पाकसोबत मॅच नको म्हणणारा गौतम गंभीर आता काय म्हणतोय?

१८ जून २०१९

वाचन वेळ : ५ मिनिटं


भारताने वर्ल्डकपमधे पुन्हा एकदा पाकिस्तानला हरवलं. पण या मॅचच्या निमित्ताने एक गोष्ट घडली, त्याकडे सगळ्यांनी दुर्लक्ष केलं. पाकिस्तानसोबत मॅच नको म्हणणारे आता गप्प आहेत. पाकविरोधात खेळणं म्हणजे देशद्रोह असं म्हणणारे आता जिंकल्यावर दोन देशांतल्या या मॅचला सर्जिकल स्ट्राईक म्हणून संबोधत आहेत. या सगळ्यांवरच एक मार्मिक टिपण.

भारताचे नवनियुक्त गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी रात्री १६ तारखेला भारताने मँचेस्टरमधे पाकिस्तानवर दुसरा एअर स्ट्राईक केल्याचं ट्विट केलं. पण त्यांनी ट्विट करुन या विराट सेनेने केलेल्या कारवाईची माहिती देण्याआधीच भारतीयांनी या स्ट्राईकचा जल्लोष देशातल्या गल्लीबोळात सुरू केला होता. यासाठी सौजन्य होतं ते स्टार स्पोर्ट्स चॅनेलचं. आता हा स्ट्राईक लाईव झाल्याने या स्ट्राईकबाबत कोणाच्याही मनात शंका उपस्थित झाली नाही.

तसंच इंग्लंडच्या ढगांनी एकदोन वेळा खोडसाळपणा केला. पण तरी शेवटी मिशन सक्सेसफुल झालं. भारताची सगळी मिसाईल ऑन टार्गेट होती. त्यामुळे परिणामकारकताही चांगली राहिली. हे सगळं जवळपास १५० कोटी लोकांच्या समोरच घडलं. त्यामुळे शंकेला कारण राहिलं नाही. आता या स्ट्राईकच्या हिरोलाही नावाजलं गेलंय.

हेही वाचा: विराट असा कसा तू वेगळा वेगळा

पण या १६ तारखेच्या स्ट्राईकची कहाणी वेगळीच आहे. आपण पहिल्या स्ट्राईकची कहाणी ऐकलीय. त्याच्या अगदी उलट कहाणी यावेळच्या स्ट्राईकची आहे. या स्ट्राईकची रूपरेषा तयार होत होती त्यावेळी खुद्द सत्ताधारी गटालाच या स्ट्राईकबाबत साशंकता होती. वेगळ्याच देशभक्तीचं प्लॅनिंग होतं की नाही माहीत नाही. पण त्यांनी हा स्ट्राईक नको म्हणजेच पाकिस्तानसोबत मॅचच नको असा स्टान्स घेतला होता.

Here comes the biggest battle we all look out for. Play 'Star Contest' with me for #INDvsPAK match on @CricPlay. Let's see if you can score more than me, follow the @CricPlay page, download the App & create your team now! #CricPlay #FantasyCricket #StarContest #AbIndiaKhelega pic.twitter.com/eKRWa8iLYF

— Gautam Gambhir (@GautamGambhir) June 16, 2019

पाकिस्तानसोबत मॅच नको, असं सत्ताधाऱ्यांनी कधी उघडपणे म्हटलं नाही. पण त्यांच्या काही समर्थकांनी उघडपणे ही बाजू लावून धरली. बहुदा त्यांना आपल्या ‘विराट’ अशा सेनेवर विश्वास नसावा. आपला हा स्ट्राईक विरोध मनावर ठसवण्यासाठी पूर्वी विराट सेनेचाच एक भाग असलेला सलामीच्या ‘गंभीर’ पायलटला आपल्या गोटात खेचलं. त्यानंतर त्याच्या तोंडून हा स्ट्राईक कसा देशद्रोह ठरेल हे ठसवण्याचा प्रयत्न केला. त्या पायलटला देशभक्तीचा मोठा पुरस्कारही देण्यात आला.

त्या निवृत्त पायलटनेही आपल्या बेंबीच्या देठापासून स्ट्राईकवर बहिष्कार बहिष्कार असें ओरडायला सुरवात केली. काही निवृत्त आणि सिनिअर पायलटनी स्ट्राईक रोखू नका याचा आपल्या मोठ्या मिशनवर परिणाम होईल असं सांगण्याचा प्रयत्न केला. पण देशभक्त पायलट मोठें नुकसान झालं तरी चालेल. पण स्ट्राईकवर बहिष्कार असं म्हणत हा स्ट्राईक म्हणजे शहिदांचा अपमान असं सांगत सुटला.

हेही वाचा: १९९२ मधे पाकिस्तानने जे केलं, ते यंदा दक्षिण आफ्रिका करू शकते?

त्यामुळे त्याच्या सहकाऱ्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. हा निवृत्ती घेतलेला सलामीचा पायलट देशभक्तीच्या नावावर मोठं नुकसान सहन करण्यास तयार होता. पण याने त्याचं काहीच नुकसान होणार नव्हतं. उलट त्याचा फायदाच झाला. कारण याच भुमिकेमुळे त्याला ‘खास’दार उघडलं गेलं. तो आता दिमाखात या दारातून आत जाऊन बसलाय.

