गेल्यावर्षींच्या हिंसाचाराने भीमा कोरेगाव हा देशाच्या इतिहासातला एक नवा धडा म्हणून सगळ्यांना माहीत झालाय. व्हॉट्सअप युनिवर्सिटीत भीमा कोरेगावबद्दल गेल्या वर्षभरात रोज एक तरी स्टोरी पोस्ट होतेय. त्यामुळे भीमा कोरेगावभोवतीचं वास्तव एखादं गूढ बनून सगळ्यांसमोर येतं. म्हणून २०१ वर्षांपूर्वी भीमा कोरेगाव इथे नेमकं काय घडलं होतं, त्याचं आता महत्त्व काय हे जाणून घेणं गरजेचं झालंय.
वंचित, उपेक्षित समाजाला आत्मभान मिळवून देण्यासाठी इतिहासातल्या त्या समाजाच्या गतवैभवास, सुवर्णकाळास उजाळा द्यावा लागतो. अस्पृश्यांना स्पृश्यांच्या तुलनेत वाटणारा न्यूनगंड नाहीसा व्हावा, सामाजिक अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी त्यांना मानसिक बळ मिळावं, यासाठी एक साधन म्हणून नजीकच्या भूतकाळात घडलेल्या भीमा कोरेगाव संग्रामाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी उपयोग केला.
भीमा कोरेगावच्या लढाईत कोण जिंकलं, कोण हरलं यापेक्षाही अस्पृश्य समाज हा लढवय्या होता हे सिद्ध करणारा पुरावा तिथे विजयस्तंभावरील नामावलीत तत्कालीन कंपनी सरकारने कोरून ठेवला होता. या पुराव्याच्या सत्यतेसंबंधी स्वतःच्या लहरीखातर कोलांटउड्या मारणाऱ्या शास्त्री, पंडितांशी निरर्थक वाद घालण्याची गरज नव्हती. तसंच खुद्द ब्रिटिश गवर्नमेंटलाही या गतकालीन इतिहासाची जाणीव करून देऊन अस्पृश्य समाजावर लष्करी भरतीसाठी असलेली बंदी उठवण्यास भाग पाडण्याची डॉ. आंबेडकरांची इच्छा होती.
अर्थात ही एक प्रकारची इतिहासाची राबवणूक असली तरी असं करणारे, विशेषतः भीमा कोरेगाव संबंधात डॉ. आंबेडकर काही पहिले किंवा एकमेव नव्हते. आंबेडकरांनी भीमा कोरेगावला पहिल्यांदा भेट दिली त्याच काळात तत्कालीन प्रसिद्ध वक्ते आणि लेखक शिवराम परांजपे यांनी ' मराठ्यांच्या लढायांचा इतिहास' हा ग्रंथ लिहिला. त्यामधे कोरेगाव भीमाच्या युद्ध वर्णनात तेथील झुंज मराठी सैन्याने जिंकल्याचं नमूद केलंय. यामागे त्यांचाही उद्देश ब्रिटिश गुलामगिरीत आत्मभान गमावून बसलेल्या भारतीय समाजास त्याच्या गतकालीन वैभवशाली कालखंडाची आठवण करून देण्याचा होता. आणि अशा गोष्टी लढाऊ परंपरा सिद्ध केल्याशिवाय यशस्वी होत नाहीत, असा समज अद्यापही प्रचलित असल्याचं दिसून येतं. असो.
ब्रिटिशांच्या लेखी या जयस्तंभाचे महत्त्व काय आणि किती असावं? या प्रश्नाकडे बऱ्याच जणांचं दुर्लक्ष झालंय. मुळात हा स्तंभ उभारण्याची प्रेरणा इंग्रजांना का व्हावी याची चर्चाच आमच्या विद्वान इतिहास संशोधकांना करावीशी वाटली नाही. माझ्या मते, प्रचलित इतिहास खरा समजून त्यावर अंध विश्वास ठेवत त्याचं उपलब्ध पुराव्यांच्या आधारे पुनर्लेखन न केल्याचा हा परिणाम आहे.
