युरोपातल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतून भारतानं काय शिकायला हवं?

१२ एप्रिल २०२१

वाचन वेळ : ४ मिनिटं


भारतात सध्या कोरोनाची दुसरी लाट आलीय. महाराष्ट्र देशातला कोरोनाचा हॉटस्पॉट बनलाय. रोज ५० हजार पेशंटचा आकडा पार होतोय. युरोप आणि अमेरिकेने गेल्यावर्षी दुसऱ्या लाटेचा अनुभव घेतलाय. या लाटेमुळे आरोग्य सुविधांवर ताण पडला. आपणही सध्या त्याच स्थितीतून जात आहोत.

जानेवारी महिन्यात कोरोनाचे आकडे कमी व्हायला लागले. कोरोना वायरसमुळे आधीच सगळ्यांचं कंबरडं मोडलं होतं. त्यामुळे आकड्यांच्या बातमीमुळे लोक खुश होते. आपल्याकडच्या आरोग्य सुविधांवर मोठ्या प्रमाणात ताण आला होता. तो हलका होईल, असं वाटलं. पण कोरोनाची आकडेवारी वाढायच्या बातम्या पुन्हा यायला लागल्या.

सध्या भारतात कोरोना वायरसच्या दुसऱ्या लाटेनं धडक मारलीय. कोरोनाचे आकडे दिवसेंदिवस वाढतायत. महाराष्ट्र देशातला कोरोनाचा हॉटस्पॉट बनलाय. स्पेन, ब्रिटन आणि युरोपातल्या अनेक देशांनी गेल्यावर्षीच या लाटेचा अनुभव घेतलाय. युरोपियन देशांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. २०२० च्या ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान आलेल्या दुसऱ्या लाटेत अमेरिकेत लाखो लोकांचा मृत्यू झाला.

१०० वर्षांपूर्वी स्पॅनिश फ्लू पहिली लाट आली होती. लाट ओसरली असं लोकांना वाटलं. पण बघता बघता दुसरी लाट आली. जगभरातल्या कोट्यवधी लोकांना या लाटेनं लक्ष्य केलं. कोट्यवधी लोकांना आपला जीव गमवावा लागला. या स्पॅनिश फ्लू आणि आताच्या युरोपातल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतून आपण बरंच काही शिकू शकतो.

हेही वाचा: किराणा दुकानातून आपण कोरोनाला घरी नेण्यापासून कसं वाचू शकतो?

युरोपला दुसऱ्या लाटेचा फटका

मागच्या वर्षी वुहान हा शब्द सातत्याने आपल्या कानावर पडायचा. वुहान चीनमधल्या हुबेईची राजधानी. हेच वुहान डिसेंबर २०१९ ला कोरोना वायरसच्या प्रसाराचं केंद्र होतं. तिथूनच हा वायरस जगभर पसरला. सुरवातीला इटली, स्पेन, अमेरिका, इराण या देशांना वायरसनं लक्ष्य केलं. गेल्यावर्षीच्या उन्हाळ्यात कोरोनाचे आकडे कमी व्हायला लागले. पण त्यानंतर जुलैत फ्रान्स आणि स्पेनमधे अचानक आकडे वाढायला लागले.

युरोपमधे कोरोनाची दुसरी लाट आली. परिस्थिती हाताबाहेर जात होती. तिथं ऑक्टोबर २०२० च्या तुलनेत कोरोनाचे नोव्हेंबरमधले आकडे तिपटीने वाढले. या काळात दररोज साधारण २ लाख पेशंट सापडत असल्याची माहिती 'अवर वर्ल्ड इन डाटा' या साईटवर वाचायला मिळते. ब्रिटन, फ्रान्स, स्पेन, इटली या देशांची स्थिती गंभीर बनत चालली होती. ऑक्टोबरमधेच दुसऱ्या लॉकडाऊनची चाहूल लागली. फ्रान्स, जर्मनीने तशी घोषणाही केली.

जर्मनीच्या चान्सलर अँजेला मर्केल यांनी ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर ऑक्टोबरमधेच धोक्याची सूचना दिली होती. लोकांनी दुर्लक्ष केलं. त्याचा फटका ऐन ख्रिसमसमधे बसला. कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची संख्या वाढली. नोव्हेंबरमधे फ्रान्सनं अधिकच कडक निर्बंध लावले. बेल्जियम या देशाची परिस्थिती तर गंभीर बनली. कारण कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेचा फटका युरोपातल्या इतर देशांच्या तुलनेत बेल्जियमला अधिक बसला होता.

