डोनाल्ड ट्रम्प यांच्या दौऱ्याबद्दल अमेरिकन मीडियाचं म्हणणं काय?

२५ फेब्रुवारी २०२०

वाचन वेळ : ४ मिनिटं


अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची बायको मिलेनिया कालपासून दोन दिवसाच्या भारत दौऱ्यावर आहेत. त्यांच्या या दौऱ्यावर सगळ्या जगाचं लक्ष आहे. नमस्ते ट्रम्प या सोहळ्याची जगभरातल्या मीडियाने दखल घेतली. अमेरिकेच्या मीडियातंही त्यांच्या भेटीबद्दल अनेक बातम्या आणि लेख छापून आलेत.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची बायको मिलेनिया यांच्या स्वागतासाठी काल गुजरातमधलं मोटेरो स्टेडियम सजलं होतं. नमस्ते ट्रम्प हा शानदार इवेंट चालला. लाखाहून जास्त लोक जमले. त्यासोबतच भारतातल्या एकूण एक न्यूज चॅनेल्सचे कॅमेरे या मोटेरो स्टेडियमवर येऊन पोचले होते. या कॅमेरांच्या लेन्समधूनच तर स्टेडियममधल्या १ लाख लोकांसोबत संपूर्ण देशच ट्रम्प यांचा स्वागत सोहळा पाहत होता.

२४ फेब्रुवारीला ट्रम्प दाम्पत्य मुलगी आणि जावयाला सोबत घेऊन दोन दिवसाच्या भारत दौऱ्यावर आलं. तेव्हापासून हे कुटुंब काय काय करतंय, कुठे जातंय या सगळ्यावर भारतीय न्यूज चॅनेल्स, पेपर आणि सोशल मीडिया सगळ्याचंच बारीक लक्ष आहे. भारतातल्या मीडियासाठी ही फारच मोठी गोष्ट आहे.

आता भारतातला मीडिया या सगळ्याच्या बातम्या छापतोय, प्रसारित करतोय तसाच आमेरिकेतलाही मीडिया करत असणार. आपले राष्ट्राध्यक्ष ट्रम्प पहिल्यांदा भारतात गेल्यावर काय करतील, काय बघतील, काय खातील याची उत्सुकता तिथल्या नागरिकांना विशेषतः तिथल्या भारतीयांनाही असणार. अमेरिकाच काय तर संपुर्ण जगाचंच ट्रम्प यांच्या भारत दौऱ्याकडे लक्ष आहे. जगभरातल्या लहान मोठ्या सगळ्याच न्यूज पेपर्सनी ट्रम्प यांच्या भारत भेटीची बातमी छापलीय.

पाकिस्तानातल्या मीडियानंही ट्रम्प हे भारत आणि अमेरिकेचे संबंध चांगले आहेत, असं आपल्या भाषणात म्हटल्याचं छापलंय. तसंच अमेरिकेतल्या मीडियानंही कालच्या इवेंटबद्दल अनेक गोष्टी छापल्यात. चला तर मग, अमेरिकन मीडिया ट्रम्प यांच्या भारत दौऱ्याबद्दल काय म्हणते ते पाहुया.

हेही वाचा : अमेरिकेतून डोनाल्ड ट्रम्प आले, पण आपले 'खास रे' ट्रम्प तात्या कुठं गेले?

चौथ्या पानावर बातमीः न्यूयॉर्क टाइम्स

न्यूयॉर्क टाइम्स हे अमेरिकेतलं महत्त्वाचं पेपर. या पेपराचं न्यूयॉर्क शहरातून वितरण होतं. खपाच्या दृष्टीने हे अमेरिकेतलं तिसऱ्या क्रमांकाचं न्यूजपेपर आहे. न्यूयॉर्क टाईम्सच्या फ्रंट पेजवर पंतप्रधान मोदी, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि त्यांची बायको मिलेनिया यांचा मोटेरा स्टेडियमच्या स्टेजवर जात असतानाचा मोठा फोटो छापलाय. ‘अमेरिका लवस इंडिया’ हे ट्रम्प यांच्या भाषणातलं वाक्य त्याखाली दिलंय.

गंमत म्हणजे, याची सविस्तर बातमी या पेपराच्या चौथ्या पानावर आलीय. अमेरिका लवस इंडिया या मथळ्याखाली छोटा मजकूर दिलाय. ‘संगीत, डान्स यांच्या सानिध्यात ट्रम्प यांचा स्वागत समारंभ पार पडला. यासाठी ट्रम्प यांना वचन दिलं होतं, त्याप्रमाणे १ कोटी नाही पण १ लाख लोक आले होते.’ असं इथं लिहिलंय.

सीएनएनचं म्हणणं काय?

केबल न्यूज नेटवर्क म्हणजेच सीएनएन हे अमेरिकेतलं २४ तास चालणारं न्यूज चॅनेल आहे. या चॅनेलचंच ऑनलाईन वेबपोर्टल चालतं. या वेबपोर्टलवर ट्रम्प यांच्या भारत भेटीच्या अनेक बातम्या प्रसिद्ध होतायत. फोटोही प्रसिद्ध केले जातायत. आज सकाळी ७ वाजता मानवीना सुरी या फ्री लान्सर म्हणून काम करणाऱ्या एका पत्रकाराचा एक लेख इथं पब्लिश झालाय.

