कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचा छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असा नामविस्तार करण्याचा मुद्दा पुन्हा चर्चेत आलाय. यात आता खुद्द खासदार छत्रपती संभाजी राजेंनीच उडी घेतलीय. त्यामुळे या चर्चेला आता वेगळं वळण मिळालंय. शिवाजी विद्यापीठ अशा एकेरी उल्लेखाने महाराजांचा अवमान होतो, असा आक्षेप घेतला जातो. पण या सगळ्यांवर खुद्द यशवंतराव चव्हाण यांनी एक युक्तिवाद केलाय.
कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाच्या नामविस्ताराचा मुद्दा पुन्हा एकदा उफाळून आलाय. राज्यसभा खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी शिवाजी विद्यापीठासह राज्यातल्या सर्व सार्वजनिक स्थळांचं नामकरण छत्रपती शिवाजी महाराज असं करण्याची मागणी केलीय. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलंय.
ते लिहितात, ‘काही दिवसांपासून महाराजांच्या नाम उच्चारावरून मोठी चर्चा होतेय. मग ते अमिताभ बच्चन प्रकरण असो की केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद, या दोन्हीवेळी शिवभक्तांची बाजू घेत मी जाब विचारला होता. यावर कायमस्वरुपी उपाययोजना करणं आवश्यक आहे. सुरवात म्हणून आपण ज्यांचं नाव केवळ शिवाजी असं आहे, अशा सर्व सार्वजनिक स्थळांचा नामविस्तार करणं आवश्यक आहे.'
दोन वर्षांपूर्वी तत्कालीन आमदार राजेश क्षीरसागर आणि काही हिंदुत्ववादी संघटनांनी शिवाजी विद्यापीठाचे नाव छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ करावं अशी मागणी केली होती. नंतर ही मागणी करणारे आणि मागणी थंडबस्त्यात गेली. आत्ता पुन्हा खासदार संभाजीराजे छत्रपतींनी तीच मागणी पुढे सरकवलीय.
स्थापनेपासून शिवाजी विद्यापीठाच्या नावावरून मतभेद आहेत. गेल्या तीन चार वर्षांपासून पुन्हा एकदा नामांतर वादाला सुरवात झालीय. शिवाजी विद्यापीठ या नावावर आक्षेप घेणाऱ्यांच्या मते, विद्यापीठाला छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असं पूर्ण नाव द्यावं. निव्वळ शिवाजी विद्यापीठ असा एकेरी उल्लेख केल्याने महाराजांचा अवमान होतो.
दुसरीकडे शिवाजी महाराज हे एकमेवाद्वितीय आहेत. त्यामुळे त्यांच्या नावाचा अपभ्रंश किंवा नामसंकोच होण्याचा धोका आहे. सी. रा. तावडे यांच्या अध्यक्षतेखालच्या समितीनेही शिवाजी विद्यापीठ या नावावरच शिक्कामोर्तब केलं. या समितीमधे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, बॅ. बाळासाहेब खर्डेकर, राजारामबापू पाटील, प्रा. ना. सी. फडके, डॉ. बी. एस. पाटील, डॉ. बी. आर. ढेकणे, डॉ. भगवान दास, डॉ. बी. एस. नाईक, प्राचार्य आर. एस. मगळी, व्ही. ए. आपटे यांचा समावेश होता, असं महाराष्ट्र टाइम्सच्या एका स्टोरीत म्हटलंय.
या स्टोरीनुसार, या समितीने देशभरातल्या मोठ्या विद्यापीठांना भेटी दिल्या. अनेक संस्थांच्या नावांचा अभ्यास केला. नामविस्तार आणि नामसंकोच याचा अभ्यास करून ‘शिवाजी विद्यापीठ’ हे नाव निश्चित केलं. या नावावर ऐतिहासिक पन्हाळगडाच्या सज्जाकोठीत शिक्कामोर्तब करण्यात आलं. शिवाजी विद्यापीठाचं नाव एखाद्याला सुचलं आणि लगेच दिलं, असं झालेलं नाही.
हेही वाचा : गांधी घराण्यानं संन्यास घेणं देशाच्या हिताचं ठरेल
बाळासाहेब देसाईंनी शिवाजी महाराजांच्या जीवनावर एखादी कादंबरी असावी असं वाटत होतं. त्यासाठी त्यांनी रणजित देसाईंना गळ घातली आणि एका महान लेखकाकडून श्रीमान योगी ही कादंबरी लिहून घेतली. तर महान इतिहास संशोधक असलेल्या डॉ. आप्पासाहेब पवारांनी यावर संशोधन केलं. देसाई आणि पवार यांच्यासह महाराष्ट्रातल्या विद्वान मंडळींच्या चर्चेतून देण्यात आलेलं नाव सध्या काहींना निरुपयोगी आणि एकेरी वाटू लागलंय.