इंग्लंडमधे व्यापारासाठी ईस्ट इंडिया कंपनी स्थापन झाली. त्यावेळी पूर्वेकडील व्यापारात या कंपनीवर अनेक संकटं कोसळली. त्यातलं पहिलं होतं आंबोयाना इथल्या बेटावर मसाल्याच्या व्यापारी स्पर्धेत डचांकडून झालेली इंग्रजांची कत्तल. १६२३ मधल्या या घटनेनंतर इंग्रजांनी अंबोयाना इथला आपला मसाल्याचा व्यापार गुंडाळला. त्यानंतर कंपनीच्या नोकरांवर जी काही जीवघेणी गंडांतरं आली, ती प्रामुख्याने हिंदुस्थानातच. यात १७५६ मधे कलकत्त्याला सिराजउद्दौलाच्या प्रेरणेने घडलेला अंधारकोठडीचा प्रकार उल्लेखनीय आहे.
त्यानंतर १७६३ मधे बिहारमधील पाटण्यात मीर कासीमने १५० इंग्रज कैद्यांची कत्तल केली. इंग्रज - म्हैसूर युद्धात टिपू सुलतानने मंगळूर इथे शरणागती पत्करलेल्या इंग्रज युद्धकैद्यांपैकी काहींना बंदी बनवले. काहींना ठार मारलं. यावेळी इंग्रजांच्या काही बायका त्याने आपल्या जनान्यात ओढल्याचा आरोपही इंग्रजांनी केला. इथे त्याच्या खरेखोटेपणाच्या चर्चेत जाण्याची गरज नाही.
मराठी सत्तेसोबत छत्रपती शिवाजी महाराजांपासून इंग्रजांवर हर्षामर्षाचे प्रसंग येतच होते. पन्हाळ्याला सिद्दीने वेढा घातला. त्यावेळी इंग्रजांनी सिद्दीला केलेल्या मदतीची शिक्षा शिवाजी महाराजांनी त्यांना दिली होती. परंतु शिवाजी महाराजांनी पकडलेले कैदी हे युद्धकैदी नव्हते, तसंच त्यांना कैदेव्यतिरिक्त काही त्रास दिल्याचं नमूद नाही.
पेशवाईच्या काळात १७७९ ला पहिलं इंग्रज आणि मराठा युद्ध झालं. यामधे इंग्रजांनी तळेगाव इथे शरणागती पत्कारली. या प्रसंगी आपल्यातले काही लोक ओलीस देऊन इंग्रजांनी आपल्या लष्कराची संभाव्य कत्तल टाळली.
त्यानंतर १८०४ मधे दुसऱ्या इंग्रज - मराठा युद्धात यशवंतराव होळकरांसमोर ब्रिटिश सेनानी मॉन्सन याच्यावरही असाच शरणागतीचा प्रसंग ओढवला. त्यावेळी त्याने आपल्या तोफा गमावण्याची नामुष्की स्वीकारली. बेपर्वाईने सैनिकांचा बळी देत आपला जीव वाचवला पण शरणागती पत्करली नाही.
या सगळ्या पार्श्वभूमीवर तिसऱ्या इंग्रज - मराठा युद्धातील भीमा कोरेगावच्या लढ्याकडे बघितलं पाहिजे. भीमा कोरेगावात भिडण्यापूर्वी पेशव्याच्या नेतृत्वाखाली मराठी सैन्याने खडकी आणि येरवडा इथे दोनवेळा इंग्रजांशी झुंज घेऊन पाहिली होती.
यामधे खडकी इथे ५ नोव्हेंबर १८१७ ला झालेल्या संग्रामात दोघांची बरोबरीच झाली. पेशव्याच्या तुलनेत अत्यल्प सैन्य असूनही इंग्रजांना आपला बचाव साधता आला. पेशव्याचा कारभारी मोर दीक्षित यात मारला गेला. पण केवळ त्याआधारे यात मराठी सैन्याचा पराभव झाल्याचा निष्कर्ष काढणं योग्य होणार नाही.
१७ नोव्हेंबर १८१७ ला येरवड्याच्या संग्रामातही निर्णायक विजय कोणाला मिळाला नाही. परंतु या लढाईनंतर पेशव्याने आपल्या राजधानीचं शहर, राहता वाडा सोडून दिला. त्यामुळे इंग्रजांना या लढाईत आपला विजय झाल्याचा डंका मिरवता आला.