ज्यावेळी त्याने ‘खास’दारातून आत प्रवेश केला त्यानंतर त्याचं ‘स्ट्राईकवर बहिष्कार’ ‘स्ट्राईकवर बहिष्कार’ असं ओरडणं हवेत विरुन गेलं. त्यानंतर स्ट्राईकची तारीख जवळ येवू लागली. सर्वजण स्ट्राईकवर ‘बहिष्कार बहिष्कार’ नारा विसरून या स्ट्राईकसाठी आपल्या कुवतीप्रमाणे गल्लीबोळात प्लॅनिंग करुन लागले.

चर्चा सुरु झाल्या त्या विरोधी पार्टीकडे असलेल्या एफ-१६ या तेजतर्रार फायटर जेटची. या फायटर जेटने २०१७ ला चॅम्पियन्स ट्रॉफीमधे कशी आपली भलीभली विमानं हा हा म्हणता पाडली होती याची उजळणी सुरु झाली. पण स्ट्राईकसाठी सज्ज असलेल्या स्क्वॉड्रन लीडरने जंग ‘हथियारों से नही तो हौसलों से लढी जाती हैं’ असं सांगत सर्वांना दिलासा दिला.

तसंच गेल्या सहा स्ट्राईकमधे आपल्या सेनेने कशी कामगिरी केली होती हे याची पारायणं सुरु झाली होती. आणि महत्त्वाचं म्हणजे या सहा स्ट्राईकवेळी सत्ताधारी विरोधात होते. त्यामुळे त्यावेळचा स्ट्राईक विरोध आता नाहीसा झाला होता. आता फक्त वाट पाहिली जात होती ती ‘ॲक्शन डे’ची. या सर्व प्रोसेसमधे स्ट्राईकला विरोध करणारा तो निवृत्त पायलट आता स्ट्राईकची स्ट्रॅटेजी काय असावी याचे धडे टीवीवरुन देत होता. तसंच आपण कसं पूर्वीच्या स्ट्राईकवेळी ‘चुन चुन के मारा था’ हे सांगत होता.

हेही वाचा: टीम इंडिया आणि धोनी क्रिकेट खेळायला गेलेत, ‘युद्धा’वर नाही

याच्यातच दुसऱ्या स्ट्राईकचा दिवस उजाडला. आकाशात ढग जमा झाले. हे ढग आपल्याला फायदेशीर नव्हते. त्यामुळे कोणी ‘ढगांचा फायदा’ कसा उचलायचा याचा उपदेश देत नव्हते. कारण ॲडवांटेज म्हणजेच टॉस विरोधी पार्टीच्या पारड्यात जावून बसला. त्यामुळे अजूनच धाकधूक वाढली. पण भारताच्या सलामीच्या ‘फायटर’ पायलट्सनी या ढगातून मार्ग काढलाच. आणि ढग विरल्यानंतर बंबार्डिंग सुरु केली. भारतीय फायटर पायलट्सनी बघता बघता विरोधी पार्टीची सगळी तळं उद्धस्त केली.

या हल्ल्यामुळे खडबडून जाग्या झालेल्या विरोधी पार्टीने प्रतिहल्ला करण्यासाठी आपली विमानं आपल्या हद्दीत घुसवली. त्यातच भारताची एक तोफ जायबंदी झाली. त्यामुळे आता हा प्रतिहल्ला कसा थांबवायचा असा प्रश्न पडला होता. पण, ‘डाव्या’ बाजूच्या तोफांनी भारताचं मोठं नुकसान करण्याची क्षमता असलेल्या दोन फायटर जेटना पाडून हा प्रतिहल्ला कमकूवत केला. मग राहिलेल्या फायटर जेट्सना बाकीच्या तोफांनी तुफानी मारा करत पाडण्यास सुरवात केली. या अचानक झालेल्या तोफगोळ्यांच्या हल्ल्यामुळे दाटून आलेल्या ढगांचा सहारा घेत उरलीसुरली फायटर जेट पराभवाच्या जखमांनी माघारी परतली.

हा सर्व स्ट्राईक होत असताना स्ट्राईक व्हावा अशी प्रामाणिक इच्छा असलेल्या आणि आपल्या नव्या दमाच्या फायटर पायलटवर प्रचंड विश्वास असलेल्या निवृत्त दिग्गज फायटर पायलटनी ‘अखंड’ देशवासियांसाठी या स्ट्राईकची लाईव कॉमेंटरीही केली. त्यानंतर ‘शत प्रतिशत’ सक्सेसफुल ठरलेल्या या सर्जिक स्ट्राईकचं जोरदार सेलिब्रेशन सुरु होतं.

पण यावेळी एका गोष्टीकडे सर्वांचंच दुर्लक्ष झालं होतं. ते म्हणजे या स्ट्राईकला बेंबीच्या देठापासून विरोध करणारा निवृत्त सलामीचा पायलट काय करत होता? तो आता विरोध करत नव्हता तर तोही भारतात बसून टीवीवर हा स्ट्राईक पहात होता. आणि ट्विटरवरुन एका क्रिकेटविषयक ॲपची जाहीरातही करत होता. ही भुमिका बदलण्याचं कारण काय तर बाबांनो त्याला त्याचे पैसे मिळतात.

बोध: एखादा आपल्याला बेंबीच्या देठापासून उपदेश करत असतो. पण खरंच तो उपदेश करत असतो की आपलं प्रोडक्ट विकत असतो हे तपासून बघायला हवं.

हेही वाचा: 

सचिन बाद झाल्यानंतर, युवराजने टीवी सुरु ठेवला 

बेल पडत नाहीत, बॅट्समन आऊट होत नाही आणि आयसीसी नियम बदलत नाही