‘शीत युद्धापासून ते व्यापार युद्धापर्यंत : भारत युएस संबंधांबद्दलच्या तुम्हाला माहीत असायला हव्यात अशा ६ गोष्टी’ असं या लेखाचं शीर्षक आहे. न्युक्लिअर बॉम्बचा संदर्भ घेत इतिहासात कोण कोणते भारतीय पंतप्रधान भारतात आले होते आणि कोणते राष्ट्राध्यक्ष अमेरिकेत गेले होते याचा मागोवा घेत आता भारत आणि युएस यांचं संबंध कसे असतील याबद्दल या लेखकानं लिहिलंय.

हाऊडी मोदीची सुधारित आवृत्तीः द अटलांटिक

अमेरिकेच्या पूर्वेला अटलांटिक महासागर आहे. त्याच्या नावावरूनच द अटलांटिक नावानं एक मासिक चालतं. या मासिकानं नमस्ते ट्रम्प हा कार्यक्रम म्हणजे हाऊडी मोदी या कार्यक्रमाची सुधारित आवृत्ती असल्याचं म्हटलंय. ट्रम्प यांना जे करायचंय ते मोदींनी आधीच केलंय असा मथाळा या बातमीवर दिसतो.

ट्रम्प यांना मुसलमानांना बॅन करायचंय. मोदींनी तर हे आधीच केलंय. ट्रम्प मीडियाला फेक न्यूज म्हणतात. मोदींच्या सरकारच्या काळातंही मीडिया दोन विचारसरणीत विभागलेली दिसते. ट्रम्प यांनी काही हिंदी शब्द बोलायचा प्रयत्न केला. ते ज्या शहरात गेले होते त्याचं नाव घेताना ते अडखळले. पण ते ज्या गर्दीसाठी भारतात गेले होते ती त्यांना मिळाली.

हेही वाचा : डोनाल्ड ट्रम्प २७ मिनिटांच्या भाषणात भारताबद्दल काय काय बोलले?

ट्रम्प यांचं लाडकं फॉक्स न्यूज

आपल्याकडे पंतप्रधान मोदींचा, भाजपचा अजेंडा चालवणाऱ्या मीडियाला गोदी मीडिया म्हटलं जातं. पंतप्रधान मोदी आपल्या खासमखास पत्रकारांनाच मुलाखतीत देतात. तसंच अमेरिकेतलं फॉक्स न्यूज हे ट्रम्प यांचं लाडकं न्यूज चॅनेल म्हणून ओळखलं जातं. इतर अनेक न्यूज चॅनेल, पेपर ट्रम्प यांच्या योजनांवर टीका करतात. पण फॉक्स न्यूजची भूमिका सावध असते.

नमस्ते ट्रम्प इवेंटबद्दल फॉक्स न्यूजच्या बातमीचं हेडिंग ‘ट्रम्प यांच्या रॅलीसाठी गर्दी, मोदींसोबत सैन्य करारावर हस्ताक्षरी’ असं होतं. राष्ट्रपतींना भरपूर गर्दी आवडते. अशाच गर्दीपुढे म्हणजेच जवळपास १ लाख लोकांच्या उपस्थितीत त्यांनी मोटेरा स्टेडियमवर भाषण दिलं, अशी या बातमीची पहिली ओळ आहे.

वॉल स्ट्रीट जनरल

‘नमस्ते ट्रम्प!: ट्रम्प-मोदी यांच्या ‘ब्रोमान्स’मागं काय आहे’ असा एक वीडियो वॉल स्ट्रीट जनरलने पब्लिश केलाय. ब्रोमान्स म्हणजे दोन भावांमधलं किंवा दोस्तांमधलं प्रेम. या वीडियोत भारत अमेरिका संबंधांतल्या अडचणींची चर्चा करण्यात आलीय. सीएएवर आणि त्यावर होणारी टीका याविषयीही सांगण्यात आलंय.

वीडियोखाली त्याची माहिती किंवा छोटा मजकूर दिलेला असतो. ‘राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचं नरेंद्र मोदी यांनी एकदम रॉक स्टारसारखं स्वागत केलं. जगातल्या दोन सगळ्यात मोठ्या लोकशाहीचे नेते एकमेकांना भेटले. ट्रम्प आणि मोदी यांच्यातली केमिस्ट्री दिसते तितकी खरंच घट्ट आहे का? सांगतायत वॉल स्ट्रीट जनरलचे एरिक बेलमॅन.’असं त्यात लिहिलंय.

हेही वाचा : 

ट्रम्प यांचं एअर फोर्स वन विमान म्हणजे उडतं व्हाईट हाऊसच!

मोदींच्या स्टेजवर ट्रम्पतात्या आले, त्याचा देशाला काय फायदा झाला?

नमस्ते ट्रम्पसाठी सजलेलं मोटेरा क्रिकेट स्टेडिअम आतून दिसतं तरी कसं?

ट्रम्प यांच्या बायकोला का बघायचाय केजरीवालांच्या शाळेचा हॅपीनेस क्लास?