बर्ड फ्लूनं देशभरातल्या १० राज्यांना आपल्या कवेत घेतलंय. आधीच कोरोना त्यात बर्ड फ्लू पुन्हा त्यामुळे टेंशन वाढत चाललंय. घाबरवून सोडणाऱ्या या बर्ड फ्लूच्या १९ व्या शतकातही नोंदी सापडतात. तर १८७८ मधे इटलीत पाणकोंबड्यांमधला प्लेग असं त्याचं वर्णन सापडतं. पण संसर्गाचा धोका असलेल्या पक्ष्यांना थेट मारायलाच लावणारा हा बर्ड फ्लू नेमका कसाय ते समजून घ्यायला हवं.
‘बर्ड फ्लू’ हा रोग दहा राज्यात पसरल्यामुळे सगळीकडे भीतीचं वातावरण तयार झालंय. या आजारात पक्ष्याच्या जवळपास सर्व अवयवांना इन्फेक्शन होतं. त्यामुळे त्यांचा मृत्यूही नक्की असतो. पक्ष्यांची लाळ, विष्ठा, नाकातलं द्राव यात वायरस असतो आणि त्यातून तो पसरतो. माणसं त्यांच्या संपर्कात आली तर त्यांनाही ‘फ्लू’सारखा आजार होतो, म्हणून त्याला ‘बर्ड फ्लू’ नाव देण्यात आलंय.
हा आजार नवीन नाही. १९ व्या शतकातही याच्या नोंदी सापडतात. १८७८ मधे इटलीत पाणकोंबड्यांमधला प्लेग असं त्याचं वर्णन सापडतं. १९५६ मधे शाफर या जर्मन शास्त्रज्ञाने या आजाराला कारणीभूत असणारा जंतू माणसात होणाऱ्या फ्लूसारखा असल्याचं दाखवून दिलं. तेव्हापासून त्याला पक्ष्यातला अतिसंसर्गजन्य फ्लू म्हणून ओळखलं जातं.
हेही वाचा: बर्ड फ्लू नव्या आर्थिक संकटाची नांदी ठरेल?
‘बर्ड फ्लू’ हा आजार वायरसमुळे होतो. बहुसंख्य सजीवांमधे जीनोम ‘डीएनए’चा बनलेला असतो तर फ्लूच्या वायरसचा जीनोम ‘आरएनए’चा असतो. प्रथिनापासून बनलेल्या कवचाच्या आत हा आरएनए असतो, फ्लूच्या वायरसमधे जीनोम एकसंघ नसतो तर त्याचे आठ तुकडे असतात. वायरसचे ए, बी, सी आणि डी असे चार प्रकार आहेत. त्यापैकी ए प्रकार पक्षी आणि प्राण्यांना संसर्ग करतो.
‘बर्ड फ्लू’चा वायरस या कॅटेगिरीत येतो. इतर प्रकारांची संसर्ग करण्याची व्याप्ती आणि तीव्रता कमी आहे. विषाणूत दोन प्रमुख प्रथिनं असतात. हीम अग्लुटीनीन आणि न्युरामिनिडेज. यापैकी पहिल्याचे अठरा तर दुसऱ्याचे अकरा प्रकार माहीत आहेत. यांच्या जोड्या मिळून या वायरसचे वेगवेगळे प्रकार बनतात. जसं एच१ एन१, एच५ एन१ इत्यादी.
या कॅटेगिरीतले सर्व वायरस प्रामुख्याने पक्ष्यांना संसर्ग करतात. हे संसर्ग दोन प्रकारचे असतात. पहिला म्हणजे अगदी सौम्य स्वरुपाचा आजार. यात कित्येक वेळा पक्षी आजारी असल्याचं कळतही नाही. पिसं गळणं, अंडी कमी होणं यासारखे परिणाम या प्रकारात दिसतात. दुसऱ्या प्रकारात आजार जास्त गंभीर स्वरुपाचा असतो. त्यात पक्ष्याच्या सर्व अवयवांना संसर्ग होतो आणि मृत्यूचं प्रमाण १०० टक्के असतं.
यातले बहुतांश वायरस फक्त पक्ष्यांनाच संसर्ग करतात. माणसात त्याचा संसर्ग क्वचित होतो. एका माणसातून दुसऱ्याला संसर्ग होण्याची उदाहरणंही दुर्मीळ आहेत. १९१८ मधे आलेली साथ एच१ एन१ प्रकारामुळे आली होती. त्यावेळी असा माणसातून माणसात पसरणारा वायरसचा प्रकार तयार झाला होता.
