा कार्यावर त्यांनी करावा. आपण जर जमा केलेल्या पैशांचा विनियोग अशारितीने केला, तर त्यामुळे आपल्या कार्याची वाहवा होईल. एवढेच नव्हे तर साईबाबांची कीर्ती, दाही दिशांना दुमदुमत राहील.
हेही वाचाः
धर्मांतरः टोटल पोलिटिकल अॅक्शन
धम्मदीक्षा समारंभात मध्यरात्री कूठून आणली बुद्धमूर्ती?
धर्मांतराच्या ६२ वर्षांनंतर तरी आत्मटीकेचा प्रवाह वाढायला हवा
साईबाबांची कीर्ती दाहीदिशा होईल, असं डॉ. आंबेडकर का म्हणाले?