काही वर्षांपूर्वी ना. ग. गोरे आणि एस. एम. जोशी यांनी नामविस्ताराबाबत विद्यापीठाकडे मागणी केली होती. मात्र बॅ. पी. जी. पाटील यांनी यामागचा इतिहास सांगितल्यानंतर त्या दोघांनीही मोठ्या मनाने ते मान्य केलं होतं. त्यानंतर हा विषय संपला.
राज्यातली सर्वात मोठी टेक्निकल इन्स्टिट्यूट असलेली वीरमाता जिजाबाई टेक्निकल इन्स्टिट्यूटचा झालेला नामसंकोच वीजेटीआय हे आपल्यासमोर उदाहरण असतानाही त्याबाबत आग्रह धरला जातोय. याशिवाय मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा झालेला सीएसएमटी हा नामसंकोच ही मोठी उदाहारणं आपल्यासमोर आहेतच.
फेसबूकवर शाहूप्रेमी माजी आमदार बाबूराव धारवाडे यांचे सुपुत्र उदय धारवाडे यांनी विद्यापीठ नामविस्तारावर एक सविस्तर पोस्ट लिहिलीय. ते लिहितात, ‘शिवाजी विद्यापीठाच्या स्थापनेस ५७ आणि वर्षे पूर्ण होताहेत. १८ नोव्हेंबर १९६२ ला विद्यापीठाची स्थापना झाली. १९६० दशकाच्या सुरवातीला दक्षिण महाराष्ट्रात एक नवं प्रादेशिक विद्यापीठ स्थापन व्हावं, त्या विद्यापीठला प्राचार्य. डॉ. बाळकृष्ण यांच्या इच्छेनुसार छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव द्यावं असं तत्कालिन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या मंत्रीमंडळामधे ठरलं.’
हेही वाचा : म्युच्युअल फंडमधली एसआयपी गुंतवणूक थांबवण्याची वेळ आलीय का?
‘विद्यापीठाचं स्वरुप निश्चित करण्यासाठी एक चिकित्सा समिती नेमण्यात आली. डॉ. बाळकृष्ण यांच्या इच्छेनुसार छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव विद्यापीठाला देण्यास कुणाचीही हरकत नव्हती. विद्यापीठाच्या कायद्यासंबधीही मतभेद नव्हते. पण नाव कोणत्या पद्धतीने द्यायचं याबाबत चिकित्सा समितीमधे मतभेद होते. समितीमधील काही सदस्यांना विद्यापीठाचे नाव 'श्री छत्रपती शिवाजी विद्यापीठ' ठेवावं असं वाटत होतं.’
‘या आग्रहामधे कोल्हापूरचे पहिले आमदार बलवंतराव बराले हेपण होते. त्यांनी सतत दोन तीन दिवस हा आग्रह धरून ठेवला. त्यांच्या या भूमिकेला समर्पक असं उत्तर कुणी दिलं नव्हतं. शेवटी यशवंतराव चव्हाण यांनी बराले यांना आपल्या चेंबरमधे बोलावलं आणि आपलं मत सांगितलं.’
यशवंतराव चव्हाण म्हणाले, ‘तुम्ही असा आग्रह धरू नका. कारण बडोद्याचे महाराजा सयाजीराव युनिवर्सिटीचा उल्लेख लोकांच्या तोंडी नेहमी एम एस युनिवर्सिटी असाच असतो. तसंच आपल्या श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठाचा उल्लेखही लोक नेहमीच एसएनडीटी विद्यापीठ असाच करतात तसं आपल्या विद्यापीठाचं होऊ नये.’
‘शिवाजी विद्यापीठ या नावानंच उल्लेख झाला तर शिवाजी हे नाव लोकांच्या सतत डोळ्यासमोर राहील. शिवाय एवढ्याच नावामुळे आपण दुसर्या कुणाच्या नावाने हे विद्यापीठ सुरू करतो असं मानण्याचं कारण नाही. या नावामधेसुद्धा श्री छत्रपती शिवाजी विद्यापीठ असं सूचित होते.’
मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे हुशार होते. त्यांचा हा युक्तिवाद इतका बिनतोड होता की, त्या आग्रही सदस्यांनी एकदम माघार घेऊन त्यांची सूचना मान्य केली. कोणत्याही कारणामुळे अशी ही गोष्ट कुणाच्या लक्षात आली नाही. अशा प्रकारे विद्यापीठाचं नाव शिवाजी विद्यापीठ असं निश्चित करण्यात आलं.
आज विचार केला तर ६० वर्षापूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी केलेली सूचना आणि युक्तिवाद योग्य होता असं वाटतं. नाहीतर आज शिवाजी विद्यापीठाचा उल्लेख संक्षिप्त शब्दात म्हणजेच एस सी एस युनिवर्सिटी असा झाला असता. त्यामुळे मूळ उद्देशालाच छेद गेला असता. कारण आजकाल आपण पाहतो तसं नावाचं संक्षिप्तकरण होत आहेच त्याचबरोबर वाक्यरचनेतही हा बदल होतोय, असं धारवाडे आपल्या फेसबूक पोस्टमधे लिहितात.
