१०२ वर्षांपूर्वी पहिल्या महायुद्धात धुमाकूळ घातलेल्या वायरसचा धडा काय?

१६ मार्च २०२०

वाचन वेळ : ५ मिनिटं


चीनपुरता मर्यादित असलेला कोरोना वायरस आता जवळपास सव्वाशे देशांत पसरलाय. याचा केंद्रबिंदू आता चीनमधून युरोपात हललाय. १०२ वर्षांपूर्वी पहिल्या महायुद्धात युरोपातून स्पॅनिश फ्लू जगभर पसरला होता. आणि बघताबघता कोट्यवधी लोकांना आपल्या विळख्यात घेतलं. आता कोरोनाशी लढताना आपल्याला स्पॅनिश फ्लूपासून काहीएक धडा घ्यावा लागेल. कारण स्पॅनिश फ्लूनचं हा धडा दिलाय.

कोरोना वायरसनं म्हणजेच शास्त्रीय भाषेत सांगायचं झालं तर कोविड-१९ सध्या जगभर धुमाकुळ घातलाय. पहिल्यांदा चीनमधे आढळलेला हा वायरस बघता बघता आता जगभर पसरलाय. जवळपास सव्वाशे देशांमधे या कोरोनानं आपली दखल दिलीय. कोरोनाची तीव्रता लक्षात घेऊन जगाच्या अनेक भागात टाळेबंदी जाहीर झालीय. जागतिक आरोग्य संघटना अर्थात डब्ल्यूएचओनंही या वायरसला आता पँडेमिक म्हणजेच जागतिक साथ म्हणून जाहीर केलंय. पँडेमिक म्हणजे एकापेक्षा जास्त खंडामधे पसरलेला, मोठ्या लोकसंख्येवर प्रभाव टाकणारी साथ.

जगातली सर्वांत मोठी साथ

जगभरात याआधीही अशा साथी आल्यात. गेल्या काही वर्षांतच जगानं सार्स, स्वाईन फ्ल्यू, मार्स यासारख्या साथींविरोधात लढा दिलाय. आजपासून १०२ वर्षांपूर्वी आलेल्या एका वायरसनंही आत्तासारखाच धुमाकूळ घातला होता. ‘द एन्फ्लूएंझा पँडेमिक‘ असं या वायरसचं शास्त्रीय नाव होतं. पण जगभरात तो स्पॅनिश फ्लू या नावाने ओळखला जातो.

वॉशिंग्टन पोस्टच्या एका बातमीनुसार, या वायरसनं जगभरातल्या जवळपास एक तृतीयांश लोकसंख्येला आपल्या कचाट्यात घेतलं होतं. जवळपास पाच कोटी लोकांचा बळी घेतला होता. चौदाव्या शतकात ‘ब्लॅक डेथ’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या प्लेगच्या साथीनं जगातल्या एक तृतीयांश लोकांचा बळी घेतला होता. पण त्याकाळी आताच्या तुलनेने लोकसंख्या कमी होती. त्या तुलनेत स्पॅनिश फ्लू ही इतिहासातली आतापर्यंतची सर्वात मोठी जागतिक साथ म्हणून ओळखली जाते.

स्पॅनिश फ्लू या वायरसचा मूळ स्त्रोत माहीत नसला तरी तो प्रथम पक्षी आणि नंतर प्राण्यांमार्फत मनुष्यामधे आल्याचं समजलं जातं. स्वॉईन फ्लूसाठी कारणीभूत असणारा एच१एन१ हाच वायरस स्पॅनिश फ्लूसाठी कारणीभूत होता. पहिलं महायुद्ध संपत असताना जानेवारी १९१८ ते डिसेंबर १९२० च्या दरम्यान या वायरसचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाला. हा वायरस अमेरिकेतून जगभर पसरल्याचं मानलं जातं.