यानंतर पेशवा आणि इंग्रज यांचा पाठशिवणीचा खेळ सुरु झाला. पेशव्याचा बेत कोणत्याही परिस्थितीत शिंदे, होळकर, भोसले या त्रिवर्गासोबत किंवा एकाशी हात मिळवत इंग्रजांसोबत मोठी लढाई घेण्याचा होता. त्यामुळे पाठीवर असलेल्या ज. स्मिथच्या सैन्याला हुलकावण्या देत तो उत्तरेत किंवा नागपूराकडे सरकण्याच्या बेतात होता. त्याचवेळी अनपेक्षितरित्या भीमा कोरेगाव नजीक पेशव्याचा इंग्रज फौजेसोबत सामना झाला.
या अनुषंगाने या संग्रामाची उपलब्ध संदर्भ साधनांवरून सिद्ध होणारी संक्षिप्त हकीकत माहीत करून घेतली पाहिजे.
३० डिसेंबर १८१७ ला पेशवा चाकण ते फुलगाव दरम्यान मुक्कामास आला. यावेळी पेशव्याच्या पाठीवर असलेल्या ज. स्मिथच्या नेतृत्वाखालील मुख्य इंग्रजी फौजेस बाजीरावाच्या सरदारांनी रस्त्यात अडथळे आणून रोखलं. इतिहासकारांच्या मते, त्रिंबकजी डेंगळेच्या रामोशी पथकांनी इंग्रज फौजेला रोखलं.
बाजीराव पुण्याकडे येत असल्याची बातमी संरक्षक फौजेचा पुण्यातला प्रमुख कर्नल बर याला मिळाली. त्याच्याकडे फारसा फौजफाटा नव्हता. त्यामुळे पेशव्याने पुण्यावर स्वारी केल्यास शहर संरक्षणार्थ म्हणून शिरूर इथल्या इंग्रजी ठाण्याकडे मदत मागितली. त्यानुसार कॅप्टन स्टाँटन हा एक बटालियन, अडीचशे स्वार आणि दोन तोफा घेऊन पुण्यातल्या ब्रिटिश फौजेच्या मदतीस निघाला. बटालियनमधे साधारणतः ४०० ते ८०० पायदळ शिपायांचा समावेश असतो. हे लक्षात घेता या संग्रामामधे इंग्रजी फौजेत हजार बाराशेपेक्षा अधिक लोकांचा भरणा नव्हता, असं म्हणता येतं.
इंग्रजांची फौज ३१ डिसेंबरच्या रात्री आठला शिरूरहुन निघाली. सकाळी दहाच्या सुमारास अविश्रांत २६ - २८ मैलांची मजल मारून कोरेगावाजवळ येऊन ठेपली. यावेळी पेशवा फुलगाव सोडून साताऱ्याच्या दिशेने निघायच्या बेतात होता. आणि त्यानुसार त्याची आघाडीची पथकं पुढे निघून गेली होती. शिरूरची इंग्लिश फौज कोरेगावी सामन्यास येईल याची त्यास बिलकुल कल्पना नव्हती.
पाठीवर ज. स्मिथ कधीही येण्याची शक्यता असताना शिरूरच्या फौजेसोबत कोरेगावजवळ लढत बसण्याची बाजीरावाची इच्छा नव्हती. त्याने सातारकर छत्रपतींना सोबत घेत पूर्वनियोजित साताऱ्याचा रस्ता धरला आणि पिछाडीच्या रक्षणाचा भार सेनापती बापू गोखल्यावर सोपवला.
या लढ्यात पेशव्याचं २० ते ३० हजार सैन्य सहभागी झाल्याचं सांगितलं जातं. पण हा आकडा मुळीच विश्वसनीय नाही. कारण पेशव्याची आघाडीची पथकं आधीच रवाना झाली होती. दुसरीकडे मुख्य फौज पेशवा आणि छत्रपती सोबत निघून गेली. त्यामुळे पिछाडी रक्षणार्थ आणि या संग्रामासाठी पाच, सात हजारांहून अधिक सैन्य बापू गोखल्याकडे असण्याची शक्यता नाही.