हेही वाचा: लसीचे साईड इफेक्ट अच्छे हैं
वायरसची वाढ व्हायची तर त्याला दुसऱ्या सजीवाच्या जिवंत पेशींची गरज असते. कुठल्याही सजीवाच्या पेशीवर इतर पेशींशी किंवा बाहेरच्या वातावरणाशी देवाण, घेवाण करण्यासाठी विशिष्ट दरवाजे असतात आणि ते विशिष्ट किल्लीनेच उघडतात. या किल्ल्या अर्थातच त्या सजीवांकडे असतात. त्यामुळे त्यांना हव्या असलेल्या वस्तूच योग्य वेळी पेशीच्या आत जाऊ शकतात.
वायरस चातुर्याने यातल्या एखाद्या किल्लीची नक्कल करून ते दार उघडतात. पेशीत शिरतात आणि तिचा कब्जा मिळवतात. पेशीत वाढतात तेव्हा त्यांच्या जीनोमच्या अनेक प्रतिकृती तयार होतात. ज्या नवीन होणाऱ्या वायरसमधे जातात; पण त्या होताना जीनोमच्या क्रमात काही बदलही होतात.
काही वेळा या बदलांमुळे या चोरीच्या किल्लीचा आकार बदलतो आणि तो वायरस दुसऱ्या एखाद्या प्राण्याच्या पेशीत जाऊ शकतो. हा वायरस त्या पेशीतून बाहेर पडल्यानंतर नेमका त्याच प्राण्याच्या संपर्कात आला तर अर्थातच त्या प्राण्यात जाऊन त्याच्या पेशींना संसर्ग करतो. अशाप्रकारे कोंबड्या, वटवाघळं, डुकरांना संसर्ग करत वायरसचा माणसात प्रवेश होतो.
हेही वाचा: कोरोना काळात मानसिक ताणतणावाचं नियोजन कसं करायचं?
सध्या मुंबई, घोडबंदर, दापोली, परभणी जिल्ह्यातला मुरुंबा इथं एच५ एन१ प्रकारचे नमुने सापडले तर बीडचा नमुना एच५ एन८ प्रकारचा आहे. म्हणजे संसर्गांचा उगम वेगळा आहे. एच५ एन१ हा प्रकार अति संसर्गजन्य प्रकारातला आहे. चीनच्या गुआंगडोंग भागात १९९६ मधे स्थलांतर करणाऱ्या पक्ष्यातून हंसामधे आला. तर भारत, बांगला देश, चीन, व्हिएतनाम, इजिप्त, इंडोनेशिया या देशात त्याने कायमचा मुक्काम ठोकलाय.
एच५ एन८ ची पहिली नोंद १९८३ ला आयर्लंडमधे झाली असली तरी तो २०१४ पासून चर्चेत आला. त्यावर्षी त्याने युरोपमधल्या अनेक देशांत हजेरी लावली. २०१७ मधे भारतात त्याची पहिली नोंद ग्वाल्हेर आणि दिल्लीच्या प्राणीसंग्रहालयात पाणकोंबड्यांमधे झाली. त्याचा माणसात संसर्ग झाल्याची फारशी उदाहरणं नाहीत.
हे दोन्ही प्रकार प्रामुख्याने पाणकोंबड्या, कोंबड्या, बदक, हंस अशा पक्ष्यांमधे संसर्ग करतात. अशा पक्ष्यांशी जवळून संबंध आलेल्या माणसांना त्यांचा संसर्ग होतो. एकाकडून दुसऱ्या माणसाला संसर्ग झाल्याच्या नोंदी नाहीत. मांस किंवा अंडी शिजवली की त्यातला वायरस नष्ट होतो. त्यामुळे शिजवलेल्या अन्नातून संसर्ग होण्याचा धोका नाही.
संसर्गाचा धोका असलेल्या पक्ष्यांना मारणं हा रोगाचा प्रसार थांबवण्याचा मार्ग आहे. ते केलं नाही तरीही पक्षी रोगाने मरणारच. त्यांच्याशी जवळचा संपर्क असलेल्या व्यक्तींनी असा पक्षी न हाताळणं, त्यांच्यापासून दूर राहणं ही खबरदारी घेतली पाहिजे. संसर्ग झालाच तर त्याच्यावर औषधं उपलब्ध आहेत. त्यामुळे न घाबरता वैद्यकीय सल्ला घेऊन ही औषधं घ्यावीत.
हेही वाचा:
‘केम छो’ची साद, गुजराती मतदार देईल का दाद?
त्यांच्या वर्णद्वेषाचा धिक्कार, आपल्या वर्णद्वेषाचा उदो उदो
शपथ घेतल्यानंतरही सोपा नसेल जो बायडन यांचा प्रवास
कोरोनानं नाही, तर आपले मजूर लॉकडाऊनमुळे मरतील?
इंटरनेटच्या समुद्रात गळ टाकून बसलेल्या हॅकर्सचं काय करायचं?
कोरोना: रँडच्या हत्येला कारणीभूत १८९७ चा कायदा पुण्यात पुन्हा लागू
(लेखक राष्ट्रीय कोशिका विज्ञान केंद्र, पुणे इथं मानद वैज्ञानिक आहेत)