हेही वाचा : महाविकासआघाडीचं नवं सरकार पाच वर्षं चालेल की नाही?
कोल्हापुरात अनेक वर्ष पत्रकारिता केलेले ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांनी नामविस्तारावर एक फेसबूक पोस्ट लिहिलीय. ते लिहितात, ‘कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापाठाचं नामकरण छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ करण्याची मागणी पुन्हा काही मंडळी करू लागलेत. ही मागणी करणाऱ्यांना शिवद्रोही म्हणावं लागेल. भले त्यापैकी कुणी रक्ताचे वारस म्हणून घेत असले तरी. कारण त्यांना ‘सीएसएमयु’ असं नाव रेकॉर्डवर आणून शिवरायांचं नाव बाजूला ढकलायचंय. अर्थात ही मंडळी ज्या वर्तुळात वावरत आहेत तिथे ते यापेक्षा वेगळा विचार करू शकत नाहीत.’
‘जेम्स लेनच्या भाईबंदांच्या या पिलावळीच्या या प्रयत्नांना जागृत शिवप्रेमींनी आणि महाराजांच्या वैचारिक वारसदारांनी तीव्र विरोध करायला हवा. शिवाजी विद्यापीठामुळेच जगभरात ‘शिवाजी’ या नावाचा डंका वाजतो हे लक्षात घ्यायला हवं. विद्यापीठाचं नामकरण करताना यशवंतराव चव्हाणांपासून विद्यापीठाचे पहिले कुलगुरू आप्पासाहेब पवारांपर्यंत सगळ्यांचा हाच हेतू होता.’
डॉ. आलोक जत्राटकर यांनी डॉ. चोरमारे यांच्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना आणखी काही नव्या मुद्द्यांना स्पर्श केलाय. ते लिहितात, ‘कोणतीही नवी संघटना किंवा नेता कोल्हापुरी उदयास येऊ लागला की, शिवाजी विद्यापीठ हे त्यांचं पहिलं सॉफ्ट टारगेट असतं. विद्यापीठापासून आंदोलनाची सुरवात करायची म्हटलं की, मग नामांतराचा मुद्दा उचलून भावनिक खेळ खेळण्यास सुरवात होऊ लागते. इतिहासात किती दिग्गजांनी विचारपूर्वक या विद्यापीठाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असं ठेवण्याऐवजी 'शिवाजी विद्यापीठ'च असलं पाहिजे, असा आग्रह धरला.’
‘विधिमंडळातही या प्रश्नावर खल होऊन अंतिमतः हेच नाव फायनल झालं. जगातला कोणताही व्यक्ती जेव्हा या विद्यापीठाचं नाव घेईल, तेव्हा छत्रपती शिवरायांचं नाव त्याच्या तोंडी आलंच पाहिजे. त्याला शिवाजी महाराज माहिती व्हायला हवेत हा उदात्त हेतू केठे आणि या इतिहासाशी देणंघेणं नसणारे हे लव्हाळी नेते कुठे? या इतिहासाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक माध्यमांनीसुद्धा अशा वार्तांना प्रसिद्धी देणं टाळलं, तर ते अधिक यथोचित होईल.
‘आणि या मुद्याला प्रसिद्धी मिळत नाही, आपला फोटो छापून येत नाही, असं लक्षात येऊन संबंधितांच्या अजेंड्यावरून हा विषय हळूच गायबही होऊन जाईल, असं वाटतं. 'जय भवानी, जय शिवाजी' अशी घोषणा देताना शिवरायांचा अवमान करण्याचा आपला हेतू असतो का? नाही ना! मग अभिमानानं शिवरायांचं नाव मिरवणाऱ्या शिवाजी विद्यापीठाचा अगर शासनाचा तसा हेतू असल्याचा समज करून घेणाऱ्यांच्या आणि देणाऱ्यांच्या हेतूविषयीच शंका घ्यायला इथे वाव आहे.’
‘इथे हेही स्पष्ट करावं लागंल की, एखाद्या संघटनेने निवेदन देण्यासाठी येणार असल्याचं कळवलं की, विद्यापीठ प्रशासन त्यांना नाकारत नाही. त्यांच्या भावनांची दखल घेऊन ती शासनाला कळवण्याची खुली भूमिका प्रशासनाकडून स्वीकारली जाते.’
हेही वाचा :
सुरक्षेची जबाबदारी महिलांवर ढकलून बलात्कार थांबणार का?
आनंद कुंभारः एक क्लार्क शिलालेख अभ्यासक बनतो त्याची गोष्ट
महाराष्ट्रातल्या अपयशानंतर भाजपला झारखंड जिंकावंच लागणार!
१०० बलात्काऱ्यांच्या मुलाखती घेणाऱ्या तरुणीचं म्हणणं ऐकायलाच हवं!