फुलगावाजवळ पेशव्याची फौज दिसताच कॅप्टन स्टाँटनने भीमेच्या तीरावर न जाता मागे कोरेगावातील तटबंदीचा आश्रय घेतला. पेशव्याची फौज पाय उताराने नदीपार करेल म्हणून जवळच्या दोन तोफा त्याने नदी उतार रोखण्याच्या उद्देशाने मांडल्या. परंतु त्याचा फारसा उपयोग झाला नाही. त्यामुळे बापू गोखल्याचं अरब पायदळ नदीपार होऊन कोरेगावात शिरलं. यावेळी इंग्रज सैन्याने मिळेल त्या स्थळाचा आश्रय घेत आपला बचाव साधण्याचा प्रयत्न केला.
अरबांच्या या चढाईत एका तोफेवरील मुख्य अधिकारी लेफ्टनंट चिशोल्म मारला गेला. त्याचं मुंडके विजयाचं प्रतीक म्हणून पेशव्याकडे पाठवण्यात आलं. याशिवाय या संघर्षात लेफ्टनंट स्वानस्टन, लेफ्टनंट कोनेलन आणि असिस्टंट सर्जन वुइंगेट जखमी झाले. त्यामुळे त्यांना गावातल्याच एका धर्मशाळेत ठेवण्यात आलं होतं. परंतु पेशव्याच्या सैन्याने तिथेही हल्ला चढवून सर्जन वुइंगेटला ठार मारलं. बाकीच्यांचीही तीच गत झाली असती परंतु कॅ. स्टाँटनने प्रतिहल्ला केला. धर्मशाळेचा कब्जा घेत आपल्या सहकाऱ्यांचे जीव वाचवले.
कोरेगावात एक गढी असून बचावार्थ तिचा ताबा घेण्याची बुद्धी इंग्रजांना झाली नाही. पेशव्याच्या सैन्याने ती गढी ताब्यात घेत तिथून इंग्रजांवर मारा केला. मात्र कोरेगावात इंग्रज सैन्याला कोंडून धरण्यापलीकडे मराठी सैन्याकडून फारशी कामगिरी घडू शकली नाही. माझ्या मते, याचं मुख्य कारण लढाईत प्रामुख्याने झालेला बंदुकीचा वापर हेच होतं. यामुळे ना मराठी सैन्याला सगळी इंग्लिश बटालियन कापून काढता आली, ना इंग्रजांना मराठी फौजेस पळवून लावता आलं.
बापू गोखल्याने आपल्या प्रयत्नांची शिकस्त केली. परंतु त्याला इंग्रजांचा चिवट प्रतिकार मोडून काढता आला नाही. त्यामुळे रात्र होताच कोरेगवातून आपलं सैन्य काढून घेत तो पेशव्याची पिछाडी सांभाळण्यास निघून गेला.
मराठी सैन्य कोरेगावातून निघून गेल्यावर कॅ. स्टाँटनने ती रात्र तिथे कशीबशी काढली. दुसऱ्या दिवशी पुण्याकडे न जाता शिरूरला निघून गेला. कारण आदल्या दिवशीच्या चकमकीत त्याच्या पथकाची खूप नासाडी झाली होती. अरबांच्या लागोपाठ हल्ल्यांनी एका क्षणाला तर स्टाँटन सोडता सगळ्यांचं मानसिक खच्चीकरण झालं होतं. त्यामुळे सैन्यासोबतच अधिकारीही शरणागतीची भाषा करू लागले होते. अशा स्थितीतही स्टाँटन ठाम राहिल्याने इंग्रजांचा लाजिरवाणा पराभव टळला.
निकालाच्या दृष्टीने या युद्धाकडे बघितल्यास मराठी सैन्याला विजयाची खूप गरज होती. खडकी, येरवड्याचे संग्राम निकाली निघाले नाहीत वर राजधानीही शत्रूंच्या हाती जाईल. बापू गोखल्यासारख्या लढवय्या सरदारास ती आपली मानहानी वाटली. त्यामुळे कोरेगावात इंग्लिश सैन्य कापून काढण्यासाठी त्याने प्रयत्नांची शिकस्त करून पाहिली. परंतु ब्रिटिश सैन्याचा चिवट प्रतिकार आणि स्टाँटनच्या अचल मनोधैर्यामळे त्यांना मात देता आली नाही.