हेही वाचाः कोरोना: रँडच्या वधाला कारणीभूत १८९७ चा कायदा पुण्यात पुन्हा लागू

मायदेशी गेलेल्या आजारी सैनिकांतून प्रसार

पहिल्या महायुद्ध काळात युद्धभूमीवर सैनिकांना खंदकात राहावं लागायचं. तिथे प्रचंड घाण असायची. सैनिकांना तिथेच जेवावं, झोपावं लागायचे. त्यामुळे या वायरसचा प्रसार जलद गतीने झाला. युद्धस्थळावर सैनिकांच्याच आजारपणाची काळजी घ्यावी लागली. त्यामुळे गंभीर आजारी सैनिकांना मायदेशी पाठवण्यात आलं. आणि बघता बघता हा आजार जगभर पसरला.

महायुद्ध सुरू असल्याने सगळ्या देशांनी आपापल्या देशांतल्या मीडियावर कडक बंधनं आणली होती. त्यामुळे या संदर्भात योग्य वार्तांकन होत नव्हते. स्पेननं मात्र या युध्दात तटस्थ भूमिका घेतली होती. त्यामुळे तिथून या वायरस संदर्भात आणि मृतांच्या आकड्यांसंदर्भात खरी माहिती प्रसारित केली जायची. त्यातच स्पेनचा राजा अल्फांसो तेरावा याला आणि तिथल्या अनेक राजकारण्यांनाही या वायरसची लागण झाली. आणि या वायरसचं स्पॅनिश फ्लू असं नामकरण झालं.

खबरदारीचा उपाय

स्पॅनिश फ्लूचं वैशिष्ट्य म्हणजे २० ते ४० वयोगटातील धडधाकट तब्येत असलेल्या लोकांचा यात मोठ्या प्रमाणात मृत्यू झाला. सप्टेंबर १९१८ ते ऑक्टोबर १९१८ या दरम्यान खूप मोठी जीवितहानी झाली. तेव्हा जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना अजून झाली नव्हती. त्यामुळे स्थानिक स्तरावरच खबरदारी घेण्यात आली.

यासंदर्भात अमेरिकेनं डॉक्युमेंटेशन करून ठेवलंय. त्यानुसार खबरदारीचा उपाय म्हणून शहरांतील थिएटर्स आणि शाळा बंद करण्यात आल्या. तसंच प्रवासावर बंदी घालण्यात आली होती. न्यूयॉर्क शहरामधे थुंकण्यास बंदी घालण्यात आली होती. थुंकणं हा दंडणीय गुन्हा होता. गर्दी करण्यास बंदी होती. अनेक इमारतींचे रूपांतर दवाखाण्यात करण्यात आलं होतं. डॉक्टर्स, नर्स यांचा तुटवडा भासत असल्याने नागरिकांना ट्रेनिंग देऊन त्यांना कामाला लावण्यात आलं. यासाठी रेड क्रॉस सोसायटीनं मोठं योगदान दिलं. आत्तासारखंच तेव्हाही अनेक शहरांत टाळेबंदी जाहीर केली गेली. मास्कचं उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आलं.

हेही वाचाः आपण कोरोनापेक्षा भयंकर वायरसशी लढलोय, त्यामुळे कोरोना से डरोना!

देशभक्तीचा अति डोस नडला

प्रसिध्द इंग्रजी लेखक जॉन बेरी यांनी १९१८ च्या स्पॅनिश फ्लूवर ‘द ग्रेट एन्फ्लूएंझा‘ या नावानं एक पुस्तक लिहलय. त्यामधे त्यांनी अमेरिकेच्या फिलाडेफ्लिया राज्यातला एक प्रसंग सांगितलाय. या काळात तिथे सैनिकांसाठी लिबर्टी लोन परेडचं आयोजन करणात आलं होतं. अनेकांनी परेड न घेण्याची विनंती केली होती. पण महापौरांनी लष्कराच्या प्रतिष्ठेसाठी ही विनंती नाकारली. या परेडला जवळपास दोन लाख लोक उपस्थित होते. तिथल्या अनेकांना या वायरसची लागण झाली. परेड झाल्यानंतर केवळ ७२ तासांच्या आत २६०० लोक मृत्युमुखी पडले.

आता रोगांचा प्रतिकार करण्यासाठी पहिल्या टप्प्यातच वेगवेगळ्या अँटीबायोटिक्सचा वापर केला जातो. तेव्हा अँटिबायोटिक्सची आतासारखी उपलब्धताही नव्हती. स्पॅनिश फ्लूच्या लागणीनंतर कॉलरा, टायफॉईड, डेंग्यू असे अनेक रोग जन्माला आले. अनेकांच्या नाक, तोंडातून काही वेळेस डोळ्यातूनही रक्त यायचे.

