सदाशिवराव पेशव्याला नानासाहेबांनी कधीही निर्णय स्वातंत्र्य दिलं नाही. त्यामुळेच पानिपत युद्धात तो अपयशी झाला की नाही हे नीट सांगता येणार नाही. पानिपतचा जन्मही एकप्रकारे नानासाहेबांमुळेच झाला असं म्हणता येईल. युद्धात सदाशिवरावानं दाखवलेल्या धाडसासाठी मात्र त्याचं कौतुक केलंच पाहिजे.
लढाईतलं संशयास्पद वीरमरण एखाद्याला इतिहासात अजरामर करतं. विधानाची प्रचीती सदाशिवरावभाऊच्या चरित्रावरून येते.
मस्तानी सोबत ज्यांचं नाव जोडलं जातं त्या थोरले बाजीराव पेशव्यांचा धाकटा भाऊ चिमाजी अप्पा. या चिमाजींचा सदाशिवराव हा एकुलता एक मुलगा. सदाशिवराव वयाच्या अवघ्या तिसाव्या वर्षी पानिपतच्या रणभूमीवर गारद झाला. याच्या मृत्यूनंतर त्याचे तोतये निर्माण झाले आणि त्यांनी पेशवाईच्या इतिहासात स्थान मिळवलं. या तोतयांचा तपास कधीही पूर्णपणे झाला नाही. त्यामुळे या तोतायांतला एकजण खरा सदाशिवराव होता का? हा प्रश्न आजही अनुत्तरीत आहे.
वयाच्या अवघ्या १० व्या वर्षी सदाशिवरावांना म्हणजेच भाऊला पितृ - मातृ शोक सहन करावा लागला. त्यानंतर त्यांचं शिक्षण, संगोपन आजी राधाबाई आणि थोरला चुलत भाऊ नानासाहेब पेशवे यांच्या देखरेखीखाली झालं. पेशव्याच्या कुटुंबात त्यावेळी भाऊखेरीज जनार्दन, रघुनाथ हे सख्खे भाऊ तसंच मस्तानीचा मुलगा, सदाशिवरावचा सावत्र बंधू समशेरबहाद्दर अशी पोरसवदा पुरुषमंडळी होती.
या सगळ्या भावंडात सदाशिवरावचाच वयानं मोठा होता. त्यामुळे थोरल्या बाजीरावांनंतर गादीवर बसलेल्या नानासाहेब पेशव्याला त्यातल्यात्यात सदाशिवरावाचाच आधार मिळण्यासारखा होता. पण नानासाहेबांचं तरुण वय आणि आरंभीची तडफ यामुळे त्यांना आपल्या भावांची व्यवहारात मदत घेण्याचं प्रयोजनच पडलं नाही. पण यामुळं पेशव्यांनी भाऊच्या व्यावहारिक आणि राजकीय शिक्षणाची हेळसांड होऊ दिली नाही.
घरात वडिलधाऱ्यांचा म्हणावा तसा धाक नसल्यानं पेशवे पदाला खूप महत्व होतं. एकाच भावाला सत्ता प्राप्त झाल्यानं पेशवे घराण्यातल्या या सख्ख्या, चुलत, सावत्र भावांचा परस्परांशी सामान्यतः असावा तसा बंधुभाव असला तरी परस्परांविषयी मत्सर, संशय इ. भावना यांचा उद्गम बालपणातच झाल्याचं उपलब्ध पत्रव्यवहारावरून दिसून येतं. भाऊ राघोबादादा म्हणजे रघुनाथरावांपेक्षा मोठा असला तरी राघोबादादा त्याच्यापासून थोडा फटकून वागायचा. त्याचप्रमाणे जनार्दन हाही राघोबादादाचा सख्खा मोठा भाऊ. त्याच्याशीही या पठ्ठ्याचं पटत नसल्याचं उपलब्ध पत्रव्यवहारातून दिसून येतं.