शेवटी एकाच जागेवर खूप काळ गुंतून पडल्यास ज. स्मिथच्या मोठ्या सैन्यास आपल्यावर चालून येण्याची संधी मिळेल. त्यातून पेशव्याची पिछाडी उघडी पडेल, या धास्तीने सांयकाळ होताच त्याने हळूहळू कोरेगावातून आपली पथकं काढून घेण्यास सुरवात केली. रात्रीच्या सुमारास गाव रिकामं केलं.
मनुष्यहानीचे आकडे, मृत अधिकाऱ्यांच्या कापलेल्या मुंडक्यांची संख्या, गावावर राहिलेला अंती कब्जा यासारख्या मुद्द्यांच्या आधारावर इंग्रज तसंच पेशवे समर्थक या लढाईत आपापल्या पक्षाचा जय झाल्याचं सांगतात. परंतु अमुक एका पक्षाचा विजय झाला असं सांगणारं एकही विजयदर्शक चिन्ह उभय पक्षांपैकी एकाही बाजूला मिळालं नाही.
गोखल्याच्या अरबांनी चिशोल्मचं मुंडकं कापलं, हे खरंय. पण त्यामुळे इंग्रजांचं मनोधैर्य न खचता ते निकराने लढले, हे विसरून चालणार नाही. शिवाय मुख्य अधिकारी चिशोल्म नव्हता. हेही दृष्टीआड करता येणार नाही.
मराठी सैन्याने इंग्रजांना दिवसभर पाणी मिळू दिलं नाही, असंही विजयाचं एक परिमाण सांगितलं जातं. परंतु गावात कोंडलेल्या इंग्रजांना गावातल्या विहिरी तसंच घराघरात साठवलेल्या पाण्याचा लाभ अजिबात झालाच नाही, असं म्हणता येईल का?
इंग्रजी सैन्याच्या हानीचे आकडे देऊन आपला विजय झाल्याचं पेशवे पक्षीय सांगतात. परंतु याच लढाईतले मराठी सैन्यहानीचे विश्वसनीय आकडे कुठायंत?
मराठी सैन्याचा या ठिकाणी विजय झाला म्हणावं, तर त्यांना इंग्लिश सैन्याची सरसकट कत्तल करता आली नाही. किंवा त्यांना शरणागती घेण्यास भाग पाडता आलं नाही. शिवाय मुख्य अधिकाऱ्याला कैद किंवा ठारही करता आलं नाही. सैन्याची निशाणं, तोफा, बुणगाईतही लुटता आली नाही.
इंग्रजांच्या बाजूसही हेच लागू पडते. परंतु तरीही इंग्रजांनी या स्थळी स्मारक उभारलं. यामागचं मुख्य कारण म्हणजे हिंदुस्थानात राज्य कमावण्याचा उद्योग सुरू केल्यापासून बिहारमधलं पाटणा किंवा तळेगावसारखे मानहानीकारक प्रसंग इंग्रजांवर ओढवले होते. कोरेगाव भीमा इथे जवळजवळ याचीच पुनरावृत्ती होण्याची वेळ आली होती. तिथल्या सैन्याने आपलं मनोधैर्य खचू न देता शत्रूचा शतप्रतिशत मुकाबला केला. आपला यशस्वी बचाव साधल्याने असं स्मारक उभारण्याची इंग्रजांना प्रेरणा न व्हावी हेच मुळी अनैसर्गिक म्हणता येईल!
त्यामुळेच कोरेगाव येथे स्मारकावरील इंग्रजी मजकुराच्या पाटीवरच्या हेडिंगखालच्या पहिल्या ओळीतच 'THE COLUMN IS ERECTED TO COMMEMORATE THE DEFENCE OF CORIGAUM' अर्थात 'कोरेगावचा बचाव' हे शब्द कोरलेले आहेत. तसंच याच पाटीवरच्या एका मजकुरात 'triomphs' या सध्याच्या काळात संदिग्ध वाटणारा शब्द वापरलाय. सद्यकालीन संदिग्ध अशासाठी की या शब्दाचे victory, win, conquest, success, achievement, ascendancy, mastery इत्यादी अर्थ होतात. सध्या यापैकी victory, win, success हे जयसूचक शब्द ग्राह्य धरले जातात. परंतु प्रश्न इथेच उदभवतो की, मातृभाषा इंग्रजी असलेल्या इंग्रजांनी अशा संदिग्ध शब्दाची योजना मुळात केलीच कशासाठी?