न्युमोनियानं तर असंख्य लोकांचा जीव घेतला. त्यामुळे मृतांचा आकडा हा पाच कोटी ते दहा कोटी इतका असल्याचं जॉन बेरी म्हणतात. एकट्या अमेरिकेत एकुण लोकसंख्येच्या पाच टक्के लोक मृत्यूमुखी पडले. एका वर्षात तिथलं सरासरी आयुर्मान १२ वर्षांनी कमी होवून ते ५१ वरून ३९ वर आलं.

मुंबईमार्गे भारतातही एंट्री

जगभरात पसरलेल्या या स्पॅनिश फ्ल्यूचा भारतालाही फटका बसला. पहिल्या महायुध्दात भारतीय सैनिक ब्रिटनच्या बाजूनं भाग घेतला होता. युद्ध संपल्यानंतर ते सैनिक मुंबई बंदरावर आले आणि त्यांच्याकडून स्पॅनिश फ्लूचा प्रसार भारतात झाला. याला भारतात बॉंम्बे फिवर म्हणतात.

टाईम्स ऑफ इंडियाच्या एका बातमीनुसार, २०१२ मधे यावर एक सशोधन झालयं. यामधे भारतातील १.४ कोटी लोकांचा मृत्यू झाल्याचं समोर आलंय. या वायरसमुळे जगभरातील एकुण मृतांपैकी २० ते २५ टक्के मृत हे एकट्या भारतात होते.

वसाहतवादी ब्रिटीश सरकारनं भारतीय लोकांच्या आरोग्याकडे संपूर्ण दुर्लक्ष केलं. १९२१ च्या जनगणनेनुसार १९११-१९२१ या दशकात भारताच्या लोकसंख्या दरामधे पहिल्यांदाच एवढी घट झाली होती.

हेही वाचाः कोरोनाला भिण्याची गरज नाय, हे आहेत खबरदारीचे साधेसोप्पे उपाय

आपण काय शिकणार?

स्पॅनिश फ्लूला फरगॉटन पँडेमिक असं म्हटलं जातं. कारण या वायरसच्या योग्य नोंदी ठेवल्या गेल्या नाहीत. यावर पुरेसं संशोधन झालं नाही. खात्रीशीर डॉक्युमेंटेशन उपलब्ध नाही. लोकही नंतर याला विसरले. पण कोरोनाच्या निमित्ताने वायरसच्या इतिहासात डोकावताना याची नोंद घ्यावीच लागते. हा वायरस आत्तापर्यंतचा सगळ्यात धोकादायक पँडेमिक वायरस आहे.

सध्याचं आपलं जग हे विविध माध्यमातून एकमेकांशी जोडलं गेलं. त्यामुळेच तर जग हे आता एक खेडं झाल्याचं म्हटलं जातं. कोरोनासारखा वायरस प्रवाशांच्या माध्यमातून जगभर फैलावतोय. भविष्यात अशी आव्हानं पेलण्यासाठी तर कुणीही याच्या लागणीसंबंधीची माहिती न दडवणं आणि लोकांना सत्य काय ते सांगणं आवश्यक आहे, हाच १०२ वर्षांपूर्वीच्या स्पॅनिश फ्लूचा धडा आहे. तो धडा आपण घ्यायला पाहिजे.

हेही वाचाः 

एका वायरसने जग कसं हादरवलं?

तुम्हाला कोरोना फेक न्यूज रोगाची लागण झालेली नाही ना?

कोरोनाः जागतिक आरोग्य आणीबाणी लागू केल्याने काय होणार?

कोरोना वायरसः १० शंकांची WHO नं दिलेली १० साधीसोप्पी उत्तरं

धार्मिक हिंसाचाराचाही आपल्या इकॉनॉमीला फटका बसेलः मनमोहन सिंग

कोरोनाने शेअर बाजार पावसासारखा कोसळतोय, १२ वर्षांतला वाईट दिवस