पुढे जनार्दन अल्पायुषी झाला आणि घरात नानासाहेब पेशव्यांसोबत सदाशिवरावभाऊ आणि राघोबादादा हेच कर्ते पुरुष उरले. समशेरबहाद्दर हा पेशव्याचा औरस पुत्र आणि बुंदेलखंडातल्या बाजीरावाच्या खासगत जहागिरीचा वारस होता. पण नानासाहेब पेशव्याने त्याला त्याच्या जहागिरीच्या कारभारावर कधीही पाठवलं नाही. त्याला राघोबादादा, सदाशिवरावभाऊ यांच्याप्रमाणे स्वतंत्र मोहिमाही दिली नाही. समशेरबहाद्दर याला नेहमी सरदाराप्रमाणेच वागणूक दिली गेली. पेशवे दरबारचा सरदार, वकील या भूमिका समशेरने बजावल्या.
पेशवाई प्राप्त झाल्यावर नानासाहेबांनी सुमारे दहा वर्ष एकहाती कारभार केला. या दहा वर्षात भाऊ मोठा झाला. राजकारण, मोहिमांत भाग घेण्याइतपत भाऊचं वय झालं. पण पेशव्यानं त्याच्यावर स्वतंत्र मोहिम न सोपवता नेहमी त्यांस आपल्या अधिकाराखाली वागवल्याचं दिसून येतं.
कर्नाटक प्रांती काही वेळा सदाशिवरावभाऊने स्वतंत्रपणे स्वाऱ्या केल्याचं जरी इतिहासात नमूद असलं तरी या मोहिमांचा खरा सेनापती, सूत्रधार नानासाहेब पेशवाच होता. त्याच्या आदेशाखेरीज भाऊला कोणताही निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य कधीच मिळालं नाही आणि ही स्थिती प्रत्यक्ष पानिपत युद्धाच्या दिवसापर्यंत कायम होती.
पेशव्याच्या फडावरील अधिकारी, सरदार म्हणून भाऊने भूमिका पार पाडल्या असल्या तरी या जबाबदाऱ्या पार पाडण्यास तो मनापासून राजी नव्हता. उलट त्याच्या बापाला म्हणजेच थोरल्या बाजीरावांना पेशवाईत जे स्थान आणि पद होतं ते प्राप्त करण्याचा त्याचा उद्देश होता. नानासाहेबांना याची थोडीबहुत जाणीव असल्यामुळे बहुतेक त्याने भाऊला याकाळात आपल्या दाबावाखाली ठेवलं असावं असाही तर्क करता येतो.
हेही वाचा : पानिपत : प्रत्यक्षात लढलं कोण? सिनेमात कौतुक कुणाचं?
छत्रपती शाहू मरण पावल्यावर ताराबाईनं छत्रपतीपदावर राजाराम याला बसवलं. हा राजा तसा नामधारीच होता. त्यामुळे त्याला हाताशी धरून सातारकर राजमंडळ निष्प्रभ करत पेशव्यांची सत्ता लौकिक आणि व्यवहारात वाढवण्याचं कार्य भाऊने रामचंद्र सुखठणकरच्या सल्ल्यानं केलं. इतिहासात स्वतंत्रपणे म्हणता येईल अशी त्याची ही एकमेव कामगिरी असावी.
भाऊच्या या कर्तबगारीमुळे पेशवाही पुढील काळात त्याच्या विषयी साशंक राहू लागला. ताराबाईनं रामराजाला कैद केल्यानंतर निर्माण झालेल्या राजकीय गोंधळाच्या स्थितीत दोघांमधलं वैर, द्वेष भाव लोकचर्चेत उघड झाला.
याच काळात भाऊने कोल्हापूरची पेशवाई प्राप्त करून घेण्याची खटपट केली होती. परंतु नानासाहेबांनी त्याची समजूत घालून आपलं कारभारीपद त्याला सोपवलं आणि कोल्हापूरची पेशवाई आपल्या पदरात पाडून घेतली. भाऊ पेशव्याचा मुख्य दिवाण झाल्याने पेशव्यांचा तीन पिढ्यांचा कारभारी पुरंदरे घरी बसला. ज्याचा परिणाम छत्रपती आणि पेशवे तसंच हिंदुस्थान आणि दख्खनच्या राजकारणावर घडून आला. ज्याची अद्याप कोणत्याही इतिहासकाराने चिकित्सा केलेली नाही.