मजकुराच्या सुरवातीच्या ओळीतच डिफेन्स शब्द वापरलाय. तर मग खालच्या एका ओळीत triomphs शब्द वापरण्याचं काही कारणच नव्हतं. याच स्मारकावरचा मराठी मजकूर बघितल्यास सुरवातीपासून शेवटापर्यंत यास जयस्तंभच म्हटलंय. तिथे असा काही शब्दांचा गोंधळ होत नाही.
माझ्या मते, इंग्रजी मजकूर बनवताना किंवा हे स्मारक उभारतानाच इंग्रजांना हे पक्कं ठाऊक होतं, की हे स्मारक आपल्या विजयाचं नसून यशस्वी बचावाचं प्रतीक आहे. त्यामुळेच त्यांनी इंग्रजी मजकुरात आरंभीच डिफेन्स शब्दाची योजना केली आणि सध्या ज्या triomphs शब्दावरून गोंधळ माजवला जातोय त्याचा त्यांनी achievement या अर्थाने वापर केलाय. कारण '... AT LENCTH ACHIEVED THE SIONAL DISCOMEITURE OF THE ENEMY AND ACCOMPLISHED ONE OF THE PROUDEST TRIOMPHS OF THE BRITISH ARMY IN THE EAST.. ' यावरून स्पष्ट होते कि, एकाच वाक्यात achive शब्दाची द्विरुक्ती टाळण्यासाठी triomphs हा समानार्थी शब्द वापरलाय.
भीमा कोरेगावच्या या स्मारकावरून सध्या महाराष्ट्रीयन समाजात अनेकानेक गैरसमज आहे. पसरवण्यात आलेत. आणि अजून पसरवणं सुरूच आहे. त्यामुळे या सगळ्यांचा प्रश्नोत्तराच्या स्वरुपात थोडक्यात आढावा घ्यायला हवा.
१) या लढाईत पेशव्याचा दारुण पराभव होऊन पेशवाईचा अंत झाला?
ही एक अनिर्णित लढाई होती. पेशव्याचा निर्णायक पराभव खुद्द पेशव्याने करून घेतला होता. यासाठी खडकी - येरवड्याच्या संग्रामादरम्यान निष्क्रियपणे वाया घालवलेला काळ कारणीभूत ठरला.
२) अस्पृश्य समाजाने तत्कालीन सामाजिक गुलामगिरीविरुद्ध पुकारलेलं बंड होतं?
याचा कुठलाही पुरावा उपलब्ध नाही. बॉम्बे इन्फन्ट्रीच्या या बटालियनमधे महार, मराठा आहेत तसंच उत्तर भारतीयही होते. तसा उल्लेख स्तंभावरच्या जखमी, मृतांच्या यादीवरून स्पष्ट होतं. तसंच बाजीराव पदभ्रष्ट व्हावा यासाठी कित्येक हिंदू, वैदिक मंडळींनी इंग्रजांशी आतून हातमिळवणी केली होती. यामधे पेशव्याचे दरबारी मुत्सद्दी, सरदार, आप्तदेखील सहभागी होते.
३) दुसरा बाजीराव हा स्वातंत्र्ययोद्धा तर त्याच्याविरुद्ध लढणारे देशद्रोही होते?
बिलकुल नाही. या न्यायाने मग सातारकर छत्रपती प्रतापसिंह, खुद्द बाजीरावाचा धाकटा भाऊ दुसरा चिमणाजी हे देशद्रोही ठरतात. ही गोष्ट इतिहास अभ्यासकांनी लक्षात घ्यायला हवी. हा लढा फक्त पेशवा आणि कंपनी सरकार किंवा इंग्रज यांच्यात झाली.
४) हा झगडा धार्मिक स्वरूपाचा होता का?
