अमेरिकन बँका संकटात आल्यामुळे गुंतवणूकदारांचं टेंशन वाढलंय

१८ मार्च २०२३

वाचन वेळ : ४ मिनिटं


सिलिकॉन वॅली बँक दिवाळखोरीत गेल्यानंतर अमेरिकी प्रशासनाने तातडीने कोणतीही हालचाल केली नाही. त्यामुळे अमेरिकी बँकांच्या समभागांना मोठा आर्थिक फटका बसलाय. सिग्नेचर तसंच सिल्वर गेट या दोन बँकाही दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभ्या आहेत. पण सरकारनं अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना केलेली दिसत नाही.

सिलिकॉन वॅली बँक दिवाळखोरीत गेल्यानंतर अमेरिकी प्रशासनाने तातडीने उपाययोजना करावी; नाहीतर आणखी काही प्रादेशिक तसंच मोठ्या बँका धोक्यात येऊ शकतात, असं तिथले अर्थतज्ञ सांगत असतानाही, अमेरिकी प्रशासन हाताची घडी घट्ट घालून बसल्याने, गेल्या ४८ तासांत आणखी दोन बँका आर्थिक संकटात सापडल्या आहेत.

सिग्नेचर तसंच सिल्वर गेट या दोन बँकांवरचं आर्थिक संकट गडद झालंय. या दोन्ही बँकांची क्रिप्टोकरन्सी जगाशी जवळीक असल्याचं मानलं जातं. तसंच नोव्हेंबर महिन्यात सिल्वर गेट बँकेच्या समभागात ९८ टक्‍के इतकी घसरण झाली होती. त्याकडे सपशेल दुर्लक्ष करण्यात आलं होतं. परिणामी ही बँक आज बंद होण्याच्या मार्गावर आहे.

अमेरिकन बँका आर्थिक संकटात

सिलिकॉन वॅली बँक ही स्टार्टअप उद्योगांना अर्थसाहाय्य करणारी बँक म्हणून ओळखली जात होती. या बँकेला कोणताही दिलासा द्यायला अमेरिकी प्रशासनाने नकार दिल्यामुळे तिथलं बँकिंग क्षेत्र दबावाखाली आलंय. एसवीबी बँकेची मालमत्ता २०९ अब्ज डॉलर इतकी आहे, तर बँकेकडे १७५ कोटी अब्ज इतक्या रकमेच्या ठेवी आहेत. त्यामुळेच 'एसवीबी' संलग्न सर्व कंपन्या अडचणीत आलेल्या आहेत.

कर्मचार्‍यांचे पगार करण्यासाठीही त्यांच्याकडे पैसा नाही. तसंच बँकेला या वित्तीय संकटातून बाहेर काढण्यासाठी बेलाऊट पॅकेज द्यायलाही नकार मिळालेला आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी तसंच मंगळवारी या दोन्ही दिवशी शेअर बाजारात अमेरिकी बँकांच्या समभागांना मोठा फटका बसला. त्यांची जोरदार विक्री झाल्यामुळे समभाग मूल्य कोसळलं.

विशेष म्हणजे एसवीबी बँक दिवाळखोरीत गेल्यानंतर इतर बँकांनाही अशाच प्रकारच्या संकटाला तोंड द्यावं लागेल, असा इशारा तिथल्या अर्थतज्ञांनी लगोलग दिला होता. एसवीबी बँक दिवाळखोरीत गेल्यानंतर अमेरिकी बँकिंग क्षेत्रासाठी वाढलेल्या जोखमींचा विचार करत मूडीज इन्वेस्टर्स सर्विसनं मंगळवारी यूएस बँकिंग प्रणालीवर 'स्थिर'वरून 'नकारात्मक' अशी टिपणी केल्याचा विपरीत परिणाम पाहायला मिळाला.

हेही वाचा: कॉर्पोरेट घराण्यांच्या हातात बँकेच्या चाव्या देणं धोक्याचं?

गुंतवणूकदारांचं टेंशन वाढलंय

सिग्नेचर तसंच सिल्वर गेट या इतर दोन बँका दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभ्या राहिल्यामुळे 'मूडीज'ला ही टिप्पणी करावी लागली, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. तसंच अमेरिकी फेडरल बँकेनं आपल्या व्याज दरवाढ धोरणाचा आढावा घ्यावा, असंही 'मूडीज'नं म्हटलंय. प्रशासनाचा नाकर्तेपणा आणि 'मूडीज'चा नकारात्मक शेरा याचा विपरित परिणाम सर्व बँक समभागांवर झाला.

वाढत्या व्याजदराच्या धास्तीनं आधीच चिंताग्रस्त असलेल्या गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात विक्री केली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी वित्तीय प्रणाली सुरक्षित असल्याचं आश्‍वासन देऊनही, गुंतवणूकदारांनी त्यांच्या शब्दांवर विश्‍वास ठेवला नाही.

अमेरिकी शेअर बाजारात झालेल्या पडझडीचा फटका आशियाई तसंच युरोपमधल्या बँक समभागांनाही बसला. फर्स्ट रिपब्लिक बँकेनं इंट्राडेत विक्रमी नीचांक गाठला. 'परिस्थिती अशीच कायम राहिली तर मध्यम ते लहान बँकांपर्यंत तरलता कमी होईल', अशी भीती हेनेसी फंडस्‌चे व्यवस्थापक डेव्हिड एलिसन यांनी व्यक्‍त केली आहे.