नानासाहेब पेशव्यांच्या बाहेरच्या आणि कौटुंबिक राजकारणामुळे इसवीसन १७५० नंतरचा कालखंड राजकीय इतिहास अभ्यासात अतिशय गोंधळात टाकणारा विषय बनला आहे. या काळात घरगुती, दरबारी स्पर्धेने पेशवा गोंधळून जाऊन त्यानं ऐन वेळी अनेक घातकी निर्णय घेतले. या घातकी निर्णायांमुळे पेशवाईच संपुष्टात आली.
नानासाहेबांनी सदाशिवरावभाऊला आपल्या दिवाणीवर घेत राघोबादादाकडे सेनापतीपद सोपवलं. परिणामी या तीघांत राजकीय वर्चस्वासाठी शीतयुद्ध सुरु झालं. भाऊ आणि राघोबादादा या वेळी पेशवेपदासाठी नव्हे तर पेशव्याच्या मुख्य कारभारीपदासाठी आपसांत स्पर्धा करत होते हीच यातली जमेची बाजु. या काळात नानासाहेब थोडाफार विलासात मग्न झाला आणि अधूनमधून आजारी पडू लागला. पण तुर्की बादशहांप्रमाणे भोगविलासात पूर्णपणे न बुडाल्यानं सरदार मंडळी, मुत्सद्दी यांच्यावर त्याचा वचक होता सैन्यावरही हुकुमत असल्यानं सदाशिवराव आणि राघोबादादाची स्पर्धा कागदावरच राहिली.
पेशव्याच्या या घरगुती राजकारणात आणखी एका व्यक्तीची याच काळात एन्ट्री झाली आणि ती म्हणजे गोपिकाबाई! गोपिकाबाई ही नानासाहेब पेशव्यांचे पत्नी. तिला घराबाहेरचं राजकारण कितपत समजत होतं हा वादाचा मुद्दा होऊ शकतो. पण घरगुती राजकारणात मात्र तिचा हात कोणीही धरू शकत नव्हतं. अगदी इतिहासकारांनी बदनाम केलेली आनंदीबाईही! आपल्या नवऱ्याची स्थिती आणि दिरांची चलती पाहून गोपिकाबाईंनी आपल्या जेष्ठ मुलाला विश्वासराव याला व्यवहारात पुढं केलं. सिंदखेड, उदगीर, पानिपत मोहिमांत विश्वासराव येतो तो यामुळेच.
हेही वाचा : पेशवाईच्या स्वैराचाराला 'फटका'वणारा तमासगीर कीर्तनकार
इसवीसन १७५० नंतर दिल्ली दरबारातलं राजकारण पूर्णपणे बदललं. या बदलत्या राजकारणात पेशव्यांचा हिंदुस्थानातला मुतालिक जयाजी शिंदे, मल्हारराव होळकरासह सहभागी झाल्याने नानासाहेब पेशवाही यात ओढला गेला. विशेष म्हणजे दिल्लीची ब्याद अंगावर घेण्यापेक्षा शाहू छत्रपतीपासून वाटणीस आलेला प्रयागचा सुभा ताब्यात घेण्याची नानासाहेबाला विशेष उत्कंठा होती. तसंच यानिमितानं काशी वगैरे तीर्थक्षेत्रेही सोडवण्याची त्याची खटपट होती. हा सर्व प्रदेश सादतखान, सफदरजंग आणि नंतर सुजाउद्दौला या अयोध्येच्या नवाबांच्या ताब्यात असल्याने नानासाहेब पेशवा त्यांच्याशी कधी गोडीगुलाबीने तर कधी शस्त्रबळाच्या धाकाने वाटाघाटी करत राहिला.
इसवीसन १७४२ मध्ये ज्ञानवापी मशीद पाडून तिथे पुन्हा विश्वेश्वराचे मंदिर उभारण्याची मल्हारराव होळकराची इच्छा होती. पण त्या क्षेत्री मुस्लिमांचं वर्चस्व असल्यानं पंच द्रविड ब्राह्मणांनी यास मोडता घातला. शिवाय हिंमत करून एकदम हा सर्वच प्रदेश जिंकून घेण्याची होळकर किंवा नानासाहेब पेशव्याची तयारी नसल्यानं प्रकरण इतक्यावरच मर्यादीत राहिलं. काशी प्रयाग संबंधी एवढी चर्चा करण्याचं कारण म्हणजे, या प्रयाग तसंच बंगाल, बिहार प्रांतावरील स्वारीमुळेच नानासाहेबाने एकप्रकारे पानिपतला जन्म दिला असं ऐतिहासिक पत्रांवरून आता सिद्ध होतंय.
यमुनेच्या पूर्व किनाऱ्यावर वसलेल्या रोहिलखंडातले रोहिले, पठाण, नजीबखान आणि सुजा यांच्यातले परस्पर संबंध, भेद आणि दिल्लीतले त्यांचे हितसंबंध, शाही परिवारांचा यांच्यापैकी कोणत्या मंडळींकडे ओढा आहे, अब्दालीशी तह करण्यास किंवा त्याचे हल्ले थांबवण्यास कोण उपयुक्त ठरु शकेल हे नानासाहेबाला कधी समजलंच नाही.
इसवीसन १७५० नंतर पेशवे एकदाही हिंदुस्थानात गेले नाहीत म्हणून त्यांना हे समजलं नाही, असं म्हणता आलं असतं. पण खुद्द राधोबा दादानं दोन वेळा हिंदुस्थानावर स्वारी केली होती. तेव्हाही त्याला याचं साधं आकलन झालं नाही याचं आश्चर्य वाटतं.
पेशव्यांची एकंदर कार्यपद्धती पाहता त्यांना थोडंफार राजकारण करता आलं असलं तरी राज्यकारभार करणं हे त्यांच्या आवाक्याबाहेरचं होतं असं दिसून येतं. राज्य करणाऱ्याकडे जी दृष्टी लागते ती पेशव्यांकडे बिलकुल नव्हती. हा त्यांच्या धर्मशिक्षणाचा म्हणजेच वैदिक धर्माचाच प्रभाव होता. त्यामुळे हिंदुस्थानात मराठी सत्तेला जे थोडंफार महत्व प्राप्त झालं ते शिंदे - होळकर या दोन हिंदू सरदारांमुळेच असं माझं मत आहे.
रघुनाथरावाची इतिहासप्रसिद्ध अटक स्वारी झाली. अब्दालीशी भांडण काढून त्यानं आणखी एक स्वारी करण्याची शक्यता निर्माण केली. पण त्याऐवजी त्यानं पटणा बिहारकडे जावं असा पेशव्याचा आग्रह होता. रघुनाथरावाने युक्तीनं ती जबाबदारी दुसऱ्यावर म्हणजे शिंद्यांवर ढकलली.
शिंद्यांकडे पेशव्याची मुतालकी असल्याने त्यांना आपल्या पदास अनुसरून बळकट सैन्य पदरी ठेवणं भाग होतं आणि त्यामुळेच एकहाती मोहिमा पार पाडण्याचं सामर्थ्यही त्यांना प्राप्त झालं. यामुळे इसवीसन १७५० नंतर हिंदुस्थान वा दख्खनमधल्या प्रत्येक मोहिमेत शिंद्यांचा सहभाग ही एक अनिवार्य बाब बनल्याचं दिसून येतं.
हेही वाचा : भीमा कोरेगावमधे २०१ वर्षांपूर्वी नेमकं घडलं काय?
यामुळेच राघोबादादा दिल्लीहून परत येताना आणि शिंदे दख्खनमधून हिंदुस्थानात जात असताना पेशव्याने शिंद्यांवर पंजाबच्या बंदोबस्ताची आणि बंगाल स्वारीची जबाबदारी टाकून दिली. या कामगिरीत अपयश येऊन दत्ताजी बुराडी घाटावर अब्दाली, सुजा आणि नजीब यांच्या हल्ल्यात मारला गेला. जनकोजी जखमी झाला. शिंद्यांच्या या वाताहतीस इतिहासकार होळकरांना जबाबदार मानत असले तरी उपलब्ध माहितीवरून शिंद्यांना मुळी तिथले राज्यकर्त्यांचं आकलन न झाल्यानं त्याच्यावर ही आपत्ती ओढवल्याचं दिसून येतं.
यानंतर होळकरांचं अब्दाली आणि त्याच्या मित्रांशी युद्ध झालं. यात उभयपक्षी बरोबरी होऊन अखेर दि. १३ मार्च १७६० रोजी शांतता करार झाला. पण त्याच्या दुसऱ्याच दिवशी सदाशिवरावाची हिंदुस्थान प्रांती नियुक्ती झाल्यानं उपरोक्त करार फिस्कटून प्रकरण मूळ पदावर आलं.
पानिपत मोहिमेआधी सदाशिवरावने सिंदखेड, उदगीर इथं निजामाविरुद्ध जय मिळवला होता. ही त्याची अब्दाली विरुद्ध लढण्याकरता निवड करण्यासाठीची पात्रता मानण्यात आली. या मोहिमांचे विश्लेषण करू पाहता एक सेनानी म्हणून त्याचा फार मोठा रोल असल्याचं यात दिसून येत नाही. सिंदखेडला दत्ताजी शिंदे तर उदगीरला राघोबादादा यांनी निजामाला चेपल्याचं उपलब्ध पुराव्यांवरून स्पष्ट होतं.
यावरून भाऊ हा पेशव्याहून सरस तर दादापेक्षा कमी प्रतीचा सेनानी असल्याचं सिद्ध होतं. तरीही पेशव्याने त्याची हिंदुस्थान प्रांती जाण्याकरता निवड केली. ती अब्दालीशी भिडण्याकरता नव्हे तर बंगाल, बिहार वा प्रयागकडे जाण्यासाठी!
पानिपत मोहिमेत भाऊने इतरांना पाठवलेली पत्रं उपलब्ध असली तरी भाऊला इतरांनी पाठवलेली पत्रं तितकीशी उपलब्ध नाहीत. त्यामुळे वरचं विधान साधार सिद्ध करणं अवघड असले तरी अशक्य मात्र नाही. आग्रापर्यंतच्या त्याच्या प्रवासाचा मार्ग आणि गोविंदपंत तसंच इतरांना पाठवलेली पत्रं पाहता भाऊचा बेत इटावा किंवा त्या आसपास यमुना पार करून जाण्याचा होता. तो अब्दालीला नव्हे तर सुजाला दबवण्यासाठी चालला होता असं दिसून येतं. पण अब्दाली आरंभापासून यमुनेच्या पूर्व किनाऱ्यावर तळ ठोकून राहिल्यानं भाऊला हे साधता आलं नाही आणि तो तसाच पश्चिम किनाऱ्यानं दिल्लीला गेला.
इथं लक्षात घेण्यासारखी महत्त्वाची बाब म्हणजे, आग्रा येईपर्यंत अब्दालीशी सामना करावा लागेल अशी भाऊ वा त्याच्या सल्लागारांना कल्पनाही नव्हती. त्यांच्या मते नेहमीसारखा अब्दाली उन्हाळ्यात मायदेशी रवाना होईल आणि त्याच्या गैरहजेरीत आपला कार्यभाग साधून घेता येईल.
आगऱ्याहून दिल्ली आणि दिल्ली मुक्कामातल्या त्याच्या सगळ्या राजकीय हालचाली या नानासाहेबाच्या आज्ञेनं झाल्या. अतिरिक्त सैन्य ठेवणं न ठेवणं तसंच तह, करार आणि दरबारातली महत्त्वाची पडे कोणाला द्यायची, न द्यायची हे सर्व निर्णय तातडीने घ्यायचे असले तरी पेशव्याच्या संमतीविना घेणं शक्य नव्हतं आणि याचाच फायदा शत्रूपक्षाने अचूक घेतला.
हेही वाचा : शनिवारवाडा १८१८: पेशवाई बुडाली त्याची गोष्ट
नानासाहेब पेशव्याची अदूरदर्शीता अशी की त्याने सुजाला वजिरी देण्याचा भाऊला आदेश दिला. ज्याचा परिणाम मराठी पक्षाच्या दृष्टीने हानीकारकच ठरला. सुजाकडे वजिरी गेल्याने त्याच्यात आणि अब्दालीत तंटे झाले नाहीत किंवा त्याने उभयपक्षांत तहही घडवून आणला नाही. उलट असा तह घडून येणं त्याच्याकरता हानिकारक होतं. कारण अब्दालीकडून पेशवा मोडला गेला नसता तर मराठी सैन्याचं त्याच्या राज्यावर येणार हे उघड दिसत होते. राजकारणातली ही बाब जशी पेशव्याला कळली नाही तशीच इतिहासकारांनाही. आणि ते नजीबला बडवत सुटले.
वस्तुस्थिती अशी होती की याक्षणी मराठी पक्ष मोडल्यास त्याचा सर्वधिक फायदा फक्त सुजालाच होणार होता. इकडे सुजाकडे वजिरी गेल्याने आधीचा वजीर गाजीउद्दिन नाराज होऊन जाट राजाकडे आश्रयार्थ निघून गेला. दिल्ली सोडून पानिपतला जाताना भाऊने स्वतःहून किंवा पेशव्याच्या आज्ञेनं केलेली अक्षम्य चूक म्हणजे ज्या तुर्की बादशाही रक्षणासाठी तो हिंदुस्थानात आला होता त्या तुर्की बादशाही परिवारातला एकही प्रतिनिधी त्याने स्वारीत सोबत घेतला नाही. म्हणजे लौकिकात हे युद्ध पेशवा आणि अब्दाली यांच्यात झाले. बादशाही संरक्षक पेशवे आणि अफगाण लुटारू यांच्यात नव्हे!
दिल्लीहून भाऊ कुंजपुऱ्यास गेला. तिथल्या गढीला ताब्यात घेऊन गोविंदपंतास पत्रात लिहिल्याप्रमाणे तिथून यमुना पार न करता, तो तसाच पुढे कुरुक्षेत्राकडे निघाला. यामागे शिखांची मदत मिळवण्याचा त्याचा हेतू होता. पलीकडच्या काठावर शत्रू प्रबळ होता. तो तसाच किनाऱ्याने वर पुढे आल्यास शिखांची मदत प्राप्त होणार नाही अशी कसलीच शंका भाऊच्या मनात आली नाही.
इथं तुलनेकरता दादाची अटकस्वारी पाहिली तर त्यात पठाण, रोहिले, तुर्क, शीख या सर्वांची मराठी पक्षास सक्रीय मदत होती. भाऊच्या वेळी कोणीच नाही. असं का झालं ? हा प्रश्न अद्याप एकाही इतिहास अभ्यासकाला पडलेला नाही. कुंजपुरा ते कुरुक्षेत्राच्या निम्म्या वाटेवरून अबाउट टर्न करून पानिपत. असा भाऊचा प्रवास झाला. कारण कुरुक्षेत्राच्या नजीक पोहोचल्यावर बागपतला अब्दाली यमुनापार झाल्याची बातमी आली. तेव्हा योजलेले सगळे बेत रद्द करुन शत्रूच्या तंत्रानं वागणं भाग पडलं!
यानंतरचा इतिहास सर्वांच्या परिचयाचा आहे. यापुढील घटनांच्या अधिक विवेचनाकरता इच्छुकांनी माझं 'पानिपत असे घडले' हे पुस्तक वाचून बघावं अशी मी शिफारस करतो. फक्त त्यामध्ये न आलेला, पाच सहा वर्षांपूर्वी मला ज्ञात नसलेला तसेच अनावश्यक वाटलेला भाग मी इथं मांडतो.