याचंही उत्तर नकारार्थीच मिळतं. इंग्रजांनी हिंदू, वैदिक वा मुस्लिमांच्या धार्मिक बाबीत कोणताही हस्तक्षेप केला नव्हता. उलट खडकी, येरवडा आणि कोरेगाव या तिन्ही ठिकाणी पेशव्याच्या वतीने जितकं शौर्य, मर्दुमकी अरब आणि गोसाव्यांनी गाजवली तितकी कोणी केली नसेल. या तिन्ही ठिकाणी ब्रिटिशांच्या तोफखान्यावर, पायदळ पलटणींवर ते बेलाशक तुटून पडल्याचे इंग्रजी इतिहासकारांनीही नमूद केलंय.
५) शरणागती न स्वीकारता यशस्वी बचाव साधला, याच कारणासाठी असं स्मारक उभारलं जातं का?
१८८० मधे अफगाणिस्तानातल्या Dubro या लष्करी ठाण्यावर शत्रूने हल्ला चढवला. ठाण्यातलं इंग्रजांचं सैन्य मारलं गेलं आणि फक्त मेजर सिडने जेम्स वॉडबी, इलाही बक्ष आणि प्रायव्हेट सोननाक ताननाक हे तिघेच उरले. तेव्हा शरणागती न स्वीकारता या तिघांनी जवळपास तीन तास सुमारे तीनशे शत्रू सैनिकांचा सामना केला. जवळचा दारुगोळा संपल्यावर हातातील बंदुकांचा लाठीसारखा वापरत ते शत्रूवर तुटून पडले, मारले गेले.
या तिघांच्या स्मरणार्थ तत्कालीन ब्रिटिश सरकारने मुंबईत युरोपियन जिमखान्याजवळच्या एका रस्त्याला वॉडबी रोड हे नाव दिलं. तसंच या तिघांच्या पराक्रमाचं वर्णन करणारा एक शिलालेख मुंबईतल्या अलेक्झांड्रा गर्ल्स हायस्कुलमधे ठेवण्यात आला.
एका विशिष्ट सामाजिक स्थितीत कोरेगाव भीमा इथल्या स्मारकाचा केवळ वंचित समाजास आत्मबलाचा प्रत्यय यावा यासाठी इतर साधनांच्या जोडीने वापर करण्यात आला. यासंबंधी विस्तृत चर्चा श्री. चांगदेव भ. खैरमोडे यांनी 'अस्पृश्यांचा लष्करी पेशा' या संदर्भ ग्रंथात केलीय. सर्वच अभ्यासूंनी ती आवर्जून वाचावी.
कार्यभाग साधल्यानंतर पराक्रमाची नवीन क्षेत्रं नव्या रूपात स्वरूपात उपलब्ध झाल्यावर अशा प्रतीकांची गरजही राहिली नव्हती. परंतु हे भान समाजाला तसंच स्वतंत्र्यानंतर भारत सरकारलाही राहिलं नाही.
शौर्यगाथांची भुरळ समाजमनास नेहमीच पडत आलीय. विशेषतः भारतासारख्या विविध जातीत विभागलेल्या देशात जातीय इतिहासाचं खूळ माजल्याने अशा शौर्यगाथांना जातीचं लेबल लागणं स्वाभाविक होतं. आणि तसं घडलंही. ही अनिष्ट बाब टाळण्यासाठी भारत सरकारने स्वातंत्र्योत्तर काळात घडून आलेल्या भारत - पाक, भारत - चीन तसेच प्रसंगोत्पात इतरत्र देशांत जाऊन भारतीय सैन्याने बजावलेल्या कामगिरीचा विस्तृत आणि साधार इतिहास उपलब्ध करून देणं आवश्यक होतं.
त्यामुळे सामाजिक शांततेचा भंग करण्यासाठी जातीय कंड सुटलेल्या विषवल्ली मूलतः खुडल्या असत्या. अजूनही जुन्या पद्धतीने सगळं काही सुरू राहणार असेल, तर नजीकच्या काळात असा इतिहास उपलब्ध होऊन सामाजिक शांतता सलोखा जपला जाईल अशी आशा आहे.
(लेखक इतिहासाचे तरुण अभ्यासक असून लोकप्रिय ब्लॉगर आहेत.)