अमेरिकी बँकांचा पाय खोलातच!

मोठ्या ठेवीदारांनी बँकांच्या मागे ठामपणे उभं राहणं, ही आजची गरज आहे. बँका खासगी गुंतवणूकदारांकडून रोख रक्‍कम घेऊ शकतात, असं अर्थ विश्लेषक म्हणतात. 'फर्स्ट रिपब्लिक'नं जेपी मॉर्गन चेस अँड कंपनीकडून अतिरिक्‍त वित्तपुरवठा घेण्यात यश मिळवलं, परंतु सोमवारी समभागांच्या किमतीत होणारी घट तो रोखू शकला नाही.

फर्स्ट रिपब्लिक बँक आणि पॅकवेस्ट बँक कॉर्पसारख्या बँकांमधे गुंतवणूक करण्याच्या शक्यतेचा अभ्यास गुंतवणूकदारांनी केला होता. बँकिंग क्षेत्रावरचा दबाव कमी करण्यासाठी सरकार काय करेल, हे गुंतवणूकदारांना पाहायचं असल्यानं, ते पुढे गेले नाहीत.

आणीबाणीच्या उपाययोजनांसह, सरकार आणखी काही ठोस पावलं उचलतं का? याकडे त्यांचं लक्ष आहे. म्हणजेच संपूर्ण अमेरिकी बँकिंग क्षेत्र प्रशासनाच्या भूमिकेकडे नजर लावून बसले आहे. फेडरल बँक तसंच जो बायडेन यांनी 'ठोस उपाययोजना राबवली नाही, तर इतर बँकाही 'एसवीबी'च्या मार्गाने जातील. एकंदरीत अमेरिकी बँकांचा पाय खोलातच आहे, हे नक्की.

हेही वाचा: सरकारी कंपन्या विकून सरकार देशाला आर्थिक मंदीतून बाहेर काढणार?

बँक व्यवसाय बुडणार?

सिलिकॉन वॅली बँक ही स्टार्टअप उद्योगाला अर्थसाह्य करणारी म्हणून ओळखली जात होती. या कंपन्यांचा संपूर्ण कारभार जवळपास ठप्प झाला आहे. त्यामुळेच या कंपन्यांशी संबंधित जवळपास लाखो कर्मचारी वित्तीय संकटात सापडले आहेत.

१३ मार्च रात्री उशिरापर्यंत कोणताही निर्णय अमेरिकी प्रशासनाने घेतलेला नव्हता. त्यामुळे संपूर्ण बँक व्यवसाय संकटाच्या टोकावर उभा आहे. त्याच्या झळा भारतापर्यंत पोचणार नसल्या, तरी अमेरिकेला त्या चांगल्याच बसणार आहेत. अदानी उद्योग समूहाबद्दल ताशेरे ओढणाऱ्या अमेरिकी तज्ज्ञांची बोलतीच बंद झाली आहे, हे मात्र सूर्यप्रकाशाएवढं स्पष्ट झालंय.

वाईन उद्योगावर संकट

एसवीबी बँक दिवाळखोरीत गेल्यामुळे फक्त स्टार्टअप कंपन्यांचंच नुकसान झालं, असं नाही. कॅलिफोर्नियातला वाईन उद्योगही अडचणीत आलाय. तिथली वाईन ही चांगल्या दर्जाची असल्याचं मानलं जातं.

१९९० च्या दशकापासून एसवीबी बँक द्राक्षबागांसाठी एक प्रभावशाली बँक म्हणून काम करत होती. कॅलिफोर्नियाच्या सोनोमा काऊंटीमधल्या हिर्श वाईनयार्डसूच्या सरव्यवस्थापक बाईनमेकर जास्मिन हिर्श यांच्यानुसार, ही एक मोठी निराशाजनक घटना आहे. हिर्श म्हणाल्या की, तिला अपेक्षा आहे की तिचा व्यवसाय चांगला होईल; पण नवीन लागवड करण्यासाठी कर्जपुरवठा करणाऱ्या नव्या गुंतवणूकदारांचा शोध आता घ्यावा लागेल.

लहान उद्योजकांना याचा मोठा फटका बसला आहे. व्याजदर वाढल्याने संपूर्ण उद्योग अडचणींचा सामना करत असताना, प्रमुख बँक 'एसवीबी'ला लागलेलं टाळं चिंतेचं मुख्य कारण आहे. उद्योगासाठी अर्थपुरवठा ही समस्या तिथं उद्‌भवली आहे.

हेही वाचा: 

रिझर्व बँकेने सरकारला पावणे दोन लाख कोटी दिल्यावर मंदी संपेल?

सत्तेचं विकेंद्रीकरण केलं तरच आर्थिक स्थिती सुधारेल :  रघुराम राजन

'वन नेशन वन फास्टटॅग' योजना चांगली, नियोजनाच्या नावाने बोंबाबोंब

घटता जीडीपी, वाढत्या महागाईने अर्थव्यवस्थेची स्टॅगफ्लेशनकडे वाटचाल

आधीची सरकारं अधिकार माहीत असतानाही रिझर्व बँकेचा सल्ला ऐकायची

(साभार - पुढारी)