हेही वाचा: आपल्याला हात धुवायला शिकवणाऱ्या या दोघींना बिग थँक्यू

पेशंटच्या संख्येतही वाढ

'अवर वर्ल्ड इन डाटा' या साईटच्या आकडेवारीनुसार मार्च, एप्रिल आणि मे २०२० या तीन महिन्यांमधे युरोपात दररोज ३५ हजार ते ३८ हजार कोरोनाचे पेशंट सापडत होत्या. नोव्हेंबरमधे हाच आकडा २ लाखाच्या पलीकडे पोचला. त्याचवेळी अमेरिकेत दररोज ८८ हजार इतके पेशंट पॉझिटिव सापडत होते.

ऑस्ट्रेलियातल्या 'युनिवर्सिटी ऑफ सिडनी' आणि चीनच्या शिन्हुवा युनिवर्सिटी यांनी स्पॅनिश फ्लू आणि कोरोना वायरसमुळे होत असलेले मृत्यू आणि पहिल्या आणि दुसऱ्या लाटेचा अभ्यास केलाय. त्यासाठी जगभरातल्या ४६ देशांना समोर ठेवण्यात आलंय.

कोरोनाची दुसरी लाट घातक असल्याचं या संशोधनातून पुढे आलंय. फ्रान्स, स्वीडन, ब्रिटन, इटली, नेदरलँड, स्पेन या देशांमधल्या आरोग्यसेवा पूर्णपणे कोलमडून पडल्याचंही संशोधन म्हणतंय. तर पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेतल्या मृत्यूची संख्याही अधिक होती.

हेही वाचा: तुम्हाला कोरोना फेक न्यूज रोगाची लागण झालेली नाही ना?

आपल्याला हलगर्जीपणा नडलाय?

कोरोनामुळे जगभरातल्या अर्थव्यवस्थांवर संकट आलं होतं. अशात पूर्ण लॉकडाऊनमुळे त्यात भर पडली असती. अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला असता. त्यामुळे युरोपियन देशांनी पूर्णपणे लॉकडाऊन लावला नव्हता. काही ठिकाणी अंशत: लॉकडाऊनची घोषणा झाली. सरकारांनी कडक निर्बंध लावले. स्थानिक पातळीवर परिस्थितीनुसार निर्णय घेतले गेले. दुसरीकडे वायरसचा संसर्ग रोखण्यासाठी तातडीने पावलं उचलली.

भारतात दुसऱ्या लाटेत तरुणांना मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग होताना दिसतोय. लहान मुलांची यात भर पडतेय. युरोपातल्या दुसऱ्या लाटेतही असंच झालं होतं. त्यामुळे जिथं तरुण जायची शक्यता जास्त होती अशा बार, रेस्टॉरंट, सार्वजनिक ठिकाणी निर्बंध अधिक कडक करण्यात आले. त्यामुळे आधीच्या तुलनेत तिथं मृत्यूची संख्या कमी झाली. आरोग्य सुविधांवरचा ताणही थोडाफार हलका झाला.

हीच परिस्थिती सध्या भारतात दिसतेय. एप्रिल, मे हे लग्न उरकायचे महिने. त्यामुळे त्याआधी जानेवारीत आकडेवारी कमी झाल्याचा फायदा आपण घेतला. लॉकडाऊन शिथिल झालं तसं सोशल डिस्टन्स, मास्कचा वापर, प्रवासादरम्यान आवश्यक काळजी अशा अनेक गोष्टींकडे आपण दुर्लक्ष केलं. सध्या त्याचा फटका आपल्याला बसतोय. तर कोरोना वायरसमधल्या डबल म्युटेशनमुळे नवं संकट उभं राहिलंय.

हेही वाचा: 

कोरोनाग्रस्त मृतदेह जाळायचा की पुरायचा?

आपल्याला घरात थांबायचं इतकं टेन्शन का आलंय?

एकदा बरं झाल्यानंतर पुन्हा कोरोनाचा संसर्ग होतो का?

कोरोना कुटुंबातलं सातवं पोरच इतकं वात्रट कसं निघालं?

कोरोनाच्या काळात जन्मलेल्या मुलाला काय म्हणायचं बरं?