नाना फडणवीस आपल्या आत्मकथनात भाऊ हा शहनवाजखान आणि भवानीशंकर या दोन सल्लागारांच्या तंत्राने चालत असल्याची माहिती मिळते. आता यांच्यापैकी शहानवाजखान कोण हे समजलेलं नाही. पण एका उल्लेखावरून भवानी शंकर हा सुजाचा वकील होता अशी माहिती मिळते. जर हा उल्लेख खरा असेल तर मग भाऊच्या एकूण शहाणपणाविषयीच प्रश्नचिन्ह उपस्थित होतं. असो.
पानिपतच्या तळावर अडकल्यानंतर सुटकेचे शक्य ते प्रयत्न भाऊने करून पाहिले. तहाची देखील जोरदार वाटाघाट करून पाहिली. ही सगळी धडपड त्याने सुजासारख्या विश्वासघाती मित्रावर विसंबून केल्याने व्यर्थ गेली.
आपल्याकडच्या विशेषतः मराठी इतिहासकारांनी सुजाचे एवढे लाड, कोडकौतुक का केले आहे हे मला एक समजत नाही. केवळ तो इराणी, शिया पंथी मुसलमान म्हणून? की ऋग्वैदिक कालीन वैदिक धर्मीय टोळीचा वंशज म्हणून? सुजा वारंवार दगाबाजी करतोय हे स्पष्टपणे दिसत असूनही इतिहासकार त्याच्या गुणवर्णनात मग्न दिसतात.
सदाशिवरावची राजकीय आणि लष्करी आघाडीवरची कामगिरी पाहता त्याची योग्यता फारतर समशेरबहाद्दरएवढी असल्याचं म्हणता येतं. याचं कारण म्हणजे त्याला दिलेला निर्णयस्वातंत्र्याचा अभाव. ज्यामुळे त्याचं यश अपयश कधीही धवल राहू शकलं नाही. महसूल विभागात त्याची कामगिरी उत्तम असल्याचं सांगितलं जातं. परंतु पेशव्याच्या कर्जाची रड मात्र त्याच्या करड्या कारभारातही मिटली नसल्याचं दिसून येतं. अर्थात, पेशव्याचं कर्जप्रकरण ऐच्छिक किती आणि अनैच्छिक किती हा वेगळ्या विषयाचा मुद्दा आहे.
पेशव्याचा दिवाण आणि सल्लागार म्हणून त्यानं पेशव्याच्या आदेशाने इब्राहीमखान गारदीस आपल्या लष्करात दाखल करून घेतलं. पण या फ्रेंच प्रशिक्षित पथकाच्या उणीवा त्याच्या लक्षात आल्या नाहीत. अर्थात हा दोष त्याला फारसा देता येत नाही. कारण, फ्रेंच युद्धतंत्र सदोष असल्याचे पुढील काळात महादजी शिंदे सारख्या लढवय्यासही उमगलं नाही तिथे भाऊसारख्या पार्टटाईम सेनानीला दोष का द्यावा!
पानिपतावर सदाशिव मारला गेला कि नाही, हा तसा अद्यापही विवादास्पद, अनुत्तरीत असलेला प्रश्न आहे. पण एवढं मात्र निश्चित कि, त्या युद्धात भलेही त्याने आडमुठेपणाचे डावपेच वापरून का होईना ज्या तऱ्हेने अब्दालीसोबत झुंज दिली, ती खरोखर कौतुकास्पद आहे. पेशव्याचा एक पार्ट टाईम सेनानीही अब्दालीला खडे चारू शकतो, त्याच्या तोंडचं पाणी पळवू शकतो ही उघड दिसणारी बाब देखील मान्य करण्याचं धाडस आमच्या इतिहासकारांना झालं नाही. ही म्हटले तर खेदाची बाब आहे.
हेही वाचा :
राजकारणाची भाषा आणि भाषेचं राजकारण
पेशवाईला वंदा किंवा निंदा, त्याआधी हे वाचा