झारखंड ट्रेंडः भाजपच्या हातातून आणखी एक राज्य निसटतंय

२३ डिसेंबर २०१९

वाचन वेळ : ४ मिनिटं


झारखंड विधानसभेच्या सुरवातीच्या ट्रेंडनुसार इथली सत्ता भाजपला गमवावी लागताना दिसतेय. बारापर्यंतच्या ट्रेंडनुसार, सत्ताधारी भाजप २९, झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल यांचं महागठबंधन ४२ जागांवर आघाडीवर आहे. ८१ जागांच्या विधानसभेत महागठबंधनने बहुमताचा आकडा पार केलाय.

झारखंड विधानसभेच्या ८१ जागांसाठी मतमोजणी सुरू झालीय. सकाळी आठ वाजता मतमोजणी सुरू झाली. सुरवातीला पोस्टल मतांची मोजणी करण्यात आली. त्यानंतर जसं जसं एवीएमच्या मतांची मोजणी सुरू झाली तसं तसं झारखंड विधानसभेचं चित्र स्पष्ट झालं. विधानसभेचा चेहरामोहरा कसा असेल हे आता स्पष्ट झालंय. फटाके फुटायला सुरवात झालीय. 

कोण, किती जागांवर पुढे-मागे?

बारा वाजेपर्यंतच्या ट्रेंडमधे भाजपच्या हातून सत्ता जातेय. निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरच्या ट्रेंडनुसार, भाजप २९, महागठबंधनमधले झारखंड मुक्ती मोर्चा २५, काँग्रेस १२, राष्ट्रीय जनता दल ५, तर झारखंड विकास पार्टी ४, ऑल झारखंड स्टुडन्ट युनियन २, राष्ट्रवादी काँग्रेस १, भारतीय कम्युनिस्ट पार्टी मार्क्सवादी लेनिनवादी १ आणि अपक्ष दोन जागांवर आघाडीवर आहेत. महागठबंधनने बहुमताचा ४१ जागांचा आकडा पार केलाय.

२०१४ मधे ३७ जागा मिळवत भाजप सगळ्यांत मोठा पक्ष झाला होता. भाजपने पाच जागा जिंकलेल्या ऑल झारखंड स्टुडन्ट युनियन अर्थात आजसूला सोबत घेत सरकार बनवलं. झारखंड मुक्ती मोर्चा अर्थात झामुमो २०.८ टक्के मतांसह १९ जागा जिंकत दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष झाला. झारखंड विकास मोर्चा अर्थात झाविमो आठ तर काँग्रेसला सहा आणि इतरांना सहा जागा मिळाल्या होत्या.

झारखंडमधे ३० नोव्हेंबर ते २० डिसेंबर या काळात पाच टप्प्यांमधे मतदान झालं. यात मुख्यमंत्री रघुवर दास, माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन, बाबूलाल मरांडी आणि आजसूचे प्रमुख सुदेश महतो यासारखे दिग्गज निवडणुकीच्या रिंगणात आहेत. एखादं दुसरा अपवाद वगळता सगळ्याच एक्झिट पोलमधे राज्यात त्रिशंकू परिस्थिती राहील अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. पण आतापर्यंतच्या ट्रेंडमधे तसं काही दिसत नाही.

हेही वाचाः झारखंडमधल्या एक्झिट पोलच्या आकड्यांचा अर्थ काय?

भाजपला विरोधात बसावं लागणार

झारखंडची निवडणूक भाजपसाठी सगळ्यात जास्त प्रतिष्ठेची आहे. भाजपच्या रघुवर दास सरकारचं भवितव्य पणाला लागलंय. पण सुरवातीच्या ट्रेंडमधे भाजपच्या हातातून सत्तेचं समीकरण निसटताना दिसतंय. गेल्यावेळी ३७ जागा जिंकणारी भाजप २९ मतदारसंघात आघाडीवर आहे. स्वबळावर ‘अब की बार ६५ पार’ असा नारा देणाऱ्या भाजपच्या सत्तास्वप्नांना खूप मोठा झटका बसतोय. भाजपने ८१ पैकी ७९ जागांवर आपले उमेदवार उभे केलेत.

सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीतही भाजपने १४ पैकी मित्रपक्ष आजसूच्या एका जागेसोबत १२ जागा जिंकल्या होत्या. झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेसला प्रत्येकी एक जागा मिळाली. भाजपने जवळपास ६४ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य मिळालं होतं. जवळपास ५० टक्के मतं मिळवली होती. पण लोकसभेतलं यश भाजपला यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मिळवता आलं नाही.

मुख्यमंत्री रघुवर दास यांनाही जमशेदपूर पूर्व मतदारसंघातून अटीतटीच्या लढतीला सामोरं जावं लागतंय. स्वतःची जागा राखण्याच्या संकटाचा ते सामना करताहेत.

महागठबंधनचं सरकार बनणार

विरोधी पक्षांसाठी झारखंडची निवडणूक अस्तित्वाच्या लढाईची आहे. पण आतापर्यंतच्या ट्रेंडमधे महागठबंधनने आपला अस्तित्वाचा लढा सत्तेची बाजी जिंकण्यापर्यंत नेलाय. ट्रेंडनुसार, झारखंड मुक्ती मोर्चा २५, काँग्रेस १२ आणि राष्ट्रीय जनता दल ५ अशा ४२ जागांवर महागठबंधन आघाडीवर आहे. महागठबंधनचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार हेमंत सोरेन हे मुख्यमंत्री बनणार असं दिसतंय.

झामुमो, काँग्रेस आणि राजद यांच्या महागठबंधनने ८१ जागांवर उमेदवार दिले. लोकसभा निवडणूक काँग्रेसच्या नेतृत्वात लढवणाऱ्या महागठबंधनने विधानसभेची निवडणूक झामुमोच्या नेतृत्वात लढली. यात झामुमो ४३, काँग्रेस ३१ आणि राजदचे ७ उमेदवार आहेत. यात राजदने पाच जागांवर आघाडी घेत सगळ्यांना चकीत केलंय.

हेही वाचाः काँग्रेसने शेवटच्या टप्प्यात प्रियांकास्त्र बाहेर काढण्यामागची चार कारणं

किंगमेकर कुणीही नाही

लहान राज्य असलेल्या झारखंडमधे किंग बनण्यापेक्षा किंगमेकर कोण बनणार याला खूप महत्त्व आहे. २० वर्षांच्या झारखंडच्या राजकीय इतिहासात कुणीही स्वबळावर किंग बनू शकलं नाही. सलग पाच वर्ष सत्तेवर राहिलेल्या भाजपनेही आजसूच्या मदतीने सरकार बनवलं. यावेळीही विधानसभेत त्रिशंकू चित्र राहिल्यास छोटे, छोटे पक्ष, अपक्ष किंगमेकर होण्यासाठी मोर्चेबांधणीला लागले होते. 

आतापर्यंतच्या ट्रेंडनुसार, किंगमेकर बनण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असलेल्यांच्या आशा, अपेक्षांवर पाणी फिरवलं गेलंय. निवडणूक पूर्व महागठबंधनची स्वबळावर बहुमताकडे आगेकूच सुरू आहे.

हेही वाचाः 

शहरी भागात मोदी लाट असूनही भाजपची चिंता काही संपेना!

आदिवासीबहुल झारखंडमधे ओबीसी राजकारणाला अच्छे दिन

झारखंडच्या लिटमस पेपरवर मोदींचं यशापयश मोजावं लागणार

भाजपला सत्ता टिकवण्यासाठी कोयलांचल जिंकावं